उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆
(‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.
‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं…. सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.)
इथून पुढे – –
‘खूप वेदना होताहेत मॅम… प्लीज… मला पेन किलरचा आणखी एक डोस द्या. ’
‘आत्ता दोन तासांपूर्वी जेवणानंतर तुला इंजक्शन दिलं होतं ना! इतकं जास्त पेन किलर घेणं योग्य नाही. तुझ्या शरिरावर पुढे त्याचा वाईट परिणाम होईल. ’
‘मला त्याची पर्वा नाही. इंजक्शन द्या. बस्स! ’ गौरव अशा काही अवस्थेत बोलून गेला की शकुंतला मॅमचं अंतर कापत कापत गेलं आणि मग त्याला इंजक्शन देणं त्यांना भागच पडलं. इंजक्शन देता देता त्या म्हणाल्या, ‘त्या दिवसाबद्दल… ऑपरेशनबद्दल तुला काही बोलावंसं वाटलं, तर तू मला तुझी फ्रेंड समज…. बोलण्यामुळेसुद्धा वेदना थोड्या कमी होतील. ’ गौरव काहिशा विचित्र नजरेने, काही वेळ त्या बेस हॉस्पिटलच्या मायाळू हेड नर्सकडे बघत राहिला आणि हळू हळू इंजक्शनच्या गुंगीत निद्रेच्या कवेत शिरला.
दर दुसर्या तिसर्या दिवशीचं हेच दृश्य असायचं. ते बेचैन दिवस आणि त्रासदायक रात्रीच्या दरम्यान एक हसवणारा क्षणदेखील आला होता. मोबाईलवर बोलता बोलता गीतालीनं एकदा एक विचित्रच मागणी केली. मोबाईलवरच्या नेहमीच्या सांभाषणानंतर, टिप्सीच्या नवनवीन करामती, बोलणं, ऐकवता ऐकवता ती एकदम म्हणाली, ‘मला त्या गोळ्या हव्या आहेत हीरो…. डॉक्टरांनी तुझ्या पोटातून आणि हातातून काढलेल्या सगळ्या गोळ्या… ’
‘काय? ? ? ’ चमकून गौरवने विचारलं. आपण जे ऐकलं, त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
‘शोना, मला त्या गोळ्या हव्या आहेत…. सगळ्याच्या सगळ्या.. तुला लागलेल्या. जेव्हा घरी येशील तेव्हा आपल्याबरोबर घेऊन ये. सगळ्याच्या सगळ्या.. सात गोळ्या. ’
‘अरे, तू काय करणार त्यांचं? ’
‘काहीही करीन. तुला काय करायचय? नवी रेसिपी बनवीन एखादी. ’
‘काय फलतु गोष्ट बोलतेयस गीतू, इथे हॉस्पिटलमध्ये त्या गोळ्यांचा डिस्प्ले केला जातो. कमॉन… डोन्ट बी चाइल्डिश.. काय करणार तू त्यांचं? ’ गौरवचं हसू थांबता थांबत नव्हतं.
‘तू बस, घेऊन ये. ,. कमीत कमी एक तरी गोळी मला हवीच! ’
तो हसरा क्षण किती तरी वेळपर्यंत वॉर्डाच्या भिंतींवर रेंगाळत राहिला. श्रीनगरच्या त्या आर्मी बेस हॉस्पिटलच्या एका खोलीत एक खास असं संग्रहालय बनवलेलं होतं…. दुनियेतील सगळ्यात वेगळं असं ते संग्रहालय असावं बहुतेक. इथे मागच्या काही युद्धात आणि आतंकवादाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये, घायाळ झालेल्या सैनिकांच्या शरिरावर झालेल्या सर्जरीनंतर काढलेल्या गोळ्या, ग्रेनेडचे तुकडे, बॉम्बमध्ये वापरले गेलेले टोकदार खिळे, छर्रे इ. गोष्टींचा संग्रह होता. ज्या हुतात्म्यांच्या वा घायाळ सैनिकांच्या शरीरातून ते काढले होते, त्यांचे नाव, ते कधी काढले याची तारीख, तो सैनिक घायाळ कधी झाला, त्याची तारीख या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तिथे होत्या. जगातील सगळ्यात वेगळा असा कोलाज संग्रह होता तो… जसा काही जखमांचंही नक्षीकाम केलय. पाच वर्षांपूर्वी गौरव जेव्हा काश्मीरमध्ये पहिल्यांदा पोस्टींगवर आला होता, तेव्हा एक दिवस असाच, इथे भरती झालेल्या एका जवानाला तो भेटायला आला होता. त्यावेळी त्याने हे अद्भूत संग्रालय पाहिलं होतं. त्या दिवशी एक उनाड विचार त्याच्या मनात चमकून गेला. कधी आपलंही नाव या जखमांच्या नक्षीकामात सामील होईल का? काही भटक्या विचारांना वास्तवाचा पदर ओढून घेण्याची मोठी वाईट सवय असते.
बेस हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या गौरव विचार करत होता, जर त्या दिवशी… इतक्या दिवसांच्या पूर्वी, त्याने जो विचार केला, तसा केला नसता तर आज खुशहाल आणि सिद्धार्थ जिवंत असते का? कसं सगळं उलटं पालटं होऊन गेलं. त्या दोघा आतंकवाद्यांना मारण्याचं किती व्यवस्थित, छान प्लॅनिंग केलं होतं. खरं म्हणजे ते अगदी साधं आणि सोपं ऑपरेशन होतं. सिद्धार्थचा हट्ट त्याने का बरं पुरवला? गोळ्यांचा आवाज कानात अजूनही घुमतोय आणि धूसर धूसर झालेल्या स्मृतीच्या पडद्यावर किती तरी दिवसांनंतर त्या दिवसाचं दृश्य स्पष्ट उमटू लागलय. एवढ्यात शकुंतला मॅम त्याची नेहमीची औषधं देण्यासाठी त्याच्याजवळ आल्या, तेव्हा त्याने हात धरून त्यांना बसवून घेतलं आणि भिंतींवरच्या समोरच्या झरोक्याकडे एकटक बघत त्या दिवशीची कहाणी सांगू लागला. त्याचा आवाज जसा काही खोल विहीरीतून येत होता… घुसमटल्यासारखा.
सप्टेंबरला ढकलून पळवत लावत, कुडकुडायला लावणारा, हुडहुडी भरवणारा, ऑक्टोबर येऊन पोहोचला होता. जिथे तिथे उघडे-बोडके चिनार उभे होते. जमीन त्याच्या लाल, तपकिरी पानांनी नटली होती। बर्फाची पांढरी शुभ्र चादर पांघरण्याच्या त्रासापूर्वी जणू ती आपल्या परीने उत्सव साजरा करत होती. धरतीच्या या उत्सवाकडे गौरवच्या बटालियनचं मुळीच लक्ष नव्हतं. आत्ता आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीमुळे, बटालियनला जसा काही विद्युत करंटने स्पर्श केला होता. बटालियनचा खास खबर्या शौकतचा फोन आला होता. कॅंम्पपासून काही अंतरावर असलेल्या दल सरोवराला लागून असलेल्या गावात दोन आतंकवादी लपून बसले आहेत. बातमीनुसार गावातील सगळ्यात मोठा सफरचंदाचा बागायतदार मोहम्मद रसीद अहमदने एवढ्यातच दोन मजली घर बांधले होते. त्याच्या या नव्या घरात काही दिवसांपासून दोन विदेशींनी… बहुदा अफगाणी आतंकवादींनी आश्रय घेतला होता. शौकतच्या विस्तृत वर्णनानुसार पहिल्या मजल्यावर बनवलेल्या दोन खोल्यांच्यामधील भिंत जरा जास्तच रुंद दिसते. त्याच्या आत एक लहानसं तळघर बनवलेलं आहे. पोलीस किंवा फौजेची तुकडी जेव्हा तिकडच्या बाजूने गस्त घालत जाते, तेव्हा हे दोन आतंकवादी तळघरात उतरून लपून बसतात. भिंतीत बनवलेल्या त्या तळघरात उतरण्यासाठीचा रस्ता, दुसर्या मजल्यावरून आहे. सर्वसामान्य काश्मिरी घरांप्रमाणे धान्य वगैरे ठेवण्यासाठी जसा माळा बनवला जातो, तशा माळ्यावरून तळघरात उतरण्याचा रस्ता आहे. एका लाकडी पट्टीने तो झाकला आहे. ऑपरेशनचं प्लॅनिंग सुरू झालं. गावाचा नकाशा चांगल्या रीतीने समजून घेतला गेला. जवळ जवळ पस्तीस घरांचं हे गाव दल सरोवराच्या दक्षिणेकडून निघणार्या नाल्याने दोन्ही बाजूंनी घेरलेलं होतं. रसीद अहमदचं घर आणि बाग गावाच्या एका कडेला होती. प्लॅनप्रमाणे असं ठरलं की दहा दहा जवानांच्या दोन तुकड्या मेजर गौरव वत्स आणि कॅप्टन सिद्धार्थ रायच्या नेतृत्वाखाली औपचारिक गस्तीच्या स्वरुपात गावात प्रवेश करतील… गावातील लोकांची सहजच चौकशी करत, अचानक रसीद अहमदचं घर घेरतील. तिसरी रिझर्व्ह तुकडी नाल्याजवळ, अचानक काही परिस्थिती उद्भवली, तर त्याचा निपटारा करण्यासाठी तिथे थांबेल.
गावात जाण्यासाठी नाल्यावरचा छोटा पूल ओलांडताना गौरवच्या छातीत धडधड होऊ लागली होती. गावात प्रवेश केल्यावर दोन्ही तुकड्या वेगवेगळ्या दिशेने विभक्त झाल्या. गाववाल्यांकडून दुआ-सलाम घेत पुढे जाताना, जवळ जवळ प्रत्येकाच्या चेहर्यावर एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवत होता. त्यांचा हा तणाव शौकतच्या बातमीला पुष्टी देत होता. दुआ-सलाम करत आणि वाटेत भेटणार्या लहान मुलांना चॉकलेट्स वाटत, दोन्ही तुकड्या स्वत:ला अगदी सामान्य असल्याचं भासवत दोन्ही दिशांनी रसीद अहमदच्या घराच्या दिशेने पुढे निघाल्या. काही क्षणातच रसीद अहमदचं घर चारी बाजूंनी घेरलं गेलं. तुकडीमध्ये असलेल्या लाइट मशिनगन्स योग्य जागी लावून ठेवल्या गेल्या. घरातून बाहेर पडणारे त्यांच्या निशाणावर रहातील आशा तर्हेने त्या लावल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थ आपल्या एक एक साथीदार जवानाला घेऊन घराच्या समोर आले. ट्रेनींगच्या दरम्यान शिकवलेलं असतं की कुणीही सनिक एकेकटा कुठलीही गोष्ट करत नाही. सगळ्या गोष्टी जोडी जोडीने होतात. इंग्रजीत त्याला बड्डी – पेअर असं म्हणतात. त्यानुसार दोघांनी आपल्या आपल्या बड्डी – पेअरसह चाल केली होती. घरातल्या सगळ्या व्यक्तींना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. जेव्हा रसीद अहमदला विचारलं गेलं की घरात आणखी कोण कोण आहेत, तेव्हा रसूल निष्पापपणे म्हणाला, ‘पता मत है! अल्लाह कसम सब खैरियत है’ त्याचं उत्तर निष्पापपणाची एक नवी परिभाषा लिहीत होतं आणि त्यावर गौरवला वाटत होतं, वळून त्याला एक जोरदार थप्पड मारावी…
आत्तापर्यंत सगळं गपचूप ऐकणार्या शकुंतला मॅमनी अचानक गौरवला थांबवत म्हंटलं, ‘त्यांची तरी काय चूक आहे यात गौरव? त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर ती एके-47 ने मरणार आणि फौजेचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्यांच्याकडून मार खाणार. कधी कधी मला वाटतं, या काश्मीरी लोकांचे जितके हाल होताहेत ना, तितके जगातल्या दुसर्या कोणत्याच लोकांनी सहन केले नसतील. ठीक आहे… तू पुढे सांग. ’
रसीद अहमद आणि त्याच्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी बसवल्यानंतर गौरवने मशिनगन घेतलेल्या सैनिकाला समोरच्या दरवाजावर लक्ष ठेवण्याची ताकीद दिली आणि नंतर त्याने आणि सिद्धार्थने आपआपल्या बड्डी – पेअरबरोबर अतिशय सावधगिरी बाळगत घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचल्यावर जिन्याजवळ असलेया दोन खोल्यांमधील भिंतींची जरा जास्तच असलेली जाडी पाहिल्यावर शंकेला कुठे जागाच नव्हती. बटालियन कॅंम्पमध्ये विचार विनिमय होऊन ठरल्यानुसार, वर माळ्यावर पोचून गौरवला माळ्याच्या फरशीवर पडून आपल्या रायफलच्या नळीने त्या लाकडी पट्टीला उचलायचं होतं. ही पट्टी भिंतीमध्ये काढलेल्या जागेला लपवून ठेवत होती. पट्टी उस्कटताच गौरवच्या बड्डीने, लांसनायक खुशहाल सिंहने त्या खालच्या जागेत दोन ग्रेनेड फेकायचे होते. बस्स! काम तमाम! सिद्धार्थ आणि त्याच्या बड्डीला जिन्यावरून आपआपल्या रायफलद्वारे तळघराच्या तोंडाशी कव्हरिंग फायर द्यायचं होतं. गडबडीला सुरुवात इथून झाली. सिद्धार्थ त्याला म्हणाला, ‘गौरव सर आपण आत्तापर्यंत खूप यशस्वी ऑपरेशन्स केलीत. माझी ही पहिलीच वेळ आहे. आत तळघरात ग्रेनेड मी फेकेन. सर.. प्लीज… ’ सिद्धार्थच्या त्या ‘प्लीज’मध्ये काय होतं कुणास ठाऊक, गौरव एकदम ‘होय’ म्हणून गेला.
‘ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यासाठी मी कधीच स्वत:ला माफ करणार नाही. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं होतं की ऑपरेशनच्या शेवटच्या भागात कुठलाही बदल करता कामा नये पण मी तीच चूक केली. ’ शकुंतला मॅम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला थोपटत राहिल्या आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्या, ‘ही सगळी नियती आहे बेटा… ’
अचानकच विहीरीच्या अधीक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला….
– क्रमशः भाग दुसरा
मूळ हिंदी कथा – ‘गर्लफ्रेंड’ मूळ लेखक – गौतम राजऋषि
अनुवाद – उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




