अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथापंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरीचे वर्णन

भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.

पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.

जववरी नाही देखिली पंढरी/

वर्णीशील थोऱी वैकुंठीची//

मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/

होऊनी कामारी दीनरूप//

वृंदावन सडे चौक रंगमाळा/

अभिनव सोहळा घरोघरी//

नामघोष कथा पुराण कीर्तनी/

ओवीया कांडणी पांडुरंग//

सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/

ब्रह्म ते केवळ नांदतसे//

तुका म्हणे जे न साधे सायासे/

प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//

तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.

होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//

काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//

अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//

तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//

पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.

(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.

पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//

अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//

नलगे धन मान/ देह भावे उदासीन//

तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//

यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.

पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.

पंढरीस दुःख न मिळे ओखदा/

प्रेम सुख सदा सर्वकाळ//

पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.

पुंडलिके हाट भरियेली पेठ/

अवघे वैकुंठ आणियेले//

पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.

उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/

घेउनिया धणी लाभ घेती//

या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.

पुरले देशाशी भरले सिगेसी/

अवघी पंचक्रोशी दुमदुमित//

या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.

तुका म्हणे संता लागलीसे धणी/

बैसले राहोनी पंढरीस//

सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.

सुरवर येती तीर्थे नित्य काळ/

पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//

साक्षभूत नव्हे सांगितली मात/

महिमा अत्यद्भूत वर्णवेना//

पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/

जळती आपैसा अघोर ते//

निर्विषय नर चतुर्भुज नारी/

अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//

तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/

जारे पंढरीस घेई कोटी//

चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.

या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.

या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

अवघीच तीर्थे घडली एक वेळा/

चंद्रभागा डोळा देखिलिया//

अवघीच पापे गेली दिगंतरी/

वैकुंठ पंढरी देखिलिया//

अवघिया संता एक वेळा भेटी/

पुंडलिक दृष्टी देखिलिया//

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/

विठ्ठलची एक देखिलिया//

ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.

असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/

डोळा भरू पाहू//

क्रमशः… २८

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted