सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ ऋतूराज… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
आला आला वसंत आला
चहूकडे आनंद पसरला
धरती ल्याली हिरवा शालू
बघता बघता गुलमोहर फुलला….
चैत्र महिना नव वर्षाचा
गुढी उभारती घरोघरी
वनवास संपवुनी चौदा वर्ष्ये
सीता राम परतले अयोध्यानगरी….
तरूवर हसले नव पल्लवीने
पक्षी विहरती स्वच्छंदाने
खळखळ वाहे निर्झर सुंदर
सृष्टी बहरली ऊल्हासाने….
कळ्या उमलल्या वेलीवरती
धुंद करितसे त्यांचा दरवळ
गुंजारव करी मधुप फुलांवर
वसंत वैभव किती हे अवखळ….
जाई जुई मोगरा फुलला
सुवर्ण चंपक गंध पसरला
रंग उधळित गुलाब आला
ऋतुराज कसा हा पहा डोलला….
ऋतु राजा आणिक धरती राणी
मुसमुसलेले त्यांचे यौवन
आम्रतरूवर कोकिळ गायन
वसंत वसुधा झाले मीलन….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈