श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ आयुष्याच्या प्रवासात या… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
☆
आयुष्याच्या प्रवासात या मीच मला का फिरवत आहे
काय मिळाले मनासारखे उगाच काया झिजवत आहे
*
दोन चार मी लिहिली कवने जमिनिवरूनी नभात गेलो
यमक जोडले कसेतरी अन् संग्रह छापुन मिरवत आहे
*
कुठे राहिले आता गुरुजी सरस्वतीचे खरे उपासक
बालपणीचे धडे गुरूंचे अजुनही मी गिरवत आहे
*
तरुणपणाचा होता तोरा वयोपरत्वे लोपत गेला
वैरी चाहुल वृद्धपणाची गुर्मी माझी जिरवत आहे
*
असेल केले काहीबाही कळत न नकळत मस्तीमध्ये
गतकाळाला वर्तमान का घालुन पाडुन हिणवत आहे
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




