वाचताना वेचलेले
☆ पर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
एका अतिशय श्रीमंत स्त्रीने एका गरीब चित्रकाराकडून आपलं पोर्ट्रेट काढून घेतलं. जेव्हा ती स्त्री ते चित्र घ्यायला आली, तेव्हा ती फार खूश झाली.
तिने चित्रकाराला विचारले, “मी तुला काही बक्षीस देऊ का?”
चित्रकार गरीब होता. गरीब माणूस किती मागणार? गरीब माणसाच्या मागण्या काय असतात? त्या सगळ्या मागण्या परमेश्वराकडेच असतात.
तो स्वतःशी विचार करू लागला – ‘मी एक हजार मागू का? की दोन? की पाच?’ पण मग त्याला वाटू लागलं, ‘इतकं मागितलं तर देईल का ती?’त्याचं मन डगमगू लागलं.
शेवटी त्याने विचार केला की आपण काही मागूच नये; तिच्यावरच सोडावं. कदाचित ती अधिक देईल.
पण त्याच्या मनात भीती होती – कदाचित ती काहीच देणार नाही. किंवा फार थोडं देईल. एकदा जर संधी सोडली तर पुन्हा काही होणार नाही!
तरीही त्याने धाडस केलं आणि म्हणाला, “तुमची जी इच्छा असेल ते द्या.”
त्या बाईच्या हातात एक छानशी पर्स होती. ती म्हणाली, “ठीक आहे! ही पर्स तू ठेव. ही फार मौल्यवान आहे.”
पर्स तर खरोखरच सुंदर आणि मौल्यवान होती, पण चित्रकाराचं मन खट्टू झालं. त्याला वाटलं, “मी या पर्सचं काय करणार? खरं तर थोडेसे पैसे मागितले असते, तर काही उपयोग तरी झाला असता.”
मग तो म्हणाला, “नाही नाही, मी पर्सचं काय करणार? तुम्ही मला दहा हजार रुपये द्या.”
ती म्हणाली, “तुझी इच्छा.” तिने पर्स उघडली – त्यात एक लाख रुपये होते. तिने त्यातून दहा हजार रुपये काढले, चित्रकाराला दिले आणि पर्स घेऊन निघून गेली.
आजतागायत तो चित्रकार स्वतःच्या छाती बडवत बसलाय, ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली!’
माणसाची स्थितीही अशीच आहे. परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे ते अदृश्य स्वरूपात आहे, गूढ आहे.
आपण मागतच राहतो.. दोन पैसे, थोडी सुख-सुविधा. पण परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे, ते जीवनाचं गुपित, ते अमूल्य धन, तो आपल्या आत असलेलं खजिना.. तो पर्स आपण उघडून पाहिलाच नाही.
जे मिळालं आहे , ते तुमच्या मागण्यांपेक्षा अनंतपटीने अधिक आहे.
पण… मागण्यांपासून जर आपण मोकळे झालो, तरच ते दिसू शकेल ना !
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



