सौ. वर्षा राजाध्यक्ष
वाचताना वेचलेले
☆ पानं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆
☆
काही पानं खुडायची असतात. (चहा)
काही पानं वाढायची असतात. (केळी, भोजन)
काही पानं चिरायची असतात. (कोथिंबीर)
काही पानं शिजवायची असतात.(पालक, मेथी)
काही पानं तळायची असतात. (अळू, कढीपत्ता)
काही पानं खायची – रंगवायची असतात. (नागवेल, विडा)
काही पानं कुटायची असतात. (पुदिना)
काही पानं लुटायची असतात. (आपटा)
काही पानं पुरायची असतात. (पालापाचोळा कंपोस्ट)
काही पानं जपायची असतात. (पिंपळ)
काही पानं तोरणात सजवायची असतात. (आंबा)
काही पानं केसात माळायची असतात. (केवडा)
काही पान वाहायची असतात. (बेल)
काही पानं मानाची असतात. (नागवेली)
काही पानं खमंग फोडणीसाठी असतात. (कढीपत्ता)
काही पानं शेवटी सोबती येतात. (कडबा)
काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. (मेहंदी)
काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णतेसाठी असतात.(तुळस)
काही पानं फक्त स्वादासाठी असतात(पुदिना)
काही पानं मसाल्यासाठी असतात. (तेजपत्ता)
काही पानं सुशोभिकरणासाठी असतात. (नारळाच्या झावळ्या)
काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात. (पळस)
काही पानं तल्लफ भागविणारी असतात. (तंबाखू)
काही पानं सत्यनारायण पूजेसाठी उपयुक्त असतात. (कर्दळी)
काही पानं गणपतीला आवडतात. (आघाडा,हराळी)
आणि
आपल्यासाठी
काही पानं भरायची असतात.(वही)
काही पानं जोडायची असतात. (पुरवणी)
काही पानं लपवायची असतात. (प्रगती पुस्तक !)
काही पानं उलटायची असतात. (भूतकाळ, दुःखाचे क्षण)
काही पान तोंडाला पुसायची असतात (आश्वासन)
तर
काही नवीन पानं उघडायची असतात.
काही पानं खेळायची असतात (पत्ते)
थोडक्यात काय, तर पानोपानी आनंदी आनंद…!
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



