नीता कुलकर्णी
☆ “वारी दोन बहिणींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
(एक सत्यकथा)
माईची खूप दिवसांपासून इच्छा होती.. एकदा तरी आळंदी.. पंढरपूर पायी वारी करावी. तो सोहळा डोळे भरून पाहावा. दोन मुलं, दोन मुली.. त्यांची शिक्षणं, लग्न, सणंवार.. वारीचा विचार सुध्दा मनात आणता येत नव्हता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माईच वय झाल होत.. आता कुठलं वारीला जायला जमणार… पंढरीची वारी आपल्या नशिबात नाही. असं म्हणून ती गप्प बसायची. घरीच नाम घेत स्वस्थ बसावं झाल… अशी तिने स्वतःच मनाची समजूत काढली होती.
वारी जवळ आली होती.. त्यामुळे ते दुःख अजूनच जाणवत होते.
मुलाला ती म्हणाली,
“वारी करायची इच्छा अपुरी राहिली.. माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही बघ… दर्भाचा करून लावावा लागेल”
आईच बोलण त्यानी हसून गंमत म्हणून सोडून दिलं. ती आजारी पडेल, तिला झेपणार नाही, त्रास होईल म्हणून घरातले तिला पाठवत नव्हते. तशी ती बऱ्याच वेळा पंढरपूरला बसने गेली होती. पण माईला एकदा तरी पायी वारी करायची होती.
त्या दिवशी रोजच्यासारखी ती संध्याकाळी रामरक्षा म्हणत बसली होती. तिच्या बहिणीचा ठकुचा फोन आला. मुलाने तो उचलला “काय म्हणतेस मावशी बरी आहेस ना”
” हो रे मी बरी आहे. एक आनंदाची बातमी आहे. मी काय सांगते ते नीट ऐक.. माझे अचानक इथल्या दिंडी बरोबर पायी वारीला जायचे ठरले आहे. त्यांनी सगळी सोय केलेली आहे. पाय दुखले तर ट्रक मध्ये बसायची सोय आहे. बरीच वर्ष ते जात आहेत. त्यांना अनुभव आहे. मी माईला पण माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्यासाठी फोन केला आहे. “एका दमात तीने सांगितले.
मुलगा गोंधळून गेला.
अचानक मावशीनी हे कस काय ठरवल.. त्याला कळेना. ठकुनी पूर्ण माहिती सांगितली. तो म्हणाला.. , “आई-बाबांशी बोलतो आणि मग तुला परत फोन करतो “
त्यांनी मावशी काय म्हणाली ते सगळं सांगितलं. माईला तर खूपच आनंद झाला होता… पण नवरा काय म्हणेल ही चिंता होती..
पंढरीनाथांनी ठकुला फोन लावला म्हणाले, “आता वय झालं माईचं.. तिला कसं झेपेल?”
ठकु म्हणाली, “भाऊजी ती जबाबदारी माझी. आजपर्यंत तिने तुमच्याकडे काही मागितलं नाही. ही तिची शेवटची इच्छा अस समजून.. तिला पाठवा ना हो. “
यावर त्यांना काही बोलता येईना..
“बरं तू इतकी त्या दिंडीच्या लोकांची खात्री देतेस म्हणून पाठवतो. आणि एक सांगतो. पहिल्यांदा जाताय सतत चालणं होणार नाही. ऊगीच थोडं चाला.. मग ट्रकमध्ये बसा. तरच परवानगी देतो. “
“हो.. हो.. “ती म्हणाली.
ते ऐकून माईचा आनंद गगनात मावेना. लहान मुलासारखा तिचा चेहरा फुलला. दोन दिवसात तयारी करून मुलगा तिला मावशीकडे घेऊन गेला.
दारातच तिने ठकुला मिठी मारली दोघींचा गळा दाटून आला. परत जाताना मुलाने बजावले,
” काही त्रास झाला तर कळव. मी तुम्हाला न्यायला येईन”
ठकुच्या सुनेने त्यांची पूर्ण तयारी करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची दिंडी निघाली. तासाभरात ते आळंदीला पोहोचले. भगव्या पताका फडकत होत्या. पायजमा, पांढरा शर्ट, टोपी, गळ्यात, तुळशीमाळा, टाळं, कपाळावर बुक्का, गंध… असे वारकरी पाहिल्यावर माईला समाधान वाटले. तिच्यासारखा अनेक बायकाही त्यात होत्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचं लांबून दर्शन झालं.
माऊलींची पालखी निघायची वेळ झाली होती. ठकु म्हणाली, ” कळसाकडे लक्ष ठेव. पालखी उचलली की तो हलतो असे म्हणतात “
माई स्वतःच आतून हलली होती. देहभान विसरली होती.
“कळस हलला.. कळस हलला “
अस सगळे ओरडले. तिला नीट दिसल नाही. तिने कळसाकडे हात करून नमस्कार केला.
दिंडीप्रमुखांनी भगवा झेंडा उभा केला.
” पुंडलिक वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय”
असा जय जय कार करत वारकरी त्यांच्या मागून निघाले.
माई ठकुची वारी सुरू झाली..
” पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनिया गाठ “
अभंग, गाणी गात गात.. वाट सरत होती. पावसाची सर येऊन गेली. वारकरी अजून ताजेतवाने झाले. भराभर निघाले. माईच्या दिंडीत एक लेकुरवाळी.. पोरग कडेवर घेऊन निघाली होती. माईला रहावलं नाही तिने विचारलं,
” एवढं लहान लेकरू घेऊन कशी निघालीस ग?”
ती म्हणाली,
“सासूबाईंनी याच्यासाठीच नवस बोलला होता. आळंदी ते पुणे करणार आहे. आणि मग याला एकदम पंढरपूरलाच घेऊन येणार आहे”
काजळ तीट लावलेलं ते सावळं पोरगं माईकडे बघून हसलं..
माईला वाटलं हे किती भाग्यवान.. त्याला लहानपणी वारी घडते आहे.. त्याच्या गालावरून तिने हात फिरवला त्याची पापी घेतली. ते पोरग म्हणजे विठ्ठलाचे छोटे सावळ ध्यान असल्याचा भास तीला झाला. माईला आता विठुरायाचा ध्यास लागला होता.
डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेतलेल्या बाईने.. पाणी पिताना वृंदावन माईच्या हातात दिले. माईच्या मनात आलं एवढं ओझं घेऊन ही म्हातारी चालतीय.. आपल्याला तर मोकळं चालायच. सहज जमेल.. माईच्या पेक्षा म्हाताऱ्या बायका, पुरुष दिंडीत होते. माईला हुरूप आला. ती भराभर पाय उचलायला लागली.
फुलांनी सजवलेल्या रथामागे विठुरायाचा गजर करत चालेले वारकरी… एका मागोमाग एक निघालेल्या दिंड्या सगळ्यांची आस एकच होती. त्या विठुच्या पंढरीला जायचं.. माईच्या डोळ्याचे पारणं फिटलं. पहिला मुक्काम पडला. वारकऱ्यांच्या स्वागताला असंख्य लोक जमले होते. दिंडी प्रमुखांनी स्वयंपाकाची व्यवस्था करून ठेवली होती. झाडाखाली पंगत बसली. पत्रावळी वरच्या त्या साध्या जेवणाला अमृताची चव होती. माई दोन घास जास्तच जेवली. रात्री कशी गाढ झोप लागली.
पहिल्या दिवशी पाय थोडे दुखले. तिकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. पालखी पुढे जात होती. पाय आपोआप वाट चालत होते.
दोघींनी ठरवले की मधून मधून एक, दोन टप्पे ट्रक मध्ये बसून जायचे. म्हणजे पुढचा आनंद घेता येईल. घरच्यांनाही काळजी नको.
एकदा पहाटेच माईला जाग आली. वारकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. माई पालखी जवळ गेली. भक्तीभावानी तिनी पादुकांवर डोकं टेकवलं. त्या क्षणी तिचं देहभान हरपलं होतं. हे अनुपम सुख डोळे भरून पहायला मिळाले जवळून दर्शन झाले… शांतपणे एकटक बघत ती उभी होती…
याच्यापुढे आता काही नको असे तिला वाटत होते…
” भेटी लागी जीवा लागलीसे आस” म्हणत वारी पुढे चालली होती. पंढरी राया जवळ येत चालला होता. रिंगण बघण्यासारखं असतं. हे इतके दिवस माई नुसत ऐकून होती. आज प्रत्यक्ष बघणार होती. गळ्यात हार घातलेला पांढराशुभ्र अश्व तयार होता. वारकऱ्यांनी रिंगण तयार केलं. इशारा झाला.. त्या क्षणी अश्वांनी पळायला सुरुवात केली. त्यांचा रुबाब, वेग बघण्यासारखा होता. टाळांचा गजर सुरू होता. रिंगणभर फिरून अश्व थेट पालखी समोर जाऊन उभा राहिला.
त्याच्या पायाखालची माती बुक्या सारखी वारकऱ्यांनी कपाळाला लावली. त्यादिवशी सर्वांना ऊत्साह वाटत होता. जल्लोष सुरू झाला. वातावरण चैतन्यमय झाले होते.
बायकांनी फुगड्या घालायला सुरुवात केली. एक जण म्हणाली,
” बहिणाबाई उठा.. नुसत्या काय बसलाय.. घाला फुगडी”
माईनी ठकुचा हात धरून तिला उठवलं आणि दोघींनी खूप वर्षांनी फुगडी घातली. निर्मळ, सात्विक आनंद बहिणी घेत होत्या.
बायका घरदार, संसार ताप दुःख, विसरल्या होत्या. घराबाहेर मोकळ्या रानात मुक्तपणे गात होत्या. त्या विठ्ठलाने बायकांच्या मनावर गारुड केलं होतं.
दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामात टाळ आणि चिपळ्यांच्या साथीवर वारकऱ्यांनी भजनं म्हणायला सुरुवात केली.
” विठ्ठल विसावा सुखाची सावली प्रेमे पान्हा घाली भक्तावरी, रूप पाहता लोचनी, संपत्ती सोहळा न आवडे मनाला लागला टकोळा पंढरीसी.. “
माई आणि ठकु रंगून गेल्या होत्या. रात्र झाली तशी ठकु म्हणाली,
” माई तू झोपतेस का? अजून बरंच चालायचं आहे. “
” ऐकू दे ग… घरी गेल्यावर झोपायचंच आहे.. काही होत नाही मला”. खरोखर माईला देहाचा विसर पडला होता.
वाखरीला पालखी पोचली.
पंढरपूर जवळ आल होतं. चंद्रभागेत स्नान झालं… कृतकृत्य वाटलं.
लांबून सर्वांनी कळसाचं दर्शन घेतलं. जणु विठुरायाच भेटला असे सर्वांना वाटले. प्रत्येकाचे डोळे भरून आले होते.
गच्च गर्दीत माई स्वतःशी हरवली होती. वारीची सांगता झाली होती. हुरहुर वाटत होती. मन इथेच अडकलं होतं. संसारात जायला नको म्हणत होतं. अजून काही दिवस इथेच राहावं असं तिला वाटत होतं. जाताना मुलगा न्यायला येणार होता.
दिंडीप्रमुख आले. निरोपानिरोपी सुरू झाली. बायका तर एका कुटुंबातल्या सारख्या झाल्या होत्या. लेकुरवाळी पोराला घेऊन आली होती. माईनी लेकराला जवळ घेतले. पोरगं खुशीत हसत होतं.. त्याची आई म्हणाली,
” माई आता पुढच्या वारीला येताल तेव्हा माझा ज्ञानोबा चालायला लागला असेल. “
“हो ग.. ”
तुळशी वृंदावन घेतलेली म्हातारी म्हणाली, ” माऊली आता आपली भेट एका वर्षानी. किती छान झाली आपली वारी. पुढच्या वर्षी पण आपण असच एकत्र जायचं.. “
बोलताना तिचा गळा दाटून आला होता.
त्यांचं बोलणं ऐकून माईला आतून हलल्यासारखं झालं…
म्हणजे…
वारी संपली कुठे होती? आता तर सुरू झाली होती…
अरे.. खरचं की
माई म्हणाली,
” ठकु आता होईल तोपर्यंत वारी करायची.. जमेल तेवढं चालायच.. दमलो तर ट्रकमध्ये बसायच… “
ठकुनी माईला जवळ घेतलं…
दोघींचे डोळे वाहत होते…
” मन शांत होता पुन्हा लागे ओढ”
या अवस्थेत दोघी बहिणी घरी निघाल्या…
पुढच्या वर्षी वारीला यायचं हे ठरवूनच…
☆
© नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






