सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ एक मात्र मी तरंग… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
गजबजलेला गाव इथे
मुखवट्यावर नाना रंग
खरा चेहरा शोधणारा
हा एक मात्र मी तरंग
माया मोहात गुंतलासे
अवतीभवतीचा संग
कोण माझा? भेटेल कधी?
रे, एक मात्र मी तरंग
आज इथे दिसतात की
वागण्याचे वेगळे ढंग
गर्दीत असा भांबावला
तो एक मात्र मी तरंग
कुणीतरी पाठीशी आहे
जाणून घेण्यात मी गुंग
हरलो नाही, ना थांबलो
जो एक मात्र मी तरंग
हलकेच परीघ मोठा
करण्यात सतत दंग
तल्लीन कार्यातच मग्न
बा, एक मात्र मी तरंग
क्षणिक अस्तित्व इथले
अर्थपूर्ण जगतो भृंग
निसर्ग गुरुस्थानी असे
नी, एक मात्र मी तरंग
ज्ञानकण ते वेचताना
भले ते करण्याचा चंग
यत्न तो देव जाणाणारा
की एक मात्र मी तरंग
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈