सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळं बघणे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल “स्थळ” ह्या संकल्पनेबद्दल तसे लिहीले होतेच. तेव्हा “स्थळं बघणे”हा कार्यक्रम अरेंज्ड मँरेज करणा-या उपवर मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अपरिहार्य मार्ग बनला आहे. पूर्वी नातेवाईक भरपूर असायचे, लोकं एकमेकांशी जुळलेली असायची परंतु हल्ली लोकसंपर्क कमी कमी होत जाण्याच्या प्रक्रीयेमुळे “लग्न जमविणे” हे मुलं व पालक ह्यांच्या साठी एक अवघड परीक्षाच होऊन बसलीयं.

विशेषतः उपवर मुलींचे प्रमाण हे उपवर मुलांच्या तुलनेत कमी असल्याकारणाने  उपवर मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक जटील समस्याच होऊन बसलीयं. अरेंज्ड मँरेजमध्ये एकतर परिचीत वा नातलग ,नाही तर विवाहमंडळं मध्यस्थांची भूमिका पार पाडतात. आणि ब-याच लोकांच्या अनुभवातून असं निदर्शनास आलं की चांगलं स्थळं पदरी पाडण्याच्या नादात हे उपवर,त्यांचे पाल्य किंवा मध्यस्थी वा विवाहनुरुप मंडळं ही बोहल्यावर चढणा-याची बरेचसे गुणं चढत्या भाजणीतील माहिती सारखी जाहीर करतातं. मुलगा असो वा मुलगी, संसाराची सुरवातच मुळी खोटी, वाढीव माहिती, देऊन केल्या गेली तर तो संसारातील विश्वासाचा पायाच मुळी डळमळीत राहील. उलट मी तर म्हणेन आपले विचार, आपली मतं ही जशीच्या तशी जाहीर करावीत. त्या देवाला काळजी असते, आपल्या विचारांचा, मतांचा आदर करणारा पार्टनर आपल्याला कुठूनही मिळेल. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं अजिबातच नसतं, त्यामुळे आपलं शिक्षणं, आपली कमाई ,आपले विचारं,मतं,आपल्या अपेक्षा ,आपल्या लेखी प्राधान्य ह्या गोष्टींचे अतिशय स्पष्टपणे तसेच मनमोकळ्या पद्धतीने आदानप्रदान व्हायला हे हवचं.

उदाहरण द्यायचंच झालं तर मुलीला फारशी घरकामाची आवड वगैरे नसली तर अजिबात बायोडाटा मध्ये गृहकर्तव्यदक्ष असले जडजूड शब्द वापरून भुलावण करु नये, तसचं मुलामुलीला माणस़ांची ,गोतावळ्याची फारशी आवड नसतांना प्रेमळ,मनमिळाऊ असली बिरुदं चिकटवू नयेत. तसचं मुलामुलीची कमाई सांगतांना कृत्रिम चलन फुगवट्यासारखी वाढवून सांगू नये, हे जर पाळले नाही तर अपेक्षांचा चक्काचूर केल्याचा ठपका अंगाला चिकटलाच म्हणून समजा. ह्या उलट एकदम खरीखुरी माहिती सगळ्यांनीच पुरवायचे ठरविले तर पुढील आयुष्य हे ब-याच प्रमाणात सुकर,सुरळीत होईल हे नक्की.

सध्या लग्न झाल्याबरोबर बेबनाव,घटस्फोट हे सर्रास काॅमन झालायं. पूर्वी मागील पिढी पर्यंत सहनशीलतेच प्रमाण ह्या पिढीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पटो वा न पटो जगासाठी तरी लग्न टिकविण्याकडे कल होता. परंतु आता काळ बदलललाय,कोणीही झुकायला, माघार घ्यायला तयार नसतं.ह्या परिस्थीतीत जर सांगितलेल्या गोष्टी खोट्या वा चूक निघाल्या तर ह्या पिढीतील तरुणाई सहन निश्चितच करतं नाही. आणि लग्न हे फक्त दोघांच नसतचं मुळी. ह्यामध्ये दोन्हीही कुटुंब इनव्हाॅल्व झालेली असतात. ह्या परिस्थितीचा विपरीत परिणाम दोन्ही कुटुंबां वर होऊ नये ही ईच्छा असल्यास आरोग्य, कमाई, आवडी,अपेक्षा,सवयी ह्या पंचसूत्री ची खरीखुरी माहिती ही एकमेकांना द्यावी तर आणि तरच ही कुटूंबसंस्था डळमळीत न होता सुखी आनंदी संसार बहरेल.शेवटी काय हो सगळ्यांना” नांदा सौख्य भरे” हेच हवं असतं.

नात्यांचही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं अस आपण म्हणू शकतो.

दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो,संयम नसतो,त्याग हा शब्द डिक्शनरी मधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे नवीन रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं.आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.

नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की. कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं.कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती,दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्या सोबतच बाकी इतर नाती सद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाममतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली,थोडासा स्वार्थ बाजूला सारला तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तमप्रकारे संसार करु शकतील. त्या मुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या ची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की खरोखरच सहजीवन  जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.

एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये.नाही तर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल तरीही एक नक्की तडजोडी ने कदाचित आपल्याला सुख नाही लाभंत पण आपण न केलेल्या तडजोडी मुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं तरी साध्यासरळ संसारासाठी “तडजोड”हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो.आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडी नंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने  घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की.  असो हा विषयच न संपणारा विषय आहे.तेव्हा तुर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments