सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ उपवर दुहिता ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
ऊपवर दुहिता वय अठराची
दर्पणी बघते आहे
“श्रृंगार करते मनरमणा”
वाट पाहते आहे….१
कुंकुम तिलक लाविते भाळी
रंग लाल बुंद
तुझ्या विचारे झाला माझा
मनमोरच धुंद….२
तुझ्याचसाठी भरजरी शालू
मोतियांचा साज
करांत कंकण कानी झुंबर
कशी मी दिसते आज….३
दूरदेशी गेलास साजणा
किती लोटला काळ
येशील आता परतुनी म्हणुनी
कंठात घातली माळ….४
करुनी सुबक कुंतल रचना
खोवले त्यावरी फूल
भांगामध्ये बिंदी लावुनी
मलाच पडली भूल….५
पुरे जाहली आता प्रतीक्षा
प्रियकर माझा येणार
चालुनी सप्तपदी सह त्याच्या
ह्रदय स्वामिनी होणार….६
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈