मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घसरगुंडी… ☆ मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ घसरगुंडी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

दुपारचा एक वाजून गेला होता. मनोजची मालगाडी लोणावळा ओलांडून कर्जतच्या दिशेने निघाली होती. मनोज गेली पंचवीस वर्षे रेल्वेमध्ये मालगाडीचा गार्ड म्हणून कार्यरत होता. मनोजने आयुष्याचा मोठा भाग घाटातल्या या रूटवर घालवला होता. येथल्या वाऱ्याचा वेग, वळणे, उतारांचे रागरंग —सगळं सगळं त्याला पाठ होतं.

आज सिमेंटच्या गोणींनी भरलेल्या ५८ वाघिणी घेऊन तो मुंबईला निघाला होता. मालगाडीच्या डब्यांना वाघीण नाव कोणी बरं ठेवलं असेल? त्याला नेहमीच गंमत वाटायची.

पळसदरी स्टेशन येत होतं, इथून कर्जत यायला साधारण पाच किलोमीटर, तिथून कल्याणला पोचेपर्यंत आणखी एक तास, मग तासाभराने ठाणे आणि आणखी एखाद्या तासाभरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गाडीचे शेवटचे स्टेशन. मनोज मनातल्या मनात हिशेब करत होता. थोडेफार सिग्नल आणि सायडिंग जरी धरलं संध्याकाळी सहापर्यंत ड्युटी संपेल असा अंदाज तो बांधत होता.

घाट संपून कर्जत ओलांडले, की मग सोबत आणलेली पोळीभाजी खावी अशी गणितं तो करत असतानाच वॉकीटॉकी खरखरली, विनेशचा – गाडीच्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू येत होता – “मनोज, वेग वाढतोय गाडीचा … ब्रेक नीट पकडत नाहीयेत बहुतेक. ”

मनोज क्षणभर थिजला.

…. घाट उतरताना ब्रेक नीट लागत नाहीयेत?

मनात थंड शिरशिरी उठली, जीवाची कालवाकालव झाली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.

दुनिया जरा जास्तच वेगाने मागे पडत होती. झाडं धावत असल्यासारखी दिसत होती.

वॉकीटॉकीवर काही सेकंदातच पुन्हा विनेशचा आवाज आला – आवाजातला कंप आता स्पष्ट जाणवत होता : “एअर ब्रेक्स प्रतिसाद देत नाहीत… डायनॅमिक ब्रेक लावतोय… पण अजून तो पुरेसा होत नाहीये. ”

मनोजने डोळे मिटले.

पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली—

…. “बिघडलेल्या ब्रेकसह घाट उतरणं म्हणजे डोंगराशी झुंज – मृत्यूशी झुंज. ”

आज ती झुंज त्याच्या वाट्याला आली होती.

मनोजने त्याच्या डब्यातील – ब्रेकव्हॅनमधील हँडब्रेकचे चक्र घट्ट पकडलं.

आणि हळूहळू, मोजक्या प्रमाणात त्याने ते चक्र फिरवत ब्रेक लावायला सुरुवात केली—

– – त्याला त्याच्या पहिल्या ट्रेनिंग ऑफिसरने शिकवलं होतं: “ब्रेक झटके देत लावू नकोस, एकदम अचानकही ब्रेक लावू नकोस….. गाडीसोबत बोल. तिच्याशी संवाद साध. ती तुला काय सांगते ते ऐक. त्यानुसार ब्रेक लाव. ”

गाडीची गती जास्त होती, हँडब्रेकचे चक्र फिरवणं कठीण होत चाललं होतं.

जोर लावून ते चक्र फिरवताना घाम फुटत होता, पण त्याने हातांची पकड सैल होऊ दिली नाही.

तिकडे रेल्वे इंजिनमध्ये, समोर, विनेश जिद्दीने लढत होता—एअर ब्रेक, डायनॅमिक ब्रेक वापरत होता, सोबत असलेली रेती ट्रॅकवर फेकत होता (सँडिंग) — मनोज आणि विनेश – दोघेही एकाच शत्रूशी झगडत होते—उतरण आणि त्या उतरणीवर गाडीचा कमी न होणारा वेग.

गाडी आता घाटात जोरात धावत होती. जिथे ताशी ६० किलोमीटरपेक्षा कमी गती असायला हवी तिथे वेग ताशी ७५ किलोमीटरच्या पुढे गेला होता.

– – वारा ब्रेकव्हॅनमध्ये चाबकासारखा घुसत होता.

– – डबे हलत होते, अडखळत होते, थरथरत होते.

मनोजचं हृदय प्रत्येक चाकासोबत धडधडत होतं.

तो हळू आवाजात पुटपुटला— “हळू धाव माझे आई, … शांत हो, … थांब ग…”

…. जणू गाडी त्याचा आवाज ऐकत होती.

विनेशचा आवाज आला – हताश, कमकुवत – “मी नाही थांबवू शकत आहे हिला, नियंत्रण सुटतंय, संपतंय सगळं. ”

मनोजचे श्वास थांबले…..

डोळ्यासमोर जीवाभावाच्या सगळ्यांचे चेहरे तरळून गेले –

सकाळी चहा करत असलेली बायको,

अजून झोपलेली मुलं,

…. आणि विनेशचाही चेहरा – विनेश आणि स्वतःला तो नेहमीच दोन डोळे म्हणायचा, “दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी” म्हणायचा. ५० च्यावर डबे, पाऊण किलोमीटर अंतर असायचं ड्रायव्हर आणि गार्डमध्ये, असायचे एकाच मालगाडीच्या दोन टोकांना, पण क्वचितच भेटायचे एकमेकांना.

मनोजने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला स्थिर केलं आणि अवसान आणून, शांत स्वरात विनेशला म्हणाला: “हार मानू नकोस. आपण दोघं आहोत. दोघं मिळून थांबवू गाडीला. तू रेल्वे कंट्रोलला सूचना दे. ”

“पळसदरी कर्जत उतारावर मालगाडीचे ब्रेक लागत नाहीयेत” – कंट्रोल रूमवर जणू विजेच्या लोळासारखी बातमी कोसळली. प्रशिक्षण, अनुभव आणि धैर्य पणाला लागलं, सिग्नल adjust केले गेले, मालगाडीच्या मार्गात सुदैवाने अन्य कोणती गाडी नव्हती, कर्जत स्टेशनपुढील गाडीचा मार्ग बदलला गेला, वाहतुकीचा अडथळा नसलेला ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला, जास्त रहदारीच्या नेहमीच्या ट्रॅकवरून सायडिंगच्या कमी वापरातल्या ट्रॅकवर गाडी वळवली जाणार होती. दोन किलोमीटर नंतर या ट्रॅकला अशा प्रसंगांसाठीच बांधलेल्या कॅच सायडिंगची तयारी होती—

कर्जत स्टेशन जवळ येत होतं, स्टेशनवर रेल्वे स्टाफ सज्ज होता, सिग्नलमन, पॉईंटमन, स्टेशनमास्तर – सगळे डोळ्यात प्राण आणून धडाडत येणाऱ्या गाडीकडे पाहत होते.

विनेश ओरडला: “वेग अजून जास्त आहे! ”

मनोजने होता नव्हता तो सगळा जोर लावून हँडब्रेक पूर्ण ताकदीने फिरवला.

हात भरून आले होते, हातांना रग लागली होती…

– – – आणि गाडीचा वेग कमी होऊ लागला….

…. खरंच कमी होत होता का भास होऊ लागले होते?

नाही, हा भास नव्हता. वेग नक्की कमी होत होता, खूप नाही, पण पुरेसा.

उतरण जणू थोडी माघार घेत होती.

कर्जत स्टेशन कधीच मागे पडलं होतं, भिवपुरी स्टेशनही मागे गेलं होतं. वेग खूप कमी झाला होता, आणि शेवटी तो क्षण आला—

डायनॅमिक ब्रेक, हँडब्रेक, सँडिंग, आणि माणसांची इच्छाशक्ती — — सगळ्यांनी मिळून त्या ५८ डब्यांच्या राक्षसी गाडीला थांबवलं होतं.

गाडी एक क्षणभर थरथरली…

आणि मग घनघोर शांतता पसरली.

मनोज थकून एका बाकावर कोसळला.

डोळ्यातून घळघळा पाणी आलं. तो वॉकीटॉकीवर कसंबसं बोलला – “वाचलो आपण…”

अधिकारी आले, तपास सुरू झाला.

ड्रायव्हरचे हात अजूनही थरथरत होते.

मनोजच्या तळहातांवर टरटरून फोड आले होते.

ब्रेकच्या घर्षणाने चाकं गरम झाली होती, पण सुरक्षित होती.

लोकांनी विचारलं—

“नेमकं कशाने वाचवलं तुम्हाला? ”

मनोज फक्त एवढंच म्हणाला—

“घाट उतरायला सुरुवात करताना नियमानुसार ब्रेकची चाचणी केली होती, तेव्हा ब्रेक व्यवस्थित होते. नंतर काय बिनसलं, माहित नाही, पण आत्ता गाडी कशी थांबली विचाराल, तर रेल्वेने केलेला ग्रीन कॉरिडॉर, विनेश – मी आणि आमची ही गाडी … आणि मुख्य म्हणजे देवाने – डोंगराने – निसर्गाने आम्हाला दिलेली एक संधी – या सगळ्यांमुळे गाडी थांबली. ”

प्राथमिक तपास पूर्ण झाला, रात्री घरी आल्यावर त्याच्या लहानग्या मुलीने मनोजला विचारलं: “बाबा, आज मी बागेत खेळायला गेले होते. तिथे एक मस्त नवी घसरगुंडी आली आहे. मी तिच्यावर खूप खेळले. झूSSम करून खाली येताना पोटात गोळा येत होता. पण मज्जा आली. तुम्ही आज काय केलंत? आज काही विशेष झालं का? ”

त्याने तिच्याकडे पाहिलं…..

घाटातला गाडीचा वेग, तो सोसाट्याचा वारा, ती भीती, ते धैर्य, आणि सरतेशेवटी थांबलेल्या गाडीचा तो शांत क्षण – आजची त्याच्या गाडीची घसरगुंडी, त्याच्या पोटात आलेला गोळा – हे सगळं सगळं क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर तरळून गेलं – तो हलकेच हसला…..

“हो, ” तो म्हणाला, “मी सुखरूप घरी आलो… हेच सर्वात विशेष झालंय आज. ”

(२७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे मुंबई घाट उतरताना, पळसदरी रेल्वे स्टेशननंतर एका मालगाडीचा वेग नियंत्रणात येत नव्हता. या सत्यघटनेवर आधारित हा लेखन प्रपंच. पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परीक्षा… ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘परीक्षा…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

” दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत..”

अजय अनिता दोघे ही एकाच college मधे शिकत होते.•• दोघे ही हुषार. त्यामुळे लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं.••••

अनिता ने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली••• मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्यांचे आई-वडील तर चकित झालेच ,बरोबर अनिता चे आई-वडील पण अनिता कडे आश्चर्याने बघू लागले ••

लगेचच अजय चे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिता चे कौतुक वाटतं की तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले.•••थोडा वेळ द्या आम्हाला .••• आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू .असं म्हणून बाबांनी परिस्थिती सांभाळुन घेतली.•••

घरी येताना सर्व शांत होते .अजय व आई खूप disturb आहे .हे बाबांच्या लक्षात आले .

घरी आल्यावर बाबा म्हणाले ••••

अरे !! तुम्ही वेगळे राहिला तर आम्हाला काही हरकत नाही .••जवळ राहिलं म्हणजेच प्रेम असत का ? अनिता चांगली मुलगी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना मागच्या पाच वर्षांपासून ओळखता. चांगली शिकलेली आहे .दिसायला सुंदर आहे. मुख्य म्हणजे तुला आवडते ना •••.मग आम्हाला काही हरकत नाही ••

.आजी मात्र नाखुश होत्या. त्यांनी एकुलत्या एक सुनेबद्दल बघीतलेली सर्व स्वप्न एका क्षणात संपल्यासारखी त्यांना वाटलं. •••.अजय फक्त ऐकत होता .••••

दुसऱ्यां दिवशी अजयने अनिताला समजविण्याचा खूप प्रयत्न केला .पण काही उपयोग झाला नाही .••••

बाबां मात्र आईला समजविण्यात यशस्वी झाले.•• मुलांच्या सुखासाठी व आनंदासाठी आई वडील नेहमीच कोणतेही निर्णय लवकर घेतात.••कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते लगेच तयारी दाखवतात .••••

आता अजय अनिता चा संसार सुरू झाला. आई बाबांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या घरातील सर्व सामान अनिता च्या पसंती ने घेतले .••अगदी चमच्या पासून फ्रीज पर्यंत सर्व वस्तू घरात तयार होत्या ••••.

दोघांची नोकरी होती. अजय आठवड्यातून एकदा घरी यायचा ••.येताना फोन करून , विचारून पिशव्या भरभरून तो आई बाबांकरिता त्यांची औषधे ,फळ ,भाज्या आणून देत असे .•••

बाबा म्हणायचे. अरे !!मग मी काय करू??? आम्हाला बाहेर जायचे कारणच मिळत नाही.•• तेंव्हा अजय हसून म्हणत असे ,•••• बाबा !! तुम्ही फक्त आईला घेऊन फिरायला जात जा.•• अनिता मात्र काही खास कारण असेल तरच यायची.•• आईला त्याचे खूप वाईट वाटत असे .बाबांना याची जाणीव होती. ते खंबीर होते .बायकोला सांभाळायची जबाबदारी पण माझीच आहे .हेही बाबांना माहीत होते .••••

बाबा म्हणजे एक प्रसन्न चित्त व्यक्तिमत्त्व .••नेहमीच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या जवळ .••• आणि आपली आयडिया कशी छान आहे ,हे त्यांना पटवून पण देता येत .••••

दोघांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. वरवरून आई खूष आहेत ,असं दाखवत जरी असल्या ,तरी कुठे तरी त्यांचे मन दुखावले होते .••••

अजय आज येणार हे कळलं की आई अगदी तयारीला लागायच्या.••• बाबा लिस्ट घेऊन आईंनी सांगितले ले सर्व साहित्य आणून द्यायचे .•••आई वेगवेगळे पदार्थ तर करायच्याच. बरोबर त्यादिवशी चा डबा म्हणून दोन तीन भाज्या, पोळ्या पण द्यायच्या••. अरे !! तेवढंच अनिताला काम कमी होईल. असं म्हणायच्या.••• नोकरी करुन सर्व करताना ती थकत असेल .••••

अनिता मात्र आपल्या विश्वात अगदी दंग होती . रमलेली होती .••आता तर project leader होती •••.त्यामुळे आनंदात होती••.पण वाढत्या कामाबरोबरच तिचा stress ही वाढत होता.••••

कंपनी मधे employees साठी कधी कधी काही कार्यक्रम आयोजित होत असतात.••• आजचा कार्यक्रम••

‘ Stress management’ वर होता.••••

अनिता ने attend केला ••.वक्ता अर्थातच तयारीने आले होते .••त्यांनी ‘ what is stress?’ त्यांचे शारीरिक व‌ मानसिक कसे परिणाम होतात. stress management करिता काय काय आपण करू शकतो?? त्याबद्दल ते बोलले .योग करणे , regular excercise करणे का गरजेचे आहे हे सांगितले .••••

आपले भाषण संपवताना ते म्हणाले तुम्ही सर्व शिकलेले तरूण अहात. पैसा , post , promotion , फक्त याचाच विचार करू नका . कुठे तरी फुल स्टोप लावायला शिका . कुठे थांबायचे ?? हे ठरवायला शिका .••••

आनंद केंव्हा घेणार आयुष्यात ?? आनंद घेणे ही वर्तमान काळातील गोष्ट असते . भविष्यात घेऊ म्हणून पूढे ढकलायची गोष्ट नव्हे..••••

Life मधे priorities ठरवायाला शिका. पैसा आणि फॅमिली दोन्ही महत्वाचे.••• freedom, privacy. च्या नावाखाली आपल्या माणसांहुन आपण दूर तर होत नाही ना . याचे भान ठेवा .•• एकटेपणा हे सुद्धा स्ट्रेस चे एक मोठे कारण आहे .•• जेंव्हा व्यक्त व्हायला कोणी विश्वासाचे मिळत नाही.तेंव्हा •• स्ट्रेस एकत्र होत जातो ••. तुमच्या या नवीन कल्चर मधे नोकरी सोडणे ,बदलणे, किंवा नोकरी जाणे, या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. •• त्यामुळे अस्थिरता व अनिश्चितता या दोन्ही तलवारी सतत टांगलेल्या असतात तुमच्या आयुष्यात .• निश्चित काही गोष्ट असेल तर ती तुमची फॅमिली आहे .••तो तुमचा आनंद आहे. तेंव्हा विचार करा.••

तुम्ही त्या सर्वांबरोबर जीवापाड तडजोड करता जे निश्चित नाही .•••मग परिवार बरोबर का नाही ??? ती तर जास्त सोपी व सहज गोष्ट आहे .ओझ आणि मन हलकं करायला परिवारासारखी दुसरी सेफ जागा नसते.••• तुमचे कौतुक करायला व तुम्हाला, तुमच्या मुलांना सांभाळायलाही कोणी तरी पाहिजेच ना.••••

माझ्या भाषणात हा उल्लेख मी सर्वात शेवटी जरी केला असला ,तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे .•• हे लक्षात ठेवा .••••

अचानक अनिता च्या डोळ्यासमोर अजय च्या आई बाबांचा चेहरा आला .••त्यांनी पाठविलेले डबे ,वेळोवेळी घेतलेली काळजी तिला आठवली .•••

अनिता घरी आली ती वेगळ्याच विचारात.•• येताना तिने बाबांना फोन केला ••.अजय ला पण सुट्टी घ्यायला सांगितले .••••

अनिता अजय उद्या घरी येतायेत . बाबांनी आईंना सांगितले .दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह??? होते. मिश्रीत भाव होते.•••

बाबा म्हणाले अग !! उद्या अनिता च्या आवडीचा स्वयंपाक कर.••••

दुसऱ्या दिवशी अजय अनिता घरी आले. अनिता ने आई बाबांना सांगितले ,•••

आम्ही येथे तुमच्या बरोबर रहायला येणार आहोत नेहमी करिता .,••

अजय ,आई बाबा पुन्हा एकदा आश्चर्य चकित झाले.•• पण यावेळी मिळणारा धक्का सुखद होता.•••

बाबा म्हणाले •••••

“Yes , you are always welcome .”

फक्त मला पंधरा दिवस द्या. तुमची खोली व्यवस्थित करायला .,••• आई नी बाबांकडे बघीतले , त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व बाबांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.••• .

” दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत. .”

‘संयम ‘आणि ‘माफ करायची ताकद ‘ मनुष्यात असली की सर्व साध्य होते .•••

इतरांकडून कमीत कमी ‘अपेक्षा ‘ व स्वतःकडून जास्तीत जास्त ‘तडजोडी :या दोन गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात .••••

” चुकीने चूकीच्या मार्गावर गेले तर काही हरकत नाही .पण चूक लक्षात येताच मार्ग बदलायची इच्छा व हिम्मत दाखविणे हे कौतुकास्पद आहे .”••••

म्हणतात ना •••••

“जिंदगी हमें हमेशा एक नया पाठ पढ़ाती है — हमें समझाने के लिए नहीं — हमारी सोच बदलने के लिए. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

– एक बोधकथा

आजी तिचं आयुष्य तिनं केलेल्या आयुष्याच्या नियमाप्रमाणे जगली. सत्तरीत फुलांचे हार करून देवाला घालताना ती सुईत दोरा कसा ओवू शकायची हे तिचं तिलाच माहित! पोथी वाचताना डोळ्यातून आसवं का गाळायची हे पण तिचं तिलाच माहित. कामाच्या सरूबाईचा काळा निळा झालेला दंड बघून “सरू, सोड त्याला आता” म्हणून कडाकडा बोलताना ती रागवायची का हळवी व्हायची हे पण तिचं तिलाच माहित!

काही का असेना.. तिच्यातील सच्चेपणा मात्र प्रत्येकाला जाणवत असे. स्वत:ला जे पटतं तेच करण्याची तिची जी धडपड चाले ती बघून घर दार थक्क होत असे. वयाला तिनं कधीच प्राधान्य दिलं नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हा गाढा विश्वास तिच्याजवळ होता. वर्तमानपत्रात “तुमची आजी” सदर लिहणे काय, पंचाहत्तर वर्षाला स्पॅनिश भाषा शिकणं काय किंवा कराटेचा क्लास लावणं काय.. सारं तिला शोभून दिसायचं.

तिनं स्वत:च्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं की कुठल्याही परीस्थितीत मला हॅास्पिटलमध्ये नळ्या जोडलेल्या अवस्थेत ठेवू नका. काय वाट्टेल ते झालं तरी. मी माझं आयुष्य माझ्या पध्दतीने जगले आहे आणि माझा मृत्युपण मला हवा तसाच यावा अशी माझी इच्छा आहे! नैसर्गिक पणे येणारा मृत्यु शरीर सुध्दा फार त्रास न होता स्वीकारतं अशी तिची खात्री होती.

आता आजी ऐशीला टेकली होती. पण मनाने वाकली नव्हती. हल्ली शरीर मात्र तिच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला दाद देत नव्हतं.

एक दिवस सकाळी रोजनिशी लिहित बसलेली असताना ती अचानक जमिनीवर कोसळली…त्या आवाजाने मुलगा व सून धावत आले! त्यांनी क्षणभर विचार केला व तिला ॲंब्युलन्स बोलवून जवळच्या हॅास्पिटलला नेले.

डॉक्टरांनी त्वरीत उपचार करून अर्धांगापासून होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराची उजवी बाजू पहिल्यासारखी होऊ शकली नाही.. जीव मात्र वाचला होता.

आजी शुद्धीवर आली व स्वत:ला नळ्या जोडलेल्या स्थितीत हॉस्पिटल मधल्या ICU मधे बघताच तिला हे स्वप्न असावं असं वाटलं. तिने स्वत:ला एक चिमटा काढला.. आणि हे स्वप्न नसून सत्य आहे याची तिला जाणीव झाली.

ती भडकली…

मुलगा येताच त्याला म्हणाली, “माझी काय इच्छा होती तुला माहित होतं.. पक्कं माहित होतं. माझ्या व ईश्वराच्या भेटीच्या आड येण्याचा अधिकार तुला कोणी दिला? ”

“अग आई, तू कशामुळे पडलीस हे तरी बघायला नको का? बघ उजवा हात नीट चालत नाही या व्यतिरिक्त तू ठणठणीत आहेस. ” मुलगा काकुळतीला येऊन बोलत होता. “आई, तुला वैद्यकिय उपचार दिले नसते तर तू कदाचित पूर्ण लुळी पांगळी झाली असतीस. त्याचा तुला किती त्रास झाला असता सांग बरं! ” मुलगा समजूत काढत होता.

आजी काही बोलली नाही. ती घरी आली पण घरी आलेली व्यक्ती आजीपेक्षा कुणी वेगळीच होती. रोजनिशी लिहिण्यासाठी हात वळत नव्हता.. प्रसादाचा शिरा अन् खमंग परतलेल्या बेसनाचे लाडू शेजारी पाजारी पाठवता येत नव्हते.. सुईत दोरा ओवता येत नव्हता आणि पोथी वाचण्याआधीच आसवं गळत होती.. तिच्यातलं चैतन्य हरपू लागलं होतं.. ती शुन्यात बघत अंथरुणात पडून रहात होती..

एक दिवस अशीच नैराश्यात पडून असताना तिनं खिडकीतून बाहेर बघितलं.. तीन पायावर चालणारा कुत्रा बघून तिला कौतुक वाटलं… फारसं उडता न येणारा एक पक्षी बागेत थोडं थोडं उडून चारा गोळा करत होता.. नातवानं त्याच्या फोनवर हात नसलेला माणूस पायाने लिहताना दाखवला…

स्वत:चं दु:ख कुरवाळत बसणाऱ्या मनाचा तिला राग आला. आपण कोणी न्यारे नाही! झाडाची फांदी तुटते, पक्षी उडू शकत नाही, कुत्र्याचा पाय तुटतो पण म्हणून ते काही निराश होऊन पडून रहात नाहीत. याच निसर्गाचा आपण एक भाग आहोत. शरीर नाशवंत आहेच! पण मी म्हणजे माझं शरीर नाही!

ती उठली व पूर्वीसारखी तयार झाली.. सुनेनं आश्चर्याने तिच्याकडे बघितलं..

तिनं रोजनिशीची वही घेतली.. डाव्या हातानं रोजनिशी लिहायचा प्रयत्न चालू केला. वेडीवाकडी लहान मुलासारखी लिहिलेली अक्षरे बघून मनापासून हसली.. तिनं ठरवलं की डाव्या हातानेच इतकं सुंदर लिहायचं की सर्वांनी बघत रहावं. एकदा मनाने घेतलं की शरीर पण साथ देऊ लागतं.. डाव्या हाताने परत एकदा श्रीगणेशा सुरू झाला.. जशी अक्षरं सुधारू लागली तशी तिच्या डोळ्यातील चमक वाढू वागली.

तिनं मुलाला जवळ बोलावलं.

“तुझं काही चुकलं नाही रे! माझी आई अशी पडली असती तर मी पण तिला लगेच डॅाक्टर कडेच नेलं असतं.. तू नाही आलास माझ्या व ईश्वराच्या मधे.. अजून ईश्वराला भेटायची वेळ आलेली नाही. रागाच्या भरात बोलले मी.. माफ कर मला! ” मुलाच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसत ती त्याला म्हणाली, “ज्या वयात उद्याची खात्री नाही त्या वयात सहा महिने मी नैराश्यात वाया घालवले! ”

तिनं वर्तमानपत्रात पाठवण्यासाठी लेख लिहायला घेतला..

मृत्युला सामोरं जाताना..

नुकतीच मी वर जाऊन दार ठोठावून आले आहे. परत आले म्हणून चार गोष्टी सांगते.. अर्धांगाचे निदान झाले आणि माझे मन भरकटले.

कसं मरण हवं असतं माणसाला? शांत, भीतीरहित, झोपेत, नकळत! डॉक्टर नको, हॉस्पिटल नको, नळ्या जोडलेल्या नकोत, व्हेंटिलेटर नको वगैरे लिहणं सोपं असतं.. पण खरी इमर्जन्सी जेव्हा उद्भवते तेव्हा आपण कुठलाच निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसतो.. अशा परिस्थितीत आपला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला पुढचे निर्णय घेण्यासाठी नेमा. तुमचं मन वाचणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी यासाठी हात पाय धड असताना सतत प्रयत्न करा. मुलगा, सून, नातवंड यांच्याशी अत्यंत विश्वासाचं नात आधीच निर्माण करा.

त्यानंतर मात्र जे घडेल तिच देवाची इच्छा होती हे समजून घ्या.. पण इतरांवर व स्वत:वर रागवण्यात वेळ घालवू नका..

शरीर नश्वर आहे. असेना का! शरीराला झाली इजा, मला नाही हे सतत स्वतःला सांगा.. तुम्ही म्हणजे तुमचे शरीर नाही. तुम्ही म्हणजे तुमची अर्धांगाने लुळी पडलेली बाजू नाही आणि तुम्ही म्हणजे तुमच्या व्याधी नाहीत हे समजून घ्यायचा प्रयत्न करत रहा.

जे त्याने दिले ते घ्यायचे व त्यातील सौंदर्य शोधायचं! मला कधी वाटले नव्हते की डाव्या हाताने मी लिहू शकेन.

आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं असतं.. राग, लोभ, हेवे दावे, मान-अपमान यात वाया घालवायचं नसतं!

काल मी तीन पायावर चालणारा कुत्रा बघितला. तो नाही हो रडत बसत. तो उठून अन्नाच्या शोधात हिंडत होता मग आपण आपल्या शरीराकडे बघून का रडत बसायचे?

आलेला दिवस आनंदात घालवा. सांभाळून रहा.

– तुमची आजी

तिनं पेन बंद केलं व सुनबाईला सांगितलं, “आज मी शिरा करते ग.. नैवेद्याला! जमेल मला डाव्या हाताने करायला!

 

लेखिका : ज्योती रानडे

प्रस्तुती :  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

आज अस्मी खूप खूश होती. कारण पण काही साधेसुधे नव्हते. आज जवळ जवळ सात ते आठ महिन्यांनी तिचे आई बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे राहायला येणार होते. हल्ली वयाच्यामुळे तिच्या आई वडीलांच्या दुखण्यांना सुरूवात झाली होती. ते काय कोणाच्या हातात नसते असे अस्मी त्यांची समजूत घालण्यासाठी म्हणत असे. आज खूप दिवसांनी ते लेकीकडे येणार होते. मागील २-३ दिवस अस्मीचे ते दोघे आल्यावर काय काय करायचे, काय काय बनवायचे ह्याचा विचार करण्यातच गेले होते. अस्मी त्यांची वाट पाहत होती. अव्दैत तिचा नवरा थोड्या वेळापूर्वी कामावर गेला होता.

काही वेळातच बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी थांबल्याचा आवाज आला. आले वाटत आई बाबा असे म्हणत चार -पाच वर्षांच्या मुलीप्रमाणे धावत ती बाहेर आली. आई वडिलांना पाहून ती आनंदीत झाली. सगळे घरात आले. दोघांना फ्रेश व्हायला सांगून ती किचनमध्ये गेली. बाबांना आवडतात म्हणून तिने सोयाबीनचे कटलेट व गोडाचे आप्पे स्वयंपाक करायला येणार्‍या शालिनीबाईंना हाताशी घेऊन बनविले होते.

उकाड्याचे दिवस असल्याने तिने आवर्जून कैरी साखरेचे केशर घालून पन्हे बनविले होते. सर्व पदार्थ ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवून ती ट्रे घेऊन हाँलमध्ये आली. आई बाबा फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसले होते. लेकीने आपण येणार म्हणून ठरविलेला बेत पाहून ते खूश झाले. एकेका पदार्थाचा आस्वाद घेताना दोघेही तिच्या पाककलेची स्तुती करत होते. आपली लेक केवढी समजूतदार आहे या विचाराने ते थोडे गहिवरले. त्यांनी केलेल्या कौतुकाने तिला पण जरा भरून आले. मध्येच तिने अव्दैतला कामावर फोन करुन आई बाबांच्या घरी पोहचल्याची बातमी दिली. पलिकडून त्याने पण त्यांच्या येण्याचा झालेला आनंद बोलण्यातून दाखविला होता. तो सी. ए. होता. तिथे जवळच त्याची स्वतःची फर्म होती. मी आज लवकर येतो असे सांगून त्याने फोन ठेवला. सांगितल्याप्रमाणे अव्दैत संध्याकाळी नेहमीपेक्षा खूपच लवकर आला. फ्रेश होऊन तो पप्पांशी गप्पा मारायला तयार झाला. त्यांच्या गप्पा रंगात आल्यावर अस्मीची आई लेकीला मदत करायला किचनमध्ये गेली. बाबा व अव्दैत ह्यांचे विचार एकमेकांशी सुसंगत होते. त्यामुळे ते दोघे तासनतास गप्पांमध्ये रंगून जात असत. लेकीकडे आल्यावर जावयाशी गप्पा मारणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी कामावर जाताना संध्याकाळी लवकर येतो असे सांगून अव्दैत कामावर गेला. मी घरी येईपर्यंत संध्याकाळी तुम्ही तिघे निसर्ग तलावाच्या तिथे असलेल्या राधाकृष्णमध्ये जाऊन या, असे त्याने अस्मीला सांगितले. त्याला चांगलेच ठाऊक होते की तिथले दहीवडे हा बाबांचा विक पाॅइंट होता. अव्दैत घरी येईपर्यंत अस्मी व तिचे आई बाबा तिथे जाऊन आले.. अव्दैतने घरी येताना सर्वांसाठी नाटकाची तिकीटे आणली होती. नाटक पाहून झाल्यावर तिथे जवळच जेवण उरकून ते घरी परतले. बाबा व आई थोडे दमले होते तरी खूश दिसत होते. दुसर्‍या दिवशीच्या जेवणात अस्मीने शालिनीबाईंना सांगून चुलीवरच्या मटण व भाकरीचा बेत केला होता. त्यांच्याकडे किचनचा ताबा सोपवून अव्दैत बाहेर पडल्यावर अस्मी त्या दोघांना घेऊन त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडली. चांगले ३ ते ४ तास खरेदी करून ती दोघे मात्र दमली होती. पण खरेदी करण्याचा उत्साह त्यांना दमून देत नव्हता. घरी आल्यावर लेकीने केलेला जेवणाचा बेत पाहून दोघेही भारावून गेले. मनाची ती अवस्था बाजूला करून बाबांनी विचारले, ” अस्मी राणी! अजून काय काय करून खाऊ घालणार आहेस ह्या आई बाबाला? ” तिला आठवले की बाबा खूश झाले किंवा भावूक झाले की तिला नुसते अस्मी न म्हणता अस्मी राणी म्हणत असत.

लवकरच आई बाबांचा घरी जाण्याचा दिवस उजाडला. अव्दैत व अस्मीने मिळून त्या दोघांना आणखीन काही दिवस राहण्यासाठी खूप आग्रह केला. पण आई बाबांनी त्यांच्या आग्रहाला जास्त उचलून धरले नाही. त्यामुळे अस्मी थोडी नाराज झाली. अव्दैतने तिला समजावले. आपल्या खोलीत आई व बाबा आपल्या सामानाची बांधाबांध करू लागले. अस्मीला न सांगताच अव्दैतने आईसाठी उंची साडी तर बाबांसाठी एक सिल्कचा झब्बा आणला होता. दोघांच्या वयाला अनुरूप असे रंग त्याने त्यांच्यासाठी आणले होते. त्यांच्या खोलीत जाऊन त्याने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या आणि म्हणाला, ” पाहून सांगा जरा तुम्हाला आवडल्या का? “अस्मी आणि अव्दैत त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. दोघांनाही खरेदी खूप आवडली. ” ह्याची काय गरज आहे? ” अस म्हणायला मात्र ते विसरले नाहीत.

पुढल्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघांनी आपले आवरले व अस्मीने बनविलेली इडली सांबार खाऊन दोघांनी आपापल्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या. अव्दैत आज कामावर जरा उशीराच निघणार होता. आई बाबांच्या येण्याने आनंदी झालेली अस्मी आज कावरीबावरी झाली होती. गाडीपाशी थांबून सगळे एकमेकांना निरोप देत होते. झटकन पुढे होऊन अव्दैतने आई बाबांसाठी गाडीचा दरवाजा उघडला. दोघे गाडीत बसल्यावर त्याने तो हळूच बंद केला. बाबांनी त्यांच्या बाजूची काच खाली करून अस्मीला म्हटले, ” चल आता आम्ही निघतो. तुमच्याकडे येऊन खूप छान वाटले. चार दिवस कसे पटकन निघून गेले ते खरच कळलेसुद्धा नाही. पोरी किती केलेस तू आमच्यासाठी या चार दिवसांत. आमच्या दोघांचे तू आईच्या मायेने माघारपणच केलेस. ” त्यांच्या ह्या बोलण्याने अस्मीच्या नकळत तिच्या डोळ्यांतील अश्रू चटकन तिच्या गालावर उतरले. त्यांचे बोलणे तिला नकळत मोठेपणा देऊन गेले होते. बाबांच्या नजरेतून तिचे अश्रू लपले गेले कारण नेमकी त्याचवेळेस त्यांनी गाडीच्या खिडकीची काच वरती केली होती.

अव्दैतचे सहजच बाजूला उभ्या असलेल्या अस्मीकडे लक्ष जाताच तिला विचारले, ” काय ग, रडतेस की काय? ” तेव्हा तिने तेवढ्याच सहजपणे त्याला सांगितले, ” काही नाही रे काहीतरी डोळ्यात गेल्यासारखे झाले त्यामुळे डोळ्यात पाणी आले इतकेच. ” अव्दैत काय समजायचे ते समजला.

☆

© अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ पूर्तता… – लेखक – श्री पराग दामले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

आज काकू चकचकीत तयार झाल्या, ठरवून ठेवलेली साडी, चपला, पर्स, हातात घड्याळ… घरात सांगून ठेवलं, येते जेवणाच्या वेळेपर्यंत… खाली उतरल्यावर रिक्षाला हात केला, रिक्षावाल्याला सारसबाग सांगितलं… कोथरुडधून, नळ स्टॉप, म्हात्रे पूल, शास्त्री रोड, निलायमचा चौक, आणि मग सारसबाग… रस्त्यावर थांबून लांबून दर्शन घेतलं… सणस ग्राऊंडला एक फेरी मारली… एक भेळ बांधून घेतली… आता पार्वती पायथा… पायथ्याशी गेल्यावर एक क्षणभर थांबून वरच्या देवळाकडे बघितलं आणि पुन्हा म्हणाल्या आता संभाजी बाग… रिक्षावाला थोडा प्रश्नार्थक नजरेने आरशात बघत होता… काकू रिक्षातून उतरल्या सुद्धा नाहीत आणि आता दुसरी बाग… संभाजी बागेतल्या एका गेटमधून आत जाऊन दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले… आता शनिवार वाडा, रिक्षावाला बुचकळ्यात पडला होता… बर गि-हाईक तर चांगलं मिळालं आहे, मग तक्रार तरी कसली करायची? … जायचंय तर नेऊ…

शनिवारवाड्याशी आल्यावर दरवाजासमोर गेल्या, पटांगणाकडे एकदा बघितलं.. खारेदाणेवाल्याकडे जाऊन एक पुडी घेतली, पुन्हा रिक्षात बसल्या… आता मात्र रिक्षावाल्याच कुतूहल प्रचंड वाढलं.. विषय काढायचा म्हणून विचारलं, “काकू तुम्ही पुण्यातल्याच का? “, , , , , , ,

“हो, का रे? “…

“सहज विचारलं. “, , , , , ,

“अगदी लहानपणापासून की लग्न झाल्यावर आलात? “, , , , ,

“अरे, मी जन्मापासून पुण्यात आहे…

आता तू ५४६ नारायण पेठेत चल… “

काय बरं असेल तिकडे? रिक्षावाला मनात म्हणत होता.. अगदी बाहेर ऐकू येईल इतकं जोरात मन बोलत होतं, , , , , ,

काकू पुढे बोलायला लागल्या, “अरे माझं माहेर तिथे होतं पूर्वी… “

“ओहहहह, तिकडे सीताफळबाग कॉलनीमध्ये नदीत आम्ही मासे पकडायला यायचो… “

“हो, तिथे एक गोठा आहे, मुलं दिसायची आम्हाला मासे पकडताना… माती गणपतीपाशी दीपमाळ होती, त्यावर दिवे लावले जायचे… कबीर बागेत खेळायची सगळी मुलं… “

बोलता बोलता माती गणपती आला… ५४६ नारायण पेठ आली, काकू उतरल्या, नवीन बिल्डिंग झाली होती, त्याच्या भिंतीला हात लावला… क्षणभर डोळे ओले झाले, म्हणाल्या, “चल आता पुन्हा कोथरूडला.. ” रिक्षावाल्याला आता प्रकाश पडला.. …. काकूंच्या जुन्या आठवणी ताज्या करायला म्हणून इतकी फिरस्ती झाली…

कोथरूडमध्ये घराशी उतरल्यावर मीटरकडे बघत पैसे सांगितले काकूंनी नोट काढून दिली… त्याने साहजिकच विचारलं, “मला चांगलं गि-हाईक मिळालं, चांगला धंदा झाला, हे सर्व ठीक आहे, , , , , पण इतकं आठवणीसाठी कोणी फिरत नाही हो.. “

“तस नाहीये रे… लहानपणी आमचे बाबा आम्हाला या सगळ्या ठिकाणी सायकलवर घेऊन जायचे, काहीवेळा तर आम्ही चालत जायचो… तेव्हा मी हट्ट करायचे, रिक्षातून जाऊ… बाबा म्हणायचे, चालल्यामुळे तब्येत छान राहते, भूक छान लागते… दोघात खाल्लेली एक भेळ सहज पचून जाते… पण कळत्या वयात समजलं की रिक्षाला खूप पैसे लागायचे, म्हणून बाबा चालत किंवा सायकलवर न्यायचे… आता यजमान स्कुटरवर नेतात, मुलं मोठी झाली, ती पण नेतात, यात माझं रिक्षात बसून फिरायचं स्वप्न तसच राहून गेलं होतं…

ते म्हणतात ती काय ती ” बकेट लिस्ट ” ओसंडून वाहात होती… होईल रिकामी हळू हळू, पुन्हा भरण्यासाठी… “

– – ऐकून रिक्षावाला स्तब्ध झाला… म्हणाला, “खरंय हो. ” त्याचं स्वप्न आठवून म्हणाला, “आकाशात विमान दिसलं की मला पण वाटतं, कधीतरी विमानात बसून, उंचावरून पुणं बघता येईल… बघू कधी स्वप्न पूर्ण होईल.. स्वप्नाचा पाठलाग मी नक्की करीन…

स्वप्नपूर्तीला वय नसतं… “

लेखक : श्री पराग दामले

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – ३ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

☆

(“बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”) 

इथून पुढे – – – 

तिथून फुडं दरवर्षी संत बहिणाबाई पोथी पारायन सुरू झालं. नंतर मातुर कुटलीबी घटना घडली नाय. त्यामुळं हळूहळू गावाचा ईस्वास पारायनावर बसला आनि जोमाने उत्सवाप्रमानं अत्यंत उत्साहात पारायन सुरू राहिलं. चार वर्षं झाली. यंदाचं पाचवं वरीस. पारायन सुरू झालं. दोन दिस झालं आनि अचानक कोल्हापूरहून मोतीलाल शेटजी गाडीतून गावात आले. त्यांचं चार पिढ्यांपूर्वी गावाशी नातं हुतं. गावात दुकान हुतं. पन पोरं बाहेर पडल्यामुळे दुकान तेंव्हाच बंद पडलं हुतं. रहातं घर पूर्वीच विकलं हुतं. दोन पिढ्या कोल्हापुरात राहून गडगंज झाल्या हुत्यात्या. सगळं येवस्थित हुतं. त्यास्नी वंशाला दिवा हवा म्हनून कुनीतरी सांगितलं, गावाकडं दान धर्म करायला होवा. त्यांना गावाचा ठावठिकाना लागला आनि त्यांनी ईचार केला की, आपलं पूर्वज जिथं रहात हुतं ते गाव तर पाहून यिऊ. तिथंच काही मदत करता आली तर पूर्वजांची आठवन म्हनून करू. मंडप पाहून शेटजींनी कार्यक्रमाची समदी इचारपूस केली. आता काय चाललंय इचारलं. पाटील, पंच, बाबा सर्वांच्या गाठी घेतल्या आनि समद्या गावकर्ऱ्यांफुडं जाहीर केलं की, मंदिर बांदायला सुरुवात करावी. मी लागल इतका दगड कोल्हापूरहून आननार हाय आनि मंदिराला दान करनार हाय.

बाबांना लई आनंद झाला. देवीनंच सुरूवात करून दिली. आता मंदिर होनार टप्प्याटप्प्यानं. फुडच्या वर्षात बाकी देनग्या गोळा केल्या. लाखभर रूपय जमा झालं. मंदिराबरोबरच समोर नंदी, तुळस सर्व काम झालं. रंगकाम झालं. मंदिर दिमाखात हुबं राहिलं. एक दिस कळस बसवावा आनि होमाचा कार्यक्रम करावा असं ग्रामपंचायत मिटींगमधे ठरलं. त्याप्रमानं बाबांनी पंढरपुरातून संन्यासी धुंडामहाराजांना निमंत्रित केलं. त्यांच्या हस्ते कळस बसवावा असं ठरलं. सांगलीतून कळस आनला. एका शुभ दिशी धुंडामहाराज आले. पालकी प्रदक्षणा झाली. पाच जोडप्यांनी मिळून होम केला. देवीची पूजा केली. पंचामृत स्नान झालं. देवी सजली. तेजस्वी दिसायला लागली. महाराजांनी कळसाचं पूजन केलं आणि मंदिरावर चढून कळस बसवला. खाली उतरले. सर्व विधी यथासांग झाले हुते. आता महाराजांनी प्रवचनाला सुरूवात केली.

“लोकहो, आपन सर्वांनी मंदिर बांदायचा पवित्र विचार केला. त्याला देविनं दुजोरा दिला. चार वर्षं आपल्याकडून सेवा करवून घेतली. आपल्याला देविनं खूप अनुभव दिले. परीक्षा पन बघितली.

सर्जाला इजा बी झाली. बरा बी झाला. हीच मोठी परीक्षा हुती. तिथं तुमी थांबला असता. पारायन थांबवलं असतं तर तुमी नापास झाला असता देविच्या परीक्षेत पन तुम्ही धीर धरला. देवीवर ईस्वास ठिवला. यालाच “श्रद्धा” म्हनतात.

ती तुमी दाखिवली. देविने ती पाह्यली. देवी प्रसन्न झाली. तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ही श्रद्धा पुना कदीबी डगमगू दिऊ नका. म्हनजे प्रत्येकाचे जन्माला येऊन सार्थक झाले म्हनता यिल. ”

“आता महत्त्वाचा ईषय हाय. आपल्या गावातील भुलाबाईचा. ती हाय का इथं? ”असे म्हनून महाराज लोकांकडे पहायला लागले. ती लांब हुबी राह्यली हुती. कुनीतरी तिला बोलावलं आणि फुडं आनलं. महाराज म्हणाले, ”भुला, ये बाई फुडं. आता मला सांग, तुझ्या अंगात येतं म्हन्जे काय हुतं ते सांगता यील का? ”

भुला म्हनली, “महाराज ढोलकी वाजली की काय तरी हुतं. मेंदूला बाकी कायबी कळत न्हाय. निस्त कामातनं गेल्यावानी हुतं. कशाचीबी सूद रहात न्हाय. म्यां येकदमच नाचायला लागते. मला काय बी कळत नाय. बाया ईचारतात एकेक प्रश्न पन म्यां मला वाटतंय ते सांगते. बाया माझी वटी भरत्यात. साडी, कापडं जमा हुत्यात. पैसं देत्यात. माजा प्रपंच चालतो. मला महत्त्व देत्यात. मी कुटंबी चोरी केली नाय बगा. आईची सेवा करते”

महाराज म्हणाले, “भुला, देवी दिसती व्हय तुला? ” “नाय बा”

“मंग तू मंदिर बांदू नका हे कसं सांगितलंस? ”

“आवं, पूर्वापार अनुभव हाय. कुनाकुनाच्या सपनात देवी ईती. मंदिर बांदन्यापेक्षा शेवा जास्त झाली तर पुन्याईपन वाढल आनि देविच्या वाटला बी नगं, श्रापबी नगं म्हनून म्या तसं सांगितलं. ”

“बरं, या दोन दिसांत तुझ्या अंगात का आलं नाही? ”

“आवं, ढोलकी कुटं वाजली? ”

असं म्हनताच समदीकडं एकच हशा पिकला. भुलाबाईला कळंना का हसत्यात. ती कावरीबावरी झाली. तिला सन्मानाने व्यासपीटावर आनलं.

महाराज म्हनाले, ” पाटील आणि पंचहो, आपल्या गावातील मानसांच्या ईकासातही आपन लक्ष घालायला हवं. निसत्या इमारती, मंदिर बांदून ईकास कसा हुनार? लोकहो, अंगात का येतं तर ज्या मानसाकडं कुनी लक्ष देत नाय, ज्या मानसाला जगन्याचं साधन नसतं, त्याला वाटतं का नाही की माझ्याकडं लक्ष द्यावं, मला जगायला साधन हवं. त्याची काय चूक? त्याच्या मेंदूत चलबिचल हुते. मानसिकता बिगडते. आनि कायतरी वाजायला लागलं की ही मानसं घुमायला लागतात आनि विच्छा पूर्न करून घेतात. ”

पाटलानं हात जोडलं, “चुकलं महाराज. आता काय करू आमी? तुमीच सांगा”

“आता असं करा, या भुलाच्या जगन्यासाठी समद्या गोष्टींची येवस्ता करा. आता पहिली गोष्ट, सर्वांनी भुलाबाई म्हन्जे देविच जनू, या देविच्या घराची डागडुजी करा. तिला झेपेल ते काम द्या. ग्रामसेविका, शिपाई असं काय बी करा. ती जगेल आनि नीट राहिल. महिला सक्षम करा म्हनत्यात म्हन्जे आनखी तरी काय? ”

भुलाबाईनं अश्रूंचा अभिषेक महाराजांच्या पायावर घातला. तिला साडी चोळी करून सन्मानाने घरी पाटविले.

या गोष्टीला एक वरीस झालं. धुंडामहाराज पुन्यांदा बघायला आले आणि पारायनालाबी. त्यावेळी भुलाबाई सर्वांत फुडं वाचायला बसली हुती. नीट नेटकं आवरून चापून चोपून साडी नेसून वाचत हुती. तिच्या घराची डागडुजी बी झाली हुती. दुपारी प्रसाद वाटप झाल्यावर तिनं महाराजांना घरी येन्याची इनती केली. महाराजांनी घर पाहिलं. टुमदार घर पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी भुलाला आशीर्वाद दिला. एक मुलगी सक्षम झाली. संत तुकारामांचा अभंग त्यांच्या मनात रूंजी घालू लागला. “जे कां रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले||तो चि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा||अभंग गुनगुनत समाधानातच ते पंढरपुरला परत आले. अशारितीने देवीच्या निमित्ताने अंधश्रद्धा दूर होन्याबरोबरच गावात महिला सक्षमीकरण सुरू झाले.

 – समाप्त –

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – २ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

☆

(त्यांनी सर्व सोसलं. त्यांना मारन्याच्या नादात वासरालाबी मारलं. वासरू गेलं. त्या आजारी हुत्या, काय बी लक्ष दिलं नाही. पन गंमत म्हनजे नवरा घरातून निघून लांब जायला बगायचा. गेला की त्योच आजारी पडायचा. असं तीन चारदा झालं.) 

इथून पुढे – –

बिचारीनं नवऱ्याची लई शेवा केली. द्येवाची भक्ती केली. नवऱ्याला नंतर चूक कळली आन् त्यानं माफी मागितली, पुना दोघांनी लई झ्याक संसार केला. हेच ते महाराज सांगत हुते. लई मोटी कथा हाय. नीट वाचू कदीतरी. ”असं बोलून त्यानं इषय थांबवला. लिहिन्याचं काम आटवडाभर चाललं. पोथी परत करून ते बहुल्याला परत आले. आता छापील प्रती तयार करायचं काम. ते पोलिस पाटलानं उचाललं. शंभर प्रती लगोलग कराडास्न छापून आनल्या. पोथीची गावातून मिरवनूक निघाली. सर्वांनी भक्तिभावाने आईला आनि पोथीला हात जोडलं. ”आई, होऊ दे गं बाई तुजं मंदिर. ”आई पत्र्याच्या शेडमधे असते हे कुनालाच पहावत नव्हतं. बाया बापड्याही श्रद्धेनं सर्व शेवा करत हुत्या.

 पारायनाचा आटवडा निश्चित करण्यात आला. तयारी पूर्न झाली. पारायन सुरू झालं. समदी मंडळी वाचाया बसली. चार दिस झालं. पाचवा दिस उजाडला. सकाळची लगबग, तयारी सुरू होती.

तवर गन्या धावतपळत आला आन् म्हनला, “आवं बापू, तात्या, गुरजी कळलं का तुमास्नी पाटलाच्या सर्जाला बैलांनं मारलं म्हनं” 

हे ऐकताच जो तो आ वासून पाहू लागला. पळापळ झाली. समदी मंडळी निघाली वाड्यावर. खरंच, पाटलाचा तरणाबांड लेक सर्जा पडला हुता जमिनीवर. पाटील डोकं धरून बसला हुता. पाटलीन रडत हुती. त्याचं असं झालं हुतं, बैलाला नेहमी परमानं वैरन टाकायला सर्जा गेला हुता. त्याचवेळी नवीन गडी शान मागं सारत हुता. निशाण बैलाला तो काय वळखला नाय. तो जोरात हिकडं तिकडं करायला लागला. सर्जा त्याला हो हो म्हनून हाकारत हुता. पण चवताळलेल्या निशाणानं एकदम मान हलवली आन् नेमकं टोकदार शिंग लागलं सर्जाच्या खांद्याला. सर्जा कळवळून खाली पडला. बरं तर बरं निशाण्याला बांधलं हुतं.

 सर्जाला वेदनेनं मूर्च्छा आली. पाटलाला काय करावं कळंना. काही जाणकारांनी तालुक्याच्या गावची ॲम्ब्युलन्स बोलावली. सर्जाला घेऊन दोन चार जन तालुक्याच्या मोठ्या डॉक्टरकडं गेले.

 गावात वातावरन गंभीर झालं. आई निनाईचा कोप झाला का काय असं वाटून जो तो मंदिरात गेला. सर्जासाठी प्रार्थना कराया लागला. सर्जा होताच तसा. सर्वांच्या गरजंला धावनारा. मदत करनारा. येता जाता विचारपूस करनारा. भावी पाटील तोच हुता. थोडावेळ पारायन थांबलं.

 पाटील, गावातील पंच मंडळी जमली. गाव जमलं. पाटील चिंतेत हुता. तरीबी फुडं काय करायचं ते कळत नव्हतं. तेवढ्यात भुलाबाई उटली. फुडं आली. म्हनली, “आवं, म्या म्हनलं हुतं नीट शेवा करा. नगा त्या फंदात पडू. कोप झालाय देवीचा आता. भाकणूक करू, माफी मागू आनि म्हनू पुन्हा वाटंला जानार नाय मंदिर बांदायच्या. ”

 समदी इचार करायला लागली. खरं हाय तिचं. येवडं देवाचं करती. अंगात बी येतिया देवी. समद्यांना उत्तरं देती. मंग देविनंच सांगितलं असनार तिला असं वाटायला लागलं.

 पंच काहीतरी बोलनार तेवड्यात “ रामकृष्ण हरी” म्हनत एकनाथ बाबा उठले आणि फुडं आले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

 “लोकहो, आपल्या कित्येक पिढ्यांची देवीवर श्रद्धा हाय. त्यांनी आखून दिलेली परंपरा आपन आजपर्यंत जपून ठिवली हाय. देव कदी कोपत नसतो. आई कधी लेकावर रूसती व्हय? देवच जर लोकास्नी माराया लागला तर ईस्वास कुनावर ठिवनार.? म्या बी भाकणूक घालून देविचा कौल घेतला हुता. आरं येड्यानों, चांगल्या कामाला देव का न्हाय म्हनंल? माजी दोन तपाची पुन्याई म्यां देविच्या मंदिरासाठी कौल लावला तवा लावली हाय. आरं बाबानों, देवी नाय खोटं ठरविनार. आई निनाई, म्यां पारायन सुरू केलं हाय. ते निम्म्यात थांबलं तर कसं हुनार? तूच आता तार नाही तर मला मार पन त्या सर्जाला वाचिव. ”येवडं बोलून बाबा खाली बसलं. पंच, पाटील काय सांगतात तिकडं सर्वांचं कान लागलं. पाटलाचं डोळं डबडबलं हुतं. एक ध्यान तालुक्याला गेलेली मंडळी कदी येतील इकडं तर दुसरं ध्यान पारायनाचं काय करायचं इकडं.

शेवटी धीर धरून पाटील म्हनालं,

 “लोकहो, माजं बी मन लागंना पन् कायतरी ईचार केला पायजे. आपन फकस्त मंदिर बांदायचा संकल्प केलाय. देवाचं पारायन तरी बंद कसं करायचं? आपन देवीला पाया पडू आन् सुरू ठिऊ पारायन. काय देवी सुचविल तसं करू. ”एवडं बोलून पाटलांनी देवीला हात जोडले. त्यांच्या बरोबर आख्ख्या गावानं आई निनाईला प्रार्थना केली. “आई निनाई, पारायन तरी आमी पूर्न करतो. नंतर तू सांगशील तसं करतो. तूच हायेस आमाला. आमचं काय चुकलं असंल तर माफी कर”

 एवडं बोलून पारायनाच्या मंडपात समदे आले. पारायन सुरू झालं. तास दोन तास गेले. पाटील पाटलीनबाई डोळं मिटून शांत बसले होते. पोराचा जीव वाचू दे म्हनून प्रार्थना करत होते. तेवड्यात तालुक्याच्या गावी दवाखान्यात गेलेला गन्या तराट आला आणि हाकारायला लागला,

 “पाटील पाटील”

 त्यांनी डोळं उघडून पाहिलं. म्हनले, ”आरं, बोल की लवकर. ”

गन्या म्हनला, “पाटील, काय बी काळजी करू नगासा. सर्जेरावाला सुद आलीय. काय बी धोका नाय. डागदरांनी जखम धुवून पट्टी केलीय. सलाईन चालू हाय. औषधं चालू हायेत. ठीक हाय समदं. ” पाटलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आलं. पाटलीन रडाया लागली. आयाबायांना म्हनली,

 “बयांनो, देवी पावली गं आपनास्नी. पारायन संपलं की लुगडं चोळी करते गं देविला आनि निवद बी दावते पुरणपोळीचा. ”

बायांना पन हायसं झालं. काहीजनी घरला गेल्या. प्रसाद करायला. दोघी पाच सात कप चा

आनि कप घिऊन आल्या. उपाशी मंडळींना चा दिला. पारायन चा पिऊन फुडं सुरू झालं.

संध्याकाळ झाली. पारायन संपलं. आरती झाली दिस मावळला. समदे घरला गेले. सर्जाला दोन दिस दवाखान्यात ठिवनार असं कळलं पन आता धोका टळला हुता. समदी निवांत हुती.

पारायनाचे पुढील दोन दिस शांततेत गेले. नित्यनेमाने वाचन, आरती, निवद, प्रसाद समदं सुरू हुतं. आता बाबांना पण हायसं वाटत हुतं. चांगल्या कामाचा संकल्प केला हाय तर पूर्न होयाला हवं असं त्यास्नी वाटतं हुतं.

भुलाबाई मात्र आतून संतापली हुती. कढ जिरवत हुती.

 “म्यां येवडं सांगून बी कशाला ईचार करतायत पाटील. हे बरं नव्हं. त्या पोराच्या जिवावर आलं तरी बी कुनी ऐकना. ” म्हनून भुलाबाई चरफडत हुती. कुनाकुनाला कानाला लागत हुती. मंदिर बांदायचा फेरईचार करावा म्हनून हट्ट करत हुती. आई निनाईचा कोप नको म्हनत हुती. काहीजनी तिला गप बशवित हुत्या. तिची नकारघंटा नको वाटत हुती पन करनार काय. देवी अंगात यिती. तिला मान दिलाच पायजे. नायतर ती रागावली तर आपल्या घरावर संकट यिल म्हनून गपगुमान तिचं ऐकत हुत्या.

दोन दिसांनी सर्जा घरला आला. दुसऱ्या दिशी पारायनाची सांगता हुती. महाप्रसाद हुता. सर्जा उठला. आंघोळ करून, बॅंडेज बांधून, आवरून देविच्या दर्शनाला गेला. तिथून पारायनाच्या मंडपात गेला. तिथं बाबांच्या पाया पडला आणि म्हनला, “बाबा पारायन पूर्न केलं ते बरं झालं. आबास्नी सर्वांनी आधार दिला. सर्वांचे आभार मानतो. आपन असंच पारायन दरवर्षी करू. आई निनाईनं मला वाचिवलं. मला लागलं म्हनून आई कोपली म्हनू नगासा. यांतून मार्ग निगंल. मंदिराचं बांदकाम हुईल आसं माझं मन म्हनतंय”

– क्रमशः भाग दुसरा 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगभलं… – भाग – १ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती कुलकर्णी

 🌸 जीवनरंग 🌸

☆ चांगभलं… – भाग – १ ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆

☆

“आई निनाईच्या नावानं चांगभलं! ”गर्दीनं जोरात गजर केला आनि पालकी उचालली. आज भंडारा, पालकी प्रदक्षणा होनार आनि आरती, निवद झाला की प्रसाद वाटप. जो तो उत्साहात वावरत हुता. गावचा पाटील झ्याकवानी फेटा घालून सूचना देत हुता. “आरं पोरांनो, देवीनं लई कल्याण केलं हाय आपलं. तिच्या कृपेनं गावाला पानी कदी कमी पडलं नाय. जिकडं तिकडं हिरी भरल्यात. शिवार फुललं परत्येक वरसाला. लाईटीचं डांब आलं. मोबाईलचं टावरबी आलं. आता घरातून मोबाईल वर बटन दाबूनश्यान आपुन पानी देतोय शिवाराला. आनि काय पायजे? समदं गाव सुखात नांदतया. कवा बी भांडान बखेडा नाय. पोरांनो, शेवा करा आईची. तीच आपल्याला आधार हाय” एवढं बोलला पाटील पन डोळं भरुन आलं त्याचं. त्याच्या मनात आई निनाईबद्दल भाव दाटून आला. कायतरी मनात ईचार येत हुता. त्यानं भक्तीभावानं देवीला हात जोडलं.

गाव हुतं सातारा जिल्ह्यातील बहुलं. हेच माजं गाव. गावाच्या तीन वाड्या हावळंवाडी, जरंवाडी आनि पाळंकरवाडी. यापैकी पाळंकरवाडीच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याला पन जरा दरीतच निनाई देविचं मंदिर हाय. तिथली ही कथा. कायमची लक्षात रहान्याजोगी.

भंडारा झाला. प्रसादवाटप झालं. जो तो आपापल्या घरला गेला. पाटील तिथंच बसून हुता. आज देवी तेजस्वी दिसत हुती. सूर्व्याची किरनं तिच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे ती हसत आहे असं वाटत हुतं. पाटलाच्या मनात मात्र खंत हुती. तो सादंसुदं पत्र्याचं मंदिर न्याहाळत हुता. भिंती पत्र्याच्या, छत पत्र्याचं, पायऱ्या नीट नव्हत्या. गावात मस्त बंगले बांदले हुते लोकांनी. गावाला मंदिर बांदणं काय जड नव्हतं.  मंदिर पाहून आपण बंगल्यात रहातोय ही खंत, अपराधीपणा पाटलाला सतावित हुता. मंदिर न हुयाला कारन बी तसंच ठोस हुतं. देवीनं दृष्टांत दिलेला, पूर्वीच्या पिढ्यांनी सांगितला हुता.

मागील चार पिढ्यांनी दोन तीनदा मंदिर बांदायचा प्रयत्न केला हुता पन काय तरी कारणानं रहायचं. सुरूवातच होत नव्हती. मागील पिढीत प्रयत्न केला गेला पन तेंव्हाच्या गुरवाला देवीनं सपनात येऊन सांगितलं, “एका रात्रीत मंदिर  होयाला पाहिजे तरच हुनार” हे कसलं सपान? गुरवानं सांगितलं समद्यांना. हे घडनार नाही म्हनून आजपातुर मंदिर राहिलं हुतं.

गावातील जुनी म्हातारी मानसं सांगत की देवी डोंगरावरच हुती म्हने. एका भक्तानं देवीची खूप सेवा केली हुती. म्हातारपनी त्याला डोंगरावर जायाला ईना म्हनून त्यानं देवीला हात जोडले आनि आता येत नाही म्हनून सांगितलं. त्यावर देवी म्हनली, “तू फुडं बघून चाल. मी मागून घरापातुर येते पन मागं वळून बगू नको. नायतर मी हाय तिथंच थांबणार. ” भक्त निगाला चालत. डोंगराचा  पायथा सुरू झाला आन् त्याला इच्छा झाली मागं वळून पहान्याची. त्यानं मागं पाहिलं आन् देवी तिथंच थांबली. गुप्त झाली. मग त्याच जागेवर एक खोली एवडं पत्र्याचं मंदिर केलं. दगडाचीच देवी केली. गेल्या चार पिढ्या ते  तसंच हुबं हाय.

आज भंडाऱ्याच्या वक्ताला आरती चालू असताना घंटा, ढोल ताशा वाजू लागला. भुलाबाईच्या अचानक अंगात आलं. ती हात वर करून घुमाया लागली. आयाबाया तिच्या भवतंनं घुटमळत हुत्या. “आई, काय मागनं हाय बोल. आमी तू म्हनशील ती शेवा करू. ”आसं म्हनत नमस्कार करत हुत्या. भुलाबाईनं घुमण्याचा हुंकार टाकला.

“हुं हुं…पाटलाच्या मनात आलंय मंदिराचं…. पन नीट शेवा केल्या बिगर हुनार नाय…उगाच एका रात्रीत बांदायचा इचार बी करू नगासा. हुनार नाय मंदिर तसं. हुं.. हुं.. ”

बाया बापड्यांनी “व्हय व्हय”म्हनत वटी भरली. ती शांत झाली पन पाटील अशांत झाला. देवी मंदिर बांदा पन म्हनतीय, बांदू नगा बी म्हनतीय. काय करायचं आता…या विचारातच तो घरला परतला.

पाटलीन तुळशी फुडं दिवा लावत हुती. तिनं पाटलाचा चेहरा पाह्यला. “आवं काय हुतंया.? समदं नीट पार पडलं नव्हं? ”

“व्हय गं, देवीच्या मनात काय हाय कळना बग”असं म्हनून त्यानं समदी हकिकत सांगितली. पाटलीन बी इचारात पडली.

“बर, बर, बगू नंतर, चला हातपाय धुवून या जेवाया. मी तयारी करते. ”असं म्हनून ती आत गेली पानं घ्यायला.

दिसामागून दिस सरले. सुगी झाली. गावची जत्रा जवळ आली. जत्रेत कथा किर्तनाची रेलचेल हुती. ग्रामदैवत जोतिबा बरोबर पुन्हा एकबार निनाईदेवीची पालखी निगाली. पुन्हा मागील इषयाला उजाळा मिळाला. रातच्याला समदी मंडळी पाटलाच्या वाड्यात जमली. यात्रेमुळं संतमंडळी पन कथा किर्तनासाठी आली हुतीतं.

वारकरी संत एकनाथ बाबा पन हुतं. बाबांनी सर्व हकिकत आयंकली आनि विचार करून ध्यानाला बसले. बाबा विठ्ठल भक्त हुते. तपश्चर्या  लई हुती. अध्यात्मिक जीवन जगत हुते. कथा, कीर्तनात मग्नच जनू. अर्ध्या तासाने बाबांचं ध्यान संपलं. ते ध्यानातून उठून आले. समद्यांना उद्देशून म्हनले, “म्यां देवीला साकडं घातलं हाय. तुजं मंदिर टप्प्याटप्प्याने पुरं करतो. त्यासाठी दरवरसाला आट दिसाचं पोथीचं पारायन सुरू करतो. तू करवून घेशील तेंव्हा हुईल. आता नगं म्हनू नकोस. आई, असाच आशीर्वाद असू दे. ”यांवर देवीनं आशीर्वाद दिला, पन म्हनली, “ स्त्रियांकडे समाजाचे अजूनबी लक्ष नाय. त्यांना आदर नाय म्हनून स्त्री ही आतून सहनशील राहिली नाय. ती पुरूषांवर जमल तेवडी दादागिरी करती. स्त्री-पुरूष समतोल गावात तरी असावा म्हनून एका आदर्श स्त्रिची पोथी शोधा. ज्या स्त्रिने संसारात सहनशीलता दाखवून आदर्श ठिवलाय तिच्याच पोथीचं पारायन केलं पाहिजे कारन आपली संस्कृती सांगती की, “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमन्ते  तत्र देवता||. ” बाबांनी “नमस्कार”करून ध्यान संपविलं. बाबांची भाकणूक झाली. सर्वांनी माना डोलावल्या आनि महिन्याभरातच पोथीचं पारायन सुरू करू आसं समद्यांनी ठरविलं.

आता पेचप्रसंग असा होता कुनाचं पारायन करायचं? ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, गुरूचरित्र काहीच उपेगाचं नाय. अनेक संत स्त्रिया हुत्या की पन संसारी लई कमी हुत्या. संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा हुत्या पन संसारी नव्हत्या. स्त्रिची पोथी हवी ते पन सहनशील आनि संसारी हवी. बाबा स्वतः च या कामाला लागले.

आले पंढरपुरात. समदे मठ, पुस्तकांच्या दुकानात मानसं पाटवली. असाच आटवडा गेला. एक दिवशी रघू विठ्ठल मंदिरात किर्तन ऐकताना पळत पळत आला. “बाबा, बाबा म्यां आत्ताच एका स्त्रिची कथा ऐकून आलोय. आक्षी आपल्याला पायजे तशीच कथा हाय. पन तिची पोथी हाय का बघावं लागंल. ”किर्तनात महाराजांनी कथा लावली हुती एका स्त्रीची. अत्यंत सहनशील, अध्यात्मिक आनि संसारी. नाव हुते ‘संत बहिणाबाई ‘त्यांचे आख्यान ऐकूनच रघू पळत आला अन् बाबांना सर्व सांगू लागला. बाबा उठले. कुठल्या महाराजांनी कथा सांगितली ते शोधलं. ते हुतं महाराष्ट्रातील लई मोट्टं ‘संत धुंडामहाराज देगलूरकर. ’किर्तन संपलं..

बाबांनी महाराजांना वाकून नमस्कार केला, “जरा थोडं बोलायचं हुतं” 

महाराज म्हणाले, ”“बसा बसा. बोला की. काय  शंका हाय का? ” 

“शंका न्हाय पन आपन कथा सांगितलेल्या संत बहिणाबाईंची पोथी हाय का? ”

“ हाय की. पन जरा जीर्ण अवस्थेत हाय ”महाराज म्हणाले.

बाबांना खूप आनंद झाला. देविच्या मनात बी आलंय मंदिराचं काम पूर्न व्हावं याची पक्की खूण बाबांना पटली. ते म्हणाले, ”असू द्या. थोडं दिवस आमाला द्या. आमी पुना लिहून काढतो. काय आडलं तर तुमास्नी इचारतो. ”चला पोथीचा प्रश्न सुटला. रघूचा उत्साह वाढला. बरोबर आलेल्या गन्यानं इचारलं, “ आरं रघू, ह्या संत बहिणाबाई मंजी त्या पुस्तकात कविता असत्यात त्याच व्हय रं? ”

रघू म्हनाला, ” आरं त्या बी लई सोशिक हुत्या आनि ज्ञानानं, अनुभवानं तर लई बेस हुत्या बग. ह्या त्या नव्हंत पन त्यांची बहीनंच जनू. ह्यांनी हाल सोसत सोसत  नवऱ्याबर आयुष्य काढलं आनि कुनी त्यांचा छळ केला माहित हाय का? आरं नवऱ्यानंच. त्यांनी सर्व सोसलं. त्यांना मारन्याच्या नादात वासरालाबी मारलं. वासरू गेलं. त्या आजारी हुत्या, काय बी लक्ष दिलं नाही. पन गंमत म्हनजे नवरा घरातून निघून लांब जायला बगायचा. गेला की त्योच आजारी पडायचा. असं तीन चारदा झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. मधुवती कुलकर्णी

बेंगलोर

दूरध्वनी ९४०३००६४३६.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शाम दहावीला बसतो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “शाम दहावीला बसतो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.

शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.

रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.

फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.

शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.

म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.

त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.

चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.

ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.

झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.

शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.

अमिताभ : किससे पूछना चाहोगे?

शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!

शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू

अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?

शाम : हा, सर. पक्का

अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.

टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर

अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल

ओबामा : यस्, आय नो दॅट यु आर ऑन द लाईन. हाऊ कॅन आय हेल्प यू?

अमिताभ : सर, शाम वॉन्टस टू आस्क यु समथिंग. यु विल बी गिव्हन 30 सेकंड्स. नेक्स्ट व्हाईस इज फ्रॉम शाम, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ

ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर

शाम जाम खुश झाला.

शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?

ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.

सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.

फोन कट झाला.

ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.

सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.

पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला

शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ नशीबवान आहे मुलगी – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(सदानंद गेल्यावर लीना व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर टेकली. आत्यानंदाने तिचं हृदय धडधडत होतं. सदानंदने सही केलेल्या फॉर्मवर परत एकदा नजर फिरवत तिने मनात म्हटलं ॓ थँक गॉड. अखेर जिंकले मी आयुष्याचा डाव. आपल्या हुशारीला, चलाखीला नशिबाने साथ दिली. आता जन्मभराची काळजी मिटली झोपाळ्याला हलकी गती देऊन लीना आठवणींच्या झुल्यावर रमून गेली …) 

इथून पुढे – – 

नीरज एमिलीची जवळीक वाढल्याने आपल्याला स्वतःच्या भविष्याची चिंता पडली होती. नशिबाने अशाच एका पार्टीत सदानंदची ओळख झाली. भारतात स्वतःचा छोटा व्यवसाय असलेला सदानंद काही कामानिमित्त त्याच्या मित्राकडे अमेरिकेत आला होता गप्पांमधून कळलं की बराच काळ आजारी असलेली त्याची पत्नी नुकतीच त्याला सोडून गेली होती. श्रीधर आणि रमा या त्यांच्या मुलांना त्याने बारावीनंतर अमेरिकेतच शिकायला ठेवलं होतं. रुबाबदार पण मनाने थोडा खचलेला सदानंद आपल्या सहानुभूतीच्या शब्दांनी जरा मोकळा झाला. फोन नंबर्सची देवाण-घेवाण झाली. आता हा चान्स अजिबात सोडायचा नाही असा निश्चय करून आपण त्याला एका निवांत हॉटेलला जेवणाचं निमंत्रण दिलं. बोलता बोलता डोळ्यात पाणी आणून आपण नीरजबरोबर लग्न करून कसं फसलो ते सांगितलं. आता ही मायावी अमेरिका नको वाटते. भारतात येऊन आधीचं सगळं विसरून शांत आयुष्य जगण्याची आपली इच्छाही त्याच्या कानावर घातली.

– – – 

सदानंद भारतात परतला तरी फोनवरून आपण त्याच्याशी सतत संपर्क ठेवला. बायकोच्या प्रदीर्घ आजाराने कंटाळलेल्या सदानंदलाही त्याच्या पोझिशनला शोभेशी, उच्चभ्रू समाजात वावरणारी कम्पॅनियन हवी होतीच. महिनाभरात तो अमेरिकेला परत आला.

नीरजलाही आपण दुसरं काही जमविण्याचा प्रयत्न करीत आहोत याचा अंदाज आला होता. त्याच्या मार्गातला अडथळा विनासायास दूर होतोय म्हणून तोही आपल्या वागण्याकडे दुर्लक्ष करीत होता. आपण नीरज बरोबरचे कायदेशीर व्यवहार पूर्ण केले. घटस्फोट घेतला आणि सदानंद बरोबर रजिस्टर लग्न करून तिथे छोटीशी पार्टी देऊन भारतात परतलो.

अमेरिका सोडण्याच्या आधी सदानंद च्या दोन्ही मुलांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांना सांगितलं मी तुमच्याशी आईच्याच नात्यानं वागणार आहे. प्लीज तुम्ही मला आणि तुमच्या बाबांना समजून घ्या. सुट्टीमध्ये घरी या आम्ही तुमची वाट पाहू. त्या बुजलेल्या मुलांची थोडी समजूत काढून निरोप घेतला तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरंगत होतं.

उपनगरातल्या एका को ऑपरेटिव्ह सोसायटीतला सदानंदचा बंगला स्टेशनपासून दूर असला तरी चांगला होता. फक्त देखभाल नसल्याने त्याची रया गेली होती. भारतात नोकरांची, कामगारांची काही कमता नसल्याने आपण त्यांच्या मदतीने बंगल्याचे, बागेचं रूप दोन दोन तीन महिन्यातच पालटलं.

आपल्या लग्नाच्या पार्टीला सदानंदचे दोन्हीकडचे नातेवाईक आवर्जून उपस्थित होते. आपल्या दिसण्याचं, मिळून- मिसळून वागण्याचं कौतुक करून त्यांनी सदानंदला चांगली सहचारिणी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. गेल्या काही वर्षात जवळच्या लग्नकार्यानाही न गेलेला सदानंद आपल्याला घेऊन अशा समारंभात उत्साहाने भाग घेऊ लागला. नाटक, सिनेमा, गाण्याचे कार्यक्रम, क्लब, पार्ट्या यात आपणही रमून गेलो.

सुट्टीसाठी श्रीधर आणि रमा तीन आठवडे येण्याचे ठरल्यावर आपण आवर्जून सारी तयारी केली. मुलांना आवडणारे पदार्थ करून घेतले. नवीन पडदे, रंग लावून त्यांच्या खोल्या सजवल्या. घरात बदललेलं रूप आणि बाबांची सुधारलेली प्रकृती बघून मुलही खुश झाली. श्रीधर रमाला सर्व नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना भेटता यावं म्हणून आपण एक गेट-टुगेदर अरेंज केलं. त्या पार्टीच्या चार दिवस आधी आपण सदानंदला नाश्त्याचे वेळी सांगत होतो की,  ॓अरे एकदा निमंत्रितांच्या लिस्टवर नजर टाक. आणि मेनू फायनल करण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरचा आता फोन येणारे तर मेनू बघून घे.॔ तेवढ्यात कॉन्ट्रॅक्टरचा फोन आलाच त्याच्याशी बोलत असताना सदानंदचाही फोन वाजला मुलं काल त्यांच्या एका मित्राकडे नाईट आऊटसाठी गेली होती.

सदानंद फोनवर आश्चर्याने विचारत होता एवढे पैसे आहेत तुझ्याकडे? बरं बरं! मग घे ते शूज तुला आवडले आहेत तर! फोन ठेवून सदानंद सांगू लागला, सकाळी घरी येता येता मुलं शॉपिंगला गेली. तिथे रमाला एक छान शूज आवडले पण त्यांची किंमत दहा हजार आहे म्हणून ती शूज घेऊ का म्हणून विचारत होती. पैशांबद्दल विचारलं तर ममाने दिलेत म्हणाली.

  ॓अरे हो! तुला सांगायचंच राहिलं. मी घरखर्चासाठी बँकेतून पैसे काढले तेव्हा मुलं येणार म्हणून त्यांच्यासाठीही वीस-वीस हजार काढले आणि मुलं आल्यावर त्यांना दिले. काय असतं ना, मित्र- मैत्रिणी बरेच दिवसांनी भेटतात. सिनेमा, हॉटेलिंग, खरेदी असते. मुलं आपली शिकताहेत. त्यांच्या जवळचे डॉलर्स, क्रेडिट कार्ड इथे कशाला वापरायचं? मुलांना कुठे कमीपणा येता कामा नये. तुझ्या पोझिशनप्रमाणे त्यांना सारं मिळालं पाहिजे. त्यांचा तो हक्कच आहे नाही का ?॔

आपलं बोलणं ऐकून सदानंदनं कृतज्ञतेने आपल्या हातावर हात ठेवला. लीना, कसं सांगू तुला? पैशाची काही कमी नाही पण असं काही करायला पाहिजे हे सुचलंच नसतं मला .॔

  ॓अरे मग मी कशाला आहे? काय ठरलंय आपलं? आता मागचं सगळं विसरून दोघांनी एकमेकांच्या सहवासात सुखात राहायचं. हो ना?॔ 

आपणही त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वस्त केलं पण पैसे काढताना जास्तीचे दहा हजार स्वतःसाठी काढले हे सांगायचं टाळलं. त्या आठवड्यात क्लबमध्ये रमी खेळताना आपण भरपूर हरलो होतो. त्यासाठी पैसे काढले हे सांगू त्याला नंतर कधीतरी असं मनाशी ठरवलं.

पार्टीमध्ये मुलं खुश होती. सर्वांशी मोकळेपणी बोलत होती. मुलांच्या आवडीचे पदार्थ करून घेऊन, त्यांच्यासाठी थोडी फार औषधं, कपडे सगळ्याचं व्यवस्थित पॅकिंग करून आपण त्यांच्या बॅगा भरल्या तेव्हा तिघेही कौतुकाने बघत आपल्याभोवती चिवचिवत होती.

काल रात्री श्रीधर- रमाला एअरपोर्टला पोहोचवून यायला उशीर झाला. सकाळी सदानंदला नाश्ता दिल्यावर आठवल्यासारखं करून आपण म्हटलं,  ॓अरे, आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरीबाईंचा रिमाइंडरचा फोन आला होता. मागच्या आठवड्यात त्यांनी घराच्या ॓चेंज ऑफ नॉमिनेशन ॔ साठी आपल्याकडे फॉर्म पाठवले होते पण मुलांच्या गडबडीत मी ते विसरले. त्यांची मीटिंग आहे शनिवारी. त्याआधी त्यांनी तो फॉर्म भरून मागितलाय.

  ॓एवढंच ना! दे तो फॉर्म. तुझ्या नावाने घराचं नॉमिनेशन करून तो फॉर्म भरून देतो.॔ सदानंद म्हणाला.

  ॓ अरे इतकी घाई नको करू. मुलांना विचार आणखी कुणाचा सल्ला घे.॔ आपण मानभावीपणे म्हटलं 

 ‌॓ कशाला? मुलांसाठी मी फॅक्टरीतला निम्मा-निम्मा हिस्सा ठेवलाय. ज्या घरासाठी तू एवढी जीव लावून धडपडतेस त्या घरावर तुझाच हक्क राहू दे. दे तो फॉर्म इकडे. बाकी काय त्या फॉरमॅलिटीज पूर्ण करून देऊन दे तो सेक्रेटरीबाईंकडे.

नेहमीप्रमाणे सदानंदला हसतमुखाने बाय करून आपण इथे झोपाळ्यावरून येऊन बसलो. त्या सही केलेल्या फॉर्मवर डोळे भरून नजर फिरवली आणि मनातलं आवडतं गाणं ओठावर आलं….

 ‌॓ आय ॲम समथिंग स्पेशल!

आय हॅव टॅलेंट.. आय एम ग्रेट!

आय से थँक्यू फॉर द लाईफ 

आय ॲम एन्जॉईंग…!

– समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares