डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दिवाळी दिवाळी… म्हणजे आणखी काय असतं…???” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
– – येत्या दिवाळीत आपण लाचार हातांना काम देऊन त्यांच्या दारी दीप लावणार आहोत…
– – गाय स्वरूप माय ला हाताने घास भरवणार आहोत…
– – रस्त्यावरील उघडी नागडी कच्ची बच्ची यांच्या हाती लाडू चिवडा ठेवणार आहोत…
– – वृद्ध आई-वडील, आजी- आजोबा यांच्या दुष्काळातल्या भेगाळलेल्या सुरकुत्यांवर मायेचे चार थेंब शिंपडणार आहोत … यांच्याच आशीर्वादाने न्हावून अभ्यंग स्नान करणार आहोत…
“आज पासून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या परीने मला जो शक्य आहे, तो सर्व फराळ आपण देणे सुरू करत आहोत”
देणारे आपण आहात, पोचवणारा मी फक्त पोस्टमन…!
दिवाळी दिवाळी… म्हणजे आणखी काय असतं…???
☆ आली माझ्या घरी ही दिवाळी… ☆
आली माझ्या घरी ही दिवाळी, दारात नाही, रस्त्यावर सजली,
चिरेबंदी वाड्यात नाही,
फूटपाथवरच्या झोपडीत उजळली!
मी पणती नाही लावली देव्हाऱ्यात,
एक भाकर ठेवली भुकेल्या हातात,
लाडू, चिवडा, अन् शेव नाही वाटणार फक्त,
एक नवी उमेद जगवणार, जगण्यात!
म्हणेन, घे माय फराळाचा घास, पण सोबत घे कामाचा ध्यास,
भीक नको, लाचारी नको,
तुझ्या हातालाच येऊदे बुंदीचा वास!
तुझ्या हातानं फुलं विकू दे, तुझ्या हातानं इस्त्री फिरू दे,
तुझ्या हाताला काम लागू दे,
आणि तुझ्याच दिव्याने माझा अंधार झिजू दे!
लोक म्हणती, लक्ष्मी आली घरी,
मी म्हणतो, लक्ष्मी रस्त्यावरी उतरली,
एका माऊलीच्या फाटक्या पदराला,
जेव्हा सन्मानाची किनार लाभली!
हीच माझी दिवाळी, हीच माझी ओवाळणी,
एका भावाने बहिणीला दिलेली,
तू जगलीस तर मी जगलो
तू हसलीस तर ही दिवाळी सजली!
आली माझ्या घरी ही दिवाळी…
खरंच आपल्या घरी आली बघ दिवाळी…!
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





