उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मराठी भाषेतली अटळ बहुभाषिकता – – – भाग – १ – लेखिका : डॉ. उषा रामवाणी गायकवाड ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

घोड्याचं काम संपलं, की खोगिरावरची गादी गुंडाळून घेऊन जातात. यावरून ‘गाशा गुंडाळणे’ म्हणजे निघून जाणं असा वाक्प्रचार रूढ झाला. हुकूम साहेब मालक ऐन बदल इनाम मनोरा जाहीर मुदत मेहनत मंजूर ऊर्फ बाद अर्ज खर्च आमदानी हे शब्द मूळचे अरबी आहेत. मराठीत आलेले काही अरबी शब्द – कचरा, मस्ती, मुश्किल, गाफील, मजबूत, हलवा, हलवाई, मूद, नादी, अर्ज, इनाम, मंजूर, दौलत, बातमी, हुकूम, साहेब, खर्च, मेहनत, जाहीर, जाहीरनामा, कलम, नक्कल, सरबत, फाजील, जबाब, ऊर्फ, पैज, साफ, शहर, नजर, तैनात, तालुका, तालीम, महाल, मदत, तफावत, जकात, बदल, करार, शाहीर, मालक, नक्कल, जबाब, दौलत, तबक, तबला, कागद, मनुका, बदाम, नगारा वगैरे.

वास्को द गामा या पोर्तुगीज व्यापाऱ्याने १४९८ साली भारतात कोचीनमध्ये व्यापारानिमित्ताने आपलं बस्तान बसवलं. १४९८ ते १९६१पर्यंत पोर्तुगीजांचा इथले हिंदू व मुसलमान राजे, इंग्रज यांच्याशी व्यापारी संबंध येत गेला. पोर्तुगीजांची गोव्यावर सत्ता होती, त्यामुळे तिथल्या मराठी बोलीवर पोर्तुगीज भाषेचा परिणाम झाला आहे. अनेकदा स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, लॅटिन शब्द इतके जवळजवळचे असतात की त्यांपैकी नक्की कुठल्या भाषेतून तो आला हे कळत नाही. पायरी हा पोर्तुगीज भाषेतला शब्द असून ‘पायरी’ ही कलमी आंब्याची एक उत्तम जात. पोर्तुगीज दर्यावर्दी अल्फान्सो दि आल्बुकर्क याच्या नावावरून आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळालं. या नावाचा अपभ्रंश ‘हापूस’ असा झाला.

पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांची काही उदाहरणं – पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, लोणचे, कोबी, बिस्कीट, घमेले, कोष्टी, साबुदाणा, लिलाव, इस्त्री, परात, पाव (‘ब्रेड’ या अर्थी) बादली, हापूस, पायरी, माणकूर इ. आंब्यांच्या जाती, पेरू, फणस, अननस, मेस्त्री / मिस्त्री, पुरावा, तुरुंग, जुगार, पसारा, टिकाव, लवाद, वरांडा, तिजोरी, बटवा, फीत, शिरपेच, पलटण, कमांडर, नाताळ इत्यादी.

बजेट या शब्दाचा मूळ अर्थ ‘अंदाजपत्रक’ असा नाही. ‘पर्स’ किंवा पैसे ठेवण्याची बॅग असा या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे. पूर्वी राजे, सरकारी कर्मचारी अशा बॅगमध्ये पैसे ठेवायचे. फ्रेंच भाषेवरून काडतूस, कूपन, फिरंगी इत्यादी शब्द आले.

ग्रीक लिपीतली आद्य अक्षरं अल्फा-बिटा या नावाने ओळखली जातात. याच ग्रीक लिपीतून पुढे रोमन लिपीचा उदय झाला. त्यावरून इंग्रजीतल्या अक्षरांना नंतर ‘अल्फाबेट’ असं म्हणू लागले. सायरन हा धोक्याची सूचना देणारा भोंगा. ग्रीक पुराणात पंख असलेल्या ‘स्त्री’ला ‘सायरन’ असं नाव आहे. त्या सायरन समुद्रात खडकावर बसून गोड आवाजात गाणी गात असत. तो गोड आवाज ऐकून समुद्र सफरीवर निघालेले खलाशी आपली जहाजं त्या दिशेने नेत. जवळ जाताच जहाजं खडकावर आदळून फुटत. तेव्हापासून तिथे ‘सायरन’, म्हणजे धोका आहे असा अर्थ रूढ झाला. शिसपेन्सिल या शब्दातला ‘शिसे’ हा शब्द शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा आहे. कारण तो पदार्थ शिसे नसून ‘ग्रॅफाइट’ आहे. ‘ग्रॅफाइट’ या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ ‘ग्राफलीन’ असून त्याचा अर्थ-लिहिणारा असा आहे. चौदाव्या इतकाच्या आधी ‘शिसे’ हा धातू वापरला जायचा. सध्या शिसे वापरावर बंदी आहे कारण तो विषारी पदार्थ आहे. कला, शास्त्र, साहित्याची ग्रीक पुराणांत एक देवता आहे. या देवतेचं इटलीत एक मंदिर आहे. तिथे अनेक कलावस्तूंचा संग्रह होता. त्यास ‘म्युझियम’ असं म्हटलं जातं. यावरून जगभरात जुन्या कलावस्तूंच्या संग्रहाला ‘म्युझियम’ हे नाम पडलं. मेन्टोर हा ग्रीक पुराणातला राजा ‘ओडोसेस’ याचा हा बुद्धिमान, हुशार पण वयस्कर मित्र. ओडोसेसचा मुलगा ‘तेलेमाकस’ याला मेन्टोरकडे सोपवून राजा युद्धावर जाई. याच्या मार्गदर्शनाखाली राजपुत्र उत्तम राज्य कारभार करायचा. जुन्या काळात झाडांच्या खोडापासून कागद बनवत. त्यात प्रामुख्याने पापयरस आणि टीलिया या झाडांच्या खोडांच्या सालींचा समावेश असे. ‘टीलिया’ या वृक्षाला लॅटिनमध्ये ‘लिबर’ असं म्हणतात. यावरून ‘लायब्ररी’ हा शब्द तयार झाला. लेबॅनॉनची राजधानी बैरुत या शहराच्या उत्तरेला समुद्रकिनाऱ्यावर ‘बायब्लॉस’ हे शहर आहे. जुन्या काळात या ठिकाणी ‘भूर्जपत्रे’ (Biblos) तयार केली जात. त्यावरून या शहरास ‘बायब्लॉस’ हे नाव पडलं. याच ‘बायब्लॉस’वरून ‘बायबल’ हा शब्द तयार झाला असं काहींचं मत आहे. इंग्रजीत चिंचेला ‘टॅमरिण्ड’ म्हणतात. अरबी लोकांना गाभूळलेली म्हणजे पिकलेली चिंच खजुरासारखी वाटली. अरबीत खजुराला ‘तमर’ म्हणतात. म्हणून त्यांनी या झाडाला तमर-ए-हिंद म्हणजेच हिंदुस्तानचा खजूर असं नाव दिलं. याच ‘तमर-ए-हिंद’वरून ‘टॅमरिण्ड’ हे नाव तयार झालं. भारतीय गणितावर उमर खय्याम (१०४८ – ११२३) पर्शिया (तेहरान) याचा ग्रंथ ‘अल-जब्र’ या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथाचं फ्रेंच भाषेत संकलन ‘अल्जिब्रा’ या नावाने करण्यात आलं. त्यावरून ‘अलजेब्रा’ हे नाव परिचित झालं. लॅटिन भाषेत दक्षिण दिशेला ‘ऑस्ट्रेलस’ असं म्हणतात. त्यावरून त्या वेळच्या माहीत असलेल्या अतिदक्षिणेकडच्या भूभागाला नाव दिलं गेलं ‘ऑस्ट्रेलिया’. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आर्क्टिक खंड आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला दक्षिण ध्रुवावरचा प्रदेश म्हणजे आर्क्टिकच्या विरुद्ध अॅन्टीआर्क्टिक. तोच पुढे अंटार्क्टिका झाला. अॅमस्टरडॅम ही हॉलंड या देशाची राजधानी. अॅमस्टर नदीवर बांधलेल्या धरणाभोवती वसलेलं शहर. मार्क ट्वेन हे सॅम्युअल क्लेमेन्स (१८३५-१९१०) या अमेरिकन लेखकाचं टोपणनाव. याचा अर्थ पुढचा जलप्रवास सुरक्षित आहे. १५९८मध्ये डच दर्यावर्दीनी मॉरिशस हे बेट शोधलं. डच राजपुत्र ‘मॉरित्स व्हॅन नास्साऊ’ याच्या स्मरणार्थ ‘मॉरिशस’ हे नाव दिलं गेलं. इटलीतील ‘सिसिली’ प्रांतातल्या संघटित गुन्हेगारांना ‘माफिया’ असं म्हणतात. खुरासणी हा मसाल्याचा काळ्या रंगाचा पदार्थ. याला कारळे असंदेखील म्हणतात. हा पदार्थ ‘खोरासन’ या प्रांतातून आला आहे. प्राचीन मध्य आशियात खोरासन हा प्रांत होता. (आताचा – अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान व पूर्व इराणचा काही भाग) खोरासनातून आला म्हणून खुरासणी! आफ्रिका खंडातल्या कृष्णवर्णीयांना (काळ्या) ‘निग्रो’ असं म्हणतात. स्पॅनिश भाषेत काळ्या रंगाला ‘निग्रो’ म्हणतात. त्यावरून ‘निग्रो’ हे नाव सर्वत्र रूढ झालं. एखाद्याचं कौतुक करताना ‘शाबास’ हा शब्द वापरला जातो. या शब्दाचा उगम फारसी भाषेत आढळतो. इराणी बादशहा – ‘शहा अब्बास’ / ‘शहा अब्वास’ हा त्या काळी त्याच्या हुशारीबद्दल प्रसिद्ध होता. पुढे या शहा – अब्बास शब्दापासून ‘शाबास’ हा शब्द तयार झाला. रिक्षा हा शब्द जपानी आहे.

‘कोलाचलम मल्लिनाथ सूरी’ हा मेडक – तेलंगणा इथे संस्कृत भाष्यकार, अभ्यासक होऊन गेला. (१३५०-१४५०) ‘कालिदासा’च्या संस्कृत नाटक, कथा-कवितांचा तो सर्वश्रेष्ठ अभ्यासक आणि टीकाकार, विश्लेषक होता. त्यावेळी कोणासही कालिदासाच्या साहित्यावर वा इतर संस्कृत साहित्यावर काही सांगायचं असल्यास ‘मल्लिनाथां’ना काय म्हणायचं आहे, हे विचारात घेतलं जायचं. त्यावरून एखाद्या विषयावर कोणी विशेष टीकाटिप्पणी केल्यास ; त्यांनी ‘मल्लिनाथी’ केली, असं म्हणतात. गंगा या शब्दाचा अर्थ गम् गा म्हणजेच सतत वाहणारी. गंगा या शब्दाचा अर्थच ‘नदी’ असा आहे. त्यामुळे कोणत्याही पवित्र नदीला ‘गंगा’ म्हणतात. उदा. वैनगंगा, बाणगंगा, पाताळगंगा. किंवा गंगा हे नदीचं विशेषनाम ऑस्ट्रिक भाषेतल्या साध्या नदीवाचक शब्दापासून संस्कृतीकरणाने बनलं आहे. गौड (मध्य बंगालपासून ओडिशापर्यंतचा प्रदेश) आणि बंगाल हे जुन्या काळातले प्रांत मंत्रतंत्र, जादूटोणा या विद्येबद्दल प्रसिद्ध होते. त्यावरून कोणत्याही गूढ, न कळणाऱ्या बाबीला आपण ‘गौडबंगाल’ असं म्हणू लागलो. आंधळी कोशिंबीर या खेळाला संस्कृतमध्ये ‘अंधा कौशिंबी’ म्हणतात. कौशांबी हे उत्तर प्रदेशातलं प्राचीन शहर. घराच्या छताला आपण छप्पर म्हणतो. धान्याचं कणीस काढल्यावर उरलेल्या ताटाला ‘छिप्पर’ असं नाव हेमचंद्रांच्या देशी नाममालेत वापरलं आहे. याचा वापर घर शाकारण्यासाठी करत. यावरून ज्यावर ‘छिप्पर’ आहे ते ‘छप्पर’! सीताफळ या लोकप्रिय फळाच्या नावाचा ‘सीता’ या रामायणकालीन सीतेशी संबंध नाही. संस्कृत भाषेत ‘सित’ म्हणजे शुभ्र, पांढरं, साखर असलेलं. यावरून आतून पांढरं व साखर असलेलं फळ ते सीताफळ. इंग्रजीतदेखील पूर्वी या फळाला शुगर अॅपल म्हणत. उष्ण कटिबंधीय अमेरिका, वेस्ट इंडिज भागातलं हे मूळ फळ. याचं खरं नाव ‘शीतफळ’ असं आहे. आयुर्वेदानुसार हे फळ ‘शीत’ प्रकृतीचं आहे. याच ‘शीतफळा’चं पुढे ‘सीताफळ’ असं नामकरण झालं. मोसंबी हे फळ प्रामुख्याने इंडोनेशिया व चीन या प्रांतांतलं आहे. भारतात मेघालय, नागालँड या प्रांतांतही मोसंबीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. पण ‘मोसंबी’ला ‘मोझांबिक’ या देशाच्या नावाचं भ्रष्ट रूप मानलं जातं.

– क्रमशः भाग पहिला 

☆

लेखिका : डॉ. उषा रामवाणी – गायकवाड

ठाणे.

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted