? विविधा ?

☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो. 

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. 

आज अचानक एकाएकी 

मानस तेथे लागे विहरू 

खेड्यामधले घर कौलारू. 

पूर्व दिशेला नदी वाहते 

त्यात बालपण वाहत येते 

उंबरठ्याशी येऊन मिळते 

यौवन लागे उगा बावरू 

माहेरची प्रेमळ माती 

त्या मातीतून पिकते प्रीती 

कणसावरची माणिक मोती 

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू 

आयुष्याच्या पाऊलवाटा 

किती तुडविल्या येता-जाता 

परि आईची आठवण येता 

मनी वादळे होती सुरु. 

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द.

शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो. 

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . 

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते. 

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments