श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ आभाळाची सरते माया… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त: वनहरिणी)
आभाळाची सरते माया अन् भूमीही हो अनुदार
पत्ता शोधित खुद्द स्वतःचा,फिरे अधांतर दारोदार!
बरीच बाकी तपोसाधना,खूप दूर ती अजून सिद्धी
अर्ध्यामुर्ध्या हळकुंडाने नकोस होऊ पिवळा फार!
दोनचार त्या तुटल्या फांद्या, अजुन मुळावर घाव कुठे
रान माजले विषवृक्षांचे, अवतीभवती अपरंपार !……
जिंकलीस तू चकमक केवळ,अंतिम रण ते अजून बाकी
रणझुंजारा! अजून तुजला झेलायाचे बरेच वार !…….
विश्वासाच्या होती चिंध्या,कृतघ्नतेचे डसती नाग
कंठी होता दाह विषाचा,जटेत घ्यावी गंगाधार !…
दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत,इथे खलांचा नंगानाच……
संत महात्मे साधू सज्जन, किती उदासिन किती लाचार!
सप्तसुरांच्या मैफिलीत ह्या, नादब्रह्म कुणि आहे अळवित
कुणी न श्रोता कुणी न दर्दी, फक्त पोरके शून्य अपार !…..
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈