श्री संभाजी बबन गायके
☆ “जीवन’संपदा’ नष्ट करणाऱ्या संवेदनाहीनतेचे जाळे” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मानवी जीवनाला सर्वोच्च प्राधान्य या तत्वावरच मानवी समाजाची रचना झाली आहे… आणि त्यानुसारच कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. किंबहुना ती तशीच होणे अपेक्षित आहे. मृत्यू अटळ असला तरी तो नैसर्गिकपणे आला तरच त्याला अर्थ असतो. बाकी सर्व मृत्यू ‘बळी’ या प्रकारात मोडतात!
घरोघरी वीजपुरवठा, इंटरनेट, टेलीविजन वाहिन्या इत्यादी सुविधांसाठी वायर्स, केबल्स, पाईप्स वापरणे गरजेचेच असते. यात या केबल्स इत्यादी इकडून तिकडे ‘फिरवणे’ क्रमप्राप्त असतेच. वीजपुरवठा केबल्स भूमिगत टाकता येतात. पण इतर केबल्सचे तसे नाही. एक इमारत ते दुसरी इमारत, मध्ये असणारी झाडे, विजेचे खांब इत्यादीवरून या केबल्स दुसरीकडे नेताना त्या खाली अधांतरी लोंबकळत राहणार हे निश्चित. वादळ, मानवी हस्तक्षेप, केबल्स खराब होऊन तुटून जाणे, चोरी करण्यासाठी केबल्स कापून नेणे व उरलेली केबल तशीच ठेवणे, यांमुळे या केबल्स खाली येतात. काही ठिकाणी या केबल्सच्या गुंडाळ्या करून बाजूला लटकत ठेवल्या जातात, चोर केबल कापून उरलेली केबल तशीच लटकवत ठेवून जातात, आणि या केबल्स जर लोकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात असतील तर त्या त्वरीत तिथून दूर करणे अनिवार्य असते. पण नेमकी हीच बाब दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. कारण कुणाच्या जीवाचे कुणाला काही सोयरसुतक राहिलेले आहे, असे अजिबात आढळत नाही. आग लागलेली ज्याला दिसते त्याने त्याचक्षणी बोंब ठोकत इतरांना सावध करणे, सूचना देणे जसे केले जाते, तसे या बाबतीत केले जात नाही. काहीजणांना हा धोकाच लक्षात येत नाही. केबल्स यंत्रणा राबवणा-या लोकांच्या लक्षात आणून दिले तर लगेचच हालचाल होईलच असेही नाही. हा सर्वस्वी दोष आपल्या समाजव्यवस्थेचा, प्रशासनाचा आहे.
कायद्याच्या भाषेत सदोष मनुष्यवध हा प्रकार असतो. भारतीय दंड (शिक्षा) संहितेच्या १००/१०१ कलमानुसार साधारणत: अशी परिभाषा आहे की, एखाद्याच्या एखाद्या कृतीने, मनुष्याचा मृत्यू ओढवू शकतो, याची कल्पना असतानाही त्याबाबत योग्य ती काळजी न घेतली जाणे याला त्या व्यक्तीला, संस्थेला जबाबदार धरले जाईल. यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये झालेला मृत्यू ‘वध’ म्हटले गेले आहे, यातच सगळे आले!
या कायद्याची अंमलबजावणी कटाक्षाने झाली तरच इतरांना जरब बसेल. परंतू आपल्याकडील मानसिकता, पळवाटा असणारे कायदे, लपवण्याची, फसवण्याची कला अवगत असणारे तज्ज्ञ, आर्थिक हितसंबंध, राजकीय हेवेदावे यांत सर्व जिरून जाते… आणि हवेत विरूनही जाते.
खड्डे खोदून ठेवले जातात, त्यांच्या भोवती संरक्षक व्यवस्था ठेवण्याची तसदी घेतली जात नाही, अंधारात माणसे या खड्ड्यात कोसळतात. शेतात शेततळी तयार होतात, तिथेही हीच त-हा. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा चीन मधून येतो आणि चिनी आपल्या लोकांचा युद्धाशिवाय बळी घेऊ शकतात आणि त्यांना हा नायलान धागा मांजा म्हणून नालायक व्यापारी साहाय्य करतात. वाहने विरुद्ध दिशेने चालवून, अतिशय बेदरकारपणे चालवून, चीनी हेडलाईट्स लावून समोरच्याला तात्पुरते आंधळे करून जाणारे, वाहने रिवर्स घेताना, पार्क करताना त्यांच्याखाली कुणी मनुष्य, प्राणी नाही न हे पाहण्याची काळजी न घेणारे, बांधकामाच्या ठिकाणी वाळूत एखाद्या कष्टकरी महिलेचे लेकरू निजवले गेले असू शकते याचा विचार मनातही न आणणारे चालक, एकमेकांशी समांतर वाहने चालवत बोलत चाललेले वाहनचालक… मरणासाठी ही अशी हजारो कारणे आहेत. आणि या मरणांना आपण कारणीभूत होऊ शकतो, याची तिळमात्र शक्यता मनात नसणारी माणसेही लाखो आहेत. जगायचे कसे?
स्वत:च्या चुकीमुळे स्वत:चाच अपघातात मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तीवर सुरुवातीला एफ. आय. आर. दाखल होतो! पण मृत व्यक्तीला शिक्षा देता येत नसल्याने हा गुन्हा रद्दही केला जातो. पण यासाठी न्यायिक प्रक्रिया असल्याचे ऐकण्यात आले आहे. पण जे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशांवरही ही प्रक्रिया लागू असते. परंतू हे खटले खूप प्रलंबित राहतात, हे दुर्दैव आहे… अफाट लोकसंख्या हे कारण तर आहेच पण त्यापेक्षाही राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव हेही सर्वांत मोठे कारण आहे… जीव महत्त्वाचा मानला तर सर्वकाही करणे शक्य आहे… पण असो.
त्याला काय होतंय, मला काय त्याचं आणि हे असंच चालायचं अशी सार्वत्रिक वृत्ती बळावल्याने आपण आपली जीवन संपदा गमावण्याच्या अगदी जवळ असतो… हे सत्य आहे. फक्त तू आधी की मी आधी? एवढाच काय तो प्रश्न उरतो. कधी न कधी मरायचेच आहे, ज्याचे दिवस भरले तो जातो, आपण काय करणार? देव माणसाच्या मृत्यूला स्वत: जबाबदार राहू नये म्हणून अशाच काही सबबी शोधतो असेही लोक बोलतात. एक व्यक्ती जेंव्हा अशी अचानक, विनाकारण, दोष नसताना या जगातून जाते अर्थात तिला जावेच लागते… तेंव्हा अनेकांवर अनेक संकटे ओढवतात… ही यादी मोठी आहे!
त्यामुळे जे आता जिवंत आहेत, त्यांनी आपणही किंवा आपलेही कुणी यात केंव्हा तरी सापडू शकते, अशा विचाराने, एखादी आग लागली की आपण जसे धावत सुटतो, त्या पध्दतीने काही उपाय केले तरच हे थांबेल. अन्यथा… आपल्या कर्माची फळे भोगायला वर जाण्याची हल्ली गरज नाही… इथंच सर्व व्यवस्था आहे!
माझ्या मित्राची पत्नी, संपदा संदीप पटवर्धन अशाच एका केबल जाळ्यात अडकून जीवाला मुकली. त्यानिमित्ताने हे मनातले लिहिले आहे. विसरून जाऊ नका. कारण संपदाच्या वधाचा दोष आपल्याही माथी आहेच. पुढे असे आणखी पाप आपल्या हातून घडू नये, ही अपेक्षा आहे.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






