श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ दूर राहिलेलं घर ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
लेफ्टनंट जनरल रंजन महाजन साहेब (निवृत्त)
त्या लाकडी पेटीमध्ये नववधूचे वस्त्रालंकार म्हणजे तिच्या भाषेत दुल्हन का जोडा… लाल रंगाचा… आणि इतर ब-याच वस्तू निघाल्या… लग्नाच्या वेळी नवरी अंगावर मोठ्या हौसेने घालते त्या सर्व वस्तू सुद्धा होत्याच. एकक्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर त्याची बहिण जणू साक्षात उभी राहिली! तिच्या लग्नात ती अशाच पेहरावात सजली होती आणि तो तिच्यामागे तलवार घेऊन उभा होता. लग्नासारख्या आनंदाच्या सोहळ्यात शस्त्रांचं काय काम? त्यानं लहानपणी त्याच्या वडिलांना विचारलं होतं. वडील म्हणाले होते, “इथं राज्य करणा-या लोकांचे सैनिक मांडवात घुसून नवरीला थेट उचलून घेऊन जात… आणि नंतर त्या पुन्हा कधीच नजरेस पडत नसत. म्हणून संरक्षणासाठी, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा तलवारींचा पहारा ठेवावा लागे… नंतर ही प्रथाच पडून गेली!”
“दादा, मला इकडे पाठवू शकाल त्या सा-या वस्तू… आणि तो पोशाख?” फोनवरून पलीकडून थरथरता प्रश्न ऐकून साहेबांच्या हृदयात कालवाकालव झाली! “पत्ता आहेच माझ्याकडे. पाठवण्याची व्यवस्था करतो, ताई!” साहेबांनी असं म्हणत फोन ठेवला. कॅप्टन साहेब म्हणाले, ”यह सभी चीजें अच्छे से pack करके इस address पे जल्द से जल्द भेज दो!” आणि साहेब आपल्या जीपकडे वळाले. त्यांनी एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिले!
ती त्या घरात नववधू अगदी काहीच वर्षांपूर्वी आली असावी. दोन मजली घर ते. त्याला खोल तळघरसुद्धा होतं. त्यात बरंच काही साठवून, लपवून किंवा सांभाळून ठेवता यायचं. घरामागे बर्फाने आच्छादलेले पहाड, त्यांवर उंच उंच झाडं. खळाळणारे ओहोळ. सफरचंदाच्या बागांतून पिकू लागलेल्या फळांचा मनमोहक वास. केशर तर इथल्या कणाकणात जणू मिसळून गेलेलं. धुकं असं की वाटे आभाळातून चालतो आहोत आपण. सूर्य उष्णता देणारा एक गोळा आहे, हे इथं कुणाला ठावेच नसावे… इतकी थंडी… दिवस कसे निघून चालले होते ते समजतही नव्हतं!
एकेदिवशी रात्री घराचा दरवाजा ठोठावत काळ आला… जोडीला हवेत बंदुकीतून डागल्या गेलेल्या गोळ्यांतील दारूचा दर्प होताच. “चला, निघा… नाही तर जीवाला मुकाल!” आवाज आणि चेहरे ओळखीचे होते… पण त्या चेह-यांवरचे डोळे आज अंधारातही चमकत होते… एखाद्या श्वापदाचे चमकतात तसे. ते शब्द खरेच होतील अशी खात्री पटली… कारण शेजारच्या घरांतून प्राणांतिक किंचाळण्याचे आवाज कानांवर आदळत होते… !
जगात राहायचे म्हणजे जिवंत राहण्यास प्राधान्य द्यावे लागते… नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडावं लागलं सर्वांना. जेवताना हातात घेतलेला घास तसाच ताटात टाकून द्यावा लागला… हात धुण्याचीही फुरसत लाभली नाही. सफरचंदाच्या व्यापारासाठी घराबाहेर पडलेले बाप-लेक रात्री घरी आले नव्हते. रस्त्यात अडकून पडले असतील अशी मनाची समजूत घालत सासू-सुना बळेच डोळे मिटून अंथरुणावर पहुडल्या होत्या… आणि त्यात दारावर पडलेल्या त्या थापा! जोडीला मोठ्या आवाजातले दरडावणे!
दिल्लीत पोहोचता पोहोचता जीव कासावीस झाला होता. बाप्या माणसांचा तर अजूनही तपास लागलेला नव्हता. सारी पांगापांग झाली होती… कोण कुठे आहे, कसा आहे, आहे की नाही? सर्व काळोख!
शरणार्थी लोकांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूत संसार थाटताना कुंकवाचा करंडा कुठे ठेवावा ते समजत नव्हतं. शेजारच्या तंबूतील मुलीचा नवरा दोन-तीन दिवसांनी परतला होता… रक्तबंबाळ अवस्थेत… पण तिचं कुंकू मजबूत होतं म्हणे! हिचं वाट पाहणं आता कुठं जुनं होऊ पहात होतं. काही दिवसांनी व्यापारानिमित्त ओळख असलेल्या एका सद्गृहस्थाने आसरा दिला.
कॅप्टन साहेबांच्या दलाला आदेश मिळाले… रिकाम्या घरांचा ताबा घ्या… अन्य कुणी घेण्याआधी… आणि त्या घराला आग लावण्यापूर्वी. काही घरांना आगी लावल्या गेल्याही होत्याच. मालकीच्या घरांतून हाकलले गेलेले लवकर परत येण्याची शक्यताही नव्हती… जिथं जगता येणार नाही तिथं राहणार तरी कोण?
साहेबांनी हे ही घर ताब्यात घेतलं… बंदोबस्त लावला! घरात राहून गेलेल्या चीजवस्तू ताब्यात घेऊन त्याची नोंद घेतली. कुण्या व्यापारी कुटुंबाचं घर असावं… घरात सारं काही नीट, छान होतं. विशेष म्हणजे त्या घरात टेलिफोनही होता. कॅप्टन साहेबांनी सहज तो फोन चालू आहे का ते पाहिलं… तो चालू होता… एस. टी. डी. सुविधेसह.
घरात काही पावत्या सापडल्या. इथून दिल्लीला सफरचंदे बाजारपेठेत पाठवण्याचा व्यवसाय होता तर या कुटुंबाचा… साहेबांनी त्या पावत्या पाहताच ओळखले. पावतीवर दिल्लीतल्या व्यापा-याचा पत्ता, फोन नंबर छापलेला होता. कॅप्टन साहेबांनी त्या नंबरवर सहज फोन लावला. एका महिलेने फोन घेतला. “कोण?” त्या महिलेने विचारले. साहेब म्हणाले, ”हम इंडियन आर्मी से है… और मैं कॅप्टन… बोल रहा हूं… ” त्यावर महिला म्हणाली, ”साहब, आप तो हमारे घर से बोल रहे है… यह घर हमारा है!”
काश्मिरातून रातोरात पलायन कराव्या लागलेल्या हजारो काश्मिरी नागरीकांपैकीच हेही एक कुटुंब होतं. पैसे, चीज वस्तू आणि शेकडो आठवणी मागे ठेवून ही माणसं जीव वाचवून त्यांच्या मालकीच्या घरांतून पळून आलेली होती!
कॅप्टन साहेबांनी त्यावर त्या महिलेला परिस्थिती समजावून सांगितली. “तुमच्या घराच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत” असंही तिला सांगितल्यावर तिने अनेक प्रश्न विचारले. म्हणाली “आमचं घर तुमचं घर समजा… सांभाळा!” आणि खात्री पटल्यावर ती साहेबांना म्हणाली, ”भाईसाहब, माझं एक काम करणार?” साहेब उदगारले… “हां, बहेन… बतावो!”
“आमच्या घराच्या तळघरात जा. तिथे एका कोप-यात फळबागेत फवारण्यासाठीची औषधं ठेवलीत… त्याच्या उजव्या बाजूला खाली एक लाकडी पेटी आहे का बघा… आणि त्या पेटीतील वस्तू मला पाठवून द्या… फार जड नाहीत वस्तू… पण माझा जीव अडकला आहे त्यांत आणि घरी कधी परतण्याची संधी मिळेल… देवास ठाऊक!”
साहेब स्वत: त्या दुमजली घराच्या तळघरात गेले. काही सैनिक सोबत घेतले… अंधा-या तळघरात ती लाकडी पेटी सापडायला वेळ लागला… पण अनेक वस्तूंच्या खाली सापडली. पेटीत अगदी निगुतीने सांभाळून ठेवलेला नववधूचा सारा साजश्रुंगार होता. साडीला तर अजूनही लग्नातल्या हळदीचा सुवास येत होता. आभूषणे ख-या सोन्याची नसावीत पण त्यांची चमक सोन्याहून चमकदार होती. पाठवणी करताना कुण्या सुवासिनीने ओटी भरली असावी… ती ओटी तशीच बांधून ठेवलेली होती पदरात! त्या वस्तू म्हणजे एका नववधूच्या जन्म-जन्मांतारीच्या आठवणी होत्या! त्या साडीच्या पदरावर आईच्या मायेची नजाकतदार वेलबुट्टी होती… आणि धागे वडिलांच्या प्रेमाचे… भावा-बहिणींनी तिची पाठवणी करताना आवेगाने मारलेल्या मिठ्या… त्यामुळे पडलेल्या सुरकुत्या अजूनही तशाच होत्या. अग्निफेरे घेताना पदराला त्यांच्या शेल्याशी बांधलेल्या गाठीच्या खुणाही तशाच होत्या!
साहेबांनी त्या सा-या वस्तू काळजीपूर्वक वर आणल्या. युनिटमध्ये परतले. एक छानसे packing करून घेतले… त्यात एक चलनी नोट आणि शगुनाचे म्हणून एक सुटे नाणेही ठेवले… आणि एक कागद ठेवला… त्यावर लिहिले. ”भावाकडून… धाकट्या बहिणीसाठी! सुखी रहा… कधी न कधी परत या तुमच्या घरी!”
पाचव्या दिवशी साहेबांच्या नावाने त्यांच्या कार्यालयात फोन आला… यावेळी पलीकडून तिचाच आवाज होता… ”दादा… !” आणि पुढची काही मिनिटे केवळ शांतता… गालांवरून ओघळणा-या आसवांना जर एखाद्या ओढ्यासारखा खळखळाटी आवाज असता तर बरं झालं असतं… पण आसवांचा तो प्रवाह निमूटपणे खाली ओघळत जात असावा.
काही वेळाने साहेबच म्हणाले, ”सब चीजें बराबर मिल गयी ना? कुछ छूट तो नहीं गया?” त्यावर ती म्हणाली, ”छूट तो सब कुछ गया पिछे… सारी जिंदगी! लेकिन आपने यादें बचा ली मेरी… और इतनी दूर भेज भी दी मेरे लिये!” पुढे ती बरंच काही बोलली… पण शब्द उमटत नव्हते… काही शब्दांना तसा काही अर्थही नव्हता… कारण मनातून जिभेवर आणि तिथून पुढे सरकायला मागून येणा-या शब्दांना जागाच उरली नव्हती… गळ्यात आवंढा गुंतून राहिलेला होता!
पुढे दिवस उलटत गेले… साहेबांची तिथून दुस-या सीमेवर बदली झाली. तिचं काय झालं माहीत नाही… पण साहेबांच्या मनात नववधूचा तो लाल रंगाचा पेहराव कायमचे रंग भरून गेला!
साहेबांना खूप दिवसांनी सुट्टी मिळू शकली… गावी पोहोचायला रात्र झाली… घरच्यांशी बोलता बोलता पहाट केंव्हा झाली ते समजलंच नाही. पहाटे गोठ्यांत गाई हंबरत होत्या… भाऊ बहिणीच्या गावाकडे निघायला घराच्या बाहेर पडला! साहेबांनी शहरातून गावाकडे परतताना तिच्यासाठी लाल रंगाची सुंदर साडी आणली होती… ती साडी तिला कधी एकदा देईन… असं साहेबांच्या जीवाला झालं होतं! सैनिकाचं कठोर शरीरातलं हळवं मन पावलांच्याही पुढं धावत निघालं होतं!
(काश्मिरातील सैनिकी जीवन सुमारे तीन दशके अनुभवलेले लेफ्टनंट जनरल रंजन महाजन साहेब (निवृत्त) यांची मुलाखत ‘The Monks & Warriors’ podcast मध्ये पाहतो आहे. महाजन साहेबांनी या मुलाखतीत एका घटनेचा ओझरता उल्लेख केला आहे. त्यावर आधारीत हा लेख आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






