सौ राधिका भांडारकर

??

☆ परिवार.. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जीवन खूप यांत्रिक झालंय् . माणसामाणसातले संवाद तुटलेत .माध्यमे असतील अनेक .पण व्हरच्युअल रिलेशनशिपने नक्की काय साध्य झालेय्.. ? नुसते ईमोजी ,लाईक्स, परस्परातील स्नेह आपुलकी खरोखरच जपतात का?   की तो केवळ एक टाईम पास…! एक खूळ. एक चाळा..     अंतर्जालात कुठेतरी दूर असलेल्या,–कधीकधी तर अनोळखीही असलेल्या व्यक्तीशी संवाद– 

नव्हे चॅटींग करत असताना, जवळ बसलेल्या व्यक्तीची आपण दखलही घेत नाही, नव्हे आपण तिचं अथवा त्याचं अस्तित्वही विसरलोय् याची जाणीव तरी होते का?

कित्येक वेळा असंही अनुभवायला येतं की माणसं..मित्र मैत्रिणी म्हणा किंवा नातलग असूद्यात ..भेटीसाठी एकत्र जमतात, तरीही आपापल्याच त्या सहा इंची विश्वातच असतात….

मग नकळतच माझं मन परीवार या शब्दापाशीच रेंगाळतं—हे सहा इंचातले समूह म्हणजे परिवार का?—-अर्थात काही गोष्टी मी नाकारु नाही शकत.

या माध्यमाने अनेक हरवलेले दुवे पुन्हा जोडून दिलेत. अंधारातले चेहरे समोर आणलेत. अनोळखी नात्यांची वीण गुंफली.

पण तरीही मागे वळून पाहताना, माझ्याच आयुष्यातल्या अनेक व्यक्तींच्या आठवणी जेव्हां माझ्या मनात रुंजी  घालतात,तेव्हा उणीवा जाणवतात. त्रुटी भासतात. 

नेमकं हे बरोबर की चूक ? हे खरं की खोटं ?नुसतंच आभासी..? यात गोंधळायला होतं. मग मी या विचारापाशी येऊन थांबते—–

परिवार या शब्दाची नेमकी व्याख्या काय? माझा परिवार म्हणजे नेमका कुठला परिवार..?

मी माझा नवरा आणि आमच्या दोन मुली ..एव्हढाच ? की माझ्या बहिणी (अत्यंत लाडक्या) ,माझे दीर ,नणंदा- जावा, त्यांची मुले ,सुना—-शिवाय असंख्य मित्रमैत्रिणी..ज्यांच्या बरोबर मी पस्तीस ते चाळीस वर्षे काम केले , तो सहकर्मचार्‍यांचा परिवार…समान आवडीमुळे निर्माण झालेले इतर अनेक परिवार—- 

आपले शेजारी, अगदी आपल्याकडे कामाला येणारी  माणसे..त्यांच्यातलीही आपली गुंतवणुक….

खरोखरच मी स्वत: परिवारप्रिय व्यक्ती आहे—हे सगळे परिवार माझ्या आयुष्याचे महत्वाचे भाग आहेत…माझा परिवार हा संकुचित असूच शकत नाही ..तो खूप व्यापक आहे…

कालच माझ्या पुतण्याचा फोन आला ,म्हणाला, ” काय काकू आहेस कुठे? किती दिवसात फोन नाही भेट नाही ..म्हटलं गेलीस की काय अमेरिकेला मुलींकडे..”

“नाही रे कुठे जाऊ? या लाॅकडाउनपायी गेले सहा महिने घरातच आहे…”

मग खूप गप्पा झाल्या.. किती बरं वाटलं ! परिवारातली माणसं आपल्यावर इतकं प्रेम करतात ,आपली आठवण ठेवतात या भावनेनं आयुष्य  वाढलं नाही तरी सुखद नक्कीच होतं..!

कालच आम्ही दोघं जुने अल्बम पहात होतो—

—अनेक आठवणी..  अनेक पारिवारीक सोहळे, प्रवास,  गेट टुगेदर्स…सुखदु:खांचे अनेक क्षण ! अनेक प्रसंग !

अल्बम पाहता पाहता एकमेकांची काळजी वाहिलेले क्षण तर आठवलेच, पण शाब्दिक वार नि भांडणेही आठवली..

अल्बममधले कित्येक चेहरे काळाच्या पडद्याआड गेलेही. पण मनात जपलेला परिवार आठवणीत अतूट–अखंडच राहिला,..

या सगळ्यांनी आपल्याला किती आणि काय काय दिलं—-आपल्या जीवनाला आकार दिला. आज ते नसूनही आहेत. त्यांच्या स्मृतींशी आजही आपला संवाद आहे…

बाळपणीच्या परिवारातली शिस्तप्रिय आई—‘ लाभालाभौ जयाजयौ स्थितप्रज्ञ ‘ असलेले ,विनोदबुद्धी असलेले वडील…प्रचंड माया करणारी आजी—सतत भांडणे उकरुन काढणारी –पण तितकीच अनेक कलांमधेही प्रवीण असलेली.काकू –.

आणि गंमतीजमती करणारी, भांडणारी, खोड्या काढणारी, आम्ही मामे आते चुलत मावस भावंडे……

सर्वसमावेशक, गुणाअवगुणांच्या ,एका अदृष्य धाग्याने घट्ट विणलेला हवाहवासा माझा वाटणारा परिवार—-

माझं सासरही तसं भरगच्च– माणसांनी भरलेलं—डोईवरचा पदर,.गौरवर्ण, उंच ताठ बांधा, अंगभर दागिने ..चेहरा प्रसन्न पण काहीसा करारी कठोरही— अशा सासूबाई..

“अग ! तुला साधी भाकरही थापता येत नाही का? ” म्हणून फटकारणार्‍या—तेव्हां रागही यायचा,  वाईटही वाटायचं. कधी कधी मनातला अहंभावही ऊफाळून यायचा. अनेक क्षेत्रातलं माझं प्राविण्य हे असं एका भाकरीपाशी निष्प्रभ व्हावं याचं वैषम्य वाटायचं. खेद वाटायचा. पण मग आईची काही वाक्यं आठवायची. आई विणायला शिकवायची तेव्हां म्हणायची,” सुईवरचे टाके सैल पडू नको देऊस..वीण घट्ट ठेव. नाहीतर सगळं उसवेल…” आईचे हे शब्द मग माझ्या पुढच्या जीवनात निराळे अर्थ घेऊन सोबत राहिले. आणि आता जाणवते, वैवाहिक जीवनाचे खरे धडेही सासूबाईंच्या कठोर शब्दांनीच शिकवले मला…त्या खरखरीत वाटण्यार्‍या पानांमधेही तुडुंब ओलावा होता..म्हणून काटेरी असली तरी हिरवी होती….

खरंच मोठ्या परिवारात खूप गंमत असते बरं का..?- व्यक्ती आणि वल्लींंचा एक गुच्छच असतो तो— कुणी मनमिळाऊ, कुणी अलिप्त. कुणी हसरा कुणी रागवणारा… कोणी नासका कांदा तर कोणी चिडका बिब्बाही..

माझ्या स्वत:च्या दोन मुलींच्या स्वभावातही केव्हढा फरक…एक गाव गोळा करेल, तर एक अत्यंत सावध–चाचपडत पारखत–उगीच कूणाला लटकणार नाही अन् कुणाला लटकूही देणार नाही…

परिवार म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. मतभेद होणारच. काहीसा गृपीझमही असतो…

कुठे त्याग समर्पण प्रेम— तर कुठे अप्पलपोटेपणा, स्वार्थ, स्वकेंद्रीतता…

पण तरीही सर्वांचं संतुलन सांभाळणं हे परिवाराचं शास्त्र असतं..या शास्त्रांचा अभ्यास नीट झाला तर परिवार तुटत नाही .सांधला जातो…

पानगळ होते. नवी पालवी बहरते.. वृक्ष विस्तारतच राहतो…

तो उन्मळत नाही, कारण मुळं घट्ट मातीत रूतलेली असतात—

परिवाराचंही तसच आहे…

माझ्या सगळ्या प्रकारच्या परिवारात मी सदैव एक हिरवं पान असावं हीच मनीषा….

मग या सगळ्या भावनिक आंदोलनात तरंगत असताना मनात येतं–जे भोगलं ,जे पाह्यलं,जे अनुभवलं, ते आताच्या आभासी जगात खरंच आहे का..? तिथे असं काय निराळं आहे की ते माणसामाणसाला खिळवूनही ठेवतंय् आणि प्रचंड दुरावाही निर्माण करतंय्..

कदाचित या प्रश्नाचं उत्तर काळच  देईल—–

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments