संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “सुखी संसाराचा मंत्र..“ ☆ संध्या बेडेकर ☆
“सुखी संसाराचा मंत्र स्वतः च लिहायचा असतो. “
माझा भाऊ म्हणजे आमचा दादा मोठा ‘ business man’ आहे. अर्थातच सांपत्तिक स्थिती उत्तम
‘स्वकर्तृत्वाने’ उभं केलेले ‘साम्राज्य’ बघून मला माझ्या भावाचे नेहमीच कौतुक व अभिमान वाटतो. पण याहीपेक्षा जास्त तो एक चांगला. ‘Human being ‘ आहे त्याचे. एवढे ऐश्वर्य असूनही, त्याचे वागणे बदललेले नाही. हे बघून चांगले वाटते . त्यामुळे आमच्या नातेवाईकांमधे तो सर्वांचा आवडता, एक ‘आदर्श’ म्हणूनच त्याच्या कडे सर्व बघतात दोन मुलं, दोन सुना, दोन नातु, आणि आजी आजोबा (दादा वहिनी) असा हा पूर्ण परिवार. एकत्र राहतात.
मुलं, सुना चांगल्या शिकलेल्या, व सर्व घरच्याच बिझनेस मधे मदत करतात. आजीसाहेब overall घराची देखरेख करतात. आजोबा अजून ही बिझनेस मधे लक्ष देतात. आवडीने बागकाम करतात.
दादाकडच्या चालीरीती मात्र वेगळ्याच आहेत. त्यातील काही अशा जसे, रोज सकाळचा चहा सर्वांसाठी दादा करणार. एक मुलगा सुन जोडीने एक आठवडा स्वयंपाक करायचा. दर आठवड्याला स्वयंपाकी जोडी बदलणार. म्हणजे चव पण बदलणार. घरातील सर्वांना स्वयंपाक पण येईल. स्वयंपाकात नाविन्य राहील. तशा मावशी मदतीला असतातच. सणावाराला आजी ‘ Traditional ‘स्वयंपाक करतात.
संध्याकाळी जेवणानंतर सर्व आवराआवरी छोटी मुलं करतील. त्यात विरजण लावणे, उरलेलं अन्न व्यवस्थित काढून फ्रीज मधे ठेवणे, सर्व मोठ्यांना पाणी देणे, सर्वांच्या खोलीत तांब्या भांड भरून ठेवणे, उगीचच जळत असलेले दीवे बंद करणे, दुसऱ्या दिवशी ची शाळेची तयारी करणे , बूट पॉलिश करणे, आजोबा, बाबा, काका सर्वांच्या बूटांनाही पॉलिश करायचे, वर्तमानपत्र व्यवस्थित घडी करून जागेवर ठेवणे, कपड्यांच्या घड्या करणे, वगैरे लहान सहान कामे घरातील दोन नातु मिळुन छान पार पाडतात. नातवांचा दिवस संपतो तो आजोबांच्या गोष्टी ने.
घरातील पैशाचा कारभार बिल भरणे, investments चे हप्ते भरणे, बॅंकेची काम, घरातील सर्वांना पगार देणे म्हणजे आजोबांपासुन ते नातवंडांच्या पॉकेट मनी पर्यंत. त्यात ‘आजींचा’ पण पगार असतो बरं का. . ही दोन्ही सुनांची जबाबदारी असते. बाहेरचे इतर व्यवहार आईंच्या सल्याने दोघी करतात.
महिन्याचे शेवटी घर खर्च व इतर खर्च बिझनेस बद्दल अडचणीं, पूढचे planning, घरातले इतर प्रश्न, यावर सर्व एकत्र बसून चर्चा करतात. सर्व निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतले जातात. घरातील सर्व प्रमुख घडामोडी सर्वांना माहीत असतात.
घरी दोन गाड्या असुनही ‘प्रवास ‘बस, रिक्षा ने सुध्दा होत असतो.
कधी कधी मुलांना ‘मूक बधिर ‘शाळेत घेऊन जाणे. ‘वृध्दाश्रमात ‘ अनेक आजी आजोबांना भेटायला नेणे. अशी outings पण होत असतात . दर रविवारी सकाळी दादा नातवांना टेकडीवर फिरायला नेतो, येताना त्यांचा आवडता breakfast करूनच मंडळी घरी परत येते.
परिवाराला एकत्र बांधून ठेवायची ही पध्दत वेगळी पण असरदार आहे.
दादांच्या घरचे ‘व्यवस्थापन ‘बघीतले की छान वाटत. असे नक्की च नसावे, की सर्वांचं सर्वांना सर्वच पटत असेल.
“मला तुझी ही गोष्ट आवडत नाही, पण तुला ही माझ्या कदाचित चार गोष्टी आवडत नसतील”
हा ‘विचार ‘ मनात ठेवला तर सहनशक्ती वाढते. माझ्याच ‘ term, conditions’ वर घर चालावं . हा ‘ हट्ट ‘सोडला तर गोष्टी easy होतात.
परिस्थिती प्रमाणे बदल करता आला पाहिजे. विचार बदलले पाहिजे जून्या चालत आलेल्या चालीरीतीं मधे आवश्यक बदल करायला शिकले पाहिजे. जेथे तीन पीढी एकत्र राहतील तेथे सर्वांनाच adjust करणे आले. घरातील मोठ्या माणसांचे वागणे, त्यांचे वेगवेगळ्या परिस्थितीत घेतलेले निर्णय, त्यांचा दृष्टिकोन, विचार, त्यांची प्रत्त्येक चांगल्या व वाईट घटनेवर होणारी ‘प्रतिक्रिया ‘ मुलांकरिता शिकवण असते . नकळत मुलांना वळण लागत. नकळत मुलांच्या विचारांना दीशा मिळते. परिवाराचे व्यवस्थापन बुद्धीबळ खेळासारखेच असते. कधी कधी गेम मधे रहायला दोन पावले मागे ही घ्यावी लागतात. आपल्या माणसांसाठी काय हरकत आहे? ? ? ? ती आपली हार नसते. .
‘विश्वासाचा ‘ पाया मजबूत असेल तर जोडलेल्या नात्यांचे ओझे वाटत नाही. जेथे सर्व एकत्र राहतात त्या वास्तूत आनंद, बरोबर समाधानही असावे.
‘ज्येष्ठांना ‘आपली जागा/ जबाबदारी पूढच्या पीढीला आनंदाने वेळेवर द्यायला जमले पाहिजे. सुनांना योग्य मान व प्रेम मिळालाच पाहिजे.
जगातलं सर्वात चांगल टॉनिक म्हणजे “जबाबदारी “. एकदा का जबाबदारी घेणे जमले की माणूस आयुष्यभर ‘वाट ‘चूकतच नाही आणि ‘कर्तव्यही ‘चूकवत नाही.
सुखी संसाराचा मंत्र कुठे ही लिहिलेला तयार मिळत नाही. तो परिस्थिती प्रमाणे, घरच्या सदस्यांच्या स्वभावांप्रमाणे, भावनांच्या धाग्यांनी, व प्रेमाने लिहावा लागतो . एकाचा मंत्र दुसऱ्याला लागू पडेलच असेही नाहीच.
आपल्या मुलांच्या लग्नात “blood donation camp” लावून ‘आहेर’ ची एक नवीन प्रथा दादाने चालू केली होती.
दूरदर्शिता, जागरूकता नवीन व जुन्या पिढीतील ‘तारतम्य ‘ सांभाळून सर्वांना कसे जपायचे. बरोबर नवीन पिढी कशी घडवायची? ? ? याचे perfect उदाहरण म्हणजे आमचा दादा.
असे लोक समाजात एक आदर्श निर्माण करतात.
“Intelligent and smart people always have clear ‘vision ‘and ‘priorities ‘ They do not hesitate to change or to take decisions as per the present situation or requirement “
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





