रमा मोडक
इंद्रधनुष्य
☆ माझी शक्तीची उपासना… – लेखिका : धनश्री जोशी ☆ रमा मोडक ☆
डाॅ. मीनाक्षी बोराटे कानिटकर
पूर्वी मी नियमित पर्वतीला असे, आता तो इतिहास झालाय. तेव्हाची गोष्ट, मीनाक्षीही माझ्यासारखी पर्वतीची वारकरी.
नियमित आम्ही एकमेकींना दिसायचो.
अशाच नियमित पर्वतीवाल्या संख्यांचा एक गृप झाला. आम्ही ठरवून दर रविवारी पर्वती ते नर्हे सिंहगड पर्यंत चालत जात असू, पर्वती, वाघजाई वरून नऱ्हे. बराच मोठा पल्ला, गप्पा गोष्टी करत मस्त भटकत असू. अप्रतिम जंगलातली वाट, आपण पुण्यात आहोत याचा विसर पाडणारी.
हा आमचा आठवड्यासाठीचा बुस्टर डोस असे.
सात आठ जणी नियमीत नऱ्हेपर्यंत येणाऱ्यांचा आमचा चांगला ग्रुप झाला, ओळखी वाढू लागल्या. बोलाचालीतून एकमेकींची वेगळी ओळख होत गेली.
सगळ्या विविध क्षेत्रातील.
… सांगायचं काय, तर ही मीनाक्षी डाॅक्टर. मित्रमंडळमध्ये तिचे हाॅस्पिटल. माहेरची, ‘मीनाक्षी देवदत्त कानिटकर. ‘ बोलता बोलता कळले महाराष्ट्रातील पहिली लेखिका ” सौ काशीबाई कानिटकर ” मीनाक्षीची पणजी.
नागपूर युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएस, मुंबई युनिव्हर्सिटी मधून एमडी पूर्ण झाल्यावर, त्यावेळी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन, ‘डाॅक्टर माधव बोराटे ‘त्यांच्याशी विवाह केला. नवरा ऑर्थोपेडिक् सर्जन. पुण्याला त्याच्याबरोबर स्थायिक होऊन स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले. दोघांनी सहकार्याने रोटरीच्या माध्यमातून शेकडो पोलिओग्रस्त, इतर कारणांनी अपंग झालेल्या मुलांवर बिना नफा तत्वावर? ऑपरेशन केली, अनेकांना पायावर उभे केले.
.. गप्पांमधून ‘ती ‘अधिक कळत गेली.
२०१२ – १३ महाराष्ट्रामध्ये जबरदस्त दुष्काळ पडला. तेव्हा पुणे रोटरी जिल्ह्यामध्ये ही पाण्याची डायरेक्टर बनली.
” दुष्काळी भागांतून शेतकऱ्यांना बारा महिने पुरेल असं पाणी देण्याचं कार्य रोटरीच्या सहकार्यातून सुरू केले. “
एकदा तिच्या बरोबर तिने सुरू केलेल्या रिसॉर्ट वर आम्ही मैत्रिणी गेलो होतो. तिच्या एकंदरीत चालू असलेल्या, केलेल्या कार्याबद्दल ती सांगत होती…..
” पहिला प्रकल्प होता पुरंदर तालुक्यातील दुष्काळी साकुर्डे गाव, या गावात सतरा बंधारे बांधले गेले होते सर्व गाळाने भरलेले होते आणि उन्हाळ्यात पूर्ण कोरडे ठक्क होते. सर्व शेती ही पाण्याअभावी जळून गेलेली होती. त्यावर्षी त्यातील पाच बंधाऱ्यांचा भरपूर ट्रक भरभरून गाळ काढला, त्यामुळे पुढल्या वर्षी जेव्हा पाऊस आला तेव्हा हे बंधारे भरून वाहायला लागले आणि खालच्या अंगाला असलेल्या सर्व विहिरींना पाणी आले. ”
“सोलापूर मधले भिगवण, इंदापूर हे सर्व तालुके अतिशय दुष्काळी. आणि 2012 /13 साली तर सगळीकडे हाहाकारच होता, इंदापूर जिल्ह्यात गोखली, तरंगवाडी विठ्ठलवाडी या सर्व गावातले ओढे आणि विहिरी संपूर्ण आटलेल्या, आम्ही काय केले, गोखली, तरंगवाडी येथे शिरपूर पॅटर्न खड्डे घेतले म्हणजेच त्या ओढ्याच्या पात्रांमध्ये ५० फूट लांब २५ फूट रुंद आणि आठ फूट खोल असे ५०- ५० फुटावर खड्डे केले, पुढच्या वर्षी पावसातून जेव्हा या ओढ्यात पाणी आले तेव्हा त्या सर्व खड्ड्यांनी ते पाणी धरून ठेवले, पुढे जाऊ दिले नाही त्यामुळे ते पाणी त्या खड्ड्यांमध्ये मुरले आणि त्यामुळेच ओढ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व विहिरी तुडुंब भरल्या. “
” कमाल आहे नाही ”
” अग हे तर काहीच नाही, भिगवणमधील मदनवाडी येथे तर आणखीन भीषण परिस्थिती होती. पाण्याचा पूर्ण दुष्काळ आणि सर्व विनंती अर्ज सरकारला करून कुठलाही उपाय झाला नाही, गावकऱ्यांनी बारामती एमआयडीसी ला जाणाऱ्या पायपाला भोकं पाडून तिथून उडणाऱ्या पाणी चोरी करायला सुरुवात केली, रोटरीच्या सहकार्यातून मदनवाडी तलावातील माध्यमातून गाळ काढला, मदनवाडी ओढ्याला सुद्धा शिरपूर पॅटर्न खड्डे घेतले, नंतर जेव्हा पहिला पाऊस आला तेव्हा अर्थातच तलाव खड्डे इथे पाणी पकडून ठेवलं गेलं ते जमिनीत मुरलं आणि ठिकठिकाणी भरपूर पाणी आलं. “
“ज्वारी बाजरी आणि ऊस सुद्धा ही पिके वाऱ्यावर डोलायला लागली, आधी जिथे फक्त काटेरी बाबळी नाही तर पिवळी पिवळी माती होती, तो प्रदेश हिरवा गार झाला.”
“गावकऱ्यांनी आनंदाने सांगितले की पूर्वी आम्ही आठशे फूट गेलो तरी पाणी मिळायचं नाही, आता बोअरवेल खणली तर १२० फुटावर सुद्धा पाणी आम्हाला मिळते. “
आपला व्यवसाय संभाळून हे सगळे करत असलेल्या मीनाक्षीने वयाच्या एका टप्प्यावर आपली चांगली चालत असलेली प्रॅक्टिस थांबवून, आपली डाॅक्टरीची झूल पूर्णपणे उतरवून ह्या वेगळ्या वाटेवर तिने आपली वाटचाल चालू केली.
– – चाकणच्या बेचाळीस शाळांना सौर ऊर्जा दिली पॅनेल्स दिली. तसेच ह्या रिसॉर्टच्या शेजारी जे गाव आहे हातवे बुद्रुक.. त्यातल्या अडीचशे घरांना सौर पॅनेल्स दिली, अडीचशे घरांना सध्या विजेचे बिल शून्य येत आहे व शंभर घरांचे सौर पॅनेल बसवण्याचे चालू आहे. हातवे बुद्रुक या गावात शून्य कचरा किंवा कचरा ही लक्ष्मी हा प्रकल्प राबवलेला आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सासवडच्या पुढे पाऊण तासावरचं हे पिंगोरी गाव, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले, गावात एकच पीक घेतले जायचे भाताचं, पावसाचे महिने पीक नंतर पाणीच नाही. तरूण गाव सोडून जाऊ लागले, फक्त पावसाची भात शेती, गावात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. पिंगोरी गावात सौरप्रकल्प उभारला. पिंगोरी मध्ये बर्याच सुधारणा केल्यात, पंप दिले, पाईप सुरू केल्या. ड्रीपलाईन उपलब्ध करून दिल्या. पिंगोरीत दीड कोटी लिटर, पावणेदोन कोटी लिटर आकाराची तळी खोदून, ती वॉटरप्रूफ करून त्यांना कंपाउंड घालून दिले. त्यांच्या तलावातला, बंधाऱ्यातला गाळ काढून दिला त्यांच्या डोंगरात समतल चर खणले. जेणेकरून पाण्याची भूजल पातळी वाढेल.
“पिंगोरी या गावात केलेल्या पाणी प्रकल्पासाठी ऑल इंडिया रोटरी चे पहिले बक्षीस मिळाले, स्टेट लेव्हलवर मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून बक्षीस मिळाले.
“आता वीस एकर जागेवर स्वतःचे हे सुसज्ज रिसॉर्ट सुरू केलंय. ”
पिंगोरी बरोबरच अनेक गावांमध्ये जलसंधारणाच्या सोयी उपलब्ध करून देऊन पाणी आडवा पाणी जिरवा या सारखे प्रकल्प सुरू केले. संस्थांच्या गच्चीवरचं, पाणी त्यांच्या बोअर मध्ये टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंग करून दिले. पाचाडचा मोठा तलाव वॉटरप्रूफ करून दिला.
… खूप काही केलय, करतेय. अग करावे तेवढं थोडंच आहे.
यासाठी आवश्यक असलेली मेहनत पैसा आणि वेळ देण्याची तिची आजही तयारी आहे.
सगळे करताना तिला भरपूर विरोध सहन करावा लागला, सिस्टीम विरूध्द झगडावे लागले,
” एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” या मार्गाने केलेला गावांचा कायापालट थक्क करणारा.
तिच्याबरोबर एकदा मी मधमाश्या पालनाच्या एका कार्यशाळेला गेले होते.
पिंगोरे गाव परिसर पाहिला. तिचे कार्य समजून घेतलं, बांधलेली शेततळी पाहिली. भारावून गेले. वयाच्या साठी नंतर, घरच्यांची नाराजी स्वीकारून पूर्ण वेगळा मार्ग निवडून, ” एकला चलो रे ” असे म्हणत आपली बकेटलिस्ट पूर्ण करण्यासाठी आपले सुखासीन आयुष्य दर्याखोर्यात भटकत, उगाचच नसती उठाठेव करत घालवणारी मीनाक्षी माझ्या दृष्टीने अवलिया खरी.
– – तिच्या सारखे निडर व्हावे असे वाटते, पण तेवढ्या पुरते.
” मी आपली,
‘बिकटवाट वहिवाट नसावी,
धोपट मार्गा सोडू नको,
अरे संसारामधी ऐस आपल्या
उगाच भटकत नको.. “
… या घिश्यापिट्या विचाराची.
… तिचे कार्य एकत्रीत करून लिहितानाही माझी दमछाक झाली,
“ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी “.
भूतदया.. गायी पशुंचे पालन, तहानलेल्या जीवन वनामाजी, शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट,
वाढवी महत्व वडिलांचे,
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ
परमपद बळ वैराग्याचे.
या तुकारामाच्या काव्यपंक्ती आठवल्या, वयाच्या या टप्प्यावर आपली तब्येत सांभाळून, चाललेल्या तिच्या प्रयत्नांना नकळत हात जोडले गेले.
लेखिका : धनश्री जोशी
प्रस्तुती : रमा मोडक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







