राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘फक्त वधू आणि पालक मेळावा’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित

सामाजिक कार्य करण्याची उर्मी मनात होती.  एकटेपण खायला उठत होतं.  भला मोठा बंगला माझ्या नावावर असला तरी, ह्या मोठ्या वास्तूत मी एकटीच होते.  निसर्ग सौंदर्य न्याहळत, वाफाळता चहा घेऊन पेपर चाळतांना नेहमीची सदरे बघितली.  रोज येणारी वधु वर सूचक मेळाव्याची जाहीरात लक्ष वेधून घेत होती.  पूर्वी वडिलधारी माणसं म्हणायची परमेश्वराने जन्माआधीच लग्नाच्या जोड्या ठरवलेल्या असतात.  पण ह्या घडीला परमेश्वरी संकेतापेक्षाही जबरदस्त असलेली, मुला मुलींच्या अपेक्षांची गाडी पुढे सरकतचं नव्हती.  मुलांपेक्षाही मुलींच्या अपेक्षांचा पारडं वरचढ होतं.  

मी विचार केला त्यांनाही स्वतंत्र मतं आहेतं, त्यांची बाजू ऐकून घेऊन ब्रेन वॉश करणारी कुणी तरी समंजस व्यक्तीची आत्ता, आवश्यकता आहे.  

माझ्या रिकाम्या मनात सैतानाला घुसवण्यापेक्षा सामोपचाराच्या विचारांना मी आव्हान केलं, आणि कल्पना डोक्यात शिरली आपण वेगळं काहीतरी करायचं. ईतरांनी वधू वर सूचक मंडळ काढलय नां, आपण वधू पालक सूचक मंडळ काढायचं.

झटपट पाटी लावली. पटापट् आई-वडील आणि कन्या, माझी वेगळी पाटी वाचून हजेरी लावू लागलं.  माझ्या रिक्त, उदास मनात उत्साहाचं वारं वाहू लागलं.

आणि काय सांगू तुम्हाला,! बोलबोलता माझा हॉल गजबजला.  मेळाव्यात सगळे जण हजर झाले.  

त्यातली धीट दामिनी बोलायला उभी राहयली.  तिला मी विसाव्या वर्षी बघितलं होतं त्या वयातलं कोवळेपण हरपून ती राकट वाटली मला.  बरोबर आहे हो! आता ती 35 च्या उंबरठ्यावर उभी होती.

भरपूर आत्मविश्वास थोडासा गर्विष्ठपणा, बोलण्यातील परखड भाषा आणि अहंकार शब्दातून जाणवत होता.  

तिच्या आई-बाबांना मी म्हणाले, “आपण ही मीटिंग खाजगी न ठेवता अगदी खुल्या दिलानें खुलऊया.  काही तुमचं काही आमचंचा मध्य साधून मुला-मुलींची गाडी रुळावर आणून मार्गाला लावायचीय आपल्याला.  व्यक्तीस्वातंत्रिय स्वतंत्र् जगात आपण या मुलींच्या विचाराला, त्यांच्या मताला प्राधान्य देऊया.  त्यांची गाडी रुळावरून घसरायला लागली तर आहोतच की आपण आपलं अनुभवाचं निशाण फडकवायला.  हो ना?

माझा मिस्कील प्रश्न ऐकून हॉलभर हास्याची लकेर उमटली.  

संवादाची सुरुवातच मोकळ्या मनाने झाली होती.  पालकांच्या आणि बालिकेंच्याही चेहऱ्यावर खुशीची पावती उमटली.

पालकांकडे वळून मी म्हणाले, “दादा मला असं सांगा, वाढतं वय लक्षात घेता आपल्या मुला-मुलींच्या लग्नाला उशीर होतोय असं नाही का वाटत तुम्हाला?

चारी बाजूंनी एकदम कोरस उत्तर आलं, “आम्हाला खूप वाटतंय हो, आत्ताच मुलींनी तयारी दाखवावी.  तशी पैशाची तयारी पणआम्ही केली आहे.  फिक्स डिपॉझिट तर मुलींच्या जन्मापासूनच, म्हणजे लग्नाच्या वेळेला, तिच्या 21व्या वर्षी मिळावं, अशी पुढची तरतूद आम्ही केव्हाच करून ठेवलीय पण आता तर हीने पस्तीशी गाठलीय.  शिक्षण, अपेक्षा, गुणमिलन कशा कशाचा मेळचं बसत नाहीय्ये. नको इतकं व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ही पिढी आमच्या डोक्यावर बसून आम्हालाच गप्प करतेय.  ऐलतीर ना पैलतीर असं या पोरांचं भविष्य डोळ्यासमोर आणताना आमचे डोक्यावरचे केस काळजीनें, आत्ताच पांढरे झालेत.  आमची वय वाढताहेत, आमची आयुष्याची होडी पैलतीराकडे जाण्याच्या मार्गावर आहे.  त्याआधी ही मुलं मुली मार्गाला लागली तर बरं होईल हो!

एक अगतिक पिता पोटतिडीकेनी बोलत होता त्यांचं कन्यारत्न फणकारून म्हणालं, ” एवढं काय बाबा! करू की, करणारच आहोत आम्ही वेळ आल्यावर लग्न”.  

तिच्या ताठ्यातल्या उत्तराने मला तिलाच प्रश्न विचारावासा वाटला, “अगं महाभागे! मग ती वेळ कधी येणार आहे? चाळीशी उलटल्यानंतर भविष्याचा सगळं गणितच चुकेल, ” मनाला आवर घालून मी तिला शान्त करत म्हणाले, “मला एक सांग तुम्ही लग्नाचं वय कां वाढवता आहात? काही कारण? की काही अपेक्षा? आता मात्र मुलींच्या घोळक्यातल्या म्होरक्या म्हणजे नीलांबरीने पुढे होऊन उत्तर दिलं, “हो मॅडम आहेतच मुळी आमच्या मागण्या आणि अपेक्षा.  तेवढं स्वातंत्र्य आम्हाला लहानपणापासूनच मिळालय.  आमची मतं मांडण्याचा, स्वतंत्रपणे वागण्याचा आम्हाला हक्क आणि अधिकार आहेचं.  तुमच्या आधीच्या पिढीने दबाव आणून तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आढ्याला टांगलं. मन मारून इच्छेविरुद्ध तुम्हीही ते स्विकारलंत पण आम्ही नाही सहन करणार. आम्ही आमच्या मनाप्रमाणे मुक्तस्वच्छंद आयुष्य जगणार. आम्हालाही अपेक्षा आहेतच की आणि कां नसाव्या? नीलांबरीच्या लाह्या ताड्ताड् फुटत होत्या.  तिचं बघून शर्मिलालाही स्फुरण चढलं, ती म्हणाली, “मॅडम पूर्वी हुंडाबळी, सासुरवास एकत्र कुटुंबात मन मारून राहणं, आणि मोठ्या माणसांनी ठरवलेल्या मुलाला माळ घालणं हे असलं सगळं, इच्छा मारून केलं जात होतं, त्यावेळच्या लग्नाच्या मुलींनी ते सहनं केलं.  पण आम्ही नाही ते सहनकरणार. आमच्या अपेक्षा मत मांडण्याचा हक्कच आहे आम्हाला”.  

मुलींचं आवेशाचं बोलणं, पालक हताशपणे ऐकत होते.  

काही वेळेला सोनाराने कान टोचलेलेचं चांगले असतात.  म्हणूनच मी ह्या उपक्रमाचा श्रीगणेशा करायचं ठरवलं होतं. मुली तशा प्रेमळ होत्या पण तितक्याच आक्रमकही होत्या.  मी विचारलं, ” सांगा बरं! काय आहेतं तुमच्या अपेक्षा?

गलका वाढला पण मी एकावेळी एकेकीलाच बोलायची संधी दिली.  समीरा म्हणाली, “आमची पहिली अट, मुलाला पगार चांगला हवा.  तो स्मार्ट हवा.  व्हेज नॉनव्हेज खाण्यापिण्यात, पार्टीत सराईतपणे वावरणारा आणि आम्हालाही संशयाचं भूत मानेवर न ठेवता वावरू देणारा हवा. अशी कां वागलीस?

असं कां? असा कां कशाला? असे प्रश्न विचारणारा गावठी मुलगा नसावा.  तो बिनापाश असावा. ” 

तिचा धबधबा मध्ये थांबवत मी म्हणाले, “बिनापाश म्हणजे काय गं? ह्याचा अर्थ मला सांगशील?

मॅडम बिनापाश म्हणजे त्याच्याजवळ त्याचे आई-वडील, बहिण भाऊ आजीआजोबा इतर नातेवाईक कोणीच नकोत.  आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवय”.  

तिला अडवत मी म्हणाले, विभक्त कुटुंबामुळे एकत्र कुटुंब पद्धती पार लयाला गेलीय आम्ही सासरची आजेसासूबाई, आतेसासुबाई अशी पण नाती जपली आहेत त्यांचा आशीर्वाद दुवा अजूनही आम्हाला मिळतोय. आजचे सासू-सासरे खूप समंजस आहेत. सासुरवास हा शब्द अगदी कडेपार झालाय त्यामुळे हवं तिथे हवं तेव्हा जाण्या येण्याची, करण्याची तुमच्या हक्काची जाणीव त्यांना आहे तशी मोकळीकही तुम्हाला मिळाली आहे आयुष्याच्या संध्याकाळी तुमची सोबत त्यांना हवी असते तुमचं वय झाल्यावर तुमच्यावरही अशी वेळ येणार आहे.  मुलांसाठी आयुष्य वेचलयं त्यांनी.  मग ती कां नकोत त्यांनी कुठे जायचं?

उद्धट नीलिमा म्हणाली, “आहेत की वृद्धाश्रम तिथे आनंदात रहाव यांनी.  मुलांच्या संसारात कशाला हवी आहे त्यांची लुडबुड?

“हो वृद्धाश्रम गल्लोगल्ली आहेत पण तिथे रक्ताची माणसं नाहीत. आधाराची मायेची सावली देणारी घरटी नाहीत. तडजोड मोठ्यांनी पण करायला हवी.  हे मान्य आहे.  एकमेकात सुसंवाद असले तर वादाला प्रवेशच नसतो 

आणि बरका नीलिमा तुम्ही मुलांसमोर चांगल्या वातावरणाचा एकमेकांना समजून घेण्याचा आदर्श ठेवलात की तुमच्या म्हातारपणी तुमचं जीवनही सुखाचं होईल.  तुमच्या अपेक्षा कळतात मला.  कारण पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती होती, हुकूमत होती पण आता तसं नाहीये.  पालक मंडळी पण सुधारक आधुनिक विचारांची झाली आहेत. तेही तुमचे मित्र व्हायला तयार आहेत. पण कुठल्याही विचारांचा अतिरेक नसावा.  काही तुझं काही माझं अशी सामोपचाराची भाषा सगळ्यांचाच आनंद वाढवते.  तशा दृष्टीने तुम्ही सुवर्णमध्ये साधून आई-वडिलांचा मानसिक भार हलका करावा असं मला वाटतं समृद्धी म्हणाली, “करू की आम्ही लग्न पण..

तिलाअडवत मी म्हणाले, “समृद्धी हे बघ बाळ करायचं आहे लग्न तर मग हा पण कशाला? 45 व्या वर्षी लग्न त्यानंतर मुलंबाळं, नैसर्गिक दृष्ट्या स्रिची शारीरिक क्षमता नंतर कमी होते.  तुम्ही तुमची मुलं वाढवताना त्यांचं शिक्षण पूर्ण करता करता थकून जाणार. मनाची उमेद असली तरी शरीर साथ द्यायला नकार देणारचं “

अनुजा बोट नाचवत म्हणाली, “पण मॅडम आम्ही लग्नच नाही केलं तर कशाला हवीय ही भानगड आणि लग्नाची बेडी?

 तिला प्रेमाने समजावत मी म्हणाले, “अनुजा तुझ्या आई बाबांकडे बघ तुझ्या काळजीने ते आत्ताच थकलेत.  तुला चांगला जोडीदार मिळालाय, तुझं लग्न होऊन तुझा संसार सुखाचा चाललाय हे बघून तेही कृतार्थ होतील कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांनाही मिळेल 

आपलंच घोडं पुढं दामटत ती म्हणाली, ” पण मग त्यासाठी लग्नचं कशाला करायला हवं? आम्ही एकट्याही राहू शकतो की.  हे लग्नाचं बंधन कशाला?

मान्य आहे मला, तेवढ्या तुम्ही धीटही आहात, कमावत्याही आहात पण सगळ्याच गोष्टी पैशानी होत नाहीत आत्ता तारुण्याची उर्मी आहे पण कधीतरी एकटेपणा बोचायलाच लागतो.  वडीलकीच्या नात्याने आणि अनुभवानी सांगते आयुष्याच्या संध्याकाळी सोबतीची गरज असते.  म्हातारपण अटळच आहे तेव्हा हातपाय थकणारच शेवटी शरीर आहे हे, कुठलातरी आजार, अपंगत्व शरीराला आणि मनाला येणारच. पण मग तेव्हा वेळ निघून गेलेली असेल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत झालेल्या असणार अशावेळी आई-वडीलही दूरच्या प्रवासाला गेलेले असतात.  म्हणूनच वेळीच सुखदुःखाला साथ देण्यासाठी, एकमेकांना आधार देण्यासाठी नवऱ्यासारखा जवळचा मित्र दुसरा कुणीच नसतो 

“पण हा विचार मुलांनी पण करायला हवाय. “अधिरानी अधिरपणे, मुद्दा मांडला.  तिला साथ देताना मी म्हणाले, ” अर्थातच संसार दोघांचा आहे तडजोड हा कानमंत्र दोघांनीही सांभाळायला हवा.  फक्त दुसऱ्याकडून अपेक्षा न ठेवता सुवर्णमध्य साधावा लागतो.  तरच आयुष्याचं गणित सोप्प होतं.  तुम्हाला सल्ला देताना, विचारांच्या दोन टोकांची जुळवणी करताना आम्ही पण सगळ्या बाजूने विचार करायला हवा हे मान्य आहे मला.  पुढच्या वेळी आपण मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण बोलवूया.  म्हणजे त्यांचेही विचार आपल्याला कळतील. ” माझ्या विचारांच स्वागत झालं आणि भरभरून होकार मिळाला.  

वेळ संपत आली. मुलींच्या चेहऱ्यावर सकारात्मक विचारचक्र सुरू झाली होती.  ती बघून आई-वडिलांच्या चेहऱ्यावर सोनाराकडून कान टोचले गेल्यामुळे समाधान दिसत होतं.  मलाही, हा आगळावेगळा मेळावा घेतल्याचा आनंद झाला.  सामंज्यसतेचा निम्मा गड तर, ‘सर’ झाला होता. आता लवकरच मला वधू पालक मेळाव्याच्या ह्या मैत्रीमुळे मुला मुलींच्या विचारात नक्कीच बदल होईल आणि लवकरच त्यांच्या लग्नाची आमंत्रणे येतील अशी आशा करते.

तर मैत्रिणींनो आता भेटूया पुढच्या मेळाव्यात. तोपर्यंत तुम्हाला राम राम..  जय श्री साई राम 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted