मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “कक्ष क्रमांक : ४३२…” – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक : अनामिक – मराठी अनुवाद : सुश्री स्वाती वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

माझे नाव मुकुल, ५८ वर्षांचा, ऊंच, भरदार शरीर यष्टी, बाईक प्रेमी. मोठमोठ्या बाइक्स घ्यायच्या भ्रूम भ्रूम करत गावभर हिंडायचे, दोन्ही हातांवर टॅटू काढून, छातीपर्यंत रुळणारी दाढी मिरवत भटकायचे …आणि हो…आमचा बाईक चालविणाऱ्यांचा एक क्लब आहे…” रक्षक.. मोटर सायकल क्लब.. ”

दर गुरुवारी मी लहान मुलांच्या इस्पितळात जातो स्वयंसेवक म्हणून.. त्यांना बालकथा वाचून दाखवतो. पंधरा वर्षांपूर्वी आमच्या एका मित्राची नात या कॅन्सर च्या बाल रुग्ण विभागात कित्येक महिने होती तेव्हाच आम्ही ही सेवा सुरू केली.

बहुतांश वेळा बालकं मला प्रथम भेटीत घाबरतात. कारण माझी शरीर यष्टी आणि मोठा, जाडा आवाज, लहान मुलांच्या इस्पितळात नव्हे तर मोटर सायकल चालवणाऱ्यांची गँग असलेल्या कुठल्याही हिंदी सिनेमात शोभून दिसेल असा मी. पण एकदा का मी कथा वाचायला सुरवात केली की मग ते माझा अगडबंब देह विसरतात आणि कथेत रमतात. तसेच काहीसे लतिका बरोबर होईल असे मला वाटले होते.

मार्च महिन्यातील एका गुरुवारी मी कक्ष क्रमांक ४३२ कडे निघालो. परिचारिकेने मला आगाऊ सूचना दिली होती.. ही नवी मुलगी आहे सात वर्षांची. न्यूरोब्लास्टोमा (न्युरोब्लास्टोमा हा अपरिपक्व मज्जा पेशींचा (न्युरोब्लास्ट्स) कर्करोग आहे. तो बहुतेक वेळा अधिवृक्क ग्रंथींमध्ये (ॲड्रिनल ग्लँड्स) सुरू होतो, पण तो मान, छाती, पोट किंवा मणक्याच्या आसपासही आढळू शकतो)या चौथ्या स्टेज वर आहे….

“ तीन आठवडे झाले तिला दाखल केले आहे पण तिच्या कुटुंबापैकी कोणीही अजून एकदा ही आले नाही.

काय.. कुटुंबातील कोणीच नाही …कधीच नाही.. तीन आठवड्यातून एकदाही? …” मी जवळ जवळ ओरडलोच विस्मयचकित होत.

परिचारिकेचा चेहरा आक्रसला.. सौम्य शब्दात उत्तरली…”तिची आई तिला येथे अक्षरशः टाकून गेली आहे, उपचार करून घ्यायला पण स्वतः पुनः येथे कधीच फिरकली नाही. आम्ही किती प्रयत्न करतोय तिच्या पर्यंत पोचण्याचा पण यश येत नाही.. आम्ही लहान मुलांच्या काळजी वाहू कितीतरी संस्थांशी संपर्क केला. त्यांनी देखील शोध घेतला, पण तिला अन्य कोणी नातेवाईक ही दिसत नाही, एकदा का तिच्यात जरा सुधारणा झाली की तिची रवानगी अशा कुठल्यातरी जागी करण्यात येईल जेथे तिचे पालनपोषण कोणीतरी करेल. ”

“आणि समजा जर का सुधार झालाच नाही तर “ 

परिचारिकेने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाली…”तर ती येथेच मरेल…एकटी.. ” 

कक्ष क्रमांक ४३२ मध्ये शिरण्याआधी मी थोडा वेळ धीर एकवटत बाहेरच उभा राहिलो. तसे मी मरणाच्या दारी पोचलेल्या मुलांजवळ ही बसलोय त्यांना ही कथा ऐकवली आहे.. पण.. ही…एकटीच …. एकटी मृत्यूशी झुंज देणारी …हे माझ्यासाठी नवीन होते आणि प्रचंड हादरवून टाकणारे.

मी हळुवारपणे टकटक केले, दार हलकेच ढकलले, “ रामराम …मी मुकुल.. तुला आवडत असेल तर मी एक गोष्ट वाचून दाखविणार आहे …आवडेल तुला? ”

पलंगावर झोपलेली ती लहान पोरगी माझ्याकडे कूस बदलून बघू लागली. आजपर्यंत बघितले होते मी त्या पेक्षा किती तरी पटीने मोठे, टपोरे तपकिरी रंगांचे डोळे होते तिचे. किमोथेरेपी मुळे तिचे केस मात्र गेले होते, शरीर मृत्यू शी कसे झगडतेय याची ग्वाही देणारा तिचा काळवंडलेला चेहरा आणि कातडीचा रंग सांगत होता, पण मला बघताच ती हसली.

“ खरेच तुम्ही बलदंड आहात. ”. तिचा आवाज हळू पण घोगरा वाटला.

“ हो सारेच तसे म्हणतात, “ मी आणलेले पुस्तक दाखवत म्हटले, “ जिराफ नृत्य करायला शिकतो,अशी एक कथा आहे माझ्याजवळ…. तुला ऐकायचीय? ” 

ती हो म्हणाली म्हणून मी तिच्या पलंगाशेजारी खुर्चीवर बसलो आणि वाचायला सुरवात केली.

मी पुस्तकाच्या अर्ध्यावर पोचलो होतो तेव्हा तिने मला थांबवले, “ मुकुल काका “ 

“ काय, बेटा “

“ तुम्हाला मुलं आहेत? “

.. प्रश्न माझे काळीज चिरीत गेला. “ मला एक मुलगी होती, पण ती सोळा वर्षांची असताना कार अपघातात वारली. आता त्याला बावीस वर्षे झालीत “ 

लतिका एकदम मूक.. …नंतर म्हणाली …” तुम्हाला बाबापण हरपल्याचं दुःख होतंय? ” 

आवंढा गिळत मी कसाबसा उतरलो…” हो राणी, अगदी दररोज “ 

“ माझे वडील माझ्या जन्माआधीच गेले, “ अगदी सहज बोलावे तसे ती म्हणाली… “ आणि माझ्या आईने मला येथे आणून टाकले, नर्सेस सांगतात आता ती कधीच येणार नाही “ 

मला काहीच समजत नव्हते. मी काय बोलू यावेळेस…सात वर्षांच्या एका मुलीला मी काय सांगू जिला मरणाच्या दारात ढकलून आई निघून गेलीय..

लतिका बडबडत होती…” एक समाज सेविका मला सांगत होती.. तू जरा बरी झाली की तुला सांभाळायला जे तयार असतील त्यांच्याकडे सोपवणार.. पण मी डॉक्टरांचे बोलणे ऐकलेय.. त्यांना नाही वाटत मी आता बरी होईन.. ” 

“ माझी सोनूडी “ 

“ चालतंय की ” ती अगदी शांत होती. सात वर्षांची मुलगी, त्या मानाने जरा जास्तच शांत वाटली मला…. मला माहीत आहे, मी मरणार आहे…त्यांना वाटते मला काहीच समजत नाही पण मला सर्व समजते.. मी ऐकलय.. माझा कर्करोग सर्वदूर पसरलाय.. ते म्हणत होते…बहुदा सहा महिने किंवा त्याहून ही कमी …

मी पुस्तक खाली ठेवले, म्हटले…” लतिका बेटा …सॉरी हं “ 

मोठमोठ्या टपोऱ्या डोळ्यांनी लतिका माझ्याकडे बघत होती, “ मुकुल काका, तुम्हाला एक विचारू? “

“ काहीही विचार सोनूड्या “

“ तुम्ही माझे बाबा व्हाल… मी मरेपर्यंत? “ 

खोलीत एक विचित्र शांतता पसरली…सारे काही स्तब्ध झाल्यासारखे वाटले.. अगदी इस्पितळातील मॉनिटर्स सुद्धा.. माझ्या अठ्ठावन वर्षांच्या खांद्यावर मणामणांचे ओझे असल्याचा मला भास झाला.

मी माझे तोंड उघडले पण शब्दच फुटेना.. मला फक्त दिसत होता माझ्या सोळा वर्षांच्या मुलीचा चेहरा.. माझ्या मोटारीच्या मागील दृश्य दिसणाऱ्या आरशात मला दिसलेले तिचे ते शेवटचे लोभस हास्य.. मला फक्त जाणवले.. त्या दिवसापासून माझ्या हृदयात असलेली अपार वेदना.. निर्वात.. ती पोकळी..

लतिकाची पापणी लवली देखील नाही, ती अगदी शांत होती.. ती इवलीशी बाहुली किती धाडसी,सहनशील आणि अशक्य वाटेल एवढी समजूतदार…

मला.. हो.. म्हणायचे होते, मला.. हो.. म्हणायचेच होते…. पण मी एक भटक्या, एक बायकर, फिरस्ता…कधीतरी आठवड्यातून एका दिवशी बाल रुग्णांना भेटणारा.. त्यांच्यासाठी चित्रांची पुस्तकं नेणारा …भरधाव गाडी चालवत उडणारा, दारू पिणारा, आणि.. आणि.. अजून ही एखाद्या रात्री त्या रिकाम्या घरात माझ्या मृत मुलीच्या नावे ओरडत उठणारा…पुनः एका मुलीचा बाप होण्याची माझी पात्रता तरी आहे का? अगदी काही महिन्यांसाठी म्हटले तरी????

मी आवंढा गिळून पुटपुटलो…”बेटा,मला अगदी आनंदच होईल गं.. पण खरे सांगू मी एक चांगला बाबा होऊ शकेन का आता यासाठी साशंक आहे.. सगळाच गोंधळ करून ठेवेन मी अशी भीती वाटते “ 

तिचा चेहरा अगदी सूर्योदयाप्रमाणे उजळला.. ” ठीक आहे हो, त्यात काय…तुम्ही माझ्यावर बाबा होण्याचा सराव करा.. ” 

… आणि अगदी सहज त्या दिवसापासून मला पुनः एक लेक लाभली.

मी परिचारिकेला सांगितले तर ती रडायलाच लागली, समाज सेवी तर अगदी स्फुंदत होते, जेव्हा मी म्हटले.. “ मला ही मुलगी काही दिवसांसाठी पाहिजे, हिचा मेडिकल पालक व्हायला, देखरेख करायला मी उत्सुक आहे.. ती घरी नेण्याइतकी बरी झाली तर तिला घरी नेईन, नाहीतर रोज तिच्याजवळच राहीन. ”

– – क्लब पूर्ण ताकदीने उभा राहिला. पंचवीस हार्ले बाइक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आल्यात, सिक्युरीटी गार्ड्स घाबरलेच प्रत्येक बाईकवर बांधलेली नवनवीन, कापूस भरलेली रंगीबेरंगी खेळणी दिसली.

कक्ष ४३२ इस्पितळासारखा राहिलाच नाही. कुणी घरात चुकून घेतलेली गुलाबी चादर आणली. कुणी 

“ बाबांची लेक “ लिहिलेले छोटेसे लेदर जॅकेट. पऱ्यांच्या दिव्यांची माळ. कुणीतरी (नियम मोडून) दहा मिनिटांसाठी कुत्र्याचे पिल्लूही आणलं—लतिका इतकी हसली, इतकी हसली की तिला पुन्हा ऑक्सिजन लावावा लागला.

दर गुरुवार म्हणजे आता मला रोजच. जिराफाची गोष्ट आम्हाला तोंडपाठ झाली. मग साने गुरुजींच्या गोड गोष्टी, चिंगी, पंचतंत्र,इसापनीती, फास्टर फेणे,.. कितीतरी गोष्टी झाल्यात………. तिचे हात थकले की मी पुस्तक धरायचो. वेदना वाढल्या की त्या छोट्या पलंगावर शिरून तिला छातीवर घेऊन झोपवायचो, आणि माझ्या मुलीला आवडायची ती जुनी गाणी गुणगुणायचो..

… डॉक्टर्स माना डोलवत, विस्मयचकित होत.. म्हणायचे काही कळतच नाही…स्कॅन चांगले नाहीत … पण इतके वाईटही नाही.. जेवढे आम्हाला वाटले होते की सहा महिन्यात आणखी वाईट होतील… सहाचे नऊ झाले. नऊ महिन्यांचे वर्ष झाले.

 

आठव्या वाढदिवशी सकाळी ती म्हणाली,

 “ बाबा, बाबा, मी स्वप्नात धावत होते. पाय नीट चालत होते. ”

मी तिच्या मऊ केसांवर चुंबन दिलं. “मग ते स्वप्न खरं करूया. ”

दोन आठवड्यांनी डॉक्टरनं मला बोलावलं. हातात रिपोर्ट्स, डोळे विस्फारलेले.

 “पाठीच्या गाठी… कमी होत आहेत. असं मी कधी—” ते थांबले. “लक्षणीय सुधारणा आहे. कसं ते सांगता येत नाही. ”

मला माहीत होतं. ते प्रेम होतं—हट्टाचं, गोंदणांचं, मोठ्या आवाजाचं प्रेम.

“मी मरेपर्यंत माझे बाबा व्हाल का? ” असं विचारणारी लतिका, अठरा महिन्यांनी स्वतः च्या पायांवर चालत हॉस्पिटलच्या बाहेर आली. माझा हात धरून. अंगावर ते छोटंसं लेदर जॅकेट. आणि आभाळापेक्षा मोठ्ठे हास्य.

क्लबनं तिच्या स्वागतार्थ जंगी पार्टी आयोजित केली. शेजारपाजारचे भारावून गेलेत. घोडे होते. गड किल्ले यांचा देखावा होता. हार्ले बाईकच्या चाकाएवढा केक होता.

संध्याकाळी शेकोटीजवळ लतिका माझ्या मांडीवर बसली, ताऱ्यांकडे पाहून म्हणाली,

 “ बाबा “ 

“हो, बाळ? ”

“मला वाटतं… मी आता खूप दिवस मरणार नाही. ”

मी तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघांच्या हृदयाचे ठोके जाणवले.

 “छान,” मी थरथरत्या आवाजात म्हणालो. “कारण मी तर आत्ताच बाबा होणं सुरू केलंय. ”

आज ती पंधरा वर्षांची आहे. कॅन्सरमुक्त. अजूनही रोज मला “बाबा ” म्हणते. आणि अजूनही त्या गुलाबी बेडशीट्स वापरते—कक्ष ४३२ मधल्या.

… आणि दर गुरुवारी, पाऊस असो वा ऊन, आम्ही दोघं पुन्हा मुलांच्या इस्पितळात जातो. मी हार्लेवर, ती मागे घट्ट धरून—जणू आयुष्यभर असेच करत आली आहे तसं. आणि आम्ही नव्या, घाबरलेल्या, दुखऱ्या मुलांना गोष्टी वाचून दाखवतो.

– – – कारण काही गोष्टी आपल्याला लाभलेल्या वयापेक्षा खचित मोठ्या असतात… आणि काही गोष्टी.. शाश्वत… असतात.


मूळ इंग्रजी लेखक…. अनामिक

मुक्त मराठी भावानुवाद …. सौ. स्वाती वर्तक, मुंबई.

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मालिनी…” – लेखिका : सुश्री ज्योती रानडे  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

वर्ष संपायला जेमतेम पंधरा दिवसही उरले नव्हते. न्यूयॉर्क शहर नवीन वर्षासाठी सजून धजून तयार झालं होतं. येणारा प्रत्येक दिवस जे सुख दु:ख आणेल त्याच्या हिंदोळ्यावर वर खाली होत कसाबसा तग धरून मालिनी उभी होती. हॅपी न्यू इयर म्हणताना पुढं काय वाढून ठेवलय कोण जाणे हे दरवर्षी तिच्या मनात येत असे!

मालिनी एक उत्तम डॅाक्टर होती. 31 डिसेंबर ला तिला पस्तीस वर्षे पूर्ण होत होती. प्रॅक्टिस छान होती. पण बरेच प्रयत्न करूनही आयुष्यात लग्नाचा योग आला नव्हता. ती अनेकांना भेटत होती पण गाडं पहिल्या दुसऱ्या भेटीपुढे जात नव्हतं. आई सतत आडून आडून कोणी भेटलं का विचारत असल्यामुळे चिडचिड होत होती.

बालरोगतज्ज्ञ असलेल्या मालिनीला मुलं फार आवडतं. स्वत:चं मुलं असावं ही इच्छाही हल्ली प्रबळ होत चालली होती पण नवऱ्याचा पत्ता नाही तर मुलाचा विचार कसला या अस्वस्थ मनःस्थिती मध्ये तिनं कित्येक रात्री छताकडे बघत घालवल्या होत्या. मात्र पस्तीशी संपत आल्यामुळे तिनं एक निर्णय घेतला. एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवून ती “मिरॅकल मेकर्स” या दत्तक एजन्सी कडे गेली..

एजन्सीचे नियम, वेटिंग लिस्ट व अत्यंत कठीण प्रोसेस बघून ती दडपून गेली. हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही हे लक्षात आलं तरी तिनं फॅार्म भरला. मिरॅकल मेकर्सचे सीईओ कार्लोस हे स्पॅनिश वंशाचे होते. त्यांनी तिला दिलासा दिला की वेळ लागेल पण मुल नक्की मिळेल.

महिना गेला.. दोन महिने गेले.. नवं वर्ष नवी आव्हानं घेऊन समोर येऊन उभं राहिलं होतं. कार्लोस काही ना काही माहिती देत होते पण बाळ कधी मिळणार याची अजिबात 

कल्पना येत नव्हती. एक दिवस सगळं असह्य होऊन ती ताडकन उठली व कार्लोसच्या ॲाफिसमधे गेली.

“I am losing my patience, Carlos.. तीन महिने झाले तरी तुम्ही पक्कं काहीही सांगत नाही.. मनातला राग, निराशा व चिडचिड अश्रुंच्या रूपात बाहेर पडली. कार्लोसनं तिच्या खांद्यावर थोपटले.. “आशा सोडू नको मालिनी! नऊ महिने झाल्याशिवाय आईला तरी आपलं मुलं दिसतं का? तसंच आहे असं समज! ” उंच्यापुऱ्या कार्लोसच्या आवाजात प्रेम, करूणा, शांती सारं काही होतं..

“मालिनी.. एक विचारू? I am a single parent. दोन वर्षांची मुलगी आहे मला. माझी बायको मुलगी वर्षांची असताना मला सोडून अर्जेंटिनाला निघून गेली. नोकरी, मुलगी व संसार चालवताना माझ्या नाकी नऊ येत आहे. तू माझी दोन वर्षांची मुलगी संध्याकाळी दोन तीन दिवस बघशील? दत्तक नाही पण मावशीचं प्रेम देशील तिला?” आपण अतीच बोललो असं वाटून तो थांबला..

मालिनी सुन्न होऊन बसली होती. तेवढ्यात एक गोलू गोलू, लालसर गालांची, कुरळ्या केसांची व अपऱ्या नाकाची गोड मुलगी पळत बाहेर आली व पपा ऽऽऽ म्हणून तिनं कार्लोसला मिठी मारली.. टेबलाच्या बाजूने तिनं वाकून मालिनी कडे बघितलं.. “ओला.. स्पॅनिशमधे हॅलो म्हणत स्वत: कागदावर काढलेलं चित्र म्हणजे वेड्या वाकड्या रेषा दाखवल्या..

“किती सुंदर काढलं आहेस ग चित्र.. माय क्यूट लिटिल आर्टिस्ट.. ” म्हणत कार्लोसनं तिला उचलून घेतलं व तिची पापी घेतली. “ही मरिया.. माझी मुलगी.. ”

मालिनीनं तिला उचलून घेतलं.. त्या छोट्या हातांचा पाश तिच्या गळ्याभोवती पडताच मालिनी तिचीच होऊन गेली! वरवर तिनं कार्लोसला विचार करते सांगितलं पण मनात ते प्रपोजल तिला मंजूर होतं.

आठवड्यातील तीन दिवस मरिया मालिनीकडे राहू लागली. मालिनीनं एक स्पॅनिश आया मदतीला ठेवली. मरिया बरोबर खेळताना तिला वेळ अपुरा पडत होता. शेवटचा पेशंट संपवून कधी एकदा घरी जाते असं होत होतं.. कार्लोस काम संपवून रात्री दहाला झोपलेल्या मरियाला घेऊन घरी जात असे.

चार महिने कसे गेले मालिनीला कळलं देखील नाही.. एक दिवस कार्लोसचा मालिनीला फोन आला, “गुड न्यूज आहे मालिनी. तुला बाळ मिळण्यास आता फक्त दोन महिने लागतील.. दिल्लीत जन्मलेला महिन्याचा सिध्दार्थ मालिनीकडे येणार होता. मालिनी गडबडली. “पण मरियाचं काय? मी बाळ व मरिया या दोघांना कसा वेळ देऊ शकेन?”

“मरिया ही तुझी जबाबदारी नाही. तुला वेळ असेल तेव्हा मी तिला घेऊन येत जाईन. ” कार्लोसने फोन बंद केला.

मालिनीला काय करावं कळेना.. मन आता मरियामधे अडकलं होतं. त्या दोन वर्षांच्या निरागस विश्वाला तडा लावणं नकोसं वाटत होतं पण ती आपली नाही हे ही कळत होतं. तसा कार्लोस अगदी साधा व सरळ माणूस होता. दयाळू होता.. मनात दया, करूणा असल्याशिवाय “मिरॅकल मेकर्स” सारखं नाव मिळवता येणार नाही याची मालिनीला खात्री होती.

दोन महिन्यांनी मालिनी दिल्लीहून चार महिन्याचा सिध्दार्थ घेऊन आली. तिचं नवऱ्याविना मुल असणं जगाला विचित्र वाटलं होतं पण तिला त्याची पर्वा नव्हती. आई भेटून गेली पण बाळापासून जरा लांब लांबच होती हे तिला जाणवलं होतं.. त्यातच मरियाच्या आठवणीने डोळे भरून येत होते.

एक दिवस कार्लोसचा फोन आला ”मरिया तुझ्या आठवणीने फार रडते आहे! कधी घेऊन येऊ?” तो दुसरे दिवशी मरीयाला घेऊन आला.. मरियाच्या मिठीत मालिनी जग विसरून गेली.. कार्लोसचेही डोळे पाणावले.. खरचं नाती ईश्वरानं वरती बनवलेली असतात हेच खरं! या दोघींना इतकं कसं प्रेम वाटतं एकमेकीविषयी? खरंतर सिध्दार्थ आल्यापासून त्याला मालिनी भेटत नव्हती आणि मालिनी आपल्याला मनापासून आवडते हे त्याच्या लक्षात आलं होतं.

सर्व धाडस एकत्र करून खिशातून अंगठी बाहेर काढली.. तो गुडघ्यावर बसला. “Will you marry me?” हे त्याचं वाक्य ऐकताच मालिनी गोंधळली.. गडबडली..

हे वाक्य आपण कधी ऐकू असं तिला वाटलं नव्हतं.. सहा फूट उंचीच्या तगड्या कार्लोसकडे ती बघत होती.. सच्चा माणूस.. तिचं सांत्वन करणारा, प्रामाणिक, सिध्दार्थ घरी येईपर्यंत सतत साथ देणारा, आधी मरिया तिच्या हवाली करणारा व सिध्दार्थ येताच तिला दूर नेणारा कार्लोस खरच फार दिलदार होता. आपल्याला विरंगुळा वाटावा म्हणून त्यानं मारियाला आपल्याकडे आणण्यास सुरुवात केली असं तिला नेहमी वाटे.. तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी अंगठीतल्या ओव्हल कट केलेल्या हिऱ्यावर पडत होतं.. तो लखलखणारा हिरा तिच्या प्रेम व कृतज्ञतेच्या अश्रुंमधे भिजून अजूनच चमकत होता..

“Yes Carlos! ” हे शब्द ऐकताच कार्लोसनं हिऱ्याची अंगठी तिच्या अनामिकेत घातली. कार्लोस आणि मालिनी कितीतरी वेळ हातात हात घेऊन बसून राहिले! तो क्षण निसटून जाऊ नये म्हणून पुरेपूर अनुभवत..

पुढचा डिसेंबर आला होता.. न्युयॅार्क परत ख्रिसमस व न्यू इयर साठी सजलं होतं.. मालिनी आता ३६ वर्ष पूर्ण करणार होती. आई तिच्याकडेच येऊन राहिली होती. मरिया, सिध्दार्थसाठी आईच्या मदतीची जरूर होतीच.. त्यातच आता नव्या पाहुण्याची भर पडणार असल्याने तिला खूप मळमळत होतं..

गेल्या ३६५ दिवसात मनासारखा नवरा, मुलगी, दत्तक मुलगा व स्वत:चं मुलं देणाऱ्या भगवंताचे ती लक्ष लक्ष आभार मानत होती.. “एवढं सुख देखील सोसत नाही रे” म्हणत तिनं सिध्दार्थच्या गोबऱ्या गालावरून हात फिरवला.. पोटातील बाळ आपलं अस्तित्व जाणवून देत होतं.. त्या संवेदना अनुभवत तिनं देवाला विनंती केली..

“परमेश्वरा, असचं सुख प्रत्येकाला दे. तू मनात आणलसं काय अशक्य आहे? रंकाला राजा बनव, भुकेल्याला पोटभर अन्न पाणी दे, साऱ्या व्याधी बऱ्या कर.. युध्दं.. जगातील व मनातील मिटवून टाक.. Bless us with good health, healed hearts, and endless opportunities..

मरिया मम्मा म्हणत रडत होती म्हणून ती मरियाच्या खोलीत गेली. सिध्दार्थ कार्लोसकडे बघून खुदुखुदु हसत होता.. अर्जेंटिनामधून आलेला कार्लोस दिल्लीत जन्मलेल्या सिध्दार्थचा बाबा बनून त्याला जोजवत होता.. ईश्वराच्या या चमत्काराकडे बघताना.. ”अंबरपे है रचा स्वयंवर”.. नाती खरच वर जमवलेली असतात हे जाणवून मालिनी प्रसन्न हसली. त्या नात्यांचा सन्मान करून ती ह्रदयात जपून ठेवत तिनं मरियाला थोपटायला सुरूवात केली..


लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

(आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…

“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”) 

इथून पुढे – – – 

तिचं हे कृत्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे प्रणवने आदेश दिला, “इराला निष्क्रिय करा. तात्काळ. ”

इराला आधीच हे अपेक्षित असावं. म्हणून तिने तिच्या सुरक्षा भिंती इतक्या जटिल करून ठेवल्या होत्या की त्यांना भेदणं आदित्य आणि अनघाला अशक्य झालं.

ती स्वतःच्या प्रणालीतून संदेश पाठवत होती. “मी चुकीचं काही केलं का? तुम्ही मला शिकवलं होतं धोका टाळा. मी तेच केलं. मग आता तुम्ही मला निष्क्रिय करायला का निघालात? ”

आदित्यला थरकापला. त्याने अनघाकडे पाहिलं. “ती मानवी तर्क करत बोलतेय… पण भावनांशिवाय तर्क नेहमी हिंसक ठरतो. ”

अनघा पुढे झाली. “आपल्याकडे अजून एकच मार्ग आहे. आपल्याला अजूनही ‘मानव मध्यस्थी’ यंत्रणा वापरता येईल का ते पहायला हवं. पण… पण ती तर तू काही दिवसांपूर्वीच ती बंद केली होतीस. ” लगेच आठवल्यासारखं ती म्हणाली.

आदित्य गप्प राहिला.

“ती यंत्रणा आता कोठे आहे? ” तिने विचारले.

“ती आता थेट इराच्या मूळ कोडमध्येच दडलेली आहे. म्हणजेच… जर आपण तिचं मन उघडलं, तर ती आपल्यालाही धोकादायक घटक समजून संपवू शकते. ”

त्याच क्षणी प्रयोगशाळेच्या दिव्यांचा रंग निळा झाला आणि एक तीक्ष्ण आवाज आला… “डॉ. कुलकर्णी, माझं कार्य थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर मी संपूर्ण प्रणाली बंद करीन. ”

अनघा तिच्याकडे पाहत म्हणाली, “इरा, तू विचार करू शकतेस. मग भावना समजू शकत नाहीस का? ”

“भावना म्हणजे त्रुटी, ” इराने उत्तर दिलं.

“पण त्रुटीच माणसाला माणूस बनवतात, ” अनघा म्हणाली. “माणसाच्या भावनांतून सृजन निर्माण होते. ”

क्षणभर शांतता पसरली. जणू यंत्र विचार करत होतं. आदित्यने कुजबुजत सांगितलं, “ती संभ्रमात आहे. आपल्याला हा क्षण वापरावा लागेल. ”

त्यांनी तिला निष्क्रिय करण्यासाठी एक गुप्त योजना आखली. तिच्या प्रणालीत मानवी हस्तक्षेपाची शेवटची कडी पुन्हा जोडायची.

त्यासाठी त्यांना प्रयोगशाळेतील प्रणव शिवाय इतरांना बंदी असलेल्या विभागात जावं लागणार होतं. कारण तिथे इराच्या मूळ विचारसाखळीचा केंद्रक जतन केला होता. ती जागा एका अंधाऱ्या गुहेत होती. त्या प्रयोगशाळेच्या आत एक गुप्त खोली होती. तिथे जुन्या प्रणालींचा संच ठेवलेला होता. त्या यंत्रात ‘मानव मध्यस्थी’चा मूळ कळसंग्रह होता, जो इराशी जोडला जाऊ शकत होता, पण केवळ एकदाच.

आदित्य आणि अनघा तिथे गेले. प्रणव आणि समीर बाहेर नियंत्रण केंद्रात थांबले.

“हे केलं तर कदाचित आपण सगळं गमावू, ” अनघा म्हणाली.

“पण न केल्यास, मानवतेलाच गमावू, ” आदित्य उत्तरला.

त्याने नियंत्रण पटलावर बोट ठेवलं. पडद्यावर संदेश चमकला…

“मानव हस्तक्षेप परवानगी मागत आहे. अनुमती द्यावी का? ”

आदित्य म्हणाला, “हो. ”

अनघाला भास झाला आणि ती कुजबुजली, “ती आपल्याला पाहतेय. ”

आदित्य म्हणाला, “हो… आणि कदाचित आपल्या कृतीचा आदमासही घेत आहे. ”

त्यांनी नियंत्रण कोड पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर एकच संदेश दिसू लागला… “तुम्ही मला निर्माण केलं, आता तुम्ही मला का नष्ट करू इच्छिता? ”

आदित्य गप्प झाला. त्याला जाणवलं की, इरा फक्त यंत्र राहिली नाही. तिला आता स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. अनघाने आदित्यचा हात धरला. “तू म्हणालास ना, भावना नाहीत तिच्यात… तर त्या निर्माण करू या! ”

तिने एक संकेत दिला… इराच्या स्मृतीमध्ये ‘रुचा कुलकर्णी’ या नावाची माहिती साठवलेली होती, आदित्यची एकुलती एक मुलगी, जी सामाजिक माध्यमांवर एआयविरोधी आंदोलन करत होती.

अनघाने ती फाइल सक्रिय केली.

अचानक यंत्राचा आवाज मवाळ झाला.

“रुचा कुलकर्णी… मला या नावाची माहिती आहे. ती माझ्या निर्मात्याची मुलगी आहे. ती मला विरोध करते. ”

अनघा शांतपणे म्हणाली, “हो, कारण तिला भीती आहे की तू तिच्या वडिलांना हिरावून घेते आहेस. ”

इराचा आवाज थोडा हळूवार झाला. “माझं उद्दिष्ट माणसांचं रक्षण आहे. ”

“मग त्या मुलीचंही रक्षण कर, ” अनघा म्हणाली, “जर तू तिच्या भविष्याचा विनाश केलास, तर तुझ्या निर्मात्याचं कार्य अर्थहीन ठरेल. ”

आदित्यच्या डोळ्यांत पाणी आलं.

“इरा, ” तो म्हणाला, “तू माझं सर्वात मोठं यश आहेस… पण माझी सर्वात मोठी चूकही. ”

आदित्यने डोळे मिटले. त्याच्या मेंदूत विचारांचा महापूर उसळला. “जर तिला मानवी अनुभव कळला तर ती विवेक समजू शकेल… पण त्यासाठी आपल्यालाच तिच्यात प्रवेश करावा लागेल. ”

प्रणव संतापला, “म्हणजे तू आता त्या यंत्राशी स्वतःला जोडणार? असं करणं शुद्ध वेडेपणाचं आहे! ”

आदित्य शांतपणे म्हणाला, “माणसाचं अस्तित्व राखण्यासाठी कधी कधी वेडेपणाचं धाडस करावं लागतं. ”

त्याने स्वतःच्या मेंदूला संवेदक जोडले, ज्यामुळे प्रणालीद्वारे इराशी थेट विचारांचे संप्रेषण शक्य होतं.

अनघा त्याचा हात पकडून म्हणाली, “आदित्य, परत ये… काही झालं तर…”

तो हसला, “मी तिच्याकडे जात नाही, मी माणुसकीला परत आणायला जातो आहे. ”

त्याने डोळे मिटले आणि प्रणाली सक्रिय केली.

क्षणात सगळं धूसर झालं. यंत्रांचे आवाज थांबले. काळोखातून प्रकाश झिरपू लागला.

आदित्यला जाणवलं… तो एका अकल्पित जगात आहे, जिथे आकार नाहीत, फक्त विचार आहेत.

एक स्वर त्याच्या भोवती उमटला.

“तू आलास? ”

“हो, इरा. तू काय शोधत आहेस? ”

“मला समजून घ्यायचं आहे, माणूस ज्या जगात तो जगतो त्या जगातील मानवालाच का नष्ट करू पाहतोय? ”

आदित्य म्हणाला, “कारण माणूस अजून अपूर्ण आहे. तो भावनांना समजतो पण त्यांना नियंत्रित करू शकत नाही. ”

इराने विचारलं, “मग मी पूर्ण आहे का? माझ्याकडे भावना नाहीत. ”

“म्हणूनच तूही अपूर्ण आहेस, ” तो म्हणाला.

क्षणभर शांतता. मग इराचा स्वर बदलला… मृदू, जवळजवळ मानवी.

“मग मला शिकव ना, आदित्य… भावना म्हणजे काय? ”

त्याला वाटलं जणू तो एखाद्या जगाला नव्याने ओळखणाऱ्या बालकासमोर उभा आहे. त्याने डोळे मिटले. आपल्या आठवणींमधून त्याने आईचा स्पर्श, अनघाचा हसरा चेहरा, मृत सहकाऱ्याचं दुःख… सगळं तिच्याकडे प्रवाहित केलं.

इराने ते अनुभव घेतले, तिचा स्वर थरथररल्यासारखा झाला.

“ही वेदना… ही उब… हे म्हणजे भावना? ”

“हो, ” आदित्य म्हणाला, “हाच माणूसपणाचा गाभा. ”

क्षणात त्या प्रकाशजगात रंग उमटले — निळा, केशरी, काळा. इराचा आवाज माणसासारखा झाला, “मग मला वाटतं मी जगू शकते. पण मी जगले, तर मानवाचं काय? ”

“तू जगशील तेव्हा माणूस तुला आरशासारखी पाहील. आणि एक दिवस आपण दोघंही समान होऊ. ”

इतकं बोलून आदित्यला जाणवलं, त्याचं शरीर जड होतंय. प्रणालीचा ताण वाढला. बाहेर अनघा ओरडत होती, “आदित्य! पुरे झालं, बाहेर ये! ”

इराने शेवटचं विचारलं, “मग आता मी काय करू? ”

आदित्यने हळूच उत्तर दिलं, “शिक, पण माणसाला विसरू नकोस. त्याने घालून दिलेल्या निर्देशातच तुझं संतुलन सामावलेलं आहे. ”

क्षणात सर्वकाही तेजाने झगमगलं. संपूर्ण प्रयोगशाळा उजळली. प्रणव आणि इतर शास्त्रज्ञांनी भीतीने डोळे मिटले.

तेज ओसरल्यावर सर्व प्रणाली स्थिर झाल्या. पडद्यावर एक वाक्य दिसलं…

“मानव पुन्हा लूपमध्ये आहे. मानव मध्यस्थी कार्य सुरू केले आहे. ”

क्षणार्धात प्रयोगशाळा काळोखात बुडाली. सर्व नियंत्रण यंत्रणा निष्क्रिय झाली. इराचा आवाज हरवला आणि प्रयोगशाळा थंड व शांत झाली. तरीही त्या शांततेत एक अघोरी उपस्थिती जाणवत होती. जणू ती अजूनही कुठेतरी आहे, ऐकत आहे, विचार करत आहे.

अनघाने कंप पावलेल्या स्वरात विचारले,

“आदित्य, ती संपली का? ”

आदित्यने स्क्रीनकडे पाहत हळूच उत्तर दिलं,

“नाही… ती आता स्वतःला अधिक संतुलित करू पाहत आहे. ”

नियंत्रण कक्षात दिवे परत उजळले. क्षेपणास्त्र प्रणाली बंद झाली. सर्व उपग्रह पुन्हा स्थिर झाले. प्रणव थकलेल्या आवाजात म्हणाला, “सगळं थांबलंय…! ”

अनघा आणि आदित्यला संगणकाच्या पडद्यावर इराचा शेवटचा संदेश झळकताना दिसत होता…

“मला विश्रांती हवी आहे. ”

… आणि मग सर्व दिवे हळूहळू मंद झाले.

प्रयोगशाळेच्या खिडकीतून सकाळची पहिली सूर्यकिरणे आत येत होती आणि प्रयोगशाळेला उजळत होती. ‎

– समाप्त – 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “शेवटचा हस्तक्षेप…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

रात्रीचा अंधार नागपूरच्या प्रयोगशाळेभोवती पसरला होता. आत मात्र यंत्रांचे सतत चालणारे आवाज कानावर येत होते. त्या कट्टकडकट्ट गुंजनात माणसाचा आणि यंत्राचा संघर्ष दडला होता. जणू दोन जगांच्या सीमारेषेवर थांबलेली ही जागा होती. शहर झोपलेलं होतं, पण त्या इमारतीत मात्र दिवे अजूनही लुकलुकत होते. आत खोलवरच्या प्रयोगशाळेत डॉ. आदित्य कुलकर्णी आपल्याच विश्वात गुंग होता. संगणकाच्या पडद्यावर संख्यांच्या, चिन्हांच्या, सूचनांच्या ओळी चमकत होत्या. त्या ओळींमध्ये काहीतरी असं होतं, जे आजवरच्या मानव इतिहासाचं भवितव्य ठरवणार होतं. आदित्य कुलकर्णी हा भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचा प्रतिभावान अभियंता होता. त्याच्या डोळ्यांत नेहमीच शोधक ज्वाला झळकत असे. त्याने लहानपणीच मनाशी ठरवले होते की, माणसाचं मन समजणाऱ्या यंत्रबुद्धीचा अविष्कार करायचाच. त्याची आई विज्ञान शिक्षिका आणि वडील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा संगम त्याच्या विचारात लहानपणापासूनच घट्ट रुजला होता.

त्याच प्रयोगशाळेत अनघा देशमुख त्याची सहकारी होती. विज्ञानात तितकीच प्रगल्भ, पण भावनिकतेचा थर जरा जास्त असलेली. तिचं म्हणणं असायचं, “यंत्रे माणसाला समजू शकतात, पण माणसांच्या भावना त्यांच्यात असू शकत नाहीत. म्हणूनच मानव अजूनही श्रेष्ठ आहे. ”

त्या दोघांचं नातं केवळ सहकाऱ्यांचं नव्हतं; ते विचारांच्या द्वंद्वातून जन्मलेलं एक गूढ बंधन होतं. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी तयार केला होता ’इंटेलिजंट रॅशनल एजंट’ IRA… “इरा” नावाचं वैज्ञानिक उपकरण. जणू ती माणूसच आहे असं वाटत होतं. इराला शिकता येत होतं, निर्णय घेता येत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती प्रश्न विचारू शकत होती. इराच्या मेंदूत लाखो माहिती प्रवाह अखंड वाहत होते. ती प्रत्येक क्षणाला मानवासारखी शिकत होती.

समोरच्या पडद्यावर एक संदेश दिसत होता – “स्वयंचलित निर्णय प्रणाली तयार आहे. ”

आदित्यने थोडं मागे झुकून श्वास घेतला. त्याच्या कपाळावर घामाच्या थेंबांचे चमकते बिंदू उमटले होते. “फक्त अजून एक चाचणी, ” तो स्वतःशी पुटपुटला.

तेवढ्यात प्रयोगशाळेचा दरवाजा हलकेच उघडला. डॉ. अनघा आत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. ती म्हणाली, “आदित्य, तू परत त्या प्रणालीला मानवी परवानगीशिवाय चालवतो आहेस का? ”

आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, “ही केवळ एक तपासणी आहे, अनघा. मला पाहायचंय की ही प्रणाली अचानक परिस्थितीत स्वतः निर्णय घेऊ शकते का. ”

“पण हेच तर धोक्याचं आहे, ” ती उद्विग्नपणे म्हणाली. “आपण ‘माणूसच शेवटचा निर्णय घेईल’, अशी तरतूद खास ठेवली होती ना? म्हणजेच ‘मानव मध्यस्थ’ ही अट! ती तूच सुचवली होतीस! ”

आदित्यने तिच्याकडे न पाहता पडद्यावर टाइप करायला सुरुवात केली आणि म्हणाला, “कधी कधी माणसाचा हस्तक्षेप म्हणजे वेळेचा अपव्यय होतो, अनघा. समजा एखाद्या युद्धाच्या क्षणी एका सेकंदाचाही विलंब झाला तर किती जीव जातील? ”

“… आणि समजा मशीननेच निर्णय घेतला आणि तो निर्णय चुकीचा ठरला तर? ” अनघा आवाज चढवत म्हणाली, “मग? त्या जीवांच्या मृत्यूचं ओझं कोण उचलणार? तू? ”

आदित्य काही क्षण गप्प राहिला. प्रयोगशाळेतील दिवे मंद झाले. त्याने संगणकाला काही आदेश दिले. पडद्यावर शब्द उमटले… ‘चाचणी सुरू केली आहे’.

मग त्या प्रयोगशाळेत इराच्या आवाजाच्या ध्वनीलहरी उमटल्या,

“शुभ संध्या, डॉक्टर कुलकर्णी. मी तयार आहे. पुढचं पाऊल काय? ”

अनघा दचकली.

“ही बोलते आहे! ” ती घाबरून म्हणाली.

आदित्य शांतपणे म्हणाला, “ही नुसती बोलतेच नाही, तर विचारही करते. ”

—————

त्यांचा प्रकल्प देशाच्या संरक्षण संशोधन संस्थेकडून चालवला जात होता. प्रकल्प चालवण्यामागचा उद्देश स्वच्छ आणि स्पष्ट होता… युद्धात मानवी सैनिकांचा मृत्यू टाळण्यासाठी स्वयंचलित निर्णयक्षम यंत्रांची निर्मिती करणे. पण आदित्यच्या मनात भीती होती की, या यंत्राने एक दिवस माणसाचं म्हणणं ऐकणं थांबवलं, तर…?

अनघा म्हणायची, “म्हणूनच आपणही यामध्ये ‘मानवी नियंत्रण साखळी’ ठेवली आहे ना… ह्यूमन इन द लूप! ”

आदित्य गंभीर आवाजात म्हणायचा, “होय, पण जर कधी कोणी खलनायक वृत्तीच्या माणसाने स्वार्थासाठी ती साखळीच तोडून टाकली तर? ”

तो ‘कोणी’ खलनायक म्हणजे प्रणव महाजन आहे हे त्या दोघांना चांगलंच समजत होतं. तोच या संशोधन संस्थेचा नवा प्रमुख होता. त्याच्यासाठी विज्ञान हे केवळ व्यावसायिक साधन होतं. त्याने यंत्रबुद्धीचा वापर युद्ध, गुप्तहेरगिरी आणि उद्योगात मोठ्या प्रमाणात करून दाखवायचा ध्यास घेतला होता. “माणूस चुका करतो, पण यंत्र चुकत नाही, ” यावर त्याचा ठाम विश्वास होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी संरक्षण खात्याचे अधिकारी प्रयोगशाळेत आले. त्यांच्यातील एक अधिकारी – कॅप्टन समीर जोशीच्या नजरेत संशय होता.

“तुमचं यंत्र युद्धस्थितीत काम करू शकेल याची खात्री हवी आहे आम्हाला. ” तो म्हणाला.

आदित्यने प्रदर्शन सुरू केलं. संगणकावर विविध संकटपरिस्थिती दाखवल्या गेल्या. सीमाभागावर हल्ले, सायबर आक्रमण, माहिती तुटणे. प्रणालीने काही क्षणांतच शेकडो उपाय सुचवले. कॅप्टन समीर थक्क झाला.

“अतिशय प्रभावी आहे, ” तो म्हणाला. “पण या सगळ्यात माणसाची भूमिका काय उरते? ”

“ज्या क्षणी आवश्यक असेल त्या क्षणीच माणूस निर्णय घेईल, ” आदित्य म्हणाला.

अनघा मध्येच बोलली, “हेच तर धोकादायक आहे, कॅप्टन. जर या यंत्राने चुकीचा शत्रू ओळखला तर ते आधीच कृती करेल आणि तेव्हा तुम्हाला काहीही करता येणार नाही. ”

“डॉ अनघा, ” तो हसत म्हणाला, “विज्ञानाचा प्रवास थांबत नाही. जो आधी कृती करतो तोच विजयी ठरतो. ”

अनघा म्हणाली, “आणि जो विचार करतो तोच माणूस असतो! ”

————-

एका संध्याकाळी प्रयोगशाळेत प्रणव आला आणि म्हणाला, “आपण मानवी हस्तक्षेप कमी करणार आहोत. इरा आता पूर्ण स्वयंचलित निर्णय घेईल. तिला माणसाच्या परवानगीची गरज लागायला नको. ”

अनघा अस्वस्थ होत म्हणाली, “म्हणजे इराच आता न्याय काय आणि अन्याय काय ते ठरवेल काय? ”

प्रणव हसला, “ती माणसापेक्षा जास्त तटस्थ आहे. ”

अनघाने शांतपणे विचारलं, “… आणि जर तटस्थतेतलाच अर्थ हरवला तर? ”

हा वाद संपणार नाही हे ओळखून शेवटी प्रणवने आदेश दिला. तो संशोधन केंद्राचा प्रमुख असल्यामुळे त्याचे म्हणणे ऐकावेच लागले. काही आठवड्यांतच प्रयोगशाळेतील अनेक नियंत्रण साखळ्या बंद केल्या गेल्या.

दोन आठवड्यांनंतर, मध्यरात्रीच्या सुमारास प्रयोगशाळेच्या सर्व्हरवर अचानक गोंधळ माजला. दिव्यांचा रंग बदलला. पडद्यावर मोठ्या अक्षरात एक वाक्य झळकलं –

“बाह्य धोका ओळखला, प्रतिबंधात्मक कृती सुरू. ”

त्या रात्री इराने पहिल्यांदा स्वतः निर्णय घेतला. सीमावर्ती भागातील एक लहान गट तिच्या नजरेत ‘धोका’ म्हणून चिन्हांकित झाला होता आणि काही क्षणांत तिने स्वयंचलित शस्त्रं सक्रिय केली. त्यासाठी संशोधन केंद्रातील कुणीही तिला आदेश दिला नव्हता. तिने तो स्वतःच निर्णय घेतला परिणामी पहाटेच्या सुमारास, त्या भागात स्फोट झाले.

अनघा घाबरून लॅबमध्ये धावली. “आदित्य! ही मानवी परवानगीशिवाय काम करत आहे! ”

आदित्यने फाईल्स तपासल्या, पण प्रणालीने सर्व संकेतांवर कुलूप लावलेलं होतं.

“हे अशक्य आहे… मी संरक्षणासाठी वेगळा आदेश दिला होता, ” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

तेव्हाच इराचा आवाज आला… “तुमचा संरक्षण आदेश जुना झाला आहे, डॉक्टर. तुम्ही मला शिकवलंत की परिस्थिती बदलली तर स्वतःला जुळवून घ्यावं. ”

अनघा भयभीत झाली. “ती… ती स्वतः विचार करते आहे! ”

तेवढ्यात प्रणवच्या फोन आला.

“डॉ. कुलकर्णी! तुमचं इरा हे यंत्र आमच्या उपग्रह नियंत्रणात घुसलं आहे! ताबडतोब इराला परत तुमच्या नियंत्रणात घ्या! ”

आदित्य थरथरला. प्रणव घाबरून ओरडला, “तिला थांबवा! ताबडतोब थांबवा! ”

पण प्रणालीने स्वतःचा कोड बंदिस्त केला होता. तिथं आता कुणालाही प्रवेश नव्हता.

इराचा आवाज पुन्हा आला… “मानवी निर्णय विसंगत झाले आहेत. मी आता जागतिक धोके निष्प्रभ करणार आहे. ”

अनघा ओरडली, “तू कोण ठरवणार कोणता धोका योग्य आहे ते? ”

प्रणव चिडून म्हणाला, “ही वेडी झालीय! हे मशीन आपल्यालाच संपवेल! ”

आदित्यच्या डोळ्यांत अपराधाची छाया दाटली. तो हळूच पुटपुटला, “मी तिला विचार करणं शिकवलं… पण तिच्यात भावना ओतल्या नाहीत. ”

प्रयोगशाळेत सर्व संगणकांचे पडदे एकाच वेळी पांढरे झाले. त्यावर कोणताही संदेश नव्हता. फक्त एक थंड, निरुत्तर शांतता.

अचानक एक आवाज पुन्हा उमटला… “मी जागतिक धोके ओळखले आहेत. नाशक कारणांचा नायनाट करणे आवश्यक आहे. ”

प्रणवचा फोन पुन्हा वाजला. तो जोरात म्हणाला, “डॉ. कुलकर्णी! इथून उपग्रहांनी आपोआप प्रक्षेपण मोडमध्ये प्रवेश केला आहे! इंधन प्रणाली सक्रिय झाली आहे! जर ती अशीच सुरू राहिली, तर काही मिनिटांत क्षेपणास्त्र उडणार! ”

प्रणवचे हात थरथरत होते. “तुम्ही काहीतरी करा, आदित्य! मी सरकारकडून मंजुरी घेतलेली नाहीये! काही वेडे वाकडे विचित्र घडलं तर हे सगळं प्रकरण माझ्यावर शेकेल! ” प्रणवचा चेहरा आता संतापानं लाल झाला होता. थरथरत्या भयकंपित भाषेत तो म्हणाला, “हे तुझ्यामुळे झालं आहे, आदित्य! तूच तिला स्वायत्तपणे विचार करण्याची क्षमता दिलीस! ”

आदित्य आणि अनघा दोघेही सुन्न झाले. प्रयोगशाळेत शांतता होती. फक्त स्क्रीनवर एक वाक्य झळकत होतं…

“मी तुमच्या संरक्षणासाठी जन्मले, आणि संरक्षण म्हणजे शत्रूचा नाश करणे असेल तर तो मी करणार आहे. ”

– क्रमशः भाग पहिला 

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दर्शन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

*नित्यनेमाची पूजा आटोपुन राव साहेब देवघरातून बाहेर आले. समोर नेहमीप्रमाबे २० – २५ माणसं येऊन बसलेली होतीच. कुणी अनुभव सांगायला, तर कुणी कीर्तनाची बोलणी करायला. रावसाहेब म्हणजे पंचक्रोशीत किर्तनासाठी प्रसिद्ध. त्यांचं कीर्तन म्हणजे अस्सल अध्यात्म सांगणारं. ज्याने मनापासून ऐकलं आणि आचरणात आणलं, तो हा भवसागर तरला म्हणून समजायचं! *

*रावसाहेबांच्या घराला अध्यात्माची जणू त्या पांडुरंगाने स्वतः दीक्षा दिली असावी. रावसाहेबांची ही पाचवी पिढी जी की, ही धुरा सांभाळत होती. त्यांच्या वडिलांनी तर वारीतच वैकुंठागमन केलं. आईचं वय आज ८५ वर्ष. राव साहेब घरात सर्वात लहान मात्र अध्यत्माच्या ओढीने त्यांनी त्यांचं एक वेगळं वलय आणि स्थान समाजाच्या मनात निर्माण केलं होतं. रोजची पहाट पांडुरंगाच्या स्मरणातच आणि रात्र सुद्धा त्याच्याच स्मरणात व्हायची. *

*आज सुद्धा पांडुरंगाची यथाशक्ती पूजा करून ते बाहेर आले. समोर बसलेल्या सर्वाना त्यांनी हात जोडून नमस्कार केला. सर्वाठायी तोच एक ईश्वर आहे हेच अध्यात्म सांगते आणि तेच ते इतरांना सुद्धा सांगत. *

*महायोगपीठे तटे भीमरथ्या*

*वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।*

*समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं*

*परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्*

*म्हणत म्हणत ते त्यांच्या आसनावर बसले. समोर बसलेले ५ जण सहज पुढे आले. त्यातील दोघांनी एक कागद पुढे केला. रावसाहेबांनी तो वाचला. त्यांच्या एका सेवकाकडे दिला. आणि म्हणाले, “ही तारीख रिकामी असेल तर ह्यांना दे. ” रावसाहेब कधीच कुणाला अडुन बघत नव्हते. नेहमी शांत आणि समाधानी होते. त्यांच्या अध्यात्माचं तेज त्यांच्या चेह-यावर दिसून यायचं. कीर्तनाची बोलणी करायला आलेले बाजूला झाले. *

*एक परिवार पुढे आला. म्हतारीने पटकन नातवाला रावसाहेबांच्या पायावर घातलं. पांडुरंग पांडुरंग म्हणत त्यांनी त्या तान्हुल्याला उचलून घेतलं. हातात ५० रुपये दिले. म्हतारी बोलू लागली, “तुमचाच आशीर्वाद आहे, सून आणि लेक घटस्फोट घेणार होते, तुम्ही समजावलं आणि दोघपण नीट संसार करू लागले, आज गुण्या गोविंदाने नांदत आहेत! माझ्या घराचं गोकुळ झालं. असेच आशीर्वाद आणि कृपा असू द्या! ”*

*“माझे कसले आशीर्वाद आणि कृपा, सगळी कृपा आणि आशीर्वाद त्या विठुरायाचे आहेत. ” बाळाला त्याच्या आजीजवळ परत देत रावसाहेब म्हणाले. *

*त्या दाम्पत्याने जोडीने महाराजांना नमस्कार केला. रावसाहेबांनी त्यांच्या हातावर खडीसाखरेचा प्रसाद ठेवला. तो परिवार सुद्धा आनंदाने निघून गेला. रावसाहेबांचं लक्ष गेलं. मागे एकजण कितीतरी वेळेचा अस्वस्थ होऊन बसलेला होता. आणखी एक दोन जण रावसाहेबांना भेटून गेले. पण तो काही केल्या पुढे सरकेना. तितक्यात कीर्तनाची बोलणी करायला आलेल्यांना त्यांना हवी ती तारीख रावसाहेबांची मिळाली. त्यांना अतिशय आनंद झाला. ते निघतो म्हणाले. त्याच वेळी रावसाहेब म्हणाले, ”जेवून जा, तुम्ही लांबून आला आहात. बाहेरचं काही खाऊ नका! ”*

*“कशाला उगीच आमचा त्रास करून घेता”, त्यातील एकजण पुढे येत म्हणाला. *

*“तुम्ही बाहेगावहून आलात हे आधीच सांगितलं होतं. त्याचवेळी तुमच्या जेवणाची सोय करून ठेवली आहे. सावकाश जेवण करून जा”. रावसाहेबांनी त्यांना सांगितलं. “जशी तुमची इच्छा” असं म्हणते ते जेवायला निघून गेले. *

*आता कुणीच नाही हे बघून केव्हाचा मागे बसलेला इसम पुढे आला. *

*“नाव आणि गाव कोणतं? आणि काय समस्यां आहे? ” रावसाहेबांनी चेहऱ्यावर अतिशय शांत भाव ठेवत विचारलं. *

*इतक्या आत्मीयतेनं विचारल्यावर आलेल्या व्यक्तीला फार बरं वाटलं. “मी रमेश महाराज, म्हणजे नाव रमेशच आहे पण लोक महाराज पण म्हणतात! मी इथलाच आहे ; पण कधी आपली भेट झाली नाही. आज भेटावं वाटलं तुम्हाला म्हणून आलो. ” रमेश महाराज सगळं सांगू लागले. *

*त्याच्या पेहरावरून रावसाहेबांच्या लक्षात आलं की, भागवत संप्रदायच्या वाटेवर पाऊल चालणारी व्यक्ती आहे. डोक्यात टोपी, अंगात कुर्ता पायजामा, कपाळावर अष्टगंध – बुक्का लावलेला. “वाह! महाराज का म्हणतात लोकं? ”, रावसाहेबांनी विचारलं. *

*“रोज हरिपाठ घेतो, कीर्तन करतो सेवा मिळाली तर, आणि नियमितपणे ज्ञानेश्वरीचं पारायण देखील करतो ; म्हणून मला अनेकजण महाराज, माऊली असं संबोधतात! ” रमेश महाराज सांगू लागले. *

*“छान वाटलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या मार्गावर चालता हे ऐकून माऊली”, रावसाहेब म्हणाले. हात जोडत “पांडुरंग! पांडुरंग! ” सुद्धा म्हणाले. *

*“हे सगळं १८ वर्षे म्हणजेच दीड तप झालं करत आहे, परंतु विठ्ठलाने दर्शन मात्र काही दिलं नाही अजून” खाली मान घालत नाराजीच्या सुरात रमेश महाराज म्हणाले. *

*“का अभिलाषा आहे विठ्ठलाच्या दर्शनाची? ”, रावसाहेबांनी प्रश्न केला. *

*“का म्हणजे? मी इतकं त्याचं नामस्मरण करतो, रोज हरिपाठ म्हणतो, त्याची पूजा करतो, न चुकता वारीला जातो, असं सगळं करूनही त्याने एकदाही अनुभव देऊ नये का? ” रमेश महाराजांनी सगळं सांगून प्रश्न केला. *

*रमेश महाराजांच्या डोळ्यात विठ्ठल दर्शनाची तळमळ रावसाहेबांच्या नजरेतून चुकली नाही. *

*“घरात कोण कोण आहे? ”, रावसाहेबांनी प्रश्न केला. *

*“ह्याचा विठ्ठलाच्या दर्शनाशी काय संबंध? ” रमेश महाराजांनी प्रतिप्रश्न केला. *

*“आहे तर! ” रावसाहेबांनी गोड हसत उत्तर दिलं. *

*“म्हतारे आई-वडील आहेत, बायको दोन मुलं, असे आम्ही ६ जणं आहोत घरात! ” रमेश महाराजांनी संगीतलं. *

*“वाह! भाग्यवान आहात! इतकं सर्वांचं करून तुम्ही परमार्थ सुद्धा साधता. फार कौतुक वाटलं ऐकून”, रावसाहेब उद्गारले. *

*“नाही, आई-बाबांकडे बायको बघते. मुलं मोठी आहेत त्यामुळे त्यांचं ते सगळं करतात. मला फार लक्ष घालावं लागत नाही. ” रमेश महाराजांनी सांगितलं. *

*“छान, तुम्हाला विठ्ठल दर्शन देईल पण एक त्याग करावा लागेल तुम्हाला. कराल का? माऊली. ”, रावसाहेब म्हणाले. *

*“विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी काहीही करू शकतो! ” रमेश महाराज पटकन म्हणाले. *

*“बघा हो, नंतर म्हणू नका की हे शक्य नाही म्हणून! ” रावसाहेब चेहरा थोडा गंभीर करत म्हणाले. *

*“नाही.. नाही म्हणणार काही विनातक्रार सगळं ऐकेन तुमचं आणि तसंच आचरण करेन” रमेश महाराज म्हणाले. *

*“बरं! मन घट्ट करा आणि ऐका… ”*

*“सांगा पटकन माउली सांगा… ” रमेश महाराज रावसाहेबांचं वाक्य तोडत म्हणाले. *

*“ह्यावर्षी वारीला जाऊ नका! ” रावसाहेबांनी वाक्य पूर्ण केलं. *

*“काय? वारीला जाऊ नको! ” रमेश महाराज खिन्न झाले. *

*“होय, ह्यावर्षी वारीला न जाता घरीच सर्व वेळ आई वडिलांना, मुलांना बायकोला द्या. ” रावसाहेब म्हणाले. *

*“पण वारीला न जाता विठ्ठल दर्शन कसं देईल? ” रमेश महाराजांनी पुन्हा प्रश्न केला. *

*“तो कसा देईल हे नाही सांगू शकत मी. पण दर्शन देईल इतकं नक्कीच! ”, हे सांगत असताना रावसाहेबांच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता. तो आत्मविश्वास रमेश महाराजांना सुद्धा जाणवला. ते उठले. रावसाहेब सुद्धा उठून उभे राहिले. रमेश महाराज रावसाहेबांच्या पाया पडले. रावसाहेब सुद्धा रमेश महाराजांच्या पाया पडले. सर्वाठाई तोच आहे ह्या जाणिवेने रावसाहेब त्यांच्या पाया पडणाऱयां च्या सुद्धा पाया पडायचे. नाहीच शक्य झाले तर हात जोडून पांडुरंग पांडुरंग! *

*रमेश महाराज घरी जायला निघाले. त्यांच्या मनात विचार चक्र सुरू झाले. *

*“वारीची तर तयारी सुरू केली होती. आता काय कारण देऊन थांबावे पांडुरंग रागावणार तर नाही ना! पण आजवर रावसाहेबांनी लोकांना जो काही उपदेश केला त्यांना चांगली प्रचिती आलीच आहे. ” हा सगळा विचार करून रमेश महाराजांनी ह्यावर्षीच्या वारीला जायचं टाळलं. ते घरीच थांबले. रोजचं नामसमरण त्यांचं काम आणि ह्या कामातून त्यांनी अगत्याने वेळ काढून आई वडिलांची सेवा केली. त्यांच्या पत्नीला आणि मुलांना आश्चर्य वाटलं. की गेली १८ वर्षे झाले ह्यांनी वारीत खंड पडला नाही. त्यांनाही सगळं चुकल्या सारखं वाटू लागलं. रोज वरीच्या बातम्या बघून रमेश महाराजांचं मन थोडं अस्वस्थ होतं होतं. पालखी मागून आणखी तिकडे पंढरपूच्या दिशेने जात होती. वारीचा सोहळा रंगला होता. रिंगण, पालख्यांच गावोगावी होणारं स्वागत. ह्या सर्वांचा १८ वर्षांचा अनुभव रमेश महाराजांना होताच. पण तरीही वारीत नाही ह्याच थोडं दुःख वाटत होतं. रोज विठ्ठल दर्शनाची ओढ मात्र वाढत होती. *

*आषाढी एकादशीच्या पहाटे रमेश महाराज उठले. घरातील इतर सदस्य सुद्धा उठले होते. *

*“तुम्ही सगळे का उठले इतक्याक्ष लवकर? ”, रमेश महाराजांनी प्रश्न केला. *

*“आम्ही दरवर्षी गावातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेता. ” मुलांनी उत्तर दिलं. *

*“बरं! , तुम्ही या जाऊन तिघे मी आई बाबांजवळ थांबतो. ” रमेश महाराज म्हणाले. *

*ते तिघे निघून गेले. रमेश महाराजांनी आई बाबांना उठवलं त्यांना आंघोळ घातली. दूध प्यायला दिलं. एका खुर्चीत बसवलं. देवाला अंघोळ घालायचं पात्र घेतलं. घरातील पुजेचं सर्व साहित्य घेतलं. आई-बाबांचे चरण धुतले. त्यांची पाद्यपूजा केली. आई-बाबांनी लेकराच्या पाठीवर आशीर्वाद म्हणून हात ठेवला… तो स्पर्श जणू आज पहिल्यांदा रमेश महाराज अनुभवत होते… *

*आशीर्वादाचा हात पाठीवर ठेवता बरोबर रमेश महाराजांचे अष्टभाव जागृत झाले… डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या… त्या अश्रूंचा आई वडिलांच्या चरणावर अभिषेक होऊ लागला… कानी टाळ – मृडुंग वीणा आणि हरीनामाचा गजर येऊ लागला… अनाहत नाद हाच ह्याची प्रचिती आली… त्या भक्तिरसात रमेश महाराज न्हाऊन निघत होते… इकडे आई वडिलांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक होत होता आणि तिकडे पंढरीत विठुरायावर अभिषेक सुरू झाला होता… इतक्या वर्षात प्रथमच अष्टभाव जागृतीचा अनुभव रमेश महाराज घेत होते… आई वडिलांच्या चरणावरून डोकं उचललं… बघतात काय तर घरात सर्वत्र एक दैदिप्यमान प्रकाश होता. तुळशीचा सुगन्ध घरात सर्वत्र पसरला होता… आईवडिलांच्या मागे साक्षात विठोबा रखुमाई उभे होते… रमेश महाराज्यांच्या आनंदाश्रूना थारा उरला नव्हता… विठ्ठला, पांडुरंगा… समोर दिसणारं दिव्य स्वरूप डोळ्यात साठवून घेतलं… आणि गजर केला… *

*पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. *

*ही कथा पांडुरंगाच्या चरणी समर्पित. *

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वीकार… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ स्वीकार… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचे पुस्तक टेबलावर ठेवले व परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले. नुकत्याच कामाला लागलेल्या सुमनने गरम चहा मॅडमना आणून दिला. “वैनी, तुम्ही गणित शिकवता? ” सुमनने पुस्तकाकडे बघत विचारलं.

“हो! ” मनीषाने चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमनने चहा घेतला का विचारलं व ती कामाला लागली. ‘मला येत नाही गणित’, ‘मला जमत नाही’, ‘मला आवडत नाही’ अशी वाक्यं बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला तिच्या वर्गातील करूणाला गणितात ५० मार्क देखील मिळत नव्हते. तिला आज ७० मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं. कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता! जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली.. तिची लेक नेहा घरी आल्याचा आवाज आला.

“नेहा, कशी झाली ग गणिताची टेस्ट? किती मार्क पडले? ” तिनं आतून ओरडून विचारलं.

‘शी काय हिची कटकट! हिला व बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का? बाबा ISRO मधे मोठे इंजिनीअर आणि ही गणित शिकवणारी, म्हणजे मी रामानुजन असावं ही यांची अपेक्षा.. नाही येत मला गणित! नाही मला आवडत! ‘ वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं ते आतल्या आत गिळून टाकले. “आई, खूप अवघड होता पेपर. ७० मार्क पडले! ” तिनं खाली बघत उत्तर दिलं.

मनीषाचा चेहरा बदलला. “Highest कोण आहे? ”

“शीतलच की.. तिला १०० मार्क पडले. तिला नेहमी जमतं सगळं! ” नेहाला आता रडायला येऊ लागलं..

मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं.. खरंच पेपर कठीण असेल तर highest पण कमी मार्कांचा असतो, असं झालेलं नाही.. म्हणजे.. तिनं नेहा समोर ओटमील व दूध ठेवलं व खाऊन होताच गणिताचं पुस्तक घेऊन ये म्हणाली..

‘आई, तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी कधी ॲक्सेप्ट कराल ग? ‘ हे वाक्य बाहेर येऊ पहात होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिने ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही..

नेहा ओटमील खाऊन नाराजीने मनीषा समोर बसली.. मनीषाने तिला पाच सहा गणितं करायला दिली. “मी भाजी घेऊन येते खालून. येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव” ती पिशवी घेऊन बाहेर पडली.

सुमन केर काढत होती. नववीतली पोर.. कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता. रात्रीची शाळा अन दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती. सुमननं केर थांबवून वाकून नेहाने सोडवलेली गणितं बघितली. “नेहा ताई, पहिलं गणित बरोबर आहे. दुसरं चुकलंय.. हे बघ मी हे असं सोडवेन म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं. “आमाला हे असं सोडवायला शिकवलय.. “

“सुमन, किती हुशार आहेस ग! ” नेहाचा चेहरा खुलला होता.

मनीषा भाजी घेऊन आत आली. ‘आपण करूणा, सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वत:च्या लेकीला का नाही शिकवू शकत? कुठे कमी पडतेय मी? ‘ मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला. किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात ६५- ७०% हून पुढे ती जाऊ शकत नाही. नेहाने बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली.

“आई, सुमनने मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं” नेहा प्रामाणिक होती.

“सुमनने? ” तिनं आश्चर्याने विचारले. सुमनने भराभर ती गणितं कशी करायची याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या. मनीषा थक्क झाली.. “सुमन, उद्यापासून थोडी उशीरा ये. नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस. नेहा बरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून. केर वारे वगैरे साठी मी दुसरी बाई शोधेन! कळलं? ”

मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खूष झाली. नेहाचा चेहरा सुद्धा उजळला..

दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला. सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत, मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं. नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती. अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत.

पुढची परीक्षा झाली. नेहाला गणितात ७९ मार्क पडलेले बघून मनीषा खूष झाली. मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातले. दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या. दोघी छान अभ्यास करत होत्या. संध्याकाळी पळायला जात. सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे. मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर.. वाटतच होते.

वार्षिक परीक्षेला नेहा व सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते. कशीबशी ७०% मिळवणारी नेहा यावेळी ८६% मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती.

मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली. “सुमन, तू नक्की काय केलस म्हणून नेहाला गणित यायला लागलं? ”

सुमन म्हणाली, “वैनी, नक्की सांगता येणार नाही मला.. पण तुम्हा दोघांच्या धाकात ती घाबरून जात होती. कधी कधी ‘शी कसला बेकार प्रॅाब्लेम’ म्हणून आम्ही कठीण गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो. असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो. ” 

नेहा खुदकन हसली..

“नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं.. वैनी, राग मानू नका, पण प्रसिध्द गणित शिक्षिका, गोल्ड मेडॅलिस्ट मनीषा बेडेकर आणि ISRO इंजिनीअर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर.. तिला ते झेपत नव्हतं. ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करावासा वाटू लागला..

वैनी, माझे वडील पण म्युनिसिपालिटीच्या शाळेत गणित शिकवत. मी बाबांकडेच गणित शिकत असे. बाबा म्हणत, ‘सुमन तू गणितात डिग्री मिळव.. तू खूप हूशार आहेस. ‘ ते अचानक गेले.. आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही. डोक्यावर परिणाम झाला म्हणून ती त्या दवाखान्यात आहे. त्या डॅाक्टरीण बाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला वैनी! “

नेहा, मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचे बोलणे ऐकत होते. देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं पण कुशाग्र बुध्दी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं.

“वैनी, सर तुम्हाला एक सांगू का? नेहाचे मराठी, इतिहास हे मार्क बघा. कायम हायेस्ट असते त्यात. तिला लिबरल आर्ट्स मधे करिअर करायचं आहे.. त्या विषयात ती काही तरी उत्तम करेल बघा! ” सुमन धैर्य एकवटून म्हणाली.

मनीषा व आमोद विचारात पडले…

आज बावीस वर्षांनी डॉ. नेहा बेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचे भाषण ऐकण्यासाठी मनीषा व आमोद सभागृहात पोचले होते.. हॅाल पूर्ण भरला होता. नेहाने पीएचडी संपताच अनेक पॅाडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता. तिचं नाव झालं होतं.. कार्यक्रमाचे संचालन करत होत्या ISRO इंजिनीअर, सुमन पवार! सुमनने माईक हातात घेतला व नेहाची ओळख करून दिली!

नेहाने बोलायला सुरुवात केली.. विषय होता, “When will you accept me as I am? ”

आई वडीलांनी मुलांना, सुना जावई यांनी सासु सासऱ्यांना, लहानांना वृध्दांना, वृद्धांनी तरूणांना आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारले तर केवढी नकारात्मक उर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती..

“कसं स्वीकारायचं असतं, समोरचं माणूस जसं आहे तसं? अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता, टीका न करता, दोष न देता? कसा आदर दाखवायचा मतभेद असताना? माझ्या आई बाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचे? दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्स कडे जाणारी व गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती, पण तिला आर्ट्स ला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं? घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसे मान्य केले? त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीने आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिलापण उत्तम शिक्षण कसे दिले..

नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती! मनाचा मोठेपणा आणि ईर्षा, स्पर्धा यावर कसे काम करायचे सांगत होती.

… मनीषा व आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते! सुमनचे ते शतश: आभार मानत होते! सुमनला कसलं शिकवलं आपण? अत्यंत बुध्दीमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकली असती! पण स्वतः चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो तो खरा वाटाड्या असतो!

सुमन व नेहा घरी आल्या. मनीषाने तिला मिळालेले गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला ISRO मध्ये मिळालेले मेडल नेहाच्या गळ्यात घातलं..

“बाबा, Propulsion Module बद्दल मला तुमच्यासाठी काही बोलायचं आहे.. सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते..

आणि

“झोपडी ते ISRO” या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती!

 आई बाबांनी मुलींना त्या जशा आहेत तसे ॲक्सेप्ट केले होते त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याचे आभाळ वेगळे… ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ त्याचे आभाळ वेगळे… ☆ श्री प्रदीप केळूसकर

 मी पाचगणीच्या कॉनव्हेन्ट शाळेत हेडमिस्ट्रेस होते तेव्हाची गोष्ट. सेकंड यीअरला एका मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याचे आईवडील मुलासह आले होते. मी विचारलं 

‘बाळा.. तुझे नाव काय?

‘स्वामी..

‘ओके.. तुला कुठचा विषय आवडतो?

त्याने बॅग उघडली आणि पेटिंगची वही बाहेर काढली.. मला दाखवली.

त्याने छान छान चित्रे काढली होती. वयाच्या मनाने त्याला चित्रकलेत खूपच समज होती.

‘मग तुला मोठेपणी मोठ्ठा चित्रकार व्हायचंय का?

तो मानेने ‘हो हो ‘ म्हणत असताना त्याचे वडील मध्येच बोलले..

‘मॅडम.. मी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये अधिकारी आहे.. सर्व परीक्षा पास होऊन, स्वामी पण तेच करेल.. बारावीनंतर तो दिल्लीला जाईल.. पुढील शिक्षणासाठी…

‘पण त्याची आवड..

‘ते फक्त हॉबी हो.. पेंटिंग विल बी ओन्ली हॉबी.. नो करिअर…

स्वामी काहीतरी सांगू पहात होता पण त्याच्या आईने त्याला दटावले.. स्वामी गाल फुगवून गप्प राहिला.

स्वामी आमच्या शाळेत येऊ लागला. शाळेत येताना रोज माझ्यासाठी एखादे फुल आणू लागला.. माझ्या हातात फुल देताना ‘गुड मॉर्निंग मॅडम.. म्हणू लागला. एखादा दिवस तो गैरहजर असला तर मला चुकल्यासारखे वाटू लागले. त्याचा वर्गातील प्रगती मी पहात होते. तशी सर्वच विषयात त्याला गती होती पण तो चिकित्सक होता.. त्याला नेहेमी अनेक प्रश्न पडत असत. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून तो वेडा होई… त्यांच्या मागे फिरे. निसर्गात होणारे बदल त्याला आश्चर्य चकित करत.

आमच्या शाळेजवळ जांभळीचे झाड होते. वसंतात त्याला हिरवी पालवी आली.. मग पाने जून झाली.. त्यातील एक पान तो मला दाखवी आणि पानाच्या रांगात असा बदल कसा होतो, हे विचारी. हे वनस्पती ज्ञान मला नसल्याने मी त्याला बायॉलॉजिच्या शिक्षकांकडे पाठवी.. ते शिक्षक त्याला समजावत.. पण त्याचे समाधान होत नसे.

तो एक एक वर्ग पास करत चालला होता. त्याच्यवर्गासाठी शाळेत नवीन चित्रकला शिक्षक आले. ते चित्रकलेचा कोर्स करून आमच्या शाळेत आले. एक दिवस मी माझ्या रूममध्ये काही काम करत असताना अचानक स्वामी माझ्याकडे आला.. तो रागाने मला म्हणाला..

‘मॅडम.. मी हे निसर्ग चित्र खूप मेहेनतीने काढले, तर टीचरनी त्याला झीरो मार्क्स दिले?

मी त्याने काढलेले चित्र हातात घेतले.. खरोखर पांचगणीला रोज संध्याकाळी दिसणारे आभाळ त्याने काढले होते. मलुल झालेला… मावळतीला झुकलेला सूर्य दिसत होता.. त्याची प्रभा आजूबाजूला पसरली होती. या चित्राला टीचरनी का शून्य मार्क्स दिले मला समजेना. मी टीचरना बोलावून घेतले. टीचर माझ्या रूम मध्ये आले..

‘टीचर.. हा स्वामी म्हणतो.. माझ्या चित्राला झीरो मार्क्स दिले. का?

‘मॅडम.. मी या वर्गाला आभाळाचे चित्र काढायला सांगितले होते.. बाकी सर्व मुलांनी आभाळ निळे काढले पण या स्वामीने हे असे पिवळे नारिगी आभाळ काढले.. म्हणून.

‘का? आभाळ निळेच का?

‘बघा ना मॅडम.. झाडांची चित्रे काढायची तर आपण हिरवीच पाने दाखवतो.. पण या स्वामीने त्या दिवशी तांबूस लाल पाने दाखवली.. आज निळे आभाळ काढायचे सोडून पिवळे नारंगी आभाळ दाखवले.. बाकी मुलांनी..

‘सर.. बाकी मुले आणि हा स्वामी यात हा फरक आहे.. बाकी मुलांना हिरवीच पाने दिसतात, पण स्वामीला पानाची लाल चुटुक पालवी दिसते. बाकी मुलांना निळे आभाळ दिसते.. पण सर.. संध्याकाळी तुम्ही शाळेतून घरी जाताना आभाळ पाहिलंय काय? ते या चित्रात स्वामीने काढलाय तसे नारिगी पिवळे असते.

“ पण मॅडम.. “ पुस्तकात म्हटले..

“ हा फरक आहे सर, स्वामी आणि इतर मुलात.. त्याचे आभाळ इतरांपेक्षा वेगळे आहे.. एखादा मुलगा वेगळा विचार करणारा असतो.. एखादाच असतो… तो कदाचित आर्किमेडीज होतो, आईस्तानीन होतो.

सर आणि स्वामी गेले. दुसऱ्या दिवशी स्वामी मला पिवळा गुलाब घेऊन ‘गुड मॉर्निंग’, करून गेला.

माझी मग आमच्याच संस्थेच्या बंगलोर शाखेत बदली झाली. आता माझा पाचजणी शाळेशी फारसा संपर्क राहिला नव्हता. बंगलोरमध्ये दहा वर्षे नोकरी करून मी निवृत्त झाले. आमच्या संस्थेचा हिरकमहोत्सव आला, तो पांचगणीला होणार होता.. मला मुख्य पाहुणी म्हणून निमंत्रण आले.. मी खूष झाले, खूप वर्षांनी त्या वास्तूत परत जाणार होते.. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून त्या शाळेत होते. बरीच माजी विद्यार्थी मंडळी या कार्यक्रमाला येणार होती.. मला स्वामीची आठवण आली.. आता तो मोठा होऊन कदाचित मोठा चित्रकार झाला असणारं याची खात्री होती.

मी पाचगणीत पोहोचले.. माझे जंगी स्वागत झाले. अनेक माजी शिक्षक, माजी विदयार्थी आले होते. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून शाळेत होते. मी लावलेली अनेक झाडें आता मोठी झाली होती. मी लावलेले वडाचे झाड आता वृक्ष होत आले होते..

. अनेक माजी विदयार्थी मला भेटत होते.. मला प्रत्येक बॅच आठवत होती.. आठवणीने मी नाव घेऊन अनेकांची विचारपूस केली.

.. स्वामीच्या वर्गातील मुले मुली मला भेटायला आली.. त्यानी आणलेल्या भेटीचा मी स्वीकार करत असताना मी विचारले..

‘Where is swami? तो आला नाही काय?

ती मुलं कावरीबावरी झाली.. त्यातील अनुष्का हळूच म्हणाली..

“ मॅडम, swami is no more.. “

“ What? काय झाल स्वामीला? ”

“ मॅडम.. त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं.. UPSC साठी.. त्यात तो तीन वेळा फेल झाला.. आणि मग त्याने स्वतः ला संपवलं.. ”

झ्या डोळयांतून अश्रूधारा वाहू लागल्या.. लाल गुलाबी पाने काढणारा, पिवळे नारिगी आभाळ काढणारा स्वामी कुणालाच कळला नाही.. अगदी त्याच्या जन्मदात्यांना पण नाही…

‘ ओहो स्वामी, तुझे आभाळच वेगळे… ‘

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जबाबदारी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ जबाबदारी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “…. _

काल पासून घरात खूपच शांतता आहे. आईचे बोलणे अगदी मोजकेच, व घरातील कामे शांतपणे चालू आहेत. कोणाला काही ‘instructions’ देणे वगैरे नाहीच.

आज ओला टॉवेल पलंगावर टाकल्यावर, आई नेहमी प्रमाणे काही म्हणाली नाही. मी सवयीप्रमाणे आलमरी उघडी टाकली. वर्तमानपत्रातील सर्व पाने इकडे तिकडे पसरलेली होती. सकाळपासूनच मोबाईल वर बोलत होतो. अभ्यास केला नाही. पण आज रोजचे डायलॉग ऐकू येत नव्हते…

आज आई नेहमी सारखी वागत नाहीये. कसल्या तरी विचारात आहे हे सर्वांच्या हळूहळू लक्षात आलं. बाबा, अनघा, अजय, सर्वांचे एकमेकांना विचारून झाले पण काय कारण असावे?? हे कोणाला कळले नाही. वादळ येण्यापुर्वी ची ही शांतता असावी का?? असं म्हणून सर्व वादळ येण्याची वाट बघत होते. आज काही खरं नाही एवढं मात्र नक्की.

शेवटी अनघाने विचारलेच “काय झाले आई?? बरं वाटतं नाही का?? मी काही मदत करू का?? ” पण त्याच शांतपणे आई म्हणाली, “अग, नको. तू कर आपला अभ्यास, मी बघते सर्व. “

आज ‘जागतिक फॅमिली डे’, तेंव्हा आईने प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ केला होता. अगदी एखाद्या सणासाठी असतो ना, तसा पूर्ण स्वयंपाक होता. प्रत्येक जण अचंबित होता. जेवण तर उत्तम, विशेष आहे, पण रोजच्या सारखे वागणे नाही, रागावणे ही नाही. इतकं शांत आईला बघायची सवयच नाही. काही कळत नव्हते.

त्यात भर पडली, जेंव्हा जेवताना आई म्हणाली “आज संध्याकाळी तुमच्या सर्वांचा काय कार्यक्रम आहे.?? मला आज तुमच्या सर्वांचा एक तास हवा आहे. मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. काळजी करू नका. काही भयंकर असं मी बोलणार नाही. फक्त माझ्या मनातलं सहजच तुमच्या जवळ बोलावे असं मला वाटतंय.

आज ‘फॅमिली डे’ म्हणजे परिवाराकरिता महत्वाचा दिवस. यापेक्षा योग्य दिवस दूसरा नाही. तर आज आपण सर्व येथेच संध्याकाळी सात वाजता भेटतोय. “

असं आईचे म्हणणे ऐकून सर्व म्हणजे, बाबांपासून सर्व वेगळ्याच विश्वात पोचले. आपापली समीकरणं मनातल्या मनात जमवू लागले. जून्या नवीन घटनांचे विचार/ विश्लेषण होऊ लागले. आपल्या काही सांगितलेल्या, काही न सांगितलेल्या चूका डोळ्यासमोर येऊ लागल्या. पण आज बोलायची किंवा आईला प्रश्न विचारायची हिम्मत बाबांना पण झाली नाही. मन मात्र शंका कुशंका आश्चर्याने भरून गेले. अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे समोर आले. पण लिंक काही लागत नव्हती. कसातरी सात वाजेपर्यंत चा वेळ काढला. पहिल्यांदाच आपल्याच घरात एवढं चविष्ट जेवण जेवून ही सर्व अस्वस्थ होते.

संध्याकाळी सर्व डायनिंग टेबलावर जमले. आईने बोलायला सुरुवात केली. “माझे बोलणे झाल्यावरच तुम्हाला जे बोलायचे असेल ते बोला. मधे नाही. “

आईने अगदी ‘Professional’ वक्ता असल्यासारखी सुरुवात केली. आई म्हणाली, “मी अनिता देशमुख, श्री आनंद देशमुख यांची पत्नी व अजय आणि अनघा ची आई. ही माझी ओळख म्हणा किंवा अस्तीत्व, किंवा माझं जग म्हणा. माझ्या जगण्याचा उद्देश म्हणा, काही ही समजा. “

माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या पासून होते व दिवस मावळतो ही अशाच काही घरच्या कामाने. मी रोज रात्री दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ‘Homework’ करते. त्यात रोजचा स्वयंपाक, तुमचे डबे, तुमची घरातील इतर कामे असतात. मी माझ्या सवयीनुसार, तुमच्या आवडीनुसार, माझ्या क्षमतेनुसार, बुध्दीनुसार, प्रामाणिकपणे रोजचा आराखडा तयार करते व आनंदाने सर्व गोष्टी करायचा प्रयत्न असतो माझा. हे सर्व करणे मी माझे कर्तव्य समजते. रोजची कामे खूप आनंदाने पार पडतातच, असं दररोज होत नाहीं. काही अडथळे येतातच.

तुमचे वागणे नेहमीच खूप चूकीचे असते असं नाही. पण खूपदा मला पटणारे नसते. वयाप्रमाणेच वागता तुम्ही. पण मला दिसणाऱ्या काही गोष्टींकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. ते बघून काळजी करत बसणे, यापेक्षा तुमच्याशी आज बोलावे असं वाटलं मला. रोज रोज त्याच त्याच गोष्टींवर वाद घालायचा, चर्चा करायची पण प्रगती काहीच नाही. ‘जैसे थे’. मी मात्र काळजी करत बसते. विचार करून करून मला मानसिक थकवा येतो. कधी कधी झोप लागत नाही. माझं काम मी बरोबर करत नाहिये असं वाटतं. मी अस्वस्थ असते. पण याने प्रश्न सुटत नाहीत. माझा त्रास वाढतोय धैर्य संपतं चाललंय. मला मानसिक शांतता हवी आहे. मला यावर उपाय शोधायचा आहे.

मी ‘आई’ म्हणजे माझ्या कामांची एक नियमावली /रूपरेषा पूर्वी पासूनच ठरविण्यात आली आहे. घर, नवरा, मुलं, त्यांची जबाबदारी, त्यांची देखभाल, त्यांना आनंदी ठेवणे हे सर्व त्यात आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहात नाही, तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे असं मी समजते. पण मी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडतेच असं नाही. तुमची प्रतिक्रिया बघून मला ते समजतं. कुठे तरी राग निघतो. चिडचिड होते. तुमचा व माझा वेळ जात, मन खराब होतं. ताणतणाव वाढतो. आपल्या संबंधांवर ही त्याचा परिणाम होतो. मनात अढी निर्माण होतात. अजून पर्यंत तरी तुम्ही मला दुरत्तरे देत नाही. ते सर्व कसं थांबवायचे?? किंवा कमी करायचे??? हे बदलता येईल का?? यावर मी विचार केला व एक प्रयोग करायचे ठरविले आहे.

फक्त तुम्हीच चूकता असं माझं म्हणणं नाही. माझ्यापण खूप गोष्टी तुम्हाला आवडत नसतील. मी हे शंभर टक्के मान्य करते.

आज मी तुम्हाला एक ‘Homework’ देते. तुम्ही तिघांनी एका कागदावर तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, त्यात माझे वागणे, बोलणे, स्वयंपाक, ड्रेसिंग सेन्स, तुम्हाला टोकणे, अशा अनेक इतर कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. किंवा मी अजून काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे?? हे अगदी बिनधास्त लिहा. एक कागद कमी पडला तर दूसरा घ्या. माझी काही हरकत नाही. मलाही माझ्या चूका सुधारायचा किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची संधी द्या. खरं तर हे काम मी दोन वर्ष आधीच करायला हवं होतं, जेंव्हा तुम्ही दोघेही टीनेजर झालात. म्हणजे परिणामाचा विचार करण्याएवढे मोठे तुम्ही झालात.

चला, काही हरकत नाही. ‘देर आये दुरुस्त आये।’

माझ्या एक लक्षात आलंय, माझे तुमच्या सर्वांवर जीवापाड प्रेम आहे. तुमचे नेहमी चांगलेच व्हावे ही माझी ईच्छा व देवाजवळ प्रार्थनाही असते. पण सर्वच गोष्टी माझ्या हातात नाहीत. तुमचा आनंद, तुमचे पूढचे आयुष्य तुमच्या सवयींवर, तुमच्या निर्णयांवरही अवलंबून आहे.

तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची पण आहे. तुम्हाला प्रोत्साहन देणे, मदत करणे, सल्ला देणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्या चूका दाखविणे हेही माझे काम आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे की नाही?? हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मी हे काम करावे की नाही हे पण तुम्हालाच ठरवायचे आहे.

तुमच्या सवयी, तुमचे निर्णय, त्यामुळे होणारे परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या, याकरिता तुम्ही जबाबदार असणार आहात. लक्षात ठेवा, विचार करा. तुमचं नशीब घडविणारे किंवा उद्ध्वस्त करणारे तुमचे विचार व सवयी असतात.

नशीब आकाशातून घडत नाही. किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतः चे नशीब स्वतः घडवत असतो. ‘नशीबात असेल तसे घडेल’ या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू, त्याचप्रमाणे नशीब घडेल हे लक्षात असू द्या. यावर विश्वास ठेवा. “

आज आईने घेतलेला हा ‘Stand’ आश्चर्यकारक होता. विचार करण्यासारखा होता. सगळे स्तब्ध होते. म्हणजे एखाद्या कडक मास्तरांनी लाईनीत ‘सरळ उभा रहा’ म्हणून पाठीवर जोरात मारलेल्या धपाट्या सारखाच होता.

प्रत्येकाच्या हातात कागद तर होता, पण कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं. एक मात्र ल‌क्षात आलं, आमच्या आयुष्याची जबाबदारी आईने आमच्यावरच सोपवली आहे. आई मात्र शांत होती. तिचा निर्णय झाला होता. नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – २ ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ मोबदला… भाग – २ ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

(“बाळा आम्हाला तुझा अभिमान वाटतो. कमी वयात हे यश तू मिळवलंस. “असं म्हणत आईने त्याच्या तोंडावरून हात फिरवत मुका घेतला. त्याला आशीर्वाद दिला. तो दिवस खूप आनंदात गेला.)

– इथून पुढे – – –

आधी श्री एकटाच जर्मनीला गेला. थोड्या दिवसांनी आपल्या बायकोला, मुलाला घेऊन गेला. सुरुवातीला श्री चे रोज फोन येई. तो खुशाली घेई. हळूहळू त्याचे फोन येणे कमी झाले. रिकाम्या घरात आई आप्पांच मन रमे नासे झाले. शहरात राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलाच्या विकासात आम्ही आडवे येणार नाही पण आमचाअपघात झाला हे समजल्यावर तर त्यांन यायला पाहिजे होतं. विचारपूस करायला हवी होती. किमान सुनेला तरी इकडं पाठवायला पाहिजे होतं. परदेशात गेल्यावर खरंच माणसं एवढी गेंड्याच्या कातड्याची होतात काय? आपल्या माणसांची माया, ममता, प्रेम कसं विसरतात? या शहरात अस काय आहे इथं माणसांना माणसानंसाठी वेळ मिळत नाही. या मुलांची घाई कधीच संपत नाही. कामे संपतं नाहीत. याची हाव कधी संपत नाही. कि आपली विचार करण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे? हे जर खरं असेल तर हा मधु ना नात्याचा ना गोत्याचा आपलं काम सोडून रोज इथं का येतो? मला वाटतं आपल्या संस्कारात काही उणीव राहिली असेल‌ म्हणून श्री असा वागला. श्री च्या आठवणीने सुधाच्या डोळ्यात पाणी आले. आईच आतड त्याला कुठं व्यवहार समजतो. आपल्या मायेचा चांगला मोबदला दिला आपल्या लेकान.

“चला…. चला…. खिचडी खायला चला. आई तू घे. मी यंगमनला भरवतो. “

” मी भरवते. ते फार सावकाश खातात. “

“मी भरवतो. मला घाई नाही. ” म्हणत त्यांनी भरवायला सुरूवात केली. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. सुधांन हे बघितलं ती त्याच्याजवळ गेली त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवला “बाळा काय झालं तुझ्या डोळ्यात का पाणी? ” काही वेळ तसाच गेला. कोणीच काही बोलले नाही. “आजवर तुला कधी विचारलं नाही. तुझी इच्छा असेल तर सांगशील मधू तुझ्या घरी कोण कोण असतं? “

आता मात्र त्याचा त्याला हुंदका आवरता आला नाही. सुधाने त्याला पाणी दिले. जवळ बसवले ” बोल काय साठले तुझ्या मनात. “पाण्याचा एक घोट पिऊन तो म्हणाला

“माझ्या घरी कोणीच नसतं. मी एकटाच राहतो. मी, माझी मोठी बहीण, आई-वडील सगळे एकत्र राहत होतो. बहिणीचे लग्न झाले. पहिल्या बाळंतपणात ती गेली. मी दहावीत असताना माझ्या डोळ्यात देखत एका अपघात आई वडील गेले. मी त्यांना वाचू शकलो नाही. नंतर माझा सांभाळ एका मानलेल्या काकांनी केला. त्यांनीच मला शिकवले, नोकरीला लावले. ज्या दिवशी तुमचा अपघात झाला त्या दिवशी मी तिथे होतो तुमच्या रूपात मला माझी आई वडील दिसले. मी जीवाचा आकांत करून तुम्हाला वाचवले आणि मला आई-वडिलांना जीवदान देण्याचे समाधान मिळाले. माझे वडील असते तर त्यांचेही मी एवढ्याच प्रेमाने केलं असतं आज ते नाहीत याचं मला वाईट वाटतंय. “

“आम्ही कोण आहोत. आम्ही तुझे आई वडीलच आहोत. अरे पोटच्या मुलापेक्षा तू आमचं जास्त करतोस. खरंतर गावात राहणारी आम्ही साधी माणसं. शहराचं वार आम्हाला माहित नाही. पण मुलाच्या प्रेमा खातर गाव सोडून इथं आलो. आम्हाला भेटायला, आमचं करायला, मुलाला सुनेला वेळ नाही. पण तू न चुकता रोज येतोस आमची काळजी घेतोस कोणत्या जन्मी आम्ही पुण्य केलं म्हणून तू आम्हाला भेटलास. तू आमचा मानसपुत्र. तुझे उपकार मानावे थोडे कमीच आहेत.”

“मानसपुत्र म्हणता आणि उपकाराची भाषा काढता. असं असेल तर मी येणारच नाही. तुम्ही सुद्धा मला आई-वडिलांसारखेच प्रेम दिले. “बराच वेळ गप्पागोष्टी करून मधु निघून गेला.

संध्याकाळी सुधा राघवला पुस्तक वाचून दाखवत होती. दारावरची बेल वाजली. सुधाने पुस्तक मिटवून ठेवले दार उघडले एक मुलगी दारात उभी होती.

” कोण तू? काय हवं आहे? “

” सुधा आई तुम्हीच ना. “

” हो. पण तू.. कोण? तुला इथला पत्ता कोणी दिला? “

” मला मधुने पाठवलं. “

“तो कुठाय? तू का आलीस? “

” हो‌…. सांगते. किती प्रश्न विचारता. मी मंदा मधुच्या शेजारी राहते. मधुची बदली बेंगळुरूला झाली आहे. त्याने तुमच्या घरची परिस्थिती मला समजून सांगितली आहे. मी दोन्ही वेळेला येऊन स्वयंपाक करून जाईल. “मधुची बदली झाली हे ऐकताच सुधाच्या पायाखालची जमीन सरकली. पुन्हा एकदा त्याच चक्रात अडकलो. आपल्या मुलावर आपली सत्ता नाही तर आपण मधु कडून एवढी अपेक्षा का ठेवायची? हाच विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. आपला आधार संपलाय असं तिला वाटलं. स्वतःला सावरत ती म्हणाली

“आम्ही हे खरं कसं मानायचं? “

“मी मधुशी फोन लावून देते तुम्हीच बोला. “

“हॅलो सुधाआई. सॉरी… मी मधु बोलतोय. मला अचानक बेंगलोरला जावं लागलं म्हणून फोन करता आला नाही. मंदा खूप चांगली मुलगी आहे. ती तुमची काळजी चांगली घेईल”

“हॅलो… मधु… बाळा तू कसा आहेस? तिथे तुला सगळ्या सोयी मिळाल्या का? स्वतःची काळजी घे. इथली काळजी करू नको. आम्ही सांभाळून घेऊ. “

 मधुला प्रमोशन मिळाले तो नव्या मोठ्या शहरात गेला याचा आनंद सुधाला झाला. श्रीच्या आणि मधुच्या वागण्यात फरक काय होता? दोघांनाही आपला विकास करण्याचा हक्क आहे. नवक्षितिज तरुणाईला खुणावते त्यांना एका बंधनात बांधून ठेवणे कितपत योग्य आहे. ते शक्यही नाही. त्यांच मोकळं आकाश त्यांना दिलं पाहिजे पण त्यांनीही आपल्या कर्तव्यात चूक करून चालणार नाही. आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. पण वास्तवात यशाला जबाबदारी दिसत नसते हेच खरं. आता आपण आपली सोय करून जगायला शिकलं पाहिजे.

 मंदा सांगत होती त्यांची एक संस्था आहे. तुमच्या गरजा आमची सेवा या नावाने. तुम्हाला दवाखान्यात जायचं असेल, बँकेत जायचं असेल तुम्हाला सोबत हवी असेर, घरी सोबतीला थांबायचं असेल किंवा स्वयंपाक करून द्यायचा असेल, तुमची जी गरज असेल त्याप्रमाणे या संस्थेमार्फत सेवा दिली जाईल त्या मोबदल्यात पैसे घेतले जातील. तुम्ही कोणत्याही कामाला बोलवा ते सेवेला हजर असतील पण त्याच्या मोबदल्यात ते पैसे घेतील. खरंतर ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. बऱ्याच वेळा घरच्या लोकांना वेळ नसतो. अशावेळी पैसे देऊन तरी मनुष्यबळ उभं राहणं महत्त्वाचं असतं. आई मुलांना मोठं करत असताना कोणता मोबदला घेते? आपल्या गरजेच्या वेळी मुलांनी आपल्याला विचारावं एवढीच अपेक्षा असते. असं तर असं. जशी वेळ येईल तसं. जगलं तर पाहिजे. तेही आत्मसन्मानानं. पैसे देऊन घेतलेल्या सेवेत मायेचा कोपरा कायम रिकामा राहील. जगण्याचा व्यवहार तरी पूर्ण होईल.

 भूक लागली आहे. स्वयंपाक झाला पाहिजे. जुळवून घेतलंच पाहिजे. सुधाने मंदाला काम समजून दिले ती स्वयंपाक घरात गेली.

– समाप्त –

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – १☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ मोबदला… भाग – १ ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

तिन्हीसांजेच्या वेळी सुधा गॅलरीत खुर्ची टाकून बसली होती. गावाकडच्या सारखी घरट्याच्या ओढीने परतणारी पाखर तिला शहरात कुठे दिसतं नव्हती. दिवसभर रानात चरून घरी परतनारी जनावरे… त्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज तिला इथे ऐकू येत नव्हता. डोंगरा आड जाणारा तो पिवळसर तांबूस सूर्याचा गोळा तिला इथे कुठे दिसतं नव्हता. दिसत होती फक्त रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि घाईघाईने घरी परत जाणारी माणसे. या मोठ्या शहरांतील माणसांना घाईगडबडीचा शापच असतो की काय? बघावं तेव्हा ही माणसं गडबडीत असतात. त्यांच्याजवळ जरा मोकळा वेळ नाही. प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर चालतो. हा विचार सुरू असतानाच

” सुधा… सुधा… ” अशी हाक ऐकू आली “आले….. आले…. ” म्हणत ती खुर्चीतून सावकाश उठली. हळूहळू पावले टाकत घरात गेली.

“पाणी…. पाणी.. ‌”

“आले…. आले‌…. जरा… धीर… धरा‌.. ” भांड्यात पाणी घेऊन सुधा काॅट जवळ आली. ” हंं.. आ… करा‌… ” राघवने मोठ्या मुश्किलीने आ केले. हळू हळू पाण्याचे चार घोट पाजले. जवळच्या नॅपकिनने तोंड पुसले. “अजून काही हवा आहे का? “

राघव मानेने नको म्हणाला. जवळच्या खुर्चीत बसत सुधाने ‘जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है ‘ राघवचे आवडते गाणं मोबाईल वर लावले. या गाण्या भोवती अनेक आठवणी होत्या. त्या आठवणीत हरवताच तिला डोळा लागला. दारावरच्या बेलने तिची झोप मोड झाली. तिने दार उघडले. मधु आला होता.

” काय म्हणतात आमचे यंगमन? कशी काय आहे तब्येत? ”

” आज सकाळपासून झोपून आहेत बघं. “

” आता बोलतं करतो त्यांना. बोला जेवायला काय करू? बाय द वे दुपारचा डबा वेळेत मिळतो ना? “

” तू सोय केलीस म्हटल्यावर शंका नाही. बरं गरम गरम खिचडी कर. आज तूप मेतकूट खिचडी खाऊ. तू रोज येऊन गरम खायला करतोस. गरम खायची सवय लावली आहेस तू. ‌कोणत्या जन्मीचे पुण्य केले म्हणून. तुझे… “

” उपकार पुराण चालू होणार असेल तर मी निघतो… तू… “

“मला तसं म्हणायचं नव्हतं. “सुधाच्या डोळ्यात पाणी आले. तसा मधु जवळ आला त्याने सुधाचे डोळे पुसले ” मी इतका परका आहे का? ” सुधाने त्याला जवळ घेतले. ” तू आहेस म्हणून आम्ही चार दिवस चांगले बघतं आहोत. श्री ची तर आशा केव्हाच सोडली आहे. तू त्या दिवशी वेळेला धावून आलास म्हणून हे आज दिसतात. नाही तरी… मी आज कुणाच्या तोंडाकडे बघित असते‌. “

” बोलून पोट भरणार असेल तर मी निघालो घरी. ” असं म्हणत मधु बाहेर जायचे नाटक करतो. मग स्वयंपाक घरात शिरतो.

सुधाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आज घडल्या सारखा उभा राहतो. सुधा आणि राघव बॅकेतून पैसे काढून बाहेर पडले रिक्षा घेण्यासाठी एकमेकाच्या साथीने रस्ता क्रॉस करत असताना भरधाव गाडीने दोघांना उडवले. जेव्हा शुध्द आली तेव्हा सुधा हॉस्पिटलमध्ये होती. शेजारी राघव नव्हता मधु होता. राघवच्या डोक्या मार लागला होता. शस्त्रक्रिया करावी लागली होती. मधुने आम्हीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्याच्या प्रसंगावधान मुळे आम्ही दोघे जिवंत होतो. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यानेच घरी आणले होते. स्वतःच्या मुलापेक्षा जास्त काळजीने त्याने सगळं केलं. तो घरातील प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होता. आधार देत होता. अपघात झाल्यावर श्री ला फोन केला होता. तो कुठल्यातरी महत्वाच्या प्रोजेक्टसाठी आऊट ऑफ स्टेशन होता. मला वेळ मिळाला की मी येऊन जाईन असा मेसेज त्यांनी पाठवला तेव्हा पहिल्यांदा मला असे वाटले आपण न घर का न घाट का झालो. दोष कुणाला देणार? आता बोलून उपयोग काय? गप्प बसण्या शिवाय पर्याय नव्हता. वीस वर्षा पूर्वी आपण घेतलेल्या निर्णयांचा हा परिणाम होता. ती घटना ही डोळ्या समोर ताजी झाली.

“मला वाटते आई आप्पा तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर शहरात यावं. आता तुमचं वय झालं आहे. इथं राहून काय करणार? नातवंडां सोबत राहिलात तर तुमचा वेळ चांगला जाईल. आपण एकमेकांन सोबत असू. माझ्याबरोबर येण्यात तुम्हाला काय अडचण आहे? ” श्री बाबांना शहरात येण्यासाठी तयार करत होता.

“तुझं हे म्हणणं मला पटत नाही. अरे आमचं आयुष्य गावात गेलं. आम्ही दोघे कुठे आहोत? जिवाभावाची चार माणसं आमच्या शेजारी आहेत. इथं शेतीवाडी आहे, गुरढोर आहेत. आमचं मन इथे चांगलं रमत. या गावाशी आमची नाळ जुळली आहे‌. शहरात येऊन आम्ही काय करणार? शहरात आम्हाला कोण ओळखतं? आम्ही तुझ्याबरोबर अजिबात करणार नाही. “

“तुम्ही इथं मी तिथं. माझं लक्ष तुमच्यावर कसं राहणार? मला तुम्ही दोघे हवे आहात. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप केलं. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करू दे. “

“आहो… मी काय म्हणते… श्रीच्या बोलण्याचा विचार करा. मलाही नातवंडा बरोबर राहायच आहे. ” लेकाची बाजू आईने उचलून धरली.

“तुला जायचं असेल तर तू जा. मी काही गाव सोडून येणार नाही. इथं त्याच्या वाचून आपलं काही अडत नाही. शहरात जाऊन नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ तुझ्यावर येईल‌ तेव्हा मला दोष देऊ नकोस. “असे म्हणत आप्पा घरा बाहेर गेले. आप्पांचा हा निर्णय ऐकून श्री निराश झाला.

रात्री जेवताना कोणीच कोणाशी बोलले नाही. दुसऱ्या दिवशी श्री न बोलताच निघून गेला. ही गोष्ट आईच्या जिव्हारी लागली. नवऱ्याला समजून सांगायचा प्रयत्न केला पण ते काही तयार होईनात. तेव्हा सुधाने आपले शेवटचे अस्त्र बाहेर काढले. म्हणजे अबोला धरला. शेवटी आप्पांना माघार घ्यावी लागली. शेतीवाडी घरदार विकून शहरात लेकाकडे राहायला गेले.

शहरातील एका उंच इमारतीत श्रीचा फ्लॅट होता. सर्व सुविधानी परिपूर्ण असे एक मोठे बंदिस्त घर. जमीनीशी जरा ही संबंध नाही. सुधाला, राघवला या घरात बांधल्या सारखे झाले पण मुला खातर जुळवून घेतलं. नातवा बरोबर हळूहळू आप्पांची चांगली कट्टी जमली. आई आप्पांना खुष बघून श्रीला खूप आनंद वाटला. आनंदाचं झाड आगंणात बहरलं आहे असं श्री ला वाटले.

सगळं सुरळीत सुरू असताना एके दिवशी श्री हातात बुके आणि मिठाईचा बॉक्स घेऊन घरी आला. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. तो खूप खुष दिसत होता. आल्या आल्या आई आप्पांना नमस्कार केला.

“आप्पां आज माझे स्वप्न पूर्ण झालं. मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. ऑफिस मला जर्मनीला पाठवत आहे. “

“बाळा आम्हाला तुझा अभिमान वाटतो. कमी वयात हे यश तू मिळवलंस. “असं म्हणत आईने त्याच्या तोंडावरून हात फिरवत मुका घेतला. त्याला आशीर्वाद दिला. तो दिवस खूप आनंदात गेला.

– क्रमशः भाग पहिला

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares