श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६९ आणि ७० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र.  ६९ – – 

सुखानंदकारी निवारी भयाते ।

जगीं भक्तिभावे भजावे तयाते ।

विवेके तजावा अनाचार हेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।।

अर्थ – –  भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आणि भयाचे निवारण करणारा आहे.  त्याला भक्तिभावाने आराधना करावी.  विवेकाच्या साहाय्याने अनाचार म्हणजे अनीतीने वागणे आणि इतरांचा हेवा किंवा द्वेष यांचा त्याग करावा.  प्रभात समयी श्रीरामाचे (भगवंताचे) चिंतन करावे.

(सुखानंदकारी – सुख आणि आनंद देणारा, तजावा – सोडून द्यावा, अनाचार – अनीतीचे वागणे)

विवेचन – – भगवंताचे गुण वर्णन करताना समर्थ म्हणतात की भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे.  सुख आणि आनंद हे शब्द आपण सामान्यपणे समानार्थी समजतो पण त्यात फरक आहे.  सुख हे क्षणिक असून इंद्रिये आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते.  माणूस आयुष्यभर या सुखाच्या मागे धावत असतो.  आनंद ही एक वृत्ती किंवा मानसिक अवस्था असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे.  ती परिस्थितीवर अवलंबून नसते.  जो स्वस्वरुपी स्थिर असतो, त्याच्याकडे कायमच आनंदी वृत्ती असते.  भगवंत या दोन्हींचा दाता आहे.  तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे.  दुःख हरण केल्यानंतर उरतो तो आनंद आणि सुख.

भगवंत हा भयाचे देखील हरण करतो.  माणसाला या ना त्या कारणाने आयुष्यभर कुठल्यातरी भयाने पछाडलेले असते.  माझा पैसा टिकेल का, मुलेबाळे मला म्हातारपणी विचारतील का? एक ना दोन अशा अनेक चिंतांनी मनुष्य ग्रस्त असतो.  पण सर्वात मोठे भय असते ते मरणाचे.  भगवंत या भीतीतून देखील आपली मुक्तता करतो.  जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका झाली तर मृत्यूचे देखील भय नाहीच!

पण या सुखानंदकारी अशा भगवंताच्या कृपेचा अनुभव यायचा असेल तर त्यासाठी कोणती अट आहे? ती समर्थ पुढील ओळीत सांगतात.  ते म्हणतात, “जगी भक्तिभावे भजावे तयाते. ” अत्यंत भक्तिभाव आपल्या ठायी असला पाहिजे.  त्यासाठी मनाने आपण त्याचे होऊन जावे.  आपले सर्वस्व त्याला अर्पण करावे.  भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा आहे अशी दृढ भावना आपल्या ठायी असली पाहिजे.  तुकाराम महाराज म्हणतात…  

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मतारीची ।

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ।।

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी भगवंत आळवावा ।

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।

भगवंत प्राप्तीसाठी वनात जाण्याची जरुरी नाही.  कोणतेही कष्ट, उपासतापास करण्याची गरज नाही.  आपण आहोत तेथेच त्याचे नामस्मरण करावे.  मनाने त्याचेच होऊन राहावे.

पण भगवंत प्राप्तीसाठी निर्मळ, शुद्ध अंतःकरणाची गरज असते.  जी माणसे अनाचाराने म्हणजे अनीतीने वागतात, दुसऱ्यांचा द्वेष किंवा मत्सर करतात, अशांना भगवंत कसा प्राप्त होईल? स्वच्छ पाण्यातच प्रतिबिंब दिसते.  तसेच मनही शुद्ध, स्वच्छ हवे.  अनीती, मत्सर, हेवेदावे हा मनातील गाळ आहे.  तो काढून टाकायला हवा.  अनीती आणि अनाचाराने वागणारी माणसे कितीही शक्तिमान आणि बलवान असली तरी शेवटी त्यांचा नाश अटळ असतो.  रावण दुराचारी होता.  शक्तिमान आणि विद्वान होता.  पण त्याचा नाश झाला.  तो स्वतः, त्याची मुले यांचा नाश झाला.  अनीतीने वागणारे कौरव युद्धात मारले गेले आणि त्यांचे राज्यही नष्ट झाले.  आपण जसे वागतो, तेच कर्माच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे परत येते.  हेवा किंवा मत्सर केल्याने दुसऱ्याचे फारसे नुकसान होणार नाही.  पण हे दोष आपल्यालाच आतून संपवतात.  द्वेष केला तर द्वेषच वाट्याला येईल.  प्रेम दिले तर प्रेम परत मिळेल.  म्हणून अनीतीने वागणे, दुसऱ्यांचा द्वेष करणे यासारख्या गोष्टींचा त्याग करायला हवा.

या गोष्टी परमार्थातील अडथळा आहेत.  त्यांचा त्याग विवेकाने म्हणजे विचारपूर्वक करावा.  मला इतरांनी माझ्याशी जसे वागायला हवे असे वाटते, तसेच मी इतरांशी वागायला हवे.  मला कोणी खोटे बोललेले आवडत नाही, कोणी माझा द्वेष केला तर मला आवडत नाही.  मग मीही इतरांशी तसेच वागायला हवे, नाही का? मागील एका मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ती कीजे. ” असा विचारपूर्वक मनाला बोध करून, संयम, विवेक आणि वैराग्य यांची कास धरून वाटचाल केली तर भगवंत दूर नाही.  त्यासाठी पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि पुढेही दिवसभर आपली कामे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये.

स्वसंवाद :: 

१.  मी क्षणिक ‘सुख’ शोधतो की चिरंतन ‘आनंद’?

२.  माझ्याकडून नकळत का होईना पण कोणाचा ‘हेवा’ (मत्सर) किंवा द्वेष घडतो का?

३.  “इतरांनी माझ्याशी जसे वागावे असे मला वाटते, तसेच मी इतरांशी वागतो का? “

४.  पहाटे उठल्यानंतर मी प्रथम श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन करतो का?

===== 

श्लोक क्र.  ७० – – 

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।

कदा बाधिजेनापदा नित्यनेमे ।

मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।।

अर्थ – अगदी मनापासून रामनाम घ्यावे.  नित्यनेमाने नाम घेणाऱ्यास संकटांचा त्रास होत नाही.  अहंकार आणि आळस या दुर्गुणांचा त्याग करावा.  आणि प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.

(वदा – म्हणा, पूर्णकामे – अगदी मनापासून, बाधणे – त्रास होणे, आपदा – संकट, मद – अहंकार, आलस्य – आळस)

विवेचन –  या श्लोकात भगवंताचे नाम अगदी मनापासून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत.  त्यासाठी त्यांनी ‘ पूर्णकामे ‘ हा सुंदर शब्द वापरला आहे.  व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला तिचे काय फळ मिळेल याकडे आपले लक्ष असते.  फळाची अपेक्षा ठेवूनच आपण कर्म करीत असतो.  पण जेव्हा रामनाम किंवा भगवंताचे नाम आपण घेतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये.  नाम फक्त नामासाठीच किंवा भगवंतासाठीच घ्यावे.  असे नाम जेव्हा आपण घेऊ त्यावेळी इतर सर्व अपेक्षा आपोआपच नाहीशा होतील.  ते नाम मग मनापासून घेतले जाईल म्हणजेच समर्थ सांगतात तसे ‘ पूर्णकामे. ‘

तसेच समर्थ म्हणतात की नित्यनेमाने नाम घेणाऱ्याला संकटे त्रास देत नाहीत.  नित्यनेमामुळे संकटे येत नाहीत असे नाही, तर संकटातही मनाचा समतोल राखण्याची आणि त्या आपदा सोसण्याची शक्ती रामनामामुळे मिळते असा याचा अर्थ आहे.  संकटांची धाव देहापर्यंतच असते परंतु अखंड नामस्मरण करणाऱ्याला त्यांचा त्रास होत नाही.

परंतु असे अगदी मनापासून नाम घेण्याच्या आड दोन मोठया अडचणी उभ्या राहतात.  एक म्हणजे आपला अहंकार.  मी कशाला नाम घेऊ? मला त्याची काय आवश्यकता? नाम घेणे हे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे.  त्याशिवाय नुसते नाम घेऊन काय होणार? त्याच्या जोडीला ज्ञान नको का? असे नानाविध विचार मनात येऊन माणूस नाम घेण्याच्या विचारापासून परावृत्त होतो.  पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्याच संतांनी नामस्मरणाचा महिमा वर्णन केला आहे.  भगवंत प्राप्तीसाठी नामसारखे सोपे साधन नाही असे ते म्हणतात.  गोंदवलेकर महाराजांनी तर आपल्या प्रत्येक प्रवचनात निरनिराळ्या प्रकारे केवळ नाम घेण्याचा उपदेश केला आहे.

नाम घेण्याच्या आड येणारी दुसरी गोष्ट म्हणजे आळस.  आळसाने मोठमोठी कार्ये नासतात.  चौऱ्यांशी लक्ष योनींचा प्रवास करून आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो असे म्हटले जाते.  मनुष्य प्राण्यांखेरीज इतरांना विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली नाही.  या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेतल्याशिवाय पर्याय नाही.  मूळ स्वरूप म्हणजेच भगवंताचे ज्ञान.  आपली नित्यकर्मे करता करता आपण सहज भगवंताचे नाम घेऊ शकतो.  परंतु प्रत्येक वेळी आपला आळस आपल्याला या गोष्टीपासून प्रतिबंध करतो आणि नामस्मरण करायचे तर निवृत्तीनंतर करू.  आताच काय घाई आहे अशा प्रकारचा सोयीस्कर विचार आपण करत असतो.  पण तो बालपण खेळात जाते, तरुणपण धुंदीत निघून जाते.  मग म्हातारपणी काही करू म्हटले तर शरीर साथ देत नाही.  म्हणूनच समर्थ आपल्याला एका अभंगात सांगतात, “काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा… ” म्हणून जोवर शरीर साथ देते आहे तोवरच परमेश्वराचे नामस्मरण नित्यनेमाने करावे असे समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१.  मी करत असलेल्या उपासनेच्या किंवा चांगल्या कामाच्या मागे काही ‘भौतिक फळाची अपेक्षा’ असते का? की मी ते निरपेक्ष भावनेने करतो?

२.  “नामस्मरण ही केवळ निवृत्तीनंतर करण्याची गोष्ट आहे” असा सोयीस्कर विचार करून मी आजचा वेळ ‘आळसात’ घालवत आहे का?

३.  माझ्या ज्ञानाचा, पदाचा किंवा संपत्तीचा ‘अहंकार’ मला भगवंताच्या चरणी लीन होण्यापासून रोखत आहे का?

४.  काळाचा प्रत्येक क्षण वेगाने पुढे जात असताना, मी माझ्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी दिवसातील काही वेळ नित्यनेमाने नामस्मरणाला देतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ६९ आणि ७०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted