श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या नक्षत्रांचे लक्ष दिवें…

निळ्या नभावर रांगोळीसम उडती चंचल पक्षि-थवें…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

वेलींवरती फुलें उमलती रोज लेउनी रंग नवे…

वृक्ष बहरती, फळें लगडती गंध घेउनी नवे नवे…

हरिततृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

डोळयांमधली जाग देतसे नव-दिवसाचे भान नवे..

अमृतभरल्या जीवनातले मनी उगवती भाव नवे…

प्रसन्न होउन निद्रादेवी स्वप्न रंगवी नवे नवे …

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

कोण आप्त तर कोणी परका उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे, नाम तयाचे नित ध्यावे…

नको अपेक्षा, नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

जय गजानन, गण गण गणात बोते,

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments