श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हसणं :  शिकायची बाब !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

काही मानवसदृश प्राण्यांचे चेहरे हसरे वाटू शकतात..पण ते हसू शकतात हे अजून सिद्ध झालेले नाही! एका हिंस्र प्राण्याचा आवाज माणसाच्या हसण्याशी साधर्म्य दाखवणारा आहे,पण त्याच्या जवळ गेले की माणसाचे हसणे भूतकाळात जमा होऊन जाण्याची शक्यता अधिक! अस्वल माणसाला गुदगुल्या करून करून मारून टाकते,असे कशावरून सांगतात ते न कळे!

मग राहता राहिला माणूस. हा प्राणी मात्र हसू शकतो. याचे हसण्याचे प्रकार नानाविध असतात,हेही खरेच.

कुणी इतरांना हसतो. कुणी कसंनुसं हसतो. स्वतःवर हसणारी माणसं तशी विरळाच असतात. अतीव दुःखातही एक उदास हसू चर्येवर उमटू शकते..नशीब थट्टा मांडते तेंव्हा !

हसवणे तसे बरेच सोपे असते..कारण माणसं फारसा विचार न करता हसू शकतात. किंवा आधी हसून घेऊन मग दातांनी ओठ चावून,किंवा जीभ बाहेर काढून काही क्षण दातांखाली दाबून ठेवून पश्चात्ताप व्यक्त करतात!

शेजारचा हसतो म्हणून काही माणसं मिले सूर मेरा तुम्हारा चालीवर हसतात.. विशेषतः इंग्लिश सिनेमा बघताना असे व्हायचे पूर्वी. दूरदर्शन मालिका वाल्यांनी मग पूर्व ध्वनिमुद्रित हास्य ऐकवून श्रोत्यांना इथे तुम्ही हसणे अपेक्षित आहे,असा दम देण्याचा प्रघात सुरू केला. हसताय ना? असं विचारून हसायलाच पाहिजे अशी गळ ही घातली जाते! Bench वर या शब्दाची शिवी करूनही हसण्याच्या जत्रेत रेवड्या वसूल केल्या जातात! दोन अर्थ निघतील..नव्हे काढलेच जातील अशी खात्री असलेल्यांचे दिवस होऊन गेलेत! अंगविक्षेप आणि डोळ्यांसह मुखविक्षेप करून हास्य सम्राट सुद्धा झालीत माणसं. मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा अशुद्ध किंवा शुद्ध नसते..ती फक्त निराळी असू शकते! नव्हते जर शुद्ध तर व्हते अशुद्ध कसे? पण इतरांच्या निराळ्या शब्दोच्चारांचा विनोदाच्या अंगाने आपल्या बोलण्यात,लिहिण्यात उपयोग करून हशा वसूल करणारी उचली मंडळी सुद्धा आढळतात!

मनात शुद्ध हास्याचे कारंजे निर्माण करणाऱ्यांच्या नभोमंडलात सर्वाधिक तेजस्वी आणि तरीही नेत्रसुखद, कर्णसुखद माणूस म्हणजे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचे अवलिया !

यांनी हसायला शिकवले ! 

त्यांच्या स्मृतीने हसू न येता हात आपोआप जोडले जातात.. हे त्यांचे बलस्थान !

स्वर्गस्थ देवता आणि तत्सम अधिकारी आता ‘पुल’ नावाच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्याची चूक करणार नाहीत…त्यांनाही स्वर्गात हसवायला ‘पुल’ कायमचे पाहिजे आहेत..नाही का?

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments