श्री आशिष बिवलकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “प्रश्न.. प्रश्न.. अन् फक्त प्रश्न…” – लेखिका : श्रीमती लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

६) वाचतांना वेचलेले — (या सदरासाठीचे साहित्य गाडेकर मॅडम पाठवणार आहेत.) 

. ” प्रश्न.. प्रश्न.. अन् फक्त प्रश्न ” लेखिका : लक्ष्मी यादव प्रस्तुती : आशिष बिवलकर 

सोमवार २३जून २०२५

‘ वाचताना वेचलेले’

प्रश्न… प्रश्न…अन् फक्त प्रश्न

लेखिका: श्रीमती लक्ष्मी यादव

प्रस्तुती: श्री.आशिष बिवलकर

एका नातेवाईकांसाठी खारघरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला तीन-चारदा जाणं झालं. प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये शिरताना काळजात धस्स होत होतं. सगळ्या वयोगटातील माणसं. श्रीमंत, गरीब सगळीच एका लायनीत बसलेली. एकसमान धागा असलेली. कॅन्सर. काही प्रकारचे कॅन्सर बरे होतात. कॅन्सर कोणत्या स्टेजवर आहे, कोणत्या अवयवाला आहे, यावरही व्यक्ती पूर्णपणे बरी होईल की नाही हे अवलंबून असतं हे माहिती असतंच आपल्याला. तरी इथं आलं की अस्वस्थ होतं.

इथं आलेली ही सगळी माणसं मृत्यूबद्दल आपल्याला काहीतरी सांगतात, असं वाटतं…इथे येणारी जवळजवळ सगळीच माणसं मृत्यूला स्पर्शून, भयानक वेदनेतून परत आलेली असतात, तर काहींच्या आयुष्याचे किती दिवस बाकी आहेत हे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना कळलेलं असतं.

कल्पनाही करवत नाही.

या वातावरणात जायला मन तयार होत नाही.

इथल्या वातावरणात आल्यावर श्वास बंद पडेल, अशी भीती वाटू लागते.

या माणसांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नाही. त्यांची वेदनेची गोष्ट ऐकू वाटत नाही. इथे येणारी प्रत्येक व्यक्ती आत्यंतिक टोकाची वेदना सहन करून आलेली असते किंवा सहन करत असते. आता अनेकांना आयुष्यही नको आणि वेदनाही नको वाटू लागतं. किमो, रेडिएशन फक्त माणसाचं शरीरचं खरवडून काढत नाही तर मनही बोथट करतं.

अंथरुणात संडास, लघवी होणं, अन्नाचा एकही कण पोटात न जाणं, सतत उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणं, सर्जरी आणि त्यासोबतच्या वेदना या सामान्य बाबी. आयुष्यभर कुणावरही अवलंबून न राहिलेली, ताठ कण्याची माणसं अशा आजारानं उन्मळून पडतात. लाज, शरम, अस्वस्थपणा, अव्हेरलेपण, अपमान या सगळ्यातून जात असतात. घरात करणारं, समंजसपणे जबाबदारी घेणारं कुणी असेल तर वेदना सहन करायला बळ येतं. नाही तर ही माणसं स्पष्ट-अस्पष्टपणे मरण मागतात.

ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते, ते कर्ज काढतात, हातउसने घेतात. ते फेडण्यासाठी घर, जमीन विकतात. कधीकधी घरातली सख्खी, जवळची माणसं आपल्याच माणसांवर खर्च केलेले पैसे दामदुपटीनं वसूल करतात. मरताना त्या माणसाला रक्ताची नाती शरीराच्या वेदनेबरोबर काळजाच्या वेदनाही देतात. सुखानं मरूही देत नाहीत.

जगण्यासाठी धडपड करणारी इथली माणसं पाहिली की आपल्या निरोगी शरीराचं, जगणं असण्याचं मोल कळतं.

खरं तर असा त्रास कुणाच्याच वाट्याला येऊ नये. पण मला सगळ्यात जास्त वाईट या पिटुकल्या मुलांचं वाटतं. खेळण्याच्या, मस्ती करण्याच्या वयात यांची असह्य वेदनेशी गाठ पडते.  “मला खूप दुखतंय, त्रास होतोय,” यापलीकडे ही बिचारी लेकरं काय बोलणार? ही मुलं किमो, रेडिएशन कशी सहन करत असतील, यांना किती दुखत असेल असा विचार मनात येतो.

स्ट्रेचरवर केस नसलेली, वाळून गेलेली मुलं पाहिली की हुंदका येतो. हाताला सलाईन लावून पायऱ्यांवर खेळणारी, आई बापांच्या अंगावर पहुडलेली, शून्यात नजर लावून गुपचूप बसलेली मुलं पाहिली की ती काय विचार करत असतील, असा प्रश्न पडतो. यांच्या डोळ्यात पाहिलं की “का?गरज नव्हती ना. प्लीज नको.” असं वाटल्याशिवाय राहवत नाही. या लेकरांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. आपल्याच जगण्याचा राग येऊ लागतो. त्यांचे फोटो काढताना हात आणि मन थरथर कापत होतं. एक प्रकारचा अपराधभाव. इथं करुणाही कामी येत नाही.

निसर्गानं यांना वेदनारहित, आनंदी आयुष्य जगू द्यायला हवं होतं की, असं वाटतं.

यांना चांगले उपचार मिळून ही सगळी लेकरं कॅन्सरमुक्त व्हावीत असा मनातल्या मनात, आतून आवाज येतो. सगळीच माणसं. इथून “आता तुम्ही कॅन्सरमुक्त झाल्या आहात, पण काळजी घ्या,” असं ऐकून बरी होऊन जाणाऱ्या काही माणसांच्या चेहऱ्यावरील वेदनेतून मुक्तीचा निःश्वास तेवढाच काय तो मनाला हिरवेपण देतो.

या मुलांच्या आई- वडिलांच्या मानसिक अवस्थेचा तर विचारच करवत नाही. पैशांची जुळवाजुळव कशी करत असतील?(तरी टाटामध्ये खूप वाजवी दरात, मोफतही उपचार होतात. इथं संवेदनशील वागणूक, मार्गदर्शन, सहकार्यही मिळतं. टाटासारखी अनेक हॉस्पिटल्स उभी राहण्याची गरज आहे. तीही सरकारी.) आपल्या लेकराला अशा वेदनेत पाहून त्यांच्या काळजाला घरे पडत असतील? लेकरू त्रास होतोय म्हणून रडत असेल तर यांचा जीव किती कळवळ करत असेल? रडून रडून यांचे अश्रू संपले असतील की अजूनही रोजची रात्र उशी ओली करून संपत असेल? यांना आपलं काळीज किती घट्ट करावं लागत असेल? आपल्या लेकराला असा आजार का झाला असेल, हा प्रश्न ते कुणाकुणाला विचारत असतील?देवाला, डॉक्टरला? माणसांना? स्वतःला?

आपल्या लेकरांच्या वेदना आपल्याला मिळोत अशी प्रार्थना ईश्वराकडं, मनाला करत असतील का?

सगळी माणसं निरोगी राहावीत!

लेखिका: श्रीमती लक्ष्मी यादव

प्रस्तुती: श्री.आशिष बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments