सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(आजच्या पाचव्या भागात ज्यांनी साहित्याचा दृढ पाया घालून दिला अशा दुर्गा)

वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा….

१) आशापूर्णा देवी 

८ जानेवारी १९०९ साळी जन्म झालेल्या या एक प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि कवयित्री होत्या. कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय, त्यांनी साहित्याच्या आवडीतून स्वतःला घडवले आणि बंगाली साहित्यात मोठे योगदान दिले.

वयाच्या १३ व्यावर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कविता शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. आणि त्या आजीवन लिहित राहिल्या. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबऱ्या, ३० कथासंग्रह, ४७ बालवाङ्मय आहे.

१९७६ मध्ये त्यांना ‘प्रथम प्रतिश्रुति’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला लेखिका आहेत.

१९९४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले, जो साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. याशिवायही त्यांनी बरे पुरस्कार मिळविलेले आहेत.

२) एलिस एक्का 

८ सप्टेंबर १९१७ ला यांचा जन्म रांची झारखंड येथे झाला. मूळ आदिवासी मुंडा समुदायाचा भाग होत्या. इतरांपेक्षा त्यांची भाषा, संस्कृती आणि परंपरा वेगळी असल्यामुळे शिक्षण घेतेवेळी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. १९३८ मध्ये कोलकत्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त करणारी ती पहिली आदिवासी महिला ठरली. सुरवातीला त्यांनी हिंदीतून केलेले लिखाण रांचीच्या आदिवासी पत्रिका मधून प्रसिद्ध होत होते. त्यांनी खलील जिब्रानच्या रचनांचे भाषांतर केले आहे. त्या पहिल्या आदिवासी महिला लेखिका ठरल्या. २०१५ मधे त्यांच्या कथांचे संकलन वंदना टेटे यांनी प्रसिद्ध केले.

३) काशीबाई कानिटकर

या पंढरपूरचे कृष्णराव बापट यांच्या कन्या. २० जानेवारी १८६१ रोजी साताऱ्याजवळील अष्टे या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले. ते सुधारणावादी होते. गोविंदरावांसोबत त्या रविवारी दुपारी प्रार्थनासमाजातील सभांना जात असत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी बखरी वाचल्या. याशिवाय संस्कृत नाटके वाचली. इंग्रजीही त्या शिकत होत्या. गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. तेव्हा गोविंदरावांबरोबरच हरिभाऊ आपटे काशीबाईंना लेखनास उत्तेजन देत असत. त्या पहिल्या महिला कादंबरीकार, कथासंग्रहकार ठरल्या.

‘शेवट तर गोड झाला’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १८८९ ला व ‘रंगराव’ ही त्यांची पहिली कादंबरी १९०३ ला प्रसिद्ध झाली. १९०६मध्ये पुण्यातील ग्रंथकार संमेलनात त्या एकमेव स्त्री लेखिका होत्या. १९०९ मधील वसंत व्याख्यानमालेत त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या.

४) महादंबा

जालना जिल्ह्यातील रामसगावच्या, तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासी. लहान वयात विधवा झाल्याने वडिलांच्या घरी परतल्या. भक्तीत रममाण होताना उपजत काव्याची ओढ जागी झाली. मराठी भाषेतील पहिली महिला संत कवयित्री आहेत. त्यांच्या काव्यरचनांना सवळी किंवा जवळीका म्हणतात. हा प्रकार धवळा प्रकारात येतो. धवळा हा महानुभव पंथातील धार्मिक विधींचा एक भाग आहे.

५) अमृता प्रीतम 

१९१९ मध्ये सध्याच्या पाकिस्तान पंजाब मध्ये जन्म झाला. फाळणीच्या वेळी त्या भारतात आल्या. १९३६ मध्ये त्यांनी ‘अमृत लेहरन’ नावाचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांचा विवाह प्रीतम सिंग यांच्याशी झाला व त्या अमृता कौर च्या अमृता प्रीतम झाल्या. फाळणीपूर्वी त्यांनी लाहोर रेडिओ स्टेशन वर पण काम केले होते. स्वातंत्र्यानंतर सामाजिक कार्यात सहभाग होता. त्यांची ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांचा अनेक देशी-विदेशी भाषात अनुवाद झाला आहे. त्यामुळे त्या विदेशातही तितक्याच प्रसिद्ध आहेत. १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘सुनेहे’ या कविता संग्रहास व १९८२ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार ‘कागज ते कॅनव्हास’ या कविता संग्रहास मिळाला आहे. दोन्ही पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला कवयित्री आहे.

६) रमाबाई रानडे 

रमाबाई रानडे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या आणि शेवटपर्यंत हेच कार्य करीत राहिल्या. पहिल्या सार्वजनिक कामात सहभागी होताना, त्यांना पती न्यायमूर्ती रानडे, यांनी भाषण लिहून दिले होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांत आपली भाषणे स्वतः लिहायला सुरुवात केली. त्या लेखिका नसल्या तरी मराठीतून आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे.

७) राससुंदरी देवी 

अंदाजे १८०९ मध्ये त्यांचा जन्म पबना जिल्ह्यात कोटाजिया गावात झाला. त्या बंगाली असून त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शाळेत जाऊ शकल्या नाहीत. शिक्षणाची आवड असल्याने त्या चोरून मिशनरी शाळेत जायच्या. अशाप्रकारे त्यांनी बंगाली भाषेची अक्षरे शिकून घेतली.

‘अमर जीवन’ हे त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन १८७६ मध्ये झाले. हे बंगाली साहित्यातील तसेच भारतीय, पहिले ज्ञात आत्मचरित्र म्हणून ओळखले जाते. या आत्मचरित्राचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात १६ लहान गद्य रचना व दुसऱ्या भागात १५ लहान गद्य रचना आहेत व दोन्ही मध्ये एक एक कविता आहे. त्या तशा लेखिका नसून त्यांची ही एकमेव रचना आहे.

८) सावित्रीबाई फुले 

यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये झाला. त्या समाजसुधारक, शिक्षण तज्ञ व कवयित्री होत्या. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. १८५४ मध्ये ‘काव्य फुले’ व १८९२ मध्ये ‘बावनकशी’ व ‘सुबोध रत्नाकर’ हे कविता संग्रह प्रकाशित झाले. ‘सावित्रीबाईंची गाणी’ असेही एक पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘ज्योतिबांची भाषणे’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले. तसेच गृहिणी मासिकातही त्यांचे लेख यायचे. प्रगत काळातील त्या पहिल्या महिला कवयित्री आहेत.

९) लल्लेश्वरी देवी 

१३१७ ते १३२० च्या दरम्यान यांचा जन्म श्रीनगर मधील एका छोट्याशा गावात ब्राह्मण परिवारात झाला. सासरी खूप त्रास असल्यामुळे त्यांनी सासरचे घर सोडले व संत श्रीकंठ महाराजांकडून दीक्षा घेतली. त्यांच्या काव्यशैलीला वाख म्हणतात. हा काश्मिरी भाषेतील एक छंद आहे. त्यात चार ओळींमध्ये कवी आपल्याला जे सांगायचे आहे ते लिहितो. तिच्या वाखांमधून तिने धार्मिक अढी कमी केल्या. जाती व धर्म या पलीकडे भक्तिमार्ग आहे हे पटवून दिले. १३९२ मध्ये त्यांचा देहांत झाला तरी आज सुद्धा काश्मीरमध्ये हिंदूंबरोबर मुसलमान सुद्धा लल्लेश्वरी देवीला मानतात.

– भाग ५.

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted