श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३१ – – –
महा संकटी सोडिले देव जेणे|
प्रतापे बळें आगळा सर्वगूणें|
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१|
अर्थ : सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही.
विवेचन : मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात.
रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असा हा राम महाप्रतापी आणि महाबलशाली आहे.
समर्थ रामाचे वर्णन करताना म्हणतात, ” आगळा सर्वगुणें… “म्हणजे भगवंत सर्व गुणसंपन्न तर आहेच परंतु अनेक परस्परविरोधी गुण त्याच्या व्यक्तिमत्वात एकवटले आहेत. तो जसा महापराक्रमी आणि शूरवीर आहे, त्याचवेळी तो भक्तवत्सल आहे. शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाणारा आहे, आपला भक्त असलेल्या पुंडलिकासाठी युगानुयुगे वीटेवर उभा राहणारा आहे, जनाबाईला दळण दळू लागणारा आहे, नाथांघरचे पाणी भरणारा आहे. अशी त्याची किती रूपे वर्णावी!
त्याचप्रमाणे देवांवर जेव्हा संकट आले त्या त्यावेळी विष्णूने अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे. पुराणातून अशा प्रकारच्या कथा आपण नेहमीच वाचतो. जेव्हा जेव्हा देवांवर संकट येत असे तेव्हा तेव्हा सर्व देव इंद्राच्या नेतृत्वाखाली श्रीविष्णूकडे आश्रय मागण्यासाठी जात असत आणि मग तो वेगवेगळे अवतार धारण करून त्यांचे रक्षण करीत असे.
विष्णू हा जगाचा पालन कर्ता आहे. ब्रह्मदेव हा जन्म देणारा आहे आणि भगवान शिव संहार करणारा आहे. पालन करणारा हा नेहमी जन्म देणाऱ्या आणि संहार करणाऱ्या पेक्षाही श्रेष्ठ असतो. यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, त्याच्यावर संस्कार केले म्हणून जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा श्रीकृष्णाची माता म्हणून यशोदेला आधी मान मिळतो. मुलांना जन्म देणे सोपे असते परंतु पालक होणे मात्र कठीण! काही लोक मुलांना जन्म देऊन सोडून देतात परंतु जे लोक अशा अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देतात, त्यांचे पालनपोषण करतात ते माता पिता श्रेष्ठ होत. कुंतीने कर्णाला जन्म देऊन सोडून दिले परंतु धृतराष्ट्राचा सारथी असलेल्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा सांभाळ मोठ्या प्रेमाने केला. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो.
अशाप्रकारे संपूर्ण जगाचे पालनपषण करणारे श्रीविष्णू किंवा श्रीराम श्रेष्ठ आहेत. प्रत्यक्ष पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे देखील त्याचे स्मरण करतात एवढा तो श्रेष्ठ आहे. रामनामाचा महिमा प्रत्यक्ष शंकर पार्वतीला वर्णन करून सांगतात. तेव्हा महापराक्रमी, महाबलशाली आणि सर्व गुणांनी संपन्न असलेला हा भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. हे लक्षात घेऊन आपणही त्याचेच स्मरण नित्य केले पाहिजे.
स्वसंवाद :
१) देवांनाही संकटे येतात आणि ते परमेश्वराचा आश्रय घेतात मग मी माझ्या संकटात त्याचा आश्रय घेण्यास का संकोचतो?
२) पालनकर्ता हा जन्म देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो मग माझे खरे पालन करणारा कोण आहे हे मी ओळखले आहे का?
३) प्रत्यक्ष शंकर-पार्वती रामाचे स्मरण करतात. माझ्या दिनक्रमात त्याचे स्मरण कितीपत होते?
४) भगवंत “आगळा सर्वगुणें” आहे. माझ्या जीवनात मी कोणत्या गुणांचा आदर्श त्याच्याकडून घेतो आहे?
– – – –
श्लोक करा. ३२ – – –
अहिल्या शिळा राघवे मुक्त केली|
पदी लागता दिव्य होऊन गेली |
जया वर्णिता शीणली वेदवाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२|
अर्थ : श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.
विवेचन : या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत.
अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साधवी आणि पतिव्रता होती इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात आला. परंतु काही कथांनुसार इंद्राने तिचे शीलभ्रष्ट करण्याआधीच अहिल्येने त्याला ओळखले आणि तो परत फिरला. तर काही कथांनुसार इंद्राच्या कृत्याला ती बळी पडली आणि तिचे पातिव्रत्य भंग झाले असे म्हटले जाते. याच सुमारास गौतम ऋषी आपल्या आश्रमात परत आले आणि त्यांना अहिल्येच्या पातिव्रत्यावर संशय आला आणि त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला. वास्तविक हे सगळे जे काही घडले यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता.
खरंतर मूळ वाल्मिकी रामायणात गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिल्याची आणि ती शिळा होऊन पडल्याची नोंद नाही. तुलसी रामायणात आणि इतरही अनेक ठिकाणी मात्र ही कथा सांगितली गेली आहे.
समर्थांनी मूळ वाल्मिकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला होता. अशा प्रकारची घटना त्यात नाही हे माहीत असताना देखील ते या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख करतात. त्याचे कारण म्हणजे ही घटना सर्वांनी स्वीकारली आहे. दुसरी म्हणजे ती रामाची महती सांगणारी आहे. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी कोणतीही गोष्ट असेल तरी त्यांना ती मान्य होते.
श्रीराम हे पतितांना पावन करणारे होते. अहिल्येला इतरांनी जरी शीलभ्रष्ट मानले तरी श्रीरामांनी तिचा तिरस्कार कधी केला नाही. आणि तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करून तिचा उद्धार केला. या साध्वीचे नाव अत्यंत आदराने पाच पतिव्रतांमध्ये घेतले जाते.
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा
पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनं
तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार करतो, तो आपला सुद्धा उद्धार करेल हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात. पतितांना पावन करणारा असा हा भगवंत आहे त्याच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडतात. त्याचे गुण वर्णन करताना ते थकतात. अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनापासून केली तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी समर्थ आपल्याला देतात. म्हणून प्रत्येकाने एकाग्रतेने आणि मनापासून श्रीरामांची भक्ती करावी. मग तो आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगी सोबत राहील. संत तुकारामांना असा अनुभव आला होता म्हणूनच ते ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं म्हणतात. “
स्वसंवाद ::
१) अहिल्येचा दोष नसताना तिला शाप मिळाला. माझा दोष नसताना माझ्या आयुष्यातही असे अन्यायकारक प्रसंग आले तर माझी परमेश्वरावरील श्रद्धा टिकून राहते का?
२) श्रीरामांनी इतरांनी तिरस्कारलेल्या अहिल्येचा स्वीकार केला. मी माझ्या जीवनात अशा उपेक्षित व्यक्तींशी कसा वागतो?
३) “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” अशी माझ्या दैनंदिन व्यवहारात मला भगवंताची सोबत जाणवते का
– क्रमशः श्लोक ३१ आणि ३२.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






