श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजुरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच टाकले होते. पण ते खोटं ठरवणारं, मला अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातेय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.
आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.
मी त्यांच्या केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं होतं.
“यु आर व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वॉज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.” ते म्हणाले होते.)
आज दिवसभर काय घडत होतं ते त्यांच्याकडून ऐकताना माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ‘अतर्क्य’ म्हणजे काय याचा प्रत्यय मला प्रत्येक क्षणी येत होता. सहजासहजी घडूच न शकणारं बरंच कांही दिवसभरात घडून गेलं होतं !!
माझ्या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ, त्यात व्यत्यय आणण्यासाठीच अचानक ठरली असावी अशी आमच्या जी.एम्. मॅडमची ती व्हिजीट, त्यादरम्यान मॅडमनी सूतोवाच केलेली नव्याने येऊ घातलेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ची गोल्डन शेकहॅंड स्कीम आणि त्याच अनुषंगाने माझ्या आयुष्यांत येऊ पहाणारी अनोखी वळणं न् पुढे त्यात प्रत्येकवेळी निर्माण होत गेलेली अनिश्चितता…!
वखरेसाहेब सांगत होते ते ऐकताना हे सगळंच अधांतर अतिशय अनपेक्षितपणे हळूहळू विरून गेलंय असंच मला वाटतं राहिलं. कारण जे घडलं होतं ते अतिशय अनपेक्षित आणि नेमकं मला हवं तसंच!!
आज पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळचे ते क्षण मी विसरूच शकत नाहीय.माझ्या अनोख्या भविष्यकाळासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्यासाठी उर्वरीत आयुष्यातली नवी पहाटच ठरली होती..!
वखरेसाहेबांनी सांगितलं त्यानुसार नागपूर रिजनल मॅनेजर श्रीवास्तव साहेब अकोला ब्रॅंचमधील बुडीत कर्जांमधे घोळ घालून ठेवलेल्या आधीच्या मॅनेजर इतकंच नंतर चार्ज घेतलेल्या मलाही जबाबदार ठरवू पहात होते आणि सर्व सुरळीत होईपर्यंत मला स्वेच्छानिवृत्तीसाठी आवश्यक असणारी ‘क्लीनचिट’ द्यायला टाळाटाळ करीत होते.३१ डिसेंबर ही सदर योजनेच्या अंमलबजावणीची अखेरची तारीख उजाडली तेव्हा माझा एकट्याचाच अर्ज अजूनही पेंडिंग असल्याचं लक्षात येताच एम्.डी.आॅफीसने तिथे सर्वांना धारेवर धरलं होतं.मी पुढे चालून आलेली एक सुवर्णसंधी हातून निसटूनच गेलीय हेच गृहित धरुन सगळं नाईलाजाने स्विकारलं होतं त्याचवेळी तिकडं सेंट्रल आॅफिस पातळीवर मात्र या प्रकरणाला अचानक हे वेगळंच वळण लागलं. तिथे हे प्रकरण थेट स्वत:च्या ताब्यात घेतलं ते नेमकं मला व्यक्तिशः ओळखणाऱ्या जी.एम्. मॅडमनीच. आणि दुसऱ्याच क्षणी वखरेसाहेबांच्या फोनचा रिंगटोन! अकोला ब्रॅंचमधील चिघळलेल्या प्रश्नाची सविस्तर पार्श्वभूमी मॅडमनी त्यांच्याकडून समजून घेतली आणि थेट श्रीवास्तव साहेबांना फोन करुन कडक शब्दांत याप्रकरणातील त्यांच्या कॅज्युअल अॅप्रोच आणि टाईम किलींग टॅक्टीजवर ताशेरे ओढत ‘ लिमयेनी तिथे अल्पकाळात प्रतिकूल परिस्थितीत जे कांही काम केलंय त्याचं पूर्ण रेकाॅर्ड झोनल व सेंट्रल आॅफिसमधे सुरक्षित आहे’ असं त्यांना स्पष्ट शब्दात बजावून ‘ घ्याल तो निर्णय पूर्ण जबाबदारीने घ्या आणि त्याच्या परिणामांना सज्ज रहा’ असं त्यांना बजावलं.
पुढच्या पंधरा-वीस मिनिटातच मला क्लीनचीट देणारा फॅक्स श्रीवास्तव साहेबांनी सेंट्रल आॅफीसला पाठवला होता आणि त्याची एक प्रत वखरेसाहेबांकडे.
वखरेसाहेब काय किंवा या जी.एम्.मॅडम काय, या सर्व घटनाक्रमात तिथं दुसरं कुणीही असतं तर? हे असंच या क्रमाने घडलं असतं? सगळं योगायोगानेच घडावं तसंच घडत गेलेलं असूनही त्या मागचा सूत्रधार मात्र ‘तो’च होता. त्या शिवाय हे सगळं असंच घडणं शक्य तरी होतं का? माझ्या आयुष्यातल्या अशा असंख्य बिकट वाटांवरच्या प्रत्येक अंधाऱ्या वळणावर मला लख्ख प्रकाशवाट दाखवणाराही ‘तो’च तर होता!
“सोs..टूमारो वील बी ए लास्ट डे आॅफ युवर सर्व्हिस लाईफ. विश यू आॅल द बेस्ट!” वखरेसाहेबांचे शब्द ऐकून मी दचकून भानावर आलो.स्वप्नवत वाटावेत असे त्यांचे ते शब्द मला भानावर आणतानाच आतून हळवं करून गेले.
“नका काळजी करु.सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना?” या त्यांच्याच शब्दांनी कांही दिवसांपूर्वीच मला आश्वस्त केलं होतं आणि आज त्यांचेच शब्द मला आनंदाने नव्या हव्याहव्याशा अशा अनोख्या वाटेवर निश्चिंतपणे मार्गस्थ व्हायचे संकेत देत होते!!
“थॅंक्यू व्हेरी मच सर..थॅंक्स फाॅर एव्हरीथिंग..”
माझा आवाज भरून आला होता. कसंबसं स्वतःला सावरत मी त्यांचे आभार मानले आणि जाण्यासाठी उठलो.
“बसा. हॅव अ कप आॅफ टी वुईथ मी..” ते मनापासून म्हणाले.
आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंतचे हे असे सगळे क्षण आपसूकच माझ्या मनात अलगद जपले गेलेयत. कारण माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈





