सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद विठुरायाचा… – कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आली ज्येष्ठ कृष्ण नवमी 

गेला विठू आनंदूनी ।

माझा ज्ञाना निघे आज

आता अलंकापुरीतून ।।१।।

*

निवृत्ती सोपान आणि

मुक्ता चित्कलिका ।

संगे येतील घेऊन 

नामा जना आणि एका ।।२।।

*
विसो गोरा बंका 

संत गजानन चोखा ।

भक्त येतील घेऊन 

साऱ्या संतांच्या पालख्या ।।३।।

*
संत मांदियाळी 

आता येईल पंढरी ।

भक्त नाचतील 

हरिनामाच्या गजरी ।।४।।

येता एकादशी । 

आता दक्षिण ती काशी ।

जाई फुलुनी भक्तांनी । 

देव बोले रखुमाईसी ।।५।।

*
राही माझी बाळे

आता येतील माहेरी ।

दुमदुमेल माझ्या 

आता नावाने पंढरी ।।६।।

*
भक्त येतात चालत । 

मनीं दर्शनाचा हेत ।

संतांच्या पालख्या 

खांद्यावरुनी वहात ।।७।।

*
नाही पावसाची पर्वा

नाही उन्हाची गणती ।

भूक तीही विसरून 

भक्त मार्ग तो चालती ।।८।।

*
देई वस्त्रे नवी

आणि शेला तो पैठणी ।

कोणते दागिने 

घालू राही अंगावरी ।।।९।।

*
नाथ सोन्याच्या ह्या माळा 

आणि कंठा मोतियांचा ।

मुकुट मस्तकी 

ठेवा कौस्तुभ रत्नांचा ।।१०।।

*
कंठामधे घाला

हिऱ्यामाणकांचे हार।

आणि कानामधे घाला 

स्वामी कुंडले मकर ।।११।।

*
मग तुमचे रुपडे । 

अति दिसेल सुंदर ।

आल्या भक्तावरी घाला 

तुम्ही शेल्याने पाखर ।।१२।।

*
प्रसाद वाटण्या 

रांधू सांगा काय देवा ।

खीर, घावन घाटलं

की मिठाई नि मेवा ।।१३।।

*
उडे लगबग मग

राही आणि विठ्ठलाची ।

करिती तयारी दोघे 

भक्त स्वागताची ।।१४।।

*
येता एकादशी 

ठेवी हात निढळावर ।

जणु भक्ताचे दर्शन 

घेण्या विठूची अधीर ।।१५।।

*
येता एकादशी 

भक्त पोचती पंढरी ।

नाचती आनंदे 

विठुनामाच्या गजरी ।।१६।।

*
झाली दर्शनाची बारी ।

भेटे भक्ता उरोउरी ।

भक्तही सुखावे 

रूप पाहुनी अंतरी ।।१७।।

*
भक्ताच्या पायासी

लावी राही तेल प्रेमे ।

हळूवारपणे 

हात विठूचा तो फिरे ।।१८।।

*

श्रम भक्तांचे ते मग

होऊनिया लुप्त ।

सांगता सोहळा होई 

विठूच्या घरात ।।१९।।

*
आला दिवस काल्याचा । 

बसे भक्तांची पंगत ।

राही करीतसे नाना- । 

विध पक्वान्नांचा बेत ।।२०।।

*
लाडू जिलबी घीवर

आणि पुरणाच्या पोळ्या ।

शेवटी तो मिळे 

दहीपोह्याचाही काला ।।२१।।

*
पार पडता सोहळा 

आला वियोगाचा दिन ।

दुःख भक्तांचे अंतरी । 

मुख विठूचेही म्लान ।।२२।।

*
निरोप देण्यासी । 

देव येई वेशीप्रत ।

भक्त जाता दूरी 

मुख लपवी शेल्यात ।।२३।।

*

भक्त जाईल रमून । 

राही फिरूनी संसारी ।

वाट पाहणे नशिबी । 

मम पुन्हा वर्षभरी ।।२४।।

*

एक दिसाचा आनंद । 

मज येत असे बळ ।

मग राही विटेवरी 

सर्व सोसूनिया कळ ।।२५।।

कवयित्री : सौ. मनीषा अभ्यंकर

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments