श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

मागच्या भागात आपण रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथांविषयी थोडी माहिती घेतली. रविंद्रनाथांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक म्हणजे देवेंद्रनाथ! त्यांनी बंगालचं सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विश्व समृद्ध केलं. त्यांच्याविषयी आणखी माहिती आज घेऊया.

ब्राह्मोसमाजाचे अनुयायी देवेंद्रनाथांचा उल्लेख महर्षी देवेंद्रनाथ असा करीत. तत्त्वबोधिनी पत्रिका ह्या ब्राह्मो समाजाचे मुखपत्र असलेल्या मासिकाद्वारे बंगाली गद्याच्या वाटचालीस गती देऊन त्यांनी मोठाच हातभार लावला. भारदस्त वैचारिक गद्यलेखनाची परंपरा बंगालीत ह्या पत्रिकेने सुरू झाली. ऋग्वेदाच्या बंगाली अनुवादास प्रथम देवेंद्रनाथांनीच हात घातला. संस्कृत व्याकरणही बंगाली भाषेत प्रथम त्यांनीच लिहिले. ‘स्वरचित जीवनचरित’ हे त्यांचे आत्मचरित्र फारच मनोरंजक आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्राचे पुढे त्यांची मुले, सत्येंद्रनाथ आणि इंदिरा देवी ह्या दोघांनी ‘देवेंद्रनाथ ठाकूरेर स्वरचित जीवनचरित’ नावाने इंग्रजीत भाषांतरही केले.

देवेंद्रनाथांच्या मुलांनी देखिल विविध विषयात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवली. द्विजेंद्रनाथ कवि, दार्शनिक और गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. सत्येंद्रनाथ पहले भारतीय ICS अधिकारी बनले. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार व संपादक झाले. रवींद्रनाथांनी नोबेल पुरस्कार मिळवून जागतिक किर्ती प्राप्त केली. त्यांची कन्या स्वर्णकुमारी देवी देखिल प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार व संपादक होत्या.

देवेंद्रनाथांच्या नातवंडांपैकी अनेकजण लेखक, चित्रकार, संगीतकार, संपादक, राजकारणी वा समाजकारणी आहेत.

देवेंद्रनाथांच्या अंतःकरणात वास्तव्य करणारा साहित्यिकच द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांचा साहित्यगुरू होय. देवेद्रनाथांमधील खरा साहित्यिक त्यांच्या स्वतःच्या आनुषंगिक लेखनात व्यक्त झालेला नसून, तो त्यांनी आप्तेष्टांना व स्नेह्यासोबत्यांना अनौपचारिकपणे लिहिलेल्या पत्रांमधून आणि त्यांच्या आत्मचरित्रातून व्यक्त झाला आहे. अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बरोबरीने देवेंद्रनाथही, स्वतःच्या नकळत नव्या बंगाली गद्याची जडणघडण करीत होते. त्यांची ही गद्यशैली त्यांच्या मुलांनी, विशेषतः द्विजेंद्रनाथ व रवींद्रनाथ यांनी उचलली व खूपच विकसित केली.

सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती. शिक्षणप्रसार व लोककल्याणकारी कार्यात देवेंद्रनाथांनी आपले सर्व जीवन वेचले. सर्वतत्त्वदीपिका सभा, तत्त्वबोधिनी सभा, हिंदू हितार्थी विद्यालय, समाजोन्नतिविधायिनी सुहृदसमिती इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि त्यांद्वारे धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक जागृती केली. हिंदू महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीवर असताना त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.

बोलपूर येथील ब्रह्मचर्याश्रम देवेंद्रनाथांनीच स्थापन केला होता. रवींद्रनाथांनी पुढे त्याचे रूपांतर जगप्रसिद्ध ‘शांतिनिकेतन’मध्ये व नंतर ‘विश्वभारती’मध्ये केले.

देवेंद्रनाथांचा मृत्यू वयाच्या ८८ व्या वर्षी १९ जानेवारी १९०५ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला.

—–

☆ गीत : ७० ☆

IS it beyond thee to be glad with the gladness of this rhythm? To be tossed and lost and broken in the whirl of this fearful joy? 

All things rush on, they stop not, they look not behind, no power can hold them back, they rush on.

Keeping steps with that restless, rapid music, seasons come dancing and pass away ⎯colours, tunes, and perfumes pour in endless cascades in the abounding joy that scatters and gives up and dies every moment.

——

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७० ☆

किती चंचल अन् द्रुत ते संगीत

तरी, पदन्यास करीत त्या लयीत 

येती अन् जाती ऋतु सारे

*

रंग, गंध, अन् संगीत, सुरांचा

वर्षाव निरंतर करी तू सुखाचा

आनंदाचे भय परी मनी दाटते रे

*

क्षणात सारे विखरून जाते 

क्षणात सारे निसटून जाते

क्षणात सारे भंगून जाते

*

येथे तर सारे सतत धावती

मागे वळूनही कधी न पाहती

या रोखणे कुणा हाती असे का ?

*

घे तू ही आनंद, हा क्षणभराचा

घे तसा भावगंध, तरल संगीताचा

त्यात हरवून, विरून जाशील का?

*

असेल फक्त तुझाच हा क्षण

करून घे श्वासांचे औक्षण

तुज कुवत एवढी नसेच का?

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ७१ ☆

THAT I should make much of myself and turn it on all sides, thus casting coloured shadows on thy radiance ⎯ such is thy maya.

Thou settest a barrier in thine own being and then callest thy severed self in myriad notes. This thy self-separation has taken body in me

The poignant song is echoed through all the sky in many-coloured tears and smiles, alarms and hopes; waves rise up and sink again, dreams break and form. In me is thy own defeat of self.

This screen that thou hast raised is painted with innumerable figures with the brush of the night and the day. Behind it thy seat is woven in wondrous mysteries of curves,

casting away all barren lines of straightness.

The great pageant of thee and me has overspread the sky. With the tune of thee and me all the air is vibrant, and all ages pass with the hiding and seeking of thee and me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७१ ☆

तुझ्या तेजावर राया

माझी रंगीत छाया 

अशी तुझी माया 

देवा, अशी तुझी माया॥

*

स्वरलहरीतून अनंत

तुझी रूपे दिगंत

दाविसी मला पामरा

देवा, दाविसी मला पामरा॥

 *

गीते तुझी रसभरीत

निनादती गगनात 

भारती या विश्वाला

देवा, भारती या विश्वाला॥

 *

रंग अनेक शोकाचे

गंध अनेक हर्षाचे

तुझीच ही किमया 

देवा, तुझीच ही किमया॥

*

आशेच्या किरणांची

भीतीच्या डोहांची

भूल तूच पाडसी

देवा, भूल तूच पाडसी॥

*

ओहोटी अन् भरती

स्वप्ने काचेची फुटती

पुन्हा स्वप्ने तूच दाविसी

देवा, तूच स्वप्ने दाविसी॥

*

तुझ्या या चकव्यात

जरी मी नच फसत

हार तुझीच होते

देवा, तुझी हार होते॥

*

दिनरातीच्या कुंचल्याने

नाट्याचा पडदा बहु रंगांने

चितारसि, तूच रंगविसी 

देवा, तूच रे रंगविसी॥

*

त्या पडद्याच्या पार विराजे

आसन अगम्य रेषांचे तुझे

तसेच जीवन गुंतागुंतीचे

देवा, जीवन गुंतागुंतीचे॥

*

तू मला यात गुंतवावे

मी परंतु नच फसावे

मम सुरांनी गगन भेदावे

देवा, गगन सुरांनी भेदावे॥

*

खेळ चाले युगे युगे तरी

डाव मजवरी येता परी

नच सापडसी मला

देवा, नच सापडसी मला॥

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

——

☆ गीत ७२ ☆

HE it is, the innermost one, who awakens my being with his deep hidden touches.

He it is who puts his enchantment upon these eyes and joyfully plays on the chords of my heart in varied cadence of pleasure and pain.

He it is who weaves the web of this maya in evanescent hues of gold and silver, blue and green, and lets peep out through the folds his feet, at whose touch I forget myself.

Days come and ages pass, and it is ever he who moves my heart in many a name, in many a guise, in many a rapture of joy and of sorrow.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ७२ ☆

हाच तो !

जो अंतर्यामी वसतो

दिव्य स्पर्शाने जागृत करतो

 

हाच तो !

मम नयनां मोहवितो

मम हृदीची तार छेडितो

सुख दुःखाची लय साधतो

 

हाच तो !

जो मायाजाल विणतो

सतत बदलत्या रंगी रंगवितो

सोनेरी, चंदेरी अन् कितीतरी तो

 

हाच तो !

युगायुगांची वाट दावितो

अनंत रूपे मम हृदयी भेटतो

ब्रम्हानंदी सुखदुःखाच्या असतो

 

हाच तो!

ज्याचे चरण पाहतो

अन् मी मजला हरवून बसतो

हाच तो अन् हाच तो!! 

*

– क्रमशः भाग २४..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments