श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ अमेरिकेतलं ‘सुदर्शन चक्र‘… लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
“मराठी आणि महाराष्ट्र मनात घेऊन अमेरिकेत फिरणारं “सुदर्शन चक्रं…”
नाटकाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर वेगवेगळी माणसं भेटतात. ह्या अमेरिका दौऱ्यात क्लिव्हलंड शहरात “सुदर्शन साठे…” भेटले…!
काय, किती आणि कसं बोलायचं ह्यांच्याविषयी…???
आधी भौतिक श्रीमंती सांगतो… म्हणजे तुमचा वाचण्यातला इंटरेस्ट वाढेल …
फूटबाॅल ग्राऊंडपेक्षा २ पावलं कमी भरेल इतकं मोठं ह्यांचं घर … घराच्या दाराशी ठेवलेल्या “रागावलेल्या सिंहाच्या पुतळ्यापासून ते घराच्या मागे, टेनिस कोर्टच्या शेजारी ठेवलेल्या “8 Hours chair”, म्हणजे ८ तास बसलं तरी ; बूडाला आणि बूडाच्या मालकाला कंटाळा येणार नाही अशा खुर्चीपर्यंत सगळं अत्यंत विचारपूर्वक आणि मौल्यवान …
ज्या ज्या महागड्या गाड्या पाहून माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या भूवया उंचावतील त्या त्या सगळ्या गाड्या घरांत… बाहेर पडायचं निमित्त काय आहे …? त्यानुसार गाडी बदलायची अन् काढायची…
2 BHK फ्लॅट च्या २ बेडरूम मिळून जेवढी जागा असेल तेवढं ह्यांचं कपड्यांचं कपाट… बूट, चष्मा वगैरे ह्यांची व्हरायटी नकोच बोलायला…
उंची जवळपास ६ फुट… DON मधल्या बच्चन साहेबांच्या रूबाबाला टक्कर देणारी ह्यांची चाल अन् स्टाईल …
आता खरी श्रीमंती…, श्रीमंती क्रमांक २ सांगतो… नीट वाचा …
समर्थ रामदासांचा दासबोध, भगवत् गीता, रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत तुकारामांचे अभंग ह्या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास … पाठांतरासहीत … छ. शिवाजी महाराजांच्याविषयी खूप आदर, अभ्यास…
महाराष्ट्रात राहुन आपण तरी काय शुद्ध बोलतो अशी स्वच्छ मराठी… भारत देशाबद्दल प्रचंड अभिमान… देशांतर्गत मुद्दे, महाराष्ट्र, राजकारण, खेळ, कला ह्या सग्गळ्याविषयीची ऐकीव नाही तर, अभ्यासलेली माहीती, प्रचंड वाचनातून आलेलं ज्ञान … वागायला अत्यंत नम्रं … प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकायची तयारी… ४५ वर्षं अमेरिकेत खूप कष्टं करून कमावलेली माणसांची, विचारांची, ज्ञानाची श्रीमंती…
त्यांनी विचार करून, प्रत्येक शब्दाचा मान राखून बोललेल्या प्रत्येक वाक्यात आयुष्याचं सार सापडावं असे मुद्दे …
मी विस्मयचकीत झालो, भारावलो, सुखावलो आणि काय काय झालो…
त्यांना त्यांचे आई वडील, आई वडीलांनी दिलेली शिकवण आणि केलेल्या संस्कारांची स्वत:च्या वयाच्या सत्तरीनंतरही ताजी आठवण आणि जाण…
बायकोविषयी प्रचंड आदर आणि प्रेम… जगातल्या सगळ्याच नवऱ्यांना पटत नाही तसा त्यांना जरी त्यांच्या बायकोचा मुद्दा नाही पटला तरी, सांगायची पद्धत सुद्धा फार आदर देणारी …
आणि कित्तीही व्यस्तता असली तरी रोsssज त्यांच्या ठरलेल्या “गजानन महाराजांच्या पोथीतला” एक अध्याय वाचण्यावरची त्यांची श्रद्धा … देवावरचा प्रचंड, दृढ विश्वास… श्रीराम, श्रीकृष्ण ह्यांना “आलो तुमच्या पायाशी” म्हणुन लीन झालेलं त्यांचं अंतःकरण…
कुणालाही कुठल्याही तराजू मध्ये न तोलणारी, सगळ्यांशी एकसारखी वागायची त्यांची पद्धत …
समोरच्याला सतत आनंद देण्याचा, त्यांच्या ज्ञानात, माहितीमध्ये भर घालणारा त्यांचा दानशूरपणा…
आणि हे सगळं त्यांच्याकडे असतांनाही मी त्यांच्यासमोर पहिल्यांदा आलो तेंव्हा माझा हात हातात घेउन मला म्हणाले “सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या माणसाचा स्पर्शं झाला… आता मलाही आशीर्वाद मिळेल …” … हे ऐकल्यावर मला भारी वाटलं होतं पण, जसा जसा ह्या माणसाचा सहवास लाभला त्यानंतर मात्र माझ्यासाठी वापरलेल्या त्या वाक्यावरून त्यांची विनोद बुद्धीही कमाल असल्याची मला खात्री पटली.
३ दिवसांत मी ह्या माणसासमोर भक्त होऊन बसलो, त्यांना ऐकलं… सतत असं काहीतरी सांगायचे कि, मोत्यांचा पाऊस पडला तर कोणता मोती वेचावा ह्या गोंधळातच वेळ जावा तसं माझं झालं… तिसऱ्या दिवशी मी कागद पेन घेऊन बसलो आणि चक्क ते बोलतात ते लिहित गेलो…
निघतांना त्यांना म्हणालो, “ सुदर्शन सर मला तुम्ही खूप आवडलात … मला आशीर्वाद द्या…” त्यांनी समर्थ रामदासांचा दासबोध दिला.
त्यांचा निरोप घेतांना का कोण जाणे मला खूप रडू येत होतं…
मी निघतांना त्यांना घट्ट मिठी मारली, मला त्यांना अजिबात सोडवत नव्हतं …
त्यांनी पाठीवरुन त्यांचा हात छान फिरवून गाडीत बसण्यापूर्वी एक हात वर करुन एकदम स्टाईलीश बाय केला आणि त्यांच्या शर्टच्या पांढऱ्या रंगाला मॅच होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र महागड्या गाडीत निघून गेले…
आपण नुसते मराठी, महाराष्ट्र, धर्म असा गवगवा करतो पण, पण, सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही मनात, वागण्यात, कर्तृत्वात, मराठी भाषा, महाराष्ट्र आणि भारत घेउन फिरणारं “सुदर्शन चक्रं” मला अनेक अर्थांनी चक्रावून गेलं … धन्यवाद …!!
☆
लेखक : श्री संकर्षण कऱ्हाडे
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







