श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # जागते रहो… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

मालकिन बाई जाग्या व्हा जाग्या व्हा… मध्यान रातीचा चांदवा डोईवर आलाय म्हंजी धनी घराकडं येन्याचा टाईम झालाय… आता येत असत्याल सोसायटीच्या मेन गेटवरून कधी लेफ्ट कधी राईट कडं झुकत.. तो गेटवरचा आगाऊ वाॅचमन बहाद्दूर बारा बेण्याचा हाय.. तो सायबास्नी ततचं आडवून ठूतो आणि सतराशेसाठ वंगाळ वंगाळ प्रश्न इचारून लै बैजार करून सोडतो… सायबास्नी आधीच लै चढलेली आनी त्यात ह्याची चवकशी… इचालरयं काय सायेब उत्तर काय देतात.. कश्याचा कशाला मेळच जमयाचा नाही.. तवा सायेबाचं टकूर सटाकलं मग बोलतात ये लै श्यान्या कोन पिलयं रं तू का मी… मगं माझ्यापेक्षाही तूच लै बडबडतोय कश्यापायी… गपगुमान गेट उघड मला माझ्या घराकडं जायाच़ आहे.. आधीच लै लेट झालाय… त्यात रोजचा हा खुटानात वाढूळ टाईम होतो… अन घरी गेल्यावर आमचा सिलेंडरचा स्फोट होतो… च्यामायला आमच्या पुरूषाची काही बी मर्दानगीची जिंदगीच राहिली नाही… अन तू रं माकड तोंड्या बेन्या.. रातच्याला गपगुमान शेपुट अंगाभवती गुंडाळून डोळं झाकून पडून राहयचं सोडून.. अगदी माझ्या येन्याच्या वेळेलाच जीव तोडून नि घसा फोडून जो भुंकायचा बिगुल वाजवून समंद्या सोसाटीला जाग आणतूस… मला काय चोर समजतोस काय रं तू रोज… इतकी वर्षे इथं राहतूय मला काय अजून बी वळखंना व्हयं रं… ये तू सकाळच्या पारी बटर नि बिसकुट खायच्या येळेला या चौकात… मग दावतू तुला चांगलाच धतुरा… आगाऊ भा*खाव मला वळखंत न्हाई… माजलास गड्या तू… माझ्यापेक्षा मालकिनीची लै काळजी घेतोस… तरीच म्हटलं मी सोसायटीच्या आत शिरतो न शिरतो तोच माझ्या फ्लॅटमध्ये दिवाळी सारखा चकाचक लाईटाचा उजेड कसा काय पडतू… तो तू बिगुल वाजवून मालकिनीला मी आल्याची वर्दी देतूस व्हयं रं… तरी बरं अजून माझं टकूरं ताळ्यावर असतयं… इतकं पिऊन तर्र होऊन बी मी आपल्या घराकडं बरोबरच जातू… अजून एकदा बी दुसऱ्याच्या घराची इतक्या रातच्याला बेल मारून झोप मोड केली न्हाई… अन तशी केली असती तर मला सोसाटीतनं कधीच हाकलला असता… थू तुझ्या कुत्र्या माझ्याशी बेईमानी करतोस अन मालकिनीला इमानदारी दावतोस… अरं तुझ्या मुळीच ती रात्री अपरात्रीला जागं होऊन माझ्याबरोबर भांड भांडून भुस्कट पाडते… अन मला तर त्या वक्ताला डोळ्यावर आलेली झोपेची झिंग नि खंबेवर खंबा संपवून जड झालेल्या डोक्यात चढलेली नशा यातनं काय बी बोलायचं सुधरतचं न्हाई… सारखं आपलं मॅडमला आय ॲम सो साॅरी.. ओके गुडनाईट याच्या पुढं गाडी सरकतच न्हाई… बाहेरच्या बाल्कनीत हा देह जाऊन पडतो तेव्हा निजानंदी तल्लीन होतो… मग दिवसा कधी जाग येते तेव्हा माझी बोलती बंद असते… कान उघडेच असतात नि बायको तिकडून एके फोरटी सेव्हनच्या फैरीवर फैरी झाडत राहते… मी कधीच शहीद झालेला असतो… पण तिचं समाधान काही झालेलं नसतं… आता आजपासून दारूच्या वाटेला जानार न्हाई नि रोज रातच्याला जंटलमन सारखं वेळेवर घराकडं येईन अशी जातमुचलक्यावर सुटका होते… अन रात्र झाल्यावर पुन्हा माझा मी राहतच नसतो.. मी देवदास होऊन जातो नि मन आधीच पोहचलेले असते मागाहून पायही तिकडेच वळतात… चार दिन कि जिंदगी है अपनी तो अपनेही हिसाबसे जियेंगे.. कल हो न हो… म्हणत एकेक जाम का प्याला रिचवत जातो… बार बंद झाल्यावर बाहेर आणून टाकतात मला तेव्हा भानावर येतो अरे बापरे लै रात्र झाली गड्या… गडाचे दरवाजे तर बंद झाले असतीलच… पण त्याशिवाय दुसरा कुठलाच थारा नसल्यानं पुन्हा पुन्हा इथचं यावं लागतयं… काय करणार साली जिंदगीभी ही ऐसी है… जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा… आणि तू कुत्र्या तर माझ्या वाईटावर टपकलेलाच असतो… मी लांबून येतानाचा वास आला कि तू जो केकटायला लागतोस बेंबीच्या देठापासून… घरातनं एकदा बायकोनं कायमचं हाकलून दिल्यावर का मलापन तुझ्यासारखं रस्त्यावर आलेलं बघितलं की तुझं समाधान हुनार आहे असा तर तुझा डावं नसंल ना!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments