श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या नकळत्या वयापासूनच मनात रूजत गेलेला ‘त्या’च्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास नंतरच्या असंख्य अनुभवांमुळे अधिकाधिक दृढ होत गेलेला आहे आणि माझ्या स्वेच्छानिवृत्तीनंतरच्या काळातही वेळोवेळी मला जाणवत राहिलेला त्याचा अलौकिक स्पर्श माझं जगणं अधिकच अर्थपूर्ण करतो आहे!

त्या सगळ्याच अनुभवांबद्दल सविस्तर न लिहिता त्यातले प्रातिनिधिक ठरतील असे दोन अनुभव मात्र या संदर्भात मला आवर्जून सांगावेसे वाटतायत.)

पुण्याच्या ‘क्वेस्ट टूर्स’ तर्फे २०१६ साली आम्ही नॉर्थ ईस्टच्या ‘सेव्हन सिस्टर्स’ टूरला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. प्रवास कालावधी २१ दिवसांचा. सहप्रवासीही आमच्यासारखेच प्रवासाची आवड असलेले. पहिल्या दिवशी परस्परांच्या औपचारिक ओळखीचा कार्यक्रम. नंतर अल्पकाळातच त्या ओळखी मनमोकळ्या गप्पांमुळे अधिकच घट्ट झालेल्या. पहिल्या दहा दिवसांचा एक टप्पा पूर्ण होऊन आता नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम ही स्थळे बाकी होती. आमचा पुढचा मुक्काम होता नागालॅंडसाठी. त्याआधीचा ‘काझीरंगा’ अभयारण्याजवळ असलेल्या एका हाॅटेलमधील आमच्या वास्तव्यातला तो अखेरचा दिवस होता.

त्यादिवशी चेक आऊट करून आम्ही नागालॅंडला निघालो आणि अचानक दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं. मग तोवरचा आमचा आनंद, उत्साह सगळा नासूनच गेला. कारण ध्यानीमनी नसताना नागालॅंड बाॅर्डरच्या अलिकडे असलेल्या चेकपोस्ट जवळ आमची टुरीस्ट बस अडवली गेली. नागालॅंडमधे दोन दिवसांपासून कांही मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं ज्याला नेमकं आजच अचानक हिंसक वळण लागलं होतं म्हणे. पाठोपाठ नुकतेच दोन बाॅंबस्फोटही झाल्याने १४४ कलम जाहीर होऊन संचारबंदीची घोषणा झाली होती. त्यामुळे पुढे अर्थातच ‘नो एंट्री’! नाईलाजाने बस परत फिरली. आम्हाला पुन्हा आधी चेक आऊट केलेल्याच हाॅटेलवर घेऊन आली आणि अखेर उर्वरीत दहा दिवसांची टूर रद्द होऊन सर्वांची परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.

अचानक असं विघ्न येऊन टूर अर्धवट सोडून घरी परत फिरावं लागल्याने आम्हा सर्वांचाच विरस झाला पण त्याला पर्याय नव्हता. कदाचित हेच हिंसक वळण आणि संचारबंदी आम्ही नागालँडमधल्या हॉटेलमधे चेकइन केल्यानंतर उद्भवली असती तर? त्या परिस्थितीत याहीपेक्षा भयंकर असं कांहीही घडू शकलं असतं. परिस्थिती अनिश्चित काळापर्यंत चिघळलीही गेली असती आणि आम्ही बंद दाराआड तिथं अडकून पडलो असतो. त्यापेक्षा हे बरं म्हणत आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय कुठे होता? माझ्यासाठी मात्र ते तेवढंच असणार नव्हतं. मी ट्रीप अर्धवट टाकून असं परत यायची वेळ आलीच नसती तर त्यामुळे पुढच्या आयुष्यभराचं सगळंच स्वास्थ्य मी हरवून बसलो असतो असं वाटायला लावणारं एक आक्रित तिथं घरी माझी वाट पहात होतं! मला घरी जाईपर्यंत त्याची कल्पना नव्हती एवढंच!

आम्ही मधेच कां परत येतोय ते तिथून निघाल्यानंतर घरी मोघम कळवून ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही रात्री लवकर घरी पोचल्यावर सलिल/अनघाशी आधी जुजबी चर्चा झाली ती त्यासंबंधीच. पण कां कुणास ठाऊक ते दोघे नेहमीसारखे मोकळे वाटत नव्हते. जेवणं आवरून आम्ही दोघे बॅगा आवरायला आमच्या रूममधे आलो तसे पाठोपाठ सलिल/अनघाही आले.

” बाबा, तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर एक सांगायचंय. ” सलिल म्हणाला.

” असं कां विचारतोयस? काय झालंय? “

“कोल्हापूरहून उदयदादाचा परवा फोन आला होता. पुष्पाआत्याबद्दल. “

“कां रे? पुष्पाताई बरी आहे ना…? ” हे विचारतानाही माझा आवाज थरथरतोय हे लक्षात येताच मनात येऊ पहाणाऱ्या कुशंका मी झटकून टाकल्या…

उदय माझ्या पुष्पाताईचा मुलगा. काळजी करण्यासारखं कांही असल्याशिवाय तो असा फोन करणं शक्यच नव्हतं.

“सांग ना,.. काय झालंय? ”

सलिलनं सांगितलं ते ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. पुष्पाताईचं डाव्या हाताच्या अंगठ्याजवळचं बोट खूप दिवसांपासून दुखत होतं. अलिकडे त्या बोटाला सूजही येऊ लागली म्हणून लगेच ऑर्थोपेडिकला दाखवलं. ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंटनंतरही बोटाचं इन्फेक्शन वाढतच गेलं. त्या बोटाच्या हाडाचा भुगा होऊ लागलाय हे लक्षात आलं आणि मग नाईलाजाने ते बोट कापायचा निर्णय झालाय. परवा सोमवारी कोल्हापूरला आॅपरेशन करायचं ठरलंय. सलिलने सांगितलं त्याचा हा सारांश.

ऐकता ऐकता मी गंभीर झाल्याचं लक्षात येताच सलिल म्हणाला,

“बाबा, जवळच्या बोटांपर्यंत इन्फेक्शन पोचू नये म्हणून हे आॅपरेशन आवश्यक आहे म्हणालेत डाॅक्टर. आत्ता नऊच तर वाजतायत. आत्या अजून झोपली नसेल. तुम्ही आत्याशी फोनवर बोला हवंतर. तुम्हा दोघांनाही बरं वाटेल. “

” नको. मी उद्या सकाळी लवकरच कोल्हापूरला जाऊन समक्षच भेटतो तिला. तरच माझं समाधान होईल… “

मी वरवर शांतपणे म्हणालो खरं पण रात्रभर माझ्या डोळ्याला डोळ्या नव्हता. आम्हा सर्व लहान भावंडांसाठी तिच्या कोवळ्या वयापासून परोपरीने झटणाऱ्या आमच्या या बहिणीचं माझ्या आयुष्यातलं स्थान ती अशी संकटात असताना मला नव्याने जाणवलं! हे दुखणं आणि ऑपरेशनचा निर्णय सगळं हू़ की चू न करता नेहमीच्याच अतिशय शांत आणि धीरोदात्तपणानं तिनं स्वीकारलं असेलही कदाचित पण मलाच ते स्वीकारता येईना. ट्रीप अर्धवट सोडून इथं आलो म्हणून हे आपल्याला आधीच सगळं समजलं तरी. एरवी ट्रीप निर्विघ्नपणे पूर्ण झाली असती, दहा दिवसांनंतर आपण आलो असतो, तर तिचं बोट कापून टाकलेला पंजाच पहावा लागला असता. नुसत्या कल्पनेनेही माझ्या अंगावर सरसरून काटाच आला! पण हे आधी आपल्याला समजून उपयोग काय? आताही वेगळं काय होणाराय? मी तिचं बोट थोडंसं वाचवू शकणाराय? उघड्या डोळ्यांनी पहात रहाण्याशिवाय काय करु शकतो मी?? अशाच सगळ्या नकारात्मक विचारांनी मन अधिकच अंधारून आलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच. मी कांहीतरी करायला हवं होतं पण कांहीच करू शकत नव्हतो…! मनाच्या त्या असहाय, हतबल अवस्थेत प्रवासाने थकलेलं शरीर शांत झोपेसाठी आसुसलेलं पण मनात मात्र हे सगळे उलटसुलट विचार ठाण मांडून बसलेले. अर्धवट ग्लानी, अर्धवट जागेपण याच अवस्थेत माझी घुसमट वाढत चालली. त्यातच रात्र उलटली तरी मिटल्या नजरेसमोरची असंख्य काटेरी प्रश्नचिन्हं बोचतच राहिलेली! आणि.. आणि.. अचानक त्या प्रश्नांचा गुंता दिसेनासा होत अगदी पुसटसा असा एक चेहरा माझ्या मिटल्या नजरेसमोर क्षणभर तरळून अलगद विरून गेला न् मी शहारलो. दचकून जागा झालो. उठून बसत अलगद डोळे उघडले तेव्हा पहाटेचे ४ वाजून गेले होते. मन मात्र माझ्या मिटल्या नजरेसमोर क्षणभर तरळून गेलेल्या त्या चेहऱ्याभोवतीच घुटमळत राहिलं… आणि… आणि अचानक ओळख पटली! .. ते.. ते.. डाॅ. चंद्रशेखर परांजपेच.. हो… नक्कीच. पण मग माझ्या मनातल्या घुसमटीचा अर्थाअर्थी यांच्याशी काय संबंध? असंही क्षणभर वाटून गेलं आणि दुसऱ्याच क्षणी त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यासारखा एक आशेचा किरण मला स्वच्छ दिसू लागला..!

यातून कांहीतरी चांगलंच निष्पन्न होणार असेल. नक्कीच. पण कसं? हे सगळे माझ्या मनाचे खेळच तर नसतील? पण परांजपे डाॅक्टरांचा विचार अलिकडे कणभरसुध्दा मनात नव्हता मग भास म्हंटलं तरी तो परांजपे डाॅक्टरांचा चेहराच कां?? …

हा.. हा ईश्वरी संकेत तर नसेल? हा प्रश्न मनात उभारला आणि तोच मला मी याक्षणी काय करायला हवं त्याची नेमकी दिशा दाखवून गेला. आत्ताच्या माझ्या अस्वस्थतेचं कारण ठरलेल्या ताईच्या प्राॅब्लेमबद्दल सगळं मनापासून बोलून मन मोकळं करायला डॉ. परांजपेंखेरीज माझ्यासाठी दुसरं होतंच कोण?

डाॅ. परांजपे आमचे फॅमिली डॉक्टर. शांत. हसतमुख. अभ्यासू. हुशार. आणि विश्वासू! त्यांना पिढीजात चालत आलेला वैद्यकीचा वारसा तर मिळाला होताच शिवाय त्यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी आयुर्वेद(एम्. डी.) नंतर एम्. बी. बी. एस्. पदवीही प्राप्त केली होती. त्यामुळे आयुर्वेदीक औषधांचाच नव्हे तर गरजेनुसार अॅलोपथीचा उपयोगसुध्दा करु शकणारे डाॅ. परांजपे हे आमच्या माहितीतलं अपवादात्मक उदाहरण होतं! त्यांच्याशी बोलून निदान मनावरचं ओझं हलकं तरी होईल असं वाटलं आणि मी लगेच डाॅ. परांजपेना फोन करून त्यांच्या भेटीची तासाभरानंतरची वेळ ठरवली.

त्यांच्याकडे जाण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रुपातला तो आशेचा किरण त्या प्रकाशवाटेवर माझी सोबत करीत होता..! !

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments