? कवितेचा उत्सव ?

🌺 स्मृतिगंध 🌺  श्री विजय अभ्यंकर ☆ 

मातीच्या सुगंधाचं  तुझ्या आवडीचं

अत्तर होऊन आलीस , अन्

स्मृतिगंध माझ्या श्र्वासात भरुन

आसमंत भारुन गेलीस…पण आता

वळवाच्या त्या सरींसारखी

नकळत अवचित येऊ नको ,

आठवणींच्या सरीत भिजवून

हुरहुर लाऊन जाऊ नको.

हस्ताच्या त्या सरींसम परि

गरजत बरसत येऊन जा ,

जलधारांच्या वर्षावानी

विरह वेदना पुसून जा.

श्रावणातल्या सरींसारख्या

आठवणींच्या रेशिम धारा,

सुखद स्मृतींचा मोर पिसारा

फुलवित दोघे चिंब भिजू.

मृद् गंधा , बरसानी वा श्रावणी तू

तुझ्या सवे ‘ मल्हार ‘ जगू दे ,

निखळ आपुले प्रेम पाहुनी

निसर्गाचा ‘षड्जʼ लागू दे.

 

– श्री विजय अभ्यंकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments