मोहिनी हेडावू

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कविते तुझ्या ऋणात मी…” – (काव्यसंग्रह) कवयित्री : स्वाती सुरंगळीकर ☆ प्रस्तुती –  मोहिनी हेडावू ☆

पुस्तक : कविते तुझ्या ऋणात मी

कवयित्री : स्वाती सुरंगळीकर 

प्रकाशक : दऊत लेखणी प्रकाशन. पुणे 

पृष्ठ संख्या १११

किंमत रू १६०

एका कवितांच्या कार्यक्रमात भेट झाली असता स्वातीताईंनी हे पुस्तक वाचायला दिले. त्यांच्या आधीही कविता मी वाचल्या होत्या आणि त्यांचे काव्य वाचनही ऐकलेले होते. या कवितांमध्ये त्यांच्या काही निवडक कवितांचा समावेश केलेला आहे. त्यांचे कविता वाचनाचे पाचशेच्या वर प्रयोग झालेले आहे. आठशे वर्षातील निवडक शंभर कवितांच्या संग्रहात ‘अनोखी श्रद्धा’ या कवितेचा समावेश केलेला आहे. त्यांच्या कविता या रूढ अर्थाने प्रेम कविता. निसर्ग कविता. विद्रोही कविता किंवा सामाजिक राजकीय अशा नाही तर त्या माणसांच्या कविता आहेत. त्या माणसांच्या मनाचा. भावनांचा. विचारांचा वेध घेतात. त्या कविता आपल्याशी संवाद साधतात. त्या कवीता अध्यात्मिकतेकडे जाणारया आहे. काही तत्त्वज्ञानात्मक आहे. परंतु कवितेचा बाज मात्र साधा सोपा असा आहे. ही व्यक्ती कविता लिहिते. त्याचप्रमाणे कविता जगते असे देखील वाटते.

‘आनंदव्रत’ ही कविता जगण्याचा मूलमंत्र देते.

‘सुखावलं घरपण’ या कवितेत कवयित्री शेवटी म्हणते ‘एकेकाच्या आत्मपरीक्षणांन

घरपण सुखावलं…

आणि साऱ्या घरातच मजेत स्थिरावल’

स्त्री-पुरुष नात्यांमधील ‘मैत्र’ हे अशीच सुंदर कविता आहे. त्यात कवयित्री लिहितात 

‘मैत्रीचे कंकण पुरे.

हिरवा चुडा घालू नको! पाऊले सोबतीला असू दे. सप्तपदी मागू नको ‘

इतकं विशुद्ध प्रेम. प्लुटोनिक प्रेम. मैत्री कुठे असेल बरे..?

‘सपान’ ही कविता कष्टकरी स्त्रीच्या व्यथा मांडते. त्यात तिची मुलगी शिक्षण घेऊन मोठं बघण्याचा स्वप्न बघते. शिक्षणासाठी तिची कष्ट करायची तयारी आहे.

‘संसारी लोणचं’ ही कविता तर त्यांची मला फार आवडते. त्यातली शेवटल्या ओळी आहे ‘संसारी लोणचं नासू नये म्हणून फाऽऽर जपावं लागतं. सहनशक्तीच्या मिठाचे प्रमाण जऽरा जास्त ठेवावं लागतं’

सुखी  संसाराचा गमक या कवितेत मांडलेलं आहे

घरी परत आलेली मुलगी ‘आत्मसन्मान’ या कवितेत आपल्या आईला सांगते ‘त्याला फक्त बायको हवीय.

सखी सचिव सहचरी नव्हे..

मला व्यापक मनाचा जोडीदार हवाय.

संकुचित वृत्तीचा नवरा नव्हे! ‘संसारात जोडीदाराने आदर द्यावा. समानतेने वागावे अशी तिची छोटीशी अपेक्षा आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या मनातली खंत कवयित्रीने व्यक्त केलेली आहे 

‘कस्तुरीमृग’ ही कविता पण आत्मपरीक्षण करणारी आहे.

‘तुझे मन तुझे वैरी.

आधी स्वतःशी झुंज घे.. त्या सकारात्मक स्त्रीत्वाची.

आज तू शपथ घे’ या कवितेत स्त्रीने आधी स्वतःशी झगडून स्वतःचे स्थान निर्माण करावं अशी अपेक्षा कवयित्री व्यक्त करते. महिला सबली करणासाठी टाकलेले हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.

‘एकमेकांसाठी ‘ही कविता सहज जीवनातलं छोटसं मर्म सांगते.

‘अरे तुझ्यातल्या पुरुषांन आता तरी बदलावं…

“मी तुझा आहे “. असं कधीतरी म्हणावं.!

स्त्री कडून अपेक्षेले समर्पण पुरुषांनीही द्यावे अशी माफक अपेक्षा प्रत्येक स्त्रीची असते.

संसारासाठी करियर सोडून निव्वळ घर काम करणाऱ्या स्त्रियांची ठसठस’ निदान तू तरी ‘या कवितेत व्यक्त होते.

‘आधी पक्षाचे पंख छटायचे.

मग म्हणायचं उडत का नाही?

पायात संसार बेड्या ठोकायच्या आणि म्हणायचं धावत का नाही?

‘अथांग ‘या कवितेतल्या शेवटला कडवं आहे 

‘एक प्रेम अथांगलेलं.

मी- तू पण ओलांडलेले.. समर्पण उमगलेलं. अद्वैताला आसुलेलं’ अथांग आणि समंजस असे प्रेम या कवितेतून व्यक्त केलेलं आहे.

‘राखी त्यागाची’ या कवितेत बहिण भावाचं प्रेम व्यक्त करते.

‘भावाच्या अंधकारमय जीवनात बहिणीने ज्योत जागविली 

अनोखी वाळण म्हणून आपली किडनी त्याला दिली ‘भाऊ बहीण प्रेमाव्यतिरिक्त अवयवदान हे मूल्य पण कवयित्री रूजविण्याच्या प्रयत्न करते.

‘सल’ या कवितेत अतिशय श्रीमंत घरातल्या स्त्रियांची होणारी घुसमट व्यक्त केलेली आहे. कवयित्री येथे लिहिते ‘आपल्यापरीस बरी. ती दासी तिची साडी…

रोज सख्याच्या मिठीत सळसळ लाडीगोडी! ‘

छोट्या छोट्या आनंदांना श्रीमंत स्त्रियांना कसे पारखे केले जाते. याचं अतिशय मर्मभेदी वर्णन कवयित्री करते.

‘संवाद ‘या कवितेत कवयित्री म्हणते 

‘कधीतरी माणसानं.. स्वतःशीच बोलावं… संवादासाठी मनाला.. विश्वासात घ्याव’

इश्श्य. स्वप्न. या खुसखुशीत विनोदी कविता आहेत.

‘अनोखी श्रद्धा ‘ही अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेत तुकाराम महाराज आणि आवली यांचा संवाद आहे. त्यात कवयित्री लिहिते.

‘चुकून माकून पल्लीच..

तं हेयो कागद धरून ठेवीन…

अभंगावाणी तरुन जाईल असी कसी बुडीन? ‘ तुकारामावरचा अथांग विश्वास आणि त्यांच्या साहित्याचं त्यांच्या बायकोने केलेलं मोल येथे कवयित्री व्यक्त करते.

श्रीहरीची बासरी या कवितेत बासरी गोपींना म्हणते 

“तुम्ही न माझ्यासारखं व्हा “. बासरी म्हणाली हसून 

“माझ्या पोकळपणातून माझं. ‘मी ‘पण गेलंय गळून’

समर्पणासाठी मी पण गळून पडतं किती गरजेच आहे. हे कवयित्री इथे उदृत करते.

‘भिंत’या कवितेत कवयित्री म्हणते

‘मनाच्या भिंतीवर…

इवलासा कवडसा..

एकच दिलासा.

ईश्वराचा.. ‘

ईश्वरनिष्ठा हे तत्व इथे लेखिका आवर्जून मांडते. त्याही पुढे जाऊन. ‘दान’ या कवितेत कवयित्री लिहिते 

देणारच असलास दान. तर दानतीचे दान दे..

देणारच असला भान. तर ते आत्मभान दे’ आत्मभानाकडून अध्यात्मिक उन्नतीकडचा प्रवास कवयित्री इथे व्यक्त करते.

अतिशय सुंदर हा कवितांचा संग्रह आहे. सर्वांनी वाचावा. समजून घ्यावा असा आहे. कवयित्रीने येथे कसे जगायचे याचे सूत्र तिच्या कवितांमधून मांडले आहे.

प्रस्तुती : मोहिनी हेडावू 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted