श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “गाड़ी बुला रही है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 हं आता ज्याचं या 7. 32 च्या सीएसटी जलदगती लोकलचे रिझर्वेशन, पास आहे ते आधी या डाव्या बाजूने आत येतील… ही लोकल इथूनच सुटणारी असल्याने इथं एकदा सगळ्या सीट भरल्यावर कुणालाही उभ्याने प्रवास करण्यास परवानगी नाही.. या मोकळ्या जागेचा हक्क पुढील येणाऱ्या प्रत्येक स्थानकातील प्रवाशांचा असेल… या घोषणेला जो कोणी अयोग्य रित्या प्रतिसाद देईल.. नियमबाह्य वागेल तो प्रवासी या लोकल मधून जो पर्यंत खाली उतरणार नाही तो पर्यंत ही लोकल हे स्थानक सोडून पुढे जाणार नाही. याची समस्त प्रवाशांनी नोंद घ्यावी.. आणि यासाठी जो काही विलंब झालाच तर त्याची त्या आगांतुक प्रवाशाची जबाबदारी असेल.. रेल्वेप्रशासन या दिरंगाई ला जबाबदार असणार नाही… लोकल दर पाच मिनिटाला इथून सी. एस. टी. कडे जात असते… प्रवाशांनी आधी ज्याचं रिझर्वेशन असेल आधी त्याला लोकलच्या डब्यात जाऊ द्यावे.. रिझर्वेशन च्या प्रवाशांनी आपल्याला दिलेल्या सीट नंबरवरच बसून घ्यायचं आहे..

…. आता लवकरच ही व्यवस्था आणि शिस्तीची अंमलबजावणीची आत्यंतिक गरज आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गर्दीवर नियंत्रण करणारी खाजगी संस्थाना देकार देऊन लोकल प्रवाश्यांची सुरक्षेची काळजी वाऱ्यावर सोडून आपले हात मोकळे (झटकून) घ्यावेत… आणि फक्त ध्वनीक्षेपकावरून गोड आवाजात सुचनांचा नुसता धो धो पाऊस पाडावा.. प्रवाश्यांच्या मानसिकतेच्या, सोशिकतेचा कडेलोट कसा होईल हे पाहावे… आणि वर रेल्वे ही भारत देशाची संपत्ती आहे तेव्हा तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक सुजाण प्रवाश्याचं कर्तव्य आहे आहे असे म्हणून आधीच कावलेल्या प्रवाशांच्या मनाला डागण्या द्याव्यात… ना घर का ना घाटका असलेला प्रवासी मग सरकारला, रेल्वेला ठेवणीतल्या गालीगलोचं पारायण करतो… कारण त्याला कुणीच वाली उरलेला नसतो… मधेच कधीतरी संधीसाधू राजकीय पक्ष याचं राजकारण करतो, बंद बंदची हाक घालतो… आपली राजकीय पोळी या तापलेल्या तव्यावर भाजून घेतो पण पोटार्थी नोकरदारांची या बंद मुळे चुल थंडावते आणि तो मात्र उपाशीच राहतो… प्रश्न कसा सुटेल लोकांची सोय कशी होईल याकडे कुणालाच काही पडलेलं नाही… रोज मरे त्याला कोण रडे या वचनाला सगळेच जागतात… आणि लोकलचा, रेल्वे च्या प्रवाश्याचे हाल कुत्रे खातात… चलो अंदर, चलो भैय्या करत आपल्याच भाईबंदावर चिडत रागावत, प्रसंगी हमरीतुमरी येत लोकलच्या डब्यात घुसत राहतात… एकदा असा प्रवेश मिळाला म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळाल्याचा फिल येतो… वरच्या पंख्याचं पातं वातावरण कोमट राहीलं याची काळजी घेतं.. आणि मग डब्यात स्थिरावलेली ती मुटकुळी झालेली शरीरं एकमेकांशी संवाद साधताना.. छोड ना यार ये रोज की मगजमारी है… अच्छा सुन ना आज शाम कि पाच पैंतालीस डब्बल फास्ट अंबरनाथ को आ रहा है ना… मै राह देखता हूं… आणि ती संध्याकाळची आणि उद्या सकाळीची लोकल सुद्धा आपापल्या प्रवाश्यांची वाट बघत प्रत्येक स्टेशनवर थांबून पुढे पुढे जात असते…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments