मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ जागतिक कविता दिन विशेष – मानसउत्सव… ☆ श्री सुनील देशपांडे 

(२१ मार्च जागतिक काव्य दिनाच्या निमित्ताने)

सध्याचा पुणेकर असलेला मी अंतर्मनाने मूळ कविता प्रेमी नाशिककर.

दरवर्षी २८ फेब्रुवारी कुसुमाग्रज जयंती हा मराठी दिन, परंतु विशेषतः ‘मराठी कविता दिन’ म्हणून माझ्या मनात कायम घर करून राहिलेला आहेच. १० मार्च हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन. त्यामुळे नाशिक मध्ये असताना २८ फेब्रुवारी ते १० मार्च हा मराठी उत्सव म्हणून आम्ही साजरा करत असू. 

खरं म्हणजे कवितेचे प्रेम निर्माण करणारी पहिली कविता कुसुमाग्रज उर्फ आमचे लाडके तात्या यांची… 

‘उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले’ तेव्हापासून वेगवेगळ्या वयामध्ये पाठ्यपुस्तकातून तसेच कवी संमेलनातून त्यांच्या अनेक कवितांनी वेड लावले. अगदी ‘स्वातंत्र्यदेवतेच्या विनवणी’ पर्यंतच्या लोकप्रिय कवितांना रोजच वंदन करावेसे वाटते. 

सध्या शारीरिक कारणामुळे फारसे बाहेर पडू शकत नसलो तरी २८ फेब्रुवारी ते १० मार्च या दिवसात मनातून हा ‘मानसउत्सव’ मी साजरा करतच असतो. आणि काव्य प्रेमामुळे त्यानंतरही वेगवेगळ्या विविध दिवशी कवितेचे ‘मानसउत्सव’ साजरे करण्याची माझी प्रथा खालील दिवशी मनापासून चालूच असते. रसिकांच्या माहितीसाठी हे  दिवस सादर करीत आहे.

१) २१ मार्च : आंतरराष्ट्रीय कविता दिन किंवा जागतिक कविता दिन :

१९४५ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्को या संस्थेने काव्य अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्याच्या आणि लुप्त होत असलेल्या भाषांना ऐकण्याची संधी वाढवण्याच्या उद्देशाने २१ मार्च हा जागतिक काव्य दिन म्हणून १९९९ मध्ये प्रथम स्वीकारला आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये विविध भाषांमध्ये २१ मार्च हा दिवस जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो.

२) २८ एप्रिल: राष्ट्रीय महान कविता दिन. 

भूतकाळात होऊन गेलेल्या खूप मोठ्या आणि महान कवींच्या कविता आठवणे त्यांचे पठण करणे मनन करणे आणि अशा कवींच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम करणे यासाठी राष्ट्रीय महान कविता दिन साजरा केला जातो. 

३) ३० एप्रिल

अमेरिकेमध्ये ‘पोएम इन युअर पॉकेट डे’ म्हणजेच तुमच्या खिशातली कविता. असा एक अभिनव दिवस साजरा केला जातो. लघु कविता, छोट्या कविता, चारोळ्या, पाचोळ्या, रुबाई, शायरी वगैरे  पद्धतीच्या कविता अशा प्रकारच्या कवितांना उठाव येण्यासाठी आणि अशा प्रकारच्या कविता सध्या अमेरिकेमध्ये खूपच लोकप्रिय असून भारतात सुद्धा सध्या अशा प्रकारच्या कविता अत्यंत लोकप्रिय होत आहेत. अशा कवितांसाठी अनेक लोकप्रिय कवीं मार्फत हा दिवस साजरा केला जातो.

४) ७ मे : कविवर्य रवींद्रनाथ टागोर जयंती 

हा दिवस सहसा संगीतकविता किंवा उत्तम अशा वृत्तबद्ध कविता किंवा संगीतिका अशा पद्धतीच्या काव्य अविष्काराने साजरा करण्याची पद्धत आहे. विशेषतः बंगाली साहित्यिकांमध्ये हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतातही काव्यप्रेमी व्यक्ती या दिवशी विविध प्रकारचे उत्तम संगीतमय काव्याचे व संगीतीय कविता अथवा काव्यगायन, संगीत नृत्य गायन अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाने हा दिवस साजरा केला जातो.

५) आषाढ शुद्ध प्रतिपदा 

(हा दिवस साधारणपणे जुलै महिन्यात येतो)

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत भाषेतील महान कवी व नाटककार कवी कुलगुरू कालिदास यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. याला ‘महाकवी कालिदास दिन’ किंवा ‘कवि कुलगुरू कालिदास दिन’ म्हणतात. महान कवि कालिदास यांच्या मेघदूत या महान काव्याचा निर्मिती दिवस मानला जातो. हा दिवस कालिदास जयंती दिन म्हणूनही समजला जातो. या दिवशी विविध कवी संमेलने व कवितांचे उत्सव साजरे करण्याचा प्रघात आहे. वर्षा ऋतू मधील हा काव्योत्सव. पाऊस अर्थात वर्षा ऋतू हा काव्य भावना जागृत करणारा काव्यात्मक वातावरण निर्माण करणारा ऋतू म्हणून समजला जातो. यामुळेच कवी मंडळींचा सगळ्यात आवडता दिवस त्यांच्या सगळ्यात आवडत्या ऋतूमध्ये म्हणजेच सिझनमध्ये येणारा हा स्फूर्तीदायक दिवस.

६) २१ ऑगस्ट : राष्ट्रीय कवी दिवस 

हा दिवस कवींच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. कवितांमधून सामाजिक जागृती आणि सामाजिक संस्कार करणाऱ्या प्रसिद्ध कवींचा त्यादिवशी सन्मान केला जातो. त्यांच्या कवितांचे कार्यक्रम. विविध काव्य स्पर्धा व उत्कृष्ट कविता पारितोषिके देऊन अशा विविध पद्धतीने राष्ट्रीय कवी दिवस साजरा केला जातो. हा दिवस कवींचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

७) ऑक्टोबर महिन्याचा पहिला गुरुवार: राष्ट्रीय कविता दिन

एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की ८ ते १६ वर्षा दरम्यान शिक्षण घेणारी पिढी कवितेवर मनापासून प्रेम करते. सर्वसाधारणपणे या वयोगटातील ४८.८% विद्यार्थी कविता प्रेमी असतात. अशा नव्या पिढीतील उदयोन्मुख कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील कवी गुणांना उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय कविता दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. प्रथमत: हा दिवस इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा होत असे. त्यावेळी अनेक देश ब्रिटिश राजसत्ते खाली असल्यामुळे त्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. विशेषतः प्रसिद्ध कवींनी नवीन पिढीतील कवींचे काव्यविश्वात स्वागत करून त्यांच्या मनात कवितेविषयी प्रेम जिव्हाळा व नवीन पिढीच्या काव्य कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट या दिवसाचे असते. नव्या पिढीतील काव्य कल्पनांना जुन्या पिढीतील कवींनी केलेला सलाम म्हणजे राष्ट्रीय कविता दिन.

८) अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा) : महर्षी वाल्मिकी जयंती 

(हा दिवस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो)

महर्षी वाल्मिकी यांना आद्यकवी मानले जाते. या विश्वातील पहिली कविता ज्यांना स्फुरली ते महर्षी वाल्मिकी. म्हणून त्यांना कवितेचे जन्मदाते संबोधले जाते. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी कवितेच्या निर्मात्याचा जन्मदिवस म्हणून अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम आणि कवींचा सन्मान अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवशी स्वच्छ चांदण्यामध्ये सहसा रात्रीच्या वेळी काव्य रंगात रंगून जाणे आणि केशरी दुधा बरोबर काव्याचा आस्वाद घेणे हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सगळीकडे भारत देशामध्ये साजरा केला जातो. सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष मध्यरात्री नंतर पर्यंत सुद्धा या कार्यक्रमामध्ये रंगून जातात.

असे हे मला ज्ञात असणारे वर्षातील विविध पद्धतीने साजरे होणारे कवितांचे दिवस. या दिवसांच्या आठवाच्या निमित्ताने माझी एक कागदावर न उठलेली कविता .. कल्पनेमध्येच लपून असलेली कविता..  त्या कवितेबद्दलची ही कविता रसिकांच्या चरणी अर्पण…

****

☆ नवीन कविता… ☆ श्री सुनील देशपांडे 

सुचते आहे मनात का ही नविन कविता

रुजते आहे बीज घेउनी नवीन कविता. 

*

या बीजातुन नवीन कांही फुटते आहे,

या बीजातुन खरेच येईल नवीन कविता ?

*

मनात माझ्या जे जे आहे व्यक्त व्हायचे,

घेऊन येईल का ते सारे नवीन कविता ?

*

नाविन्याचे कपडे लेऊन जुनीच येईल, किंवा

दिव्य देहिनी असेल का ती नवीन कविता ?

*

संचित प्रश्नांचे जे जाळे मनात माझ्या,

सोडवील का गुंता थोडा नवीन कविता ?

*

गुंता माझ्या मनातला ती सोडवील जर,

मुक्ती देईल मलाच माझी नवीन कविता.

*
ज्या मुक्तीची वाट आजवर पहातो आहे,

त्या मुक्तीची वाट दाखविल नवीन कविता.

 — श्री सुनील देशपांडे

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? क्षण सृजनाचा ?

🤣 ई डी चा बाप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(प्राजक्ता, माझी मुलगी सिंगापूरला नुकतीच Standard Chartered बँकेत Executive Director झाली, त्यावर केलेली रचना! 🙏)

🕺🤣 EDचा बाप! 😅🕺

EDचा बाप होण्याचं भाग्य

मिळालं प्राजक्तामुळे काल परवा

आता माझ्याशी कसं वागायचं

तुम्ही आपल्या मनाशी ठरवा

*

तसं घाबरायचं कारण नाही

सांगून ठेवतो आत्ताच तुम्हांला

कारण तुम्हावर ‘रेड टाकायचा’

अधिकार नाही बरं कां आम्हांला

*

आम्ही टाकलीच जर कधी ‘रेड’

तुमच्यावरील प्रेमाने घरावर

खात्री असू द्यावी मनातून

तुम्हांला धरणार नाही धारेवर

*

बोळवण करावी अशावेळी

आमची तुम्ही गोडधोड देऊन

अन्यथा सुखदुःखाच्या गोष्टी करू

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

संध्याकाळी निवांतपणे ‘बसून’

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘रंग… नको बेरंग..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

होळी व धूलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा! 

या शुभेच्छा देताना ‘यंत्रदास’ आम्हाला सुरक्षिततेच्या काही सूचनाही आवर्जून देतो. सणाच्या रंगांचा बेरंग होऊ नये म्हणून या सूचनांचे पालन करावे आणि सणाचा आनंद लुटावा अशी त्याची आग्रहाची विनंती आहे.

‘श्री सुरक्षितताबोध’ या ग्रंथाच्या ‘बालक्रीडनसुरक्षिततानाम’ अध्याय ५.  श्लोक १२ ते १४ मधे यंत्रदास सांगतोय.

 *

आहा.  बाळके खेळतीं रंग होळी

जळीं लोळतीं (लावुनी भांग गोळी?)

फुगे फोडितीं.  फेकितीं रंग नाना

सिनेमानटासारखे छंद नाना ll१२ll

 *

किती रंग ते.  काय त्यांची झळाळीं!

तेलातले रंग.  ख्याती निराळी

निळे.  तांबडे.  पांढरे वा रुपेरी

जरा लागता… त्याहुनी मिर्चि बsरी! ll१३ll

 *

मना! ऐशिं होळी न केव्हाच खेळीं

(रहावे सुखे खाउनी फक्त पोळी!)

असे रंग ते भंगवीतीं शरीरा

तसा लागतो रे करावा खरारा ll१४ll

*

टीप:-

खरारा: घोड्याचे अंग स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘खरारा करणे’ म्हणतात. त्यासाठी वापरल्या जाणा-या बोथट दातेरी.  काटेरी पत्र्यालाही ‘खरारा’ म्हणतात.

यंत्रदास: ‘यंत्रदास’ या टोपण नावाने १९९३ साली ‘ श्रीसुरक्षिततोध ‘ नावाचा.  ‘सुरक्षितता’ (Safety ) या विषयावर मी लिहिलेला ग्रंथ पुण्याच्या ‘टेल्को’ – आताची ‘टाटा मोटर्स’ या कंपनीने प्रकाशित केला होता. ‘ सुरक्षिततेविषयी सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारा उत्कृष्ट ग्रंथ’ म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार देऊन या ग्रंथास सन्मानिले आहे.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी

☆ क्षण सृजनाचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी

ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.

सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.

ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”

मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात.श्यान भरलं,टाकलं

गुरास्नी चारा टाकला.न्याहरी केली.

शेतात गेलो बैलं घेऊन कोळपलं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या गेलो गोठ्यात धारा काढल्या ‌

किटल्या भरल्या,वैरन टाकली.

कारभारणीला घेऊन शेत भांगललं.

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

म्या दूध घालून परत आलो

कारभारणीनं केलेला च्या पिला

घेतला ईळा काढली वैरन

*

काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं

दिस मावळायला आला

गुरास्नी चारा पाणी झालं

ढगाआड सुर्व्या लपला

 काल बी असंच,उद्या बी असंच,

आज येगळं काय झालं?

*

तिकडं बी परदेशात अंधार झालाच की

समदी कामावरनं घरला आलीत की

 काल,आज, उद्या त्यास्नी राबायचं हायच की

घरात बाहेर कुटबी काम्पुटर हायच की

*

मंग नवीन वरस सुरू झालं म्हनं मंजी काय झालं?

आज, उद्या आन् परवा धारा हायत्याच की.ईळा बी हाय.भांगलायचं बी हाय.

आन् गुरास्नी वैरन ती कुटं जाती?कापायची हायच की.

भाकर तुकडा हायच की.झाडाखाली सुखानं पडायचं हायच की

*

मंग नवीन वरीस सुरू झालं मंजी काय झालं? काय आलं आनि काय गेलं?

मंजी काय झालं?

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ हृदयस्पर्शी… ☆ श्री जगदीश काबरे ☆

आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर तिचे स्मरण म्हणजे आठवणींचा गोफ असतो. पण आठवणींचा मामलाही वाटतो तेवढा सरळ नाही. कोणत्या आठवणी मनात जोजवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे आपल्या हाती कुठे असतं? कारण काही आठवणी कितीही विसरू म्हटलं तरी कायमचा पिच्छा पुरवत राहतात. कधी कधी एखादी छोटी गोष्ट मोठ्यातल्या मोठ्या स्मृतींची शृंखला मनात चालू करते. या आठवणीतलं बरं काय, वाईट काय यांची निवड मेंदूतील न्यूरॉन्सच्या चाळण्याच करत असतात.

हृदयस्पर्शी –जगदीश काबरे

*

एक दिवस येईल, आपल्याला अलग करेल

मग कोणीही कुणावर रागावणार नाही.

*

एके दिवशी आपण वेगळे होऊ,

कुठे हरवून जाऊ कोणास ठाऊक?

*

तू मला लाखो वेळा हाक मारशील

पण मी काही परत येणार नाही.

*

जेव्हा तू रात्री झोपायला जाशील,

माझ्या आठवणीने तळमळशील.

*

कारण मी कधीही डोळे उघडणार नाही

तुझ्याशी गुजगोष्टी करू शकणार नाही.

*

जेव्हा तू तुझा फोन पाहत असशील

तेव्हा तुला माझा मेसेज दिसणार नाही.

*

शेवटी, रडून रडून तुझी आसवे सुकतील

असवाच्या प्रत्येक थेंबात मला शोधशील.

*

आठवाच्या सागरी जेव्हा जेव्हा तू बुडून जाशील

माझ्या प्रिया, माझ्यातच तू सामावलेला असशील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ चंद्र.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे… नुकतंच नवरात्र झालं होतं आणि कोजागरी पौर्णिमा जवळ आली होती. मी बँकेतर्फे एका ट्रेनिंगसाठी नाशिक ट्रेनिंग सेंटरला गेलेली होते. दसऱ्याला सुट्टी होती म्हणून त्या एका दिवसासाठी घाईघाईने घरी जाऊन परतले होते… पण यावर्षी नेहेमीसारखी कोजागरीची रात्र साजरी करता येणार नाही म्हणून जरा हुरहुरल्यासारखं वाटत होतं…

…. रात्री झोप येत नव्हती म्हणून रूमच्या खिडकीतून आकाशाकडे बघत बसले होते… हा माझा जुनाच छंद होता म्हणा… मुक्त विहरणाऱ्या ढगांमुळे आकाशात उमटणारे वेगवगळे आकार, त्यातून मधेच डोकावणाऱ्या चांदण्या, वडलांनी बघायला शिकवलेली नक्षत्रं… हे सगळं बघण्यात मन नेहेमीच खूप रमायचं… तर त्या वर्षी पाऊसही थोडा रेंगाळलेला होता… आकाशात पावसाचे ढग रेंगाळतांना दिसत होते… आणि मधूनच अचानक त्यातून चंद्र डोकावतांना दिसला…मध्येच झाकला जात होता…परत दिसत होता…कधी अर्धा…कधी पुरता… या चंद्राला पाहून आजवर कितीतरी कवींना वेगवेगळे अर्थ ध्वनित करणारी काव्यं सुचली आहेत, आणि ती सुचतच रहातील असा जणू ‘प्रेमाचा साक्षीदार’च करून टाकलाय त्याला कायमचा.

… ’पण या चंद्राला जर बोलता आलं असतं तर काय म्हणाला असता हा?’ …त्याच्याकडे बघता बघता अचानक मनात आलं होतं… मग हाच विचार कितीतरी वेळ डोक्यात घोळत राहिला होता आणि जराशाने काही ओळी आपसूक सुचल्या… ती ही कविता …

☆  चंद्र… ☆

काल सहज फिरता फिरता रस्त्यात एक गंमत झाली

एका वळणावर जरा आडोशाला, मला चंद्राची पालखी दिसली ॥

*

आत चंद्र होताच, पण बसला होता चेहरा पाडून

तो उदास निस्तेज चेहेरा पाहून, मी गेले चक्रावून ॥

*

नेहेमीचे ते सुंदर रुपडे, आठवले मग क्षणात

नकळतच माझ्याही, अन् गलबलले मग मनात ॥

*

घाबरतच गेले जवळ त्याच्या, खांद्यावर थोपटले

स्पर्शातल्या माझ्या विश्वासाने, बोलते त्याला केले ॥

*

खिन्न उद्विग्न मनात त्याच्या वादळ होते घोंघावत

कुठून आलो इथे, म्हणून मन होते पस्तावत ॥

*

म्हणे कशी सांगू तुला, व्यथा माझ्या मनीची

सारेच इथे स्वत:त गर्क, खंत नाही कशाची ॥

*

निवांत रम्य वेळ साधून, आलो सागराला भेटायला

मला पाहून चक्क तो, मागेच लागला हटायला ॥

*

मला पाहून मनात त्याच्या उर्मी उठतात ऐकलं होतं

प्रत्यक्षी पण खरं त्याचं, रूप काही वेगळंच होतं ॥

*

दु:खी कष्टी झालो आणि, नाद त्याचा सोडला

माझ्या साक्षीने प्रेम करणाऱ्या माणसांचा रस्ता धरला ॥

*

इथेही पण घोर निराशाच, आली माझ्या वाट्याला

विचारपूसही करायला, तो वेळच नाही कोणाला ॥

*

दुरूनच पाहून नाक मुरडून कुजबूज काहीतरी

खडबडीत माझा चेहरा त्याची.. किळस म्हणे वाटते भारी ॥

*

नेहेमीच यांना हवी पौर्णिमा, पण अमावस्या नको

सुखात सगळे वाटेकरी, पण दु:खात वाटा नको ॥

*

माहीत नव्हती मला इथली उफराटी ही तऱ्हा

चुकलंच आलो इथे, आपला लांबच होतो बरा ॥

*

एक मात्र पटलं, माणसं हुशार इथली खरोखर

दुरून डोंगर साजरे, हे कळलंय् यांना बरोबर ॥

*

एवढं बोलून हुंदका आवरून, निघाला तो जायला

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

सोडून गेला मनात माझ्या, भुंगा एक छळायला ॥

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग यमन (कल्याण)..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

देवघरात समईच्या शुभ्र कळ्या फुलल्या आहेत. दीप प्रज्वलित होऊन घराघराला सुवर्णकांती लाभली आहे. चंदन, आगरू, कर्पूराच्या धुपाच्या धुंद गंधाने आसमंत भरून गेलाय्, प्रसन्न झालाय्.

*

अशा समयी शांत होतं क्लांत मन.

कारण, याच वेळी…  

स्वराकार घेत असतो “राग यमन!

🌻 राग यमन 🌻

*

संध्या सरली, हुरहुर विरली, कातर मन सावरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या “यमन” सुमन घमघमले! ।। ध्रु।।

*

काजळ ढाळुन कळ्या दिव्यांच्या पुन्हा प्रफुल्लित झाल्या

नुपूर झंकारीत स्वर्गिच्या स्वप्नसख्या अवतरल्या

तम दवडुनि प्रासाद उजळले, मंगलमय झाले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।१।।

*

अलगद शीतल वात बिलगला रजनीगंधेला

जिवापाड जपलेला शिरिचा परिमल घट डुचमळला

वातावरणी कसे अचानक गंधजाल पसरले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।२।।

*

दर्पणात निजरूप न्याहळित मुक्त केस सावरले

फुले माळली, कुंडल ल्याली, गळा हार घातले

नयनी काजळ, भाळी कुंकुम, कटी मेखला रुळे

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले ।।३।।

*

भुरभुर कुंतल, अधीर अंतर, मंतरलेल्या दिशा

“तुझ्यासवे एकांती सखया कशा रंगतिल निशा? “

अशा चिंतनी असता परिचित पदरव कानी पडले

हिन्यापरी ह्रदयात सखीच्या यमन सुमन घमघमले! ।।४।।

*

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ मुक्त.. (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

अगदी सात आठ दिवसांपूर्वीचीच गोष्ट.. सकाळी चहा पीत पीत एकीकडे पेपर वाचत होते. पहिलं पान उपभोगाच्या वस्तूंच्या अत्याकर्षक जाहिरातींनी भरलेलं .. दुसऱ्या पानावर दिवाळीनिमित्त कुठल्या शहरातल्या बाजारपेठेत गर्दीची किती झुंबड उडाली त्याच्या फोटोंची गर्दी — त्या फोटोंच्या आजूबाजूला गर्दीत झालेली चेंगराचेंगरी – कुठे खून – कुठे मारामाऱ्या – कुठे जीवघेणा पूर – मग कुणा कुणाची आत्महत्या

– मधेच राजकारणातल्या निव्वळ स्वार्थापोटी मारल्या जात असलेल्या कोलांटउड्या — थोडक्यात काय तर बहुतेक सगळीकडे चाललेली नकारात्मकतेची कुरघोडी….. पानांची बहुतेक सगळी जागा याच नको वाटणाऱ्या वास्तवाने भरलेली ….. 

… वैतागून पेपर दूर सारला. आणि शेजारी असलेल्या खिडकीतून बाहेर बघत एव्हाना गार झालेला चहा प्यायला लागले….. घराखाली लावलेल्या झाडाच्या फांद्या आता पहिल्या मजल्यावरच्या आमच्या खिडकीजवळ पोहोचल्या होत्या. सहज लक्ष गेलं तर एक अगदी चिमणीपेक्षाही छोटा असणारा पक्षी झोक्यावर बसल्यासारखा एका फांदीवर झुलत होता .. मधेच आपले इवलाले पंख फुलवत स्वतःभोवतीच गिरक्या घेत होता .. मधेच आनंदाने आरोळ्या माराव्या तसा आवाज करत होता – – मस्त वाटत होतं – –

– – –  पण मधेच एकीकडे समोर फडफडणारा पेपर लक्ष विचलित करत होता … आणि नकळत मनात विचार भिरभिरायला लागले ….  इवलीशी चोच .. इवलेसे पंख असूनही मनसोक्त आनंदाने जगत असलेलं ते इवलंसं पाखरू … आणि जवळ खूप काही असूनही कशा ना कशाला जखडून सतत उरस्फोड करणारी असंतुष्ट माणसं. — आणि मग आपोआप मनात झिरपायला लागले शब्द – – –

☆ मुक्त .. ☆

उंच उंच भरारण्यासाठी  ..  पाखरांना नाही लागत दिवाळी दसरा

त्यांच्या मनाचे तेच तर राजे ..  कुवत जाणून खुशाल पंख पसरा .. ..

*

म्हणून आनंद साजरा करायला .. कारण त्यांना लागतच नाही

‘मी सदैव मुक्त आहे ‘ .. त्यांना नेहेमीच असते ग्वाही .. ..

*

मनसोक्त जगायलाही .. लागत नाही कुठलंच कारण

पोटापुरते दाणे मिळता .. तोच वाटतो त्यांना सण .. ..

*

हप्त्यावरती आणत नाहीत .. आनंदाचे फसवे पंख

ज्यावर असतो फासलेला तो .. समाधानाचा नकली वर्ख .. ..

*

मनापासूनचे समाधान असते .. मुद्दाम दाखवण्याची आस नसते

स्पर्धाच नाही कुणाशी कसली .. मग डामडौलाची गरजच नसते .. ..

*

गरजाच त्यांच्या मुळात माफक .. अवास्तव कुठलीच अपेक्षा नसते

म्हणून अंगापेक्षा बोंगा जड .. असे त्यांचे कधी-कुठे दिसते ? .. ..

*

म्हणून तर विहरतात मुक्तपणे .. घालत नाहीत स्वतःच्याच पायात बेड्या

ना कुणाशी स्पर्धा ना हेवेदावे .. ना आवाक्याबाहेरच्या आकांक्षा वेड्या .. ..

*

.. .. .. स्वरचित चक्रव्यूहातून बाहेर पड ..  प्रयत्न तरी कर ना  रे माणसा

 शीक जरा पाखरांकडून .. तो मुक्त आनंद असतो तरी कसा .. ..

*

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

☆ क्षण सृजनाचा ☆ “माझ्या पाऊसराजा…” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या पाऊस राजा र किती सांडशी सांडशी

*

तुझे येण्यान दारी र पोरं बाळ रे नाचती

म्हणे माय पाऊस आला येतील जोंधळे शेताला

राजा खाईल कडबा गाई म्हशीला र चारा

सारी नक्षत्र सांडली नाही थांबण्याचं नाव

तुझ्या पाण्याने रे नेला माझा संसार वाहून

उभ पीक झालं आडवं मोडलं घराचं कवाड

लेकर बाळ बखोटीला जीवधावे आसऱ्याला

अन्न पोटाला ते नाही अन कपडा भिजलेला

काय बाप्पारे जाहल आम्हा बखोटीला धरलं

लेकरा बाळा दूध नाही म्हाताऱ्यांना हीव भरलं

साऱ्या जगाचा पोशिंदा मागे भाकर भाकर

चार जूने रे कपडे द्यावा हात्रुन पांघरून

काय वेळ तू आणली पोरं सैरभैर झाली

तुझ्या थोड्याशा पाण्यात धुत होतेमी चिरगुट

त्यासी जोडून शिवून होई चिंध्याच वाकळ

त्या वाकळाची उब देई थंडीला आधार

माझी चूल अन बोळकी तुझ्या पुरात वाहिली

माझ्या माहेराची मस गेली पुरात वाहून

चार बकऱ्या ही वाहिल्या आता काही नाही राहिल्या

ते मुक जनावर मेल चिखलात रुतून

उभ्या जन्मात कधी र नाही आलास धावून

पाणी शोधायला जायचं कोसन कोसन

नाही बरं केलं देवा आम्हा गाठलं गाफील

आता कसा पूजावारे तुझा देव्हारा भक्तिन

माय अंबे ये धावून नाही कोणी तुझ्या वाचून

आता आवरा पावसा वाट घराची तू धर

माय बापांनो व्हा पुढे द्या थोडासा रे हात

हा बळीराजा रे देईल तुम्हा जिंदगीभर साथ

शीला पतकी सोलापूर 8805850279

 

ही कविता म्हणजे काव्य नव्हे यमकाची जोडाजोडी नाही आशय घन ही नाही… फक्त परिस्थिती आणि भावना .. ही लिहिताना काही ओळींवर मला हुंदका आवरत नव्हता.. डोळ्यात पाणी येत होतं.. अक्षर दिसत नव्हती ..काल रात्री एक फोन आला बाई आपली एक विद्यार्थिनी तिचे कुटुंब तिचे गाव वाले पुरात अडकलेत . .जुने कपडे पांघरून अंथरुण काही मदत गोळा करून द्याल का… आणि रात्री कितीतरी वेळ झोपच आली नाही वाटलं ही आपली कित्येक माणस धास्ती न जागीच आहेत अंगावर वाळलेला कपडाही नाही रात्री वाढलेल्या पावसाच्या आवाजाने बेचैन व्हायला होत होतं ही कविता फक्त भावना आहेत त्या समजून घ्या आणि वाटलं तर मदत करा….!

*

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares