☆ पाऊसच पाऊस… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
असा कसा रे पावसा आलास तू अचानक
उन्हाळ्याची सुट्टी आमची होती ना रे शिल्लक
*
कित्ती कित्ती होते ठरवले सुट्टीत खूप फिरायचे
तुझ्या अवकाळी येण्याने त्यावर पडले पाणी ना रे
*
डोंगर, दऱ्या, जंगल, रान सारे पालथे घालायचे
सागराच्या लाटांवर मस्त झोकून द्यायचे
*
एक वर्ष वाट पाहिली सुट्टीची या आम्ही
पण तुझ्यामुळे घ्यावी लागली या साऱ्यांशीच कट्टी
*
पावसाळ्याचे चार महिने तुझ्याच हक्काचे
तरीसुध्दा तुझी लुडबुड आमच्या सुट्टीमध्ये
*
खरं सांग रे पावसा असा रे तू कसा?
अवकाळी म्हणून सारे चिडवतात नं तुला
*
तसा तूही आहेस रे खूप खूप चांगला
आमची गरज पाण्याची भागवतोस खरा
*
म्हणूनचं म्हणते रागाला नको येऊ
आमच्या मेच्या सुट्टीत नको बाबा येऊ
*
छत्री, रेनकोट, बुट नवेनवे घेऊ
तुझ्या येण्याचे तेव्हा स्वागत नक्की करु
☆
© सुश्री त्रिशला शहा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



