सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

ईशा :-  “आजी काय शिवतेयस? ” 

आजी :-  “अगं! विशेष काही नाही.  नेहमीचेच आपले! उसवलेले  शिवणे.  पण बरं झालं  आलीस.  जरा सुई ओवून दे ग राणी.  “

ईशा  :- “हो  , देते.  आण.  “

आजी :-  ” ईशा! खरंतर मला असे एवढ्या- तेवढ्यासाठी तुला कामाला लावायला आवडत नाही.  पण….. काय करणार! वय झाले की परावलंबन येतेच! “

ईशा :-  “ परावलंबन म्हणजे काय ग आजी? “

आजी  :- “अगं! म्हणजे  काही कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून  राहणे.  dependence  ग! “

ईशा  :- ” हं…. आजी तू  74 वर्षांची आहेस न? मग 74  व्या वर्षी म्हणतात का? वय झालंय असं?  मी आत्ता  आठव्या वर्षी  नाही म्हणू शकत का? माझं  वय झालंय म्हणून? 🤔 “

आजी :-  ” 😃! अगं  बाळा, असं नाही.   एका वया नंतर म्हाताऱ्या माणसांना सर्व कामे  पूर्वीसारखी  जमेनाशी होतात.  तेव्हा  वय झालंय म्हणतात.  तुझे वय तर आत्ता  नवनवीन कामे , कौशल्ये  म्हणजे  skills   शिकण्याचे वय आहे.  “

ईशा  : – ” अगं पण आजी तू मोदक , पुरणपोळ्या,  गुळाच्या  पोळ्या  वगैरे  करतेस की अजूनही  पहिल्यासारख्याच.  मग? “

आजी  :-  ” अगं सोने! त्यात डोळ्यांचे काम नसते न फारसे! “

ईशा :-  ” अच्छा! मग असे म्हण  ना की तुझ्या  डोळ्यांचे वय झालेय.  जसे  आजोबांच्या  गुडघ्यांचे  वय झालेय  तसे.  बरोबर ना?  “

बडबड अक्का  बडबड करून पळून गेली.  पण आजी मात्र विचारांच्या भोवऱ्यात जणू  फिरतच राहिली.  

ईशा पटकन बोलून गेली   ‘डोळ्यांचे  वय  ‘.  नकळत किती बरोबर बोलली होती ती.  

अलिकडे 2/3 वर्षे मंदाताईंनाही असे काहीसे जाणवत होते की काही गोष्टी  अगदी  पूर्वीसारख्या  पूर्ण  आत्मविश्वासाने आपण अजूनही करतो आणि काही बाबतीत मात्र वय झालेय असे  पुन्हा पुन्हा वाटते.  मालिकांची नावे आठवत नाहीत; पण शेजारची अनू  वीण विचारायला आली की अगदी सहज आठवून सांगते.  स्मार्ट फोन वापरताना बोटे भलतीचकडे पडतात पण वाती करताना ,  मोदक करताना हीच बोटे  किती शिताफीने  भराभर  फिरतात.  

याचा अर्थ असा की आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे वय वेगवेगळ्या वयात होते.   मंदाताईंना आता नादच लागला , कोणती कामे  पूर्वीसारखी  होतात व कोणती  होत नाहीत हे पहाण्याचा.  

एक दिवस त्यांनी सरळ 50 कामांची यादीच  केली.  त्यातली काही कामे  दैनंदिन तर काही कामे  कौशल्याशी निगडीत.  यादी पूर्ण झाली आणि त्यावर टिकमार्कही झाले.  

मंदाताईंना खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला  कारण त्यांना त्यातली  41 कामे अजूनही जशीच्या तशी करायला जमतात  हा शोध लागला.   म्हणजे 82% कामे जमतातच की! 👍👍

अरेच्चा! मग आपण दिवसाकाठी इतक्या वेळा  ‘ वय झालेय ‘ असे का बरे म्हणतो? 🤔🤔 खरंतर आपल्या एखाद्या अवयवाने असहकार पुकारणे म्हणजे वय होणे  नव्हे.   जी कामे माझ्या आवडीची आहेत ती मी अजूनही छान करू शकते कारण ती पुन्हा पुन्हा करते  म्हणून सराव आणि आत्मविश्वास दोन्ही खूप असतो.   म्हणजेच सरावाने  आत्मविश्वास टिकवता येतो.  

याच विचारातून  मंदाताईंना एक समाधानकारक शोध लागला.  तो म्हणजे…… वय होण्याचे वय थांबवणे  हे थोडेफार का होईना, आपल्या हातात आहे.  

त्या लगेच उठल्या  , खोलीत गेल्या  आणि पेटीतून जुनी , जपून ठेवलेली  लोकर आणि सुया काढल्या.  छान एकसारखे  टाके घालू लागल्या.  त्या स्वतःवरच खूप खूश होत्या. प्रत्येक टाका जणू  सांगत होता ‘मनाचे आणि मेंदूचे वय  अजून झालेले नाही  मंदाताई. ‘ 😊

लेखिका :सुश्री सुजाता भडभडे

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments