सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ विसर्जन (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
पुण्यातला सुप्रसिद्ध बाजीराव रोड … त्या रस्त्यावर असणारा तितकाच प्रसिद्ध शनिपार चौक.. चहूबाजूंनी सदैव गजबजलेला.. जीवनावश्यक सर्व चीजा सहजपणे उपलब्ध करून देणारे, या चौकात एकत्र येणारे चारही रस्ते… या चौकाच्या.. या बाजीराव रस्त्याच्या अगदी लागून असलेल्या ठिकाणी मी जन्मापासून पुढे ४६-४७ वर्षं राहिलेली आहे. आणि म्हणूनच या चौकाच्या चौफेर असणारे चार महत्वाचे गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीची मोठ्या उत्साहात वाजत गाजत जाणारी विसर्जन मिरवणूक म्हणजे माझ्या आयुष्याचा जणू एक अविर्भाज्य भागच…. उत्साह आणि आनंदाची …गणेशाच्या मंगलमय नेत्रसुखद दर्शनाची लयलूट करणाऱ्या या सगळ्या गोष्टी… जाण्याआधीच पुढच्या वर्षीच्या आगमनाची वाट पाहायला भाग पाडणारा हा उत्सव….
….. हो.. आठवतंय तेव्हापासून गेल्या काही वर्षांपर्यंत असंच तर होतं सगळं. फुले मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरु व्हायची. आणि त्यासाठी पुण्यातली सगळी सार्वजनिक मंडळे रांग लावून सज्ज असायची.
ढोल ताशे – त्याबरोबर शिस्तीने तालबद्ध.. लयबद्ध नाचत जाणारे त्या त्या मंडळाचे कार्यकर्ते – शांततेने.. स्वयंशिस्त पाळणारे बघे लोक…… आणि वेळेत सुरु होऊन वेळेत संपणारी प्रेक्षणीय मिरवणूक……
….. काही वर्षांनी कालानुरूप हे चित्र हळूहळू बदलत चालल्याचे कुठेतरी जाणवत होते हे नक्की.. शहराची लोकसंख्या सतत वाढत होती.. गणपती पहात हिंडण्याची वेळही वाढत होती. सजावटीचे नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत होते.. तरीही त्यावेळचं एकूणच सामाजिक वातावरण सुसह्य होत होतं…….. पण आता गेल्या काही वर्षांपासून मात्र, प्रसन्नता.. मनापासूनचा भक्तिभाव.. आणि मनात साठवून ठेवावा असा आनंद देणाऱ्या या उत्सवाचे.. विशेषतः विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप पूर्णपणे पालटल्याचे स्पष्टपणे अगदी दरवर्षी जाणवते आहे. डीजे.. त्यावर वाजणारी कानठळ्या बसवणारी कर्कश्श गाणी.. त्यावर बेधुंद होऊन विचित्र अंगविक्षेप करत भान हरपून नाचणारी तरुणाई … पाहतांना चक्कर यावी अशी विद्युत रोषणाई …. सगळे सगळे अगदी असह्य करणारे होत चालले होते.. नव्हे.. झालेच होते.
.. भर रस्त्यावर असणाऱ्या माझ्या घराच्या गॅलरीत एका वर्षी रात्री त्या मिरवणुकीसाठी चाललेला अनागोंदी गोंधळ बघत अगदी सुन्न होऊन उभी होते.. कारण घरात झोप लागणं केवळ अशक्य होतं. जिकडे तिकडे सगळा नुसता धुमाकूळ.. रस्ता दिसतच नव्हता.. दिसत होती फक्त डोकी.. आणि डोकी… आणि फक्त कलकलाट.. हा शब्दही खरं टोकदाच होता त्या डोकं बधीर करणाऱ्या गोंगाटासाठी. रस्त्याच्या कडेने दाटीवाटीने उभे असलेले खाद्यपदार्थांचे अगणित स्टॉल्स आणि त्याच्या कढयांवर मुद्दाम आपटल्या जाणाऱ्या झाऱ्यांचे जणू डोक्यात घाव घातल्यासारखे घणघणाट …. चणे-फुटाणे, कर्कश्श पिपाण्या, फुगे, आणि काय काय विकणाऱ्यांच्या गर्दीला मारलेल्या हाका….. किती आणि काय काय सांगावं …
….. मिरवणुकीसाठी नंबर लावून उभ्या असलेल्या एका ट्रकवर ठेवलेल्या गणपतीकडे मध्येच माझं लक्ष गेलं.. त्याच्याकडे पहात असतांना अचानक त्या विघ्नहर्त्या गणेशाचाच चेहेरा अगदी केविलवाणा.. रडवेला.. वैतागलेला दिसत असल्याचा मला भास व्हायला लागला…….. आणि मनात नकळत शब्द उमटू लागले……
नाद रंग अन उत्साहाचा उत्सव चाले चोहीकडे
परि या जल्लोषात हरवली उत्सवमूर्ती कुणीकडे ….
*
दहा दिवस त्या मांडवात बांधून घातले त्यालागी
आज पहा किती बरे वाटले.. घरी जाण्याची घाई उगी….
*
रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले
सहनशील हा गजानन परी, आसन ना त्याचे ढळले ….
*
सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला
वाजतगाजत सगळे जमले उधाण आले उत्साहाला ….
*
मोटारीवर मुकाट बसुनी गणपती सारे पहात होता
जाणवले त्यालाही होते, गर्दीतच तो चुकला होता ….
*
लेझीम ढोल नि टिपरीचा तो तालच गर्दीमध्ये हरवला
धांगडधिंगा किती चालला विसरलेच त्या गजाननाला ….
*
“ छंदच नीत मज सकल जनांना चकवत असतो नशीबरूपे
म्हणे आज मी स्वतःच चुकलो – चकविती ही माझीच रुपे ….
*
विचार करता करता थकुनी गजाननाचा लगे डोळा
दचके जेव्हा जागे होता.. दिसे तळपता सुवर्णगोळा ….
*
जाण्याचा की दिन पालटला, कसल्या भक्तांशी ही गाठ
जातो जातो म्हणतो तरीही सोडती ना ते त्याची वाट ….
*
आज विनवतो हा भक्तांना.. मायबाप जाऊ दे की मजला
दहा दिवस राहिलो ना गुपचुप.. नका धरू आता वेठीला ….
*
पुढच्या साली नक्की येईन.. म्हणे एक परि शर्त असे
नकोत लैला नकोत मजनू, सनई चौघडा पुरे असे ….
*
बिभत्स वर्तन कुठे नसावे.. मंगल वातावरण हवे
माझ्या नावे सर्वार्थाने जनजाग्रण व्हायाचि हवे ….
*
…. गजाननाचेही मन हाले या भक्तांचा निरोप घेता
जलमार्गे जाताजाता.. त्या पाण्यावर हलती लाटा ….
*
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈