अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस
संसाराची आसक्ती गेल्याशिवाय तुम्ही आम्ही सर्वच माणसे या ऐहिक मोह पाशातून मुक्त होणे कदापि शक्य नाही म्हणून अशा संसारासक्त माणसांना तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात ते पाहू.
का रे माझी पोरे म्हणशील ढोरे/
मायबाप खरे काय एक//
का रे गेले म्हणून मी करीसी तळमळ/
मिथ्याची कोल्हाळ गेलियाचा//
का रे माझे माझे म्हणशील गोत/
न सोडविती दूत यमाहाती//
का रे मी बळिया म्हणविसी ऐसा/
सरणापाशी कैसा उचलविसी//
तुका म्हणे न धरी भरवसा काही/
वेगी शरण जाई पांडुरंगा//
महाराज म्हणतात की, बाबारे, तात्काळ तू पांडुरंगाला शरण जा. उगाच कशापाई ही माझी मुलं, ही माझी गुर ढोरं करत बसतोस? माझे आई- बाप, माझं गोत का करतोस? कोणी गेल्यावर विनाकारण का तळमळतोस? यमदुताच्या तावडीतून यांच्यापैकी कोणीही तुला सोडवण्यास येणार नाही हे लक्षात असू दे. स्वतःला मोठा बलाढ्य का समजतोस? जर इतका बलवान आहेस, तर मेल्यानंतर तुला सरणावर दुसऱ्याला का चढवावे लागते? एकच लक्षात ठेव की या विश्वात कायम टिकणारा, चिरंजीव असा कोणताच पदार्थ नाही. म्हणून तू फक्त एका पांडुरंगाला शरण जा. ते एकच शाश्वत सत्य आहे.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/
उदास विचारे वेच करी//
उत्तमची गती तो एक पावेल/
उत्तम भोगेल जीवखाणी//
पर उपकारी नेणे परनिंदा/
परस्त्रिया सदा बहिणी माय//
भूतदया गाई पशूंचे पाळण/
तान्हेल्या जीवन वनामाजि//
शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट/
वाढवी महत्त्व वडिलांचे//
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ/
परमपद बळ वैराग्याचे//
गृहस्थाश्रमी माणसाचे आचरण कसे असावे हे सांगणारा हा अभंग सर्वश्रुत व परिचित आहे. जन हो, प्रामाणिकपणे व्यवहार करून द्रव्य प्राप्त करावे, परंतु मनात त्याची आसक्ती नको. उदास विचारे, अलिप्त राहून ते द्रव्य खर्च करा. अशा व्यवहाराने तुम्हाला उत्तम गती मिळेल आणि तुम्ही चांगले भोग भोगाल. कुणाला लुबाडून, चोरी करून, डाका घालून सद्गती मिळणे कदापी शक्य नाही. जो परोपकार करतो, निंदा नालस्ती करत नाही, जो परस्त्रीला मातेसमान, भगिनी समान मानतो, जो सर्व भूत मात्रांवर प्रेम करतो, दया, सहानुभूती दाखवतो, त्यांचे पालन- पोषण करतो, यथाशक्ती वैराण मार्गात पाण्यासाठी विहिरी बांधतो, जो आपली वृत्ती शांत ठेवून कोणाशी दुष्ट वागत नाही, वरिष्ठांचा मान ठेवतो, त्याचा गृहस्थाश्रम आदर्श होय. मोक्षप्राप्तीला लागणारे वैराग्य ते हेच होय. केवळ जंगलात जाऊन एकांतवासात राहण्याने मोक्षप्राप्ती असंभव आहे.
महाराज प्रापंचिकाला पुढे सांगतात,
आयुष्य मोजावया बैसला मापारी/
तू का रे वेव्हारी संसाराच्या//
अरे भल्या माणसा, तो काळ तुझ्या आयुष्याचे माप घेत आहे आणि तू इथे संसारात रममाण झाला आहेस?
नेईल ओढोनी ठाऊक नसता/
न राहे दुश्चित्ता हरिविण//
तो काळ तुला कधी ओढून नेईल ते तुला कळणारही नाही, म्हणून आतापासूनच तू हरीचिंतन करत रहा. तुझे चित्त विचलित होऊन देऊ नकोस.
कठीण हे दुःख यम जाचतील/
कोण सोडविल तया ठाई//
तू केलेल्या पापांची यमराज तुला शिक्षा देईल, तेव्हा यातून तुला सोडवायला कोण येईल?
राहतील दूरी सज्जन सोयरी/
आठवी श्रीहरी लवलाही//
त्यावेळी सखे सोयरे, नातलग, मित्र मंडळी सर्वजण तुझ्यापासून दूर राहतील. तेव्हा तू सतत श्रीहरीचे स्मरण करत रहा, त्या एका हरीला शरण जा.
तुका म्हणे किती करसी लंडायी/
होईल भंडाई पुढे थोर//
तुकाराम महाराज म्हणत आहेत, ” अरे, इतका गर्व आणि मस्ती बरी नव्हे, असे केल्याने शेवटी तुझी मोठी दैना होईल.
संसारी माणूस, गृहस्थ सर्वसाधारणपणे कसा असतो त्याचे वर्णन आपल्याला या खालील अभंगात पहावयास मिळते.
जरी आले राज्य मोळविक्या हाती/
तरी तो मागुता वेवसायी//
तृष्णेची मजूरे नेणती विसावा/
वाढे हाव हावा काम कामी//
वैभवाची सुखे नातळता अंगा/
चिंता करी भोगा विघ्न जाळी//
तुका म्हणे वाहे मरणाचे भय/
रक्षण उपाय करूनी असे//
एखाद्या मोळी विक्या माणसाला राज्यकारभार देऊन त्याला सिंहासनावर बसवले, तरी त्याच्या मनात मोळ्या विकण्याची आणि त्याचा धंदा करण्याची इच्छा निर्माण होणारच. संसारी माणसाचे ही तसेच आहे. मनुष्य देहाचा लाभ होऊनही आपल्या तृष्णेचा (लोभाचा) गुलाम होतो. अविश्रांत श्रम करतो आणि हावेने हाव, कामाने काम वाढत जातो. भरपूर वैभव असले तरी त्याला सुख लाभत नाही. कितीही उत्तम भोग अनुकूल असले तरी काही विघ्न तर नाही ना येणार या भीतीने त्याचे आयुष्य जळत राहते. जरी तो आपल्याला मरण नक्की येणार आहे हे जाणत असला तरी, आपला पैसा, सारे वैभव कसे टिकून राहील याचा अहोरात्र विचार करत राहतो.
अशा प्रकारे या मायाजालात अडकलेल्या प्रापंचिकाला त्यातून बाहेर काढण्यासाठी परमार्थाला कसे लागावे ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील काही अभंगातून सुचवितात.
ते म्हणतात,
आवडी येते गुणे/
कळो चिन्हे उमटती//
पोटीचे ओटी उभे राहे/
चित्त साहे मानसी//
डोहोळीयाची भूक गर्भा/
ताटी प्रभा प्रतिबिंबे//
तुका म्हणे मागून घ्यावे/
मना खावे वाटे ते//
दृष्टांत देऊन महाराज जन रीत सांगत आहेत. ते म्हणतात की, एखाद्या ठिकाणी चांगले गुण दिसले म्हणजे त्या माणसावर आपली प्रीती जडते. जी गोष्ट मनात असते तीच ओठा वाटे प्रगट होते, कारण मन चित्ताचे सहाय्य घेत असते. मातेला डोहाळे लागतात, ती सर्व भूक, तहान, आवड गर्भाची असते. त्याचीच भावना आईच्या ठिकाणी अन्नाच्या वासने प्रमाणे प्रतिबिंबित होते. जे भक्षण करताना मनाला आवडते तेच पुन्हा मागून खावेसे वाटते. तुकाराम महाराज आपल्या आवडी परमार्थाकडे कशा लावाव्या ते सुचवतात.
स्वतःबद्दल प्रापंचिकांना ते सांगतात,
” माझ्यावर अशी काही अमंगल वेळ ओढवली की नेमका कथेच्या वेळी मला शीण आला आणि मी दुःखी झालो. माझ्या पापामुळे मला दुष्ट लोकांचे दर्शन झाले. मी आता हे विठोबाच्या कानावर घालतो. जन्माला येऊन संसाराच्या मोहात मी कितीदा माझी फजिती करून घ्यावी? देवा, माझी उघड उघड फजिती जाणून लवकर या आणि मला मदत करा. या संसाराच्या वेढ्यात सापडलो आणि बायका मुलांची सेवा करण्यातच अडकलो. पण भक्तीच्या वाटेने पांडुरंगाची कृपा झाली, आणि त्याची भेट झाली. संसाराचे ओझे डोक्यावर होते, ते सोडविणारा कोण सद्गुरु भेटेल याची मला चिंता लागून राहिली होती. “
स्वतःच्या या अनुभवावरून सांसारिकास महाराज सांगतात,
जा रे तुम्ही पंढरपुरा
तो सोयरा दीनांचा//
गुणदोष नाणी मना/
करी आपणासारिखे//
उभारोनी उभा कर/
भवपार उतराया//
तुका म्हणे तातड मोठी/
जाली भेटी उदंड//
तुम्ही पंढरपूरला जा कारण तो परमेश्वर, पांडुरंग दीनांवर दया करणारा आहे दीनानाथ आहे. जे त्याला शरण जातील त्यांचे गुणदोष न बघता तो त्यांना आपल्या समान करतो. शरणागताना भवसागरातून उद्धारून नेण्याकरता तो आपले हात वर करून उभा आहे. दीन व आर्त लोकांना भेटण्याची त्याला मोठी उत्कंठा आहे. त्याच्या भेटीने आपले फार मोठे हित होते.
इतके अभंग वाचल्यानंतर आपण सारेच या भवसागरातील प्रवासी, सर्वसामान्य प्रापंचिक, परमार्थाच्या वाटेने चाललो तर आपल्यालाही पांडुरंग, माय- माऊली भेटेल आणि कृपा करेल यात शंका नाही.
क्रमशः… २२
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈







