संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “ते चुकीचे नाहीत.. ते वेगळे आहेत..“ ☆ संध्या बेडेकर ☆
काल ताईकडे भिशी होती. मी ताईच्या मदतीला नेहमीप्रमाणेच होते. ताई माझ्यापेक्षा पाच वर्ष मोठी. म्हणजे पंचाहत्तरीची.
तस आजकाल एकंदरीत एक गोष्ट लक्षात येते की overall बायकांचे. राहणीमान सुधारले आहे. व्यवस्थित राहणे त्यांच्या सवयीत उतरले आहे. छान अगदी मॉडर्न dresses पण घालतात. आपल्या मुली, सुनांना बघून त्यांच ड्रेसिंग सेन्स बदलला आहे. आज पंचाहत्तरीत असलेली स्त्री सुद्धा स्वतःला जेष्ठ समजते. म्हातारपणाची झलक जरी दिसत असली तरी ती स्वतः तस डिक्लेअर करत नाही. ही चांगली गोष्ट आहे. भिशी, वाचक मंच, जेष्ठ नागरिक संघ यांचे कार्यक्रम अटेंड करणे, आपल्या आवडीनुसार विविध कार्यक्रमात भाग घेणे. नाटक, सिनेमा, ट्रीप ला बिनधास्त जाण जमतय तिला. स्वतः ला एक्टिव ठेवणे जमतय तिला.
स्वतःवर पैसे खर्च करणे म्हणजे गुन्हा नव्हे, हे समजलय तिला. मी आनंदी राहण्याची जबाबदारी माझीच आहे. हेही ती समजून आहे.
आयुष्याची second inning खेळायची ही चांगली पद्धत आहे.
बायका एकत्र येणे, बसणे म्हणजे अनंत गप्पा. Alphabets जरी A to Z असले तरी गप्पांची RANGE त्या पार सहज जाते. कुठून गप्पा कूठ पर्यंत पोचतील ? याचा अनुमान कोणीच लावू शकत नाही. खरतर गप्पा थांबवाव्या लागतात.
अग बाई!! अंधार झालाय.
अरे! घरी सूनबाई यायची वेळ झालीय. घराची किल्ली तर माझ्याकडे आहे …
अस म्हणून काही जणी आता निघावच लागेल, म्हणून निघायची तयारी करतात. काही बिनधास्त अजिबात घाई नसलेल्या मैत्रीणी पण असतातच की. त्यांचे गप्पा सेशन चालूच असत.
बरे असो… मी मात्र बोलायचे काम कमी, पण ऐकायचे काम जास्त करत होते.
गृपमध्ये लक्ष देऊन ऐकायचे काम केले तर बर्याच गोष्टी समजतात.
मी नंतर ताईला म्हंटल… अग ताई ! काय ग ! किती त्या गप्पा. एखादया विषयाचा किती कीस पाडता तुम्ही. म्हणजे अगदी expert असल्यासारखे comments देतात या सर्व. कोणी कोणाच पान खाली पडू देत नाही.
आजच्या मुली, सूना… त्यांचे ड्रेसेस, त्याच्या सवयी, boy friends / girl friends, हाॅटेलिंग, स्वीगी, झोमॅटो, तो अंधाधुंध खर्च…
हा विषय तर खूपच रंगला. तसा हा जेष्ठांचा आवडता विषय आहेच म्हणा.
अग पण ताई ! त्या मीनाताई किती वेगळच बोलत होत्या. अग ! त्यांना नवीन जनरेशन च काहीच पटत नाही का ? नवीन जनरेशनवर फारच नाराज दिसत होत्या त्या.
त्या मेधा ताई आणि कल्पना काकूंची वादावादी बघून मला वाटल आता या दोघी भांडतात की काय ?
त्या सुमेधा ताई बर्यापैकी शांत होत्या. खरय प्रत्येक चर्चेत आपल मत दिलच पाहिजे. असा नियमही कुठे लिहिलेला नाहिये. जे बोलत होत्या, ते मात्र छान, पॉझिटिव्ह, पटण्यासारख बोलत होत्या.
खूपदा विचार न करता, भावनांच्या आहारी जाऊन आपल मत मांडण्याच्या घाईत, दुसर्याच्या मताचा अपमान होण्याची शक्यता असते. थोडा विचार करून, वेळ घेऊन आपले मत मांडल्यास, situation सहज हाताळता येते. आपल्या भावनांना आपल्या ताब्यात ठेवण गरजेच असत. शब्दांची निवड आणि शब्दांच्या मांडणीकडे पण लक्ष देण आवश्यक असत. नाहीतर सहज डिस्कस करता करता मारामारीवर ते डिस्कशन जायचे.
ताई म्हणाली… अग !खरय.
एकाच situation वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतातच. वेगवेगळ्या प्रतिक्रियेबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. त्यात त्यांचा स्वभाव, सवयी, परिस्थिती यांचा पण प्रभाव पडतोच. त्यांच्या दृष्टीने
त्यांची प्रतिक्रिया अगदी बरोबरच असते.
त्यामुळे चूक अस कोणीच नसत.
खरतर प्रत्येक वेळेस, प्रत्येक गोष्टीवर, आपण आपल मत द्यायची काही गरजही नसते. कधी कधी तर स्पष्ट आणि खर बोलण लोकांना आवडतही नाही. काळ वेळ जागा आणि खासकरून विषय परिस्थिती बघून प्रतिक्रिया देण्यातच शहाणपण असत. आजकाल तसही लोक प्रतिसाद कमी आणि प्रतिक्रिया जास्त देतात.
प्रतिक्रिया देताना माझच बरोबर… असा अट्टाहास ही नसावा.
खरतर शांतपणे सर्वांच बोलण ऐकल तर, एकाच गोष्टीकडे बघायचे. वेगवेगळे दृष्टीकोन लक्षात येतात.
आपल्याला आयुष्यात येणारे अनुभव, आपल्या घरातील मोठ्या माणसांनी प्रत्त्येक घटनेवर दिलेली प्रतिक्रिया बघून आपला स्वभाव तयार होत असतो.
आपली आवड निवड याचाही आपल्या मत व्यक्त करण्यात वाटा असतोच.
जनरेशन गॅपमुळे जेष्ठ नागरिकांना काही विषय तर अजिबात पटत नाही. सध्याची जनरेशन तर एवढी फास्ट धावतेय की दररोजच नवनवीन गोष्टी ऐकू येतात / दिसतात.
पण काय करणार ?…
जमाने के साथ तो चलना पडेगाही ।
थोड adjust, थोड दुर्लक्ष करायला शिकावच लागेल. तरच आपल अन् त्यांच आयुष्य सुखकर होईल.
चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली तर तो विषय स्पष्ट होतो. एकमेकाच्या मताचा आदर करता आला पाहिजे.
मी बरोबर आणि तू चूक.
अस कधी म्हणता येत नाही.
प्रत्येक जण, त्याचे मत मांडतो.
ते चूक नसत, वेगळ असतं.
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





