सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ सावित्री ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

सावित्री ही सृष्टी कर्त्या ब्रह्मदेवाची पत्नी. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली . महाप्रलयानंतर भगवान नारायण बराच काळ योग निद्रेत मग्न होते. ते जागृत झाले तेव्हा त्यांच्या नाभीतून एक दिव्य कमळ उगवले. त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रम्हा हा विश्वाचा मूळ निर्माता, प्रजापती, पितामह आणि हिरण्यगर्भ आहे. पण अख्ख्या विश्वात त्याचे मंदिर फक्त राजस्थान येथील पुष्कर सरोवरात आहे. याचे कारण त्याची पत्नी सावित्री  हिने दिलेला शाप.

ब्रम्हा कृतयुगे

पूज्यस्त्त्रेतायां

यज्ञ उच्चते !

द्वापरे पूज्यते

विष्णूवहं

पूज्यश्चतुर्ष्वपि

( ब्रम्हांडपुराण)

कृतयुगात ब्रम्हा पूज्य, त्रेतायुगात यज्ञ पूज्य, द्वापार युगात विष्णू पूज्य व चारही युगात मी( शिव) पूज्य आहे. असे ब्रम्हांड पुराणात सांगितले आहे. या श्लोकावरून सुरुवातीच्या काळात ब्रम्हा ची पूजा प्रचलित होती हे समजते. त्यानंतर वैदिक धर्मात यज्ञयागा ला प्राधान्य मिळाले.

ब्रह्मा आणि त्यांची पत्नी सावित्री यांनी एकदा मोठा यज्ञ करायचे ठरवले. सृष्टीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले. नारदादी सर्व देव , ब्राह्मण उपस्थित झाले. यज्ञा चा मुहूर्त जवळ आला पण सावित्री चा पत्ता नव्हता. मुहूर्त साधण्यासाठी भगवान विष्णूच्या आदेशाने ब्रह्माने नंदिनी गायीच्या मुखातून एका स्त्रीची निर्मिती केली. तिचे नाव गायत्री ठेवले. पुरोहितांनी ब्रम्हाचे तिच्याशी लग्न लावले व यज्ञास सुरुवात केली. इतक्यात सावित्री तेथे आली. आपल्या जागी गायत्री पाहून ती रागाने बेभान झाली. तिने ब्रम्हा ला शाप दिला की ज्या सृष्टीच्या कल्याणासाठी यज्ञ सुरू केलास आणि माझा विसर पडला त्या सृष्टीत तुझी पूजा कोणीही करणार नाही. तुझे मंदिर बांधण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा नाश होईल. पतिव्रतेचा शाप खरा ठरला व आज तागायत ब्रह्मदेवाचे मंदिर कुठेही बांधले गेले नाही. तिची शापवाणी ऐकून सर्व देव देवता भयभीत झाले त्यांनी तिला शाप मागे घेण्याची विनंती केली. काही वेळाने तिचा राग शांत झाला व तिने ऊ:शाप दिला या पृथ्वीवर के वळ पुष्कर मध्ये तुझी पूजा केली जाईल. तेव्हापासून पुष्‍कर खेरीज कुठेही ब्रह्मदेवाचे देऊळ नाही व पूजाही केली जात नाही.

सावित्रीने ब्रम्हा ला शाप दिलाच पण विष्णूनेही साथ दिली म्हणून त्याला ही शाप दिला की तुम्हाला पत्नी विरहाच्या यातना भोगाव्या लागतील. भगवान विष्णू ने राम अवतार घेतला त्यावेळी त्याला 14 साल पत्नी विरह सहन करावा लागला. नारदाने ब्रह्माच्या विवाहाला संमती दिली म्हणून नारदाला शाप दिला तुम्ही आजीवन एकटेच रहाल. नारद मुनींचे लग्न झाले नाही. ब्राम्हणांनी हे लग्न लावले म्हणून सर्व ब्राह्मण जातीला शाप दिला तुम्हाला कितीही दान मिळाले तरी तुमचे समाधान कधीच होणार नाही तुम्ही कायम असंतुष्टच रहाल. ज्या गायीच्या मुखातून गायत्री निर्माण झाली त्या गाईला शाप दिला की कलियुगात तुम्ही घाण खाल. व हे सारे अग्नीच्या साक्षीने घडले म्हणून अग्नीला शाप दिला की कलियुगात तुमचा अपमान होईल. राग शांत झाल्यावर कोणाचेही न ऐकता ती पुष्कर तीर्था च्या मागे रत्नागिरी पर्वतावर निघून गेली. त्या ठिकाणी सावित्री मंदिर बांधले आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे फूट उंचीवर ते मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. पण भाविक लोक आजही तिथे जातात.

राजस्थानात पुष्कर मध्ये ब्रम्हा इतकेच सावित्रीला पूज्य मानतात. तिला सौभाग्यदेवता मानतात. स्त्रिया भक्तिभावाने तिथे तिची पूजा करतात. तिथे मेंदी बांगड्या बिंदी तिला अर्पण करून भक्तिभावाने ओटी भरतात आणि सौभाग्याचे दान मागतात. इथे राहून सावित्री आजही आपल्या भक्तांचे रक्षण करते. अशी ही तेजस्वी पतिव्रता. पण अन्याय सहन करू शकली नाही. व तिचा राग योग्य असल्यामुळे ब्रह्मदेवाचे ही तिच्यापुढे काही चालले नाही. या सर्व प्रकारा मध्ये गायत्रीची काहीच चूक नव्हती म्हणून तिने तिला कोणताही शाप दिला नाही हे तिचे मोठेपण. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या मानी देवतेला कोटी कोटी प्रणाम.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

माहितीपूर्ण सुंदर लेख, कुंदाताई !