शामला पालेकर
वाचताना वेचलेले
☆ ‘हातात हात पकडला पाहिजे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆
नातं कोणतंही असो
मतभेद कितीही असो
संबंध तोडण्याची भाषा
मुळीच कधी करू नये
प्रत्येक माणूस वेगळा
विचारसरणी वेगळी
मनुष्य जन्मा तुझी
कहाणीच आगळी-वेगळी
बापासारखा मुलगा नसतो
मुलासारखी सून नसते
नवरा आणि बायकोचे तरी
कुठे तेवढे पटत असते?
जरी नाही पटले तरी
गाडी मात्र हाकायची असते
अबोला धरून विभक्त होऊन
सारं गणित चुकायचे नसते
काही धरायचं असतं
काही सोडायचं असतं
एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून
एकमेकाला सोडायचं नसतं
चुकल्यावर बोलावं
बोलल्यावर ऐकून घ्यावं
एकांतात बसल्यावर
अंतरंगात डोकवावं
राग मनात ठेवला म्हणून
कोणाचं भलं झालं का?
बिनफुलाच्या झाडाजवळ
पाखरू कधी आलं का?
समोरची व्यक्ती चुकली तरी
प्रेम करता आलं पाहिजे
झालं गेलं विसरून जाऊन
गच्च मिठी मारली पाहिजे
स्वागत होईल न होईल
जाणं येणं चालू ठेवलं पाहिजे
समोरचा जरी चुकला तरी
म्हणा “खुशाल ठेव देवा त्याला! “
आयुष्य खूप छोटं आहे
हां हां म्हणता संपून जाईल
प्रेम करायचं राहिलं म्हणून
शेवटी खूप पश्चात्ताप होईल
लक्षात ठेवा नात्यापेक्षा
दुसरं काहीही मोठं नाही
आपलं माणूस आपल्याजवळ
यासारखी श्रीमंती नाही
कवी :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




