मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिशिर सरला… भाग – 2 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे☆

? जीवनरंग ?

☆  शिशिर सरला… भाग – 2 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆  

(तुम्ही असं फ्लॅट भाड्याने घेऊन राहिलात तर माझ्या मनाला यातना होतील. सध्या पुण्यातच आपल्या घरी राहा.” ) – इथून पुढे —-

त्यावर वसंता काही बोलला नाही. सकाळी उठून निघण्यासाठी तयार झाला आणि चहा घेऊन बाहेर पडला. हळूहळू पावलं टाकत तो बस स्टॅंडकडे निघाला. अचानक पावसाची भुरभुर सुरू झाली. कुठंतरी आडोसा शोधत होता. शेजारीच एका प्रोजेक्टचं काम सुरू होतं. काही फ्लॅटमधून लोकांची उपस्थिती जाणवत होती. 

वसंता सरळ तिथल्या ऑफिसमधे जाऊन पोहोचला. चौकशी केल्यावर सिनियर सिटीजन्ससाठी वन रूम कीचनचे फ्लॅट्स विक्रीस असल्याचं कळलं. तसंच काही फ्लॅट्स जुजबी भाड्याने उपलब्ध होते. “काका दोन मिनिट थांबा. मी फोन करून बघतो. मालकांना यायला किती वेळ लागेल ते विचारून घेतो.” असं नम्रपणे सांगून तिथल्या तरूणाने फोन लावला. त्याचा फोन होईपर्यंत वसंता बाहेरच थांबून राहिला. 

मालक दहा पंधरा मिनिटात येत असल्याचं सांगून त्यानं केबिनमध्ये बसायला सांगितलं.  केबिनचं दार लोटताच भिंतीवर प्रोजेक्टचा एक भला मोठा फोटो होता. शेजारीच एका दांपत्याचा फोटो होता. 

वसंताची नजर धूसर झाल्यानं, फोटो स्पष्ट दिसत नव्हता. त्यानं जवळ जाऊन पाहिलं आणि चपापलाच. तिथल्या स्वीपरला त्यानं त्या फोटोबाबत विचारलं. “काका हेच आमचे मालक आणि मालकीण आहेत!” त्या स्वीपरनं मोठ्या कौतुकानं सांगितलं.

वसंता तिथून पटकन बाहेर पडला. सिक्युरीटीवाल्यानं थांबवलं. “काका, फक्त थोडा वेळ थांबा. ते निघालेच आहेत. इथे तुमच्यासारखे कित्येक वृद्ध लोक राहतात. ज्यांना आवश्यक असेल त्यांना जेवणाचे डबे आणि वैद्यकीय सेवाही पुरवली जाते. अर्थात त्याचा वेगळा चार्ज पडतो. पण वृद्धांची इतकी कोण देखभाल करतो हो? आमचे मालक आणि मालकीण खूपच कनवाळू आहेत.”  

“आता आलोच” असं म्हणून वसंता थेट बसस्टँडवर येऊन पोहोचला. स्वत:च्या जावयाने आणि लेकीने आपल्या डोळ्यांत अशी धूळ झोकावी ह्याचा त्याच्या मनाला चटका लागला. आणखी एक मार्ग बंद झाला.

आता अमेयला फोन करावा आणि सरळ युएसला जाऊन किमान सहा महिने तरी राहून यावं, असा विचार करतच वसंता घरी आला. लगोलग अमेयला फोन लावून नातवांना येऊन भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यावर “बाबा, सध्या इथं क्लायमेट बरं नाहीये. तुम्हाला त्रास होईल. पुढच्या वर्षी बघू कधीतरी.” मुलानं गंभीरपणे सांगितलं आणि फोन ठेवला.   

वसंता विमनस्क मनस्थितीत जवळच्या बागेत जाऊन नेहमीच्याच बेंचवर विसावला आणि आपल्याच विचारात गढून गेला. थोड्याच वेळात, एक तरूण येऊन शेजारीच बसला आणि त्यानं आवाज दिला, “काका कसे आहात? मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून इकडे आलोय.” 

वसंता भानावर येत कसंबसं बोलला, “ शेखर, तू इकडे कसा? आणि हो, तू काय बोलणार आहेस ते मला ठाऊक आहे. बॅंकेतल्या लोनबद्दलच ना? मी पैसे भरून टाकेन. तू त्या कर्जाला जामीनदार आहेस. मी तुला कसलीही तोशीस लागू देणार नाही. कळलं?” 

“ काका, मला तुमच्या ऋणातून काही अंशी का होईना मुक्त व्हायचं होतं, म्हणून मी त्या कर्जाची संपूर्ण रक्कम भरली आहे. मी आता तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय. मी काही वावगं बोललो असेन तर मला माफ करा. कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यावर, तुम्ही फक्त ऑफिसात येऊन बसा. क्लाएंट्स हॅन्डल करा. ज्युनियर्सना मार्गदर्शन करा आणि….” 

“ नको, शेखर. हा तुझा मोठेपणा आहे. मुळात माझा हातगुणच वाईट आहे. किती कष्टाने मी अमेयला शिकवून एवढं कर्तृत्ववान केलं, तो निष्ठुर झालाय. ठेवी मोडून, कर्ज काढून ज्या लेक जावयाला मायेने मदत केली त्यांनी माझ्याशी खोटं बोलून मला दगा दिला. मी तुझं काय भलं करू शकणार आहे सांग?”

“ काका, अहो ज्या कोणाला तुमच्या शुभंकर हातांचा स्पर्श होतो त्यांचं सोनं होऊन जातं. इतरांचं माहीत नाही पण माझ्या व्यवसायाची भरभराट तर तुमच्याच सानिध्यात, तुमच्या सावलीतच झालेली आहे.”

काही वेळ स्तब्धता पसरली. अचानक थंड वार्‍याचा एक मुजोर झोत आला. शिशिर ऋतुच्या आगमनानं, पिवळी वाळलेली कितीतरी पानं भिरभिरत उडाली. वसंता खिन्नपणाने म्हणाला, “ पाहिलंस, शेखर? अशीच पानगळ माझ्या जीवनातदेखील सुरू झालेली आहे. नात्यांची पानं अलगद गळून पडताहेत. मायेची फुलंही कोमेजून जात आहेत. मी लवकरच या झाडांच्यासारखाच पूर्णपणे निष्पर्ण होऊन जाईन.” 

“ काका, आयुष्याच्या शेवटी एक रम्य संध्याकाळ असावी, असं प्रत्येकाला वाटतं. याच कातरवेळी सगळे हिशेब मनाच्या पटलावर आपोआप उमटायला लागतात. तुम्ही केवळ नात्यातल्या पानगळीने निराश झालात. पानगळीनंतर झाडांना पुन्हा पालवी फुटते हा निसर्गक्रम आहे. मला सावली देणारी दोन्ही झाडेच उन्मळून पडली. तुम्हाला माहीत आहे, गेल्या वर्षभरात मी आईबाबांच्याविना पोरका झालोय. मी काय म्हणावं?” —- वसंताकडे त्याचं उत्तर नव्हतं. 

“ आता शिशिर सरला आहे. पानगळ होऊन गेलीय. हा मधला काळ म्हणजे आपल्या आयुष्याच्या वळणावर थबकलेलं एक पाऊल होतं, असं समजू या. काका, मी एकटा पडलोय. माझ्यावर आणखी एक उपकार करा. माझ्या मुलांचे आजोबा म्हणून माझ्या घरीच राहायला या… तुमच्या आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकवार हिरव्याकंच पानांनी बहरत जाणारा वसंत ऋतू नक्की येईल. काका नाही म्हणून नका..” असं म्हणत शेखरने पाणावल्या डोळ्यांने दोन्ही हात जोडले.    

शेखरचे दोन्ही हात हातात घेऊन त्याला पाठीवर थोपटत, वसंताने होकारार्थी मान डोलावली. शेखर आनंदाने भारावून गेला. “ काका, उद्या सकाळी बॅग भरून तयार राहा. मी तुम्हाला न्यायला येतोय. पुढच्या आठवड्यात मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी अपाइंटमेंट घेतोय.”  

वसंताला आता आयुष्यातल्या खऱ्या वसंत ऋतूची स्पष्ट चाहूल लागली होती….. !  

– समाप्त –

लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगलुरू ९५३५०२२११२

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिशिर सरला… भाग – 1 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे☆

? जीवनरंग ?

☆  शिशिर सरला… भाग – 1 – लेखक – श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆ 

“काका, तुम्ही या फर्मला हवे आहात. मला तुमच्याकडूनच ऑडिटमधल्या खाचाखोचा कळल्या. या फर्मच्या सुरूवातीच्या काळात तुम्हीच तर या फर्मची सगळी जबाबदारी पेलली होती. हल्ली मात्र तुमच्याकडून वारंवार अकाऊंटिंगच्या एंट्रीज चुकताहेत. कारणं मी  समजू शकतो. काही काळ तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुमची सॅलरी मात्र अव्याहत चालू राहील. माझं ऐका, लवकरात लवकर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. शुगर लेवल नियंत्रणाखाली आहे का, हे एकदा तपासून घ्या. ऑपरेशन कधी करायचं ते विचार करून काय ते मला सांगा.”  

“होय, शेखर माझ्याकडून चुका होत आहेत. कबूल आहे. एक लक्षात ठेव, मी पुन्हा कामावर आलो तरच सॅलरी घेईन, अन्यथा नाही.” असं बोलून वसंता खिन्न मनाने बाहेर पडला. सूर्यास्त व्हायला सुरूवात झाली होती. पक्ष्यांचा थवा चिवचिवाट करत घरट्यांकडे परतण्यासाठी आकाशात भरारी मारत होता. 

वसंताची पावलं मात्र घराकडं जायला तयार नव्हती. घरात वाट पाहणारं कोण आहे? त्याच पापुद्रे उडालेल्या चार भिंती? आजवर शेखरचा आधार होता. आज तोही तुटला. त्याला मी आता नकोसा झालोय. डोक्यात असंख्य विचारांचं मोहोळ उठलं होतं. त्याच विचारात त्यानं घरात पाऊल ठेवलं. सोफ्यावर डोळे मिटून बसला.  डोळ्यांसमोरून वीस वर्षाचा कालखंड सरकत जात होता.   

किरकोळ पोटदुखीच्या आजाराचं निमित्त झालं आणि सुमन आठवड्याच्या आत कायमची निघून गेली. आयुष्याचं चक्रच थांबल्यासारखं झालं. अमेय पंधरा वर्षाचा होता आणि शांभवी नऊ वर्षाची. वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी विधुरपण आलं. कित्येकांनी पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला. मुलांना सावत्रपणाची वागणूक नको म्हणून त्याने तो प्रस्ताव बाजूला सारला. 

मुलांचे आई-बाबा बनून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे हेच वसंताचे एकमेव ध्येय होते. स्वतःचा फ्लॅट होताच, ‘दहा बारा हजाराच्या पेन्शनीवर आणि पीएफ, ग्रॅच्युईटीची मिळणारी रक्कम मुदत ठेवीत ठेवून व्याजावर कसं तरी भागवता येईल. कुठंतरी पार्ट-टाईम नोकरी करता येईल’ असा विचार करून त्यानं लगेच बँकेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली. मुलं शाळेत जाईपर्यंत वसंताचा वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही. परंतु दुपारचा वेळ घालवणं त्याला अवघड जात होतं. संध्याकाळी मुलं आली की त्या दोघांचा अभ्यास आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. हे सगळे करता करता रात्रीचे अकरा वाजून जायचे. 

एके दिवशी सकाळीच शेखर पत्ता शोधत घरी आला. वसंताच्या बॅंकेतल्या एका मित्राने त्याला पत्ता दिला होता. शेखरने नुकताच सीएचा कोर्स पूर्ण केला होता. अकाऊंट्स आणि ऑडिटसाठी मदत करण्याविषयी त्यानं प्रस्ताव मांडला. फावल्या वेळेत काम करता येणार होतं. वेळेचं बंधन नव्हतं. मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठीदेखील पैसा लागणारच होता. वसंताने ते काम आनंदाने स्वीकारलं. शेखरचे काम जसजसे वाढत चालले तसे वसंताचे कामही वाढत चालले. 

काळ सरकत होता, काही वर्षातच अमेय इंजिनिअर झाला. त्याला अमेरिकेतील चांगल्या युनिव्हर्सिटीत अ‍ॅडमिशन मिळाली. त्या खटाटोपात वसंताच्या मुदत ठेवी कमी कमी होत गेल्या. मुदतठेवी काय आज न उद्या पुन्हा करता येतील. अमेयचे शिक्षण महत्त्वाचे होते.

दरम्यान शांभवी बीकॉम पास झाली. लगेचच तिच्यासाठी मुंबईत स्थायिक झालेल्या इंजिनियर मुलाचे स्थळ सांगून आले. सुहास एका प्रतिष्ठित कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरी करत होता. नव्या मुंबईत त्याचा एक छोटासा फ्लॅट होता. वसंताने मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले. त्यात वसंताची उरलीसुरली जमापुंजी संपुष्टात आली. 

अमेयला युएस मधे चांगली नोकरी मिळाली. त्याची होणारी पत्नी त्याला तिथेच भेटली. त्याच्या लग्नाचा सोहळा पुण्यातच पार पडला. अमेयने त्या धांदलीत देखील वसंताचा पासपोर्ट बनवून घेतला. ‘बाबा, तुम्ही फक्त मला सांगायचा अवकाश की मी तुम्हाला तिकीट पाठवून देतो’ असंही सांगायला तो विसरला नाही. 

वसंताला मात्र अमेरिकेत जाता येत नव्हते. कारणही तसंच घडलं होतं. जावयाने अचानक नोकरी सोडली. त्याला स्वत:चं प्रोजेक्ट लॉन्च करायचं होतं. त्यासाठी पाच लाखांची आवश्यकता होती. वसंताने बॅंकेकडून तीन लाखाचं पर्सनल लोन घेतलं आणि शेवटची दोन लाखाची मुदतठेव मोडून पाच लाखाची तजवीज केली. केवळ शेखरने जामीन दिला होता म्हणून एका दिवसात बॅंकेचं कर्ज मंजूर झालं. 

जावयाने कबूल केल्याप्रमाणे सुरुवातीचे दोन महिने नियमित हप्ते भरले. त्यानंतर जी जमीन घेतली होती ती वादातली होती असं कळलं. सुहास कामधंदा सोडून पैसे परत मिळावेत म्हणून खेटे घालत होता आणि लेक लहानसहान शिलाईची कामं करत घर चालवत असल्याचं कळलं. कर्जाचे हप्ते वसंताच्या बोकांडी बसले.     

लेकीची आठवण येताच वसंताने बॅगेत एक दिवसाचे कपडे भरले आणि लगोलग नव्या मुंबईकडे निघाला. ‘पुण्यात राहण्यापेक्षा लेकीच्या घराजवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहावं. अडीअडचणीला ती धावून येईल. एका माणसाच्या जेवणाची सोय करायला तिला कितीसे अवघड जाणार आहे. तिला दर महिन्याकाठी काही पैसे देता येतील,’ असा विचार करतच वसंता लेकीच्या घरी येऊन पोहोचला. 

जावयाने वसंताकडे निर्विकारपणे पाहिलं. एका शब्दानेही बोलला नाही. आजोबांना पाहून नातवंडे खुश झाली. “आजोबा, तुम्ही आमच्याकडेच रहा ना!” म्हणून आग्रह करत होती. तोच धागा पकडून वसंताने लेकीकडे विषय काढला. “शांभू बेटा, मी आता इथे जवळच एखादी खोली भाड्याने घेऊन राहीन म्हणतोय. तू काय म्हणतेस?”  

“बाबा, मी अजून जिवंत आहे. तुम्हाला खोली भाड्याने घेऊन राहायची काय आवश्यकता आहे? सध्या आमची ही जागा आम्हालाच अपुरी पडतेय. आम्ही टू बेडरूमचा फ्लॅट घेतल्यावर मात्र तुम्ही आमच्याकडेच येऊन राहा. तुम्ही असं फ्लॅट भाड्याने घेऊन राहिलात तर माझ्या मनाला यातना होतील. सध्या पुण्यातच आपल्या घरी रहा.” 

– क्रमशः… 

लेखक – व्यंकटेश देवनपल्ली.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काहीतरी ढासळलंय ! –  अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ काहीतरी ढासळलंय ! –  अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

आईनं विस्तवावर पळी चांगली कडक तापवली, अन बाहेरचं दार अर्धवट उघडत मुसळधार पावसाला चांगला सणसणीत चटका दिला ! ” मेल्या, आता तरी तोंड काळं कर तुझं !” चिडचिड करतच तिनं धाडकन दार लावून घेतलं.

आजचा सलग पाचवा दिवस ! अंगात यावं तसं पिसाळून कोसळतोय हा वरून. खाली ती भुई तरी कुठवर सोसणार? शेवटी तिनं पण हात टेकले. तसा हिरव्याकंच माळाला पायदळी तुडवत पाण्याचे लोटच्या लोट घराभोवतीनं दंगल करू लागले, आणि पावलाइतकं पाणी गुडघाभर कधी झालं कळलंच नाही.

आज तर जणू माजावर आल्यासारखा कोसळतोय पाऊस. दिवसभर बिचारी पन्हाळ उर फाटेस्तोवर पाणी ओकत होती. बाहेर कुत्री आडोशाला पार मुटकुळं करून गप पडून होती. अधूनमधून अंगावरचं पाणी झटकण्यापुरती काय ती अंग हलवायची. पाखरांचे तर हाल बघवत नव्हते. कोवळ्या झाडावरची कोवळी घरटी केव्हाच जमिनीनं झेलली होती. वळचणीला चार दोन साळुंक्या भेदरून बसल्या होत्या. परसात बांधलेल्या आडव्या बांबूवर एकच कावळा जमिनीकडे गोठून गेल्यागत बघत बसला होता. वर पत्र्यावर जणू ताशाची टिप्पर घुमावी तसा थर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज लय धरून सुरूच होता.

दुपार कलंडली तसा पावसानं उजेडाला पार कंबरेत लाथ घालून हाकलूनच दिला. लगोलग माजघरात पहिले शिरला तो अंधार ! आईनं तोवर घाईघाईनं जेवणं, भांडी उरकून घेतलं होतं. आम्हा पोरांना सक्त ताकीद दिली होती की खबरदार खाटेवरून खाली उतराल तर ! तेवढ्यात पोतराजानं आभाळाच्या पाठीवर जणू कडाडकन आसूड ओढला. आई म्हणाली, ” नक्की जवळपास कुठंतरी वीज पडलेली दिसतेय. ह्यांची घरी यायची वेळ होईल आता, तेवढा तरी जरा थांबू दे रे पाऊस !”

घराला अंधारानं अजूनच मिठी मारली. आईनं देवापाशी दिवा लावायला घेतला. फडफडत ज्योत कशीतरी उजेड फेकत राहिली. उग्रट वासाच्या उदबत्तीसमोर देवाला मिटल्या डोळ्यांनी नमस्कार करत आमचं शुभंकरोती सुरू झालं. मला आवडायचं असं बसून सगळं म्हणायला. फक्त ते तेराच्या पुढचे पाढे म्हणजे अंगावर काटा यायचा. बाहेर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजातही आईचं लक्ष आमच्याकडे बरोबर होतं.  ‘ तेरी साती किती म्हणालास ?’ मग परत तेरा एके तेरा पासून सुरू ! पाऊस कोसळतच होता. आतापर्यंत घरातले ते चाळीसचे पिवळे बल्ब मरगळलेला प्रकाश घरभर शिंपडायला लागले होते. दाराशी आईने पेला उपडा करून ठेवला. बाहेर गेलेलं माणूस लवकर घरी येतं म्हणे !

पाऊस आता रंगात आला होता. तोच दार वाजलं. ओल्या कंच भिंतीत पाणी पिऊन फुगलेलं लाकडी दार भेसूरपणे किरकिरत उघडलं, दारात नखशिखांत भिजलेले वडील उभे ! हातातल्या छत्रीची पार दैना झालेली दिसत होती. आईने आधी जाऊन टॉवेल आणला नि म्हणाली, “आधी कपडे बदला, डोकं कोरडं करा, मी तोवर चहा ठेवते.” नेमके तेव्हाच लाईट गेले. वडिलांचा दरारा आणि बाहेरचा मिट्ट काळोख, एकदमच घरात शिरले. आईने पुढचं मागचं दार घट्ट लावून घेतलं. दोन्ही दारात एक एक चिमणी पेटवून ठेवली. प्रकाशामुळे ‘जनावर’ घरात शिरत नाही, त्यासाठी हा खटाटोप. वडिलांनी तोवर कपडे बदलून कंदील खाली काढला, अंगठ्याने वरची कडी उचलून अलगद काच बाहेर काढली. कपड्याने सगळी काजळी स्वच्छ पुसली. मग ते गोल बटण फिरवून वात थोडी वर घेतली. पेटवली, आणि परत सावकाश काच लावून कंदील स्वयंपाकघरात आणून ठेवला. हे काम दुसऱ्या कोणी केलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. काचेवर इतकी सुद्धा काजळी त्यांना चालत नसे. भोवतीभोवतीनं फिरणारे आम्ही मग कंदीलाभोवती जेवायला बसलो. जेवताना वाटेत कसं सगळीकडे पाणी भरलंय ते वडिलांनी अगदी रंगवून सांगितलं. आईचा चेहेरा अजूनच काळवंडला काळजीनं ! जेवता जेवता ती मधूनच ओल धरलेल्या भिंतीकडे आणि तग धरलेल्या कौलांकडे पहात होती.

पाऊस अजून तस्साच आदळतोय. कंदिलाच्या उजेडातच वडिलांनी अंथरुण घातलं. आईनं देवापुढचा दिवा शांत केला, देवाला नमस्कार केला अन येऊन आडवी झाली. तशी आम्ही पोरं तिच्या उजव्या डाव्या कुशीत जाऊन झोपलो. वडील उजवा हात डोक्याखाली घेऊन कुशीवर वळून झोपायचा प्रयत्न करत होते. पण पावसाचा कर्कश्श आवाज कोणालाच झोपू देत नव्हता.

साधारणतः तासभर असाच गेला असेल, तोच “धप्प” आवाज झाला. वडील लगेच उठले, कंदील मोठा केला आणि आवाजाच्या दिशेने स्वयंपाकघराकडे गेले आणि तसेच घाईघाई परत आले. आईला उठवलं, तिलाही दाखवलं, …स्वयंपाकघराच्या भिंतीची एक वीट खाली पडली होती. दोघांच्याही अंगाचा थरकाप उडाला. सत्तर वर्षाच्या जुन्या भिंतींनी गेले पाच दिवस पावसाशी घेतलेली झुंज आज कुठेतरी डळमळली. भिंतीची एक वीट कोसळली. दोघांनीही आम्हाला मुलांना उठवलं. आणि मधल्या खोलीत घेऊन गेले. तिथे आम्हाला झोपवून दोघेही तसेच काळजीनं बसून राहिले. पाऊस काही ऐकायला तयार नव्हता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळोख घराभोवती घिरट्या घालत होता. आणि पुन्हा एकदा आवाज आला, “धप्प, धुडुं !” वडील उठले तसं आई काळजीनं म्हणाली, 

“काही कुठं जाऊ नका बघायला, काय व्हायचं ते होऊ दे पण तुम्ही तिकडे जाऊ नका हो !” पण वडिलांना कुठला धीर निघतोय. ते हळूहळू जवळ जाऊन बघून आलेच. खोल आवाजात त्यांनी सांगितलं, “अजून चार विटा पडल्यात ! दाराची वरची बाजू मोकळी झाली गं !” बहुदा दोघांनीही डोळ्याच्या कडा पुसल्या असाव्यात. पण काळोखात सगळं लपवलं गेलं. मग त्यानंतर पाच दहा मिनिटांच्या अंतराने आवाज येतच राहिले, एक एक वीट पडतच राहिली. आम्ही जीव मुठीत घेऊन एकमेकांच्या आधारानं तसेच बसून होतो.

हळूहळू रात्र पुढे सरकत होती. पावसाचा जोर थोडा ओसरला होता. पूर्वेला झुंजूमंजू व्हायला लागलं होतं. अंधार थोडा विस्कटायला लागला होता. रात्र तर सरली म्हणून आई वडील सुस्कारा सोडतायत तोवर एकच मोठ्ठा आवाज झाला आणि छपरासकट सगळं स्वयंपाकघर जमीनदोस्त झालं. एवढ्यावरच पावसाचं समाधान झालं नाही म्हणून आतापर्यंत शाबूत असलेला व्हरांडाही एकाएकी ढासळला. सुदैवाने आम्ही बसलो होतो ती मधली खोली तेवढी अजून तग धरून होती. पण केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं.

एकदाचं फटफटलं ! बाहेर माणसांची जरा चाहूल जाणवायला लागली. पाऊस सुद्धा ओसरला. तसे भीत भीत आम्ही सगळे तो पडक्या भिंतींचा ढिगारा ओलांडून बाहेर मोकळ्या अंगणात आलो. एव्हाना आमचं घर पडल्याची बातमी आजूबाजूला पसरली. कोणीतरी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेलं. दिवस जरा वर आल्यावर आई वडील परत घराकडे गेले. घराच्या चारही बाजूच्या भिंती ढासळल्या होत्या. पण देवळीतला गणपती मात्र तसाच होता, सुरक्षित ! आईला त्याचंच खूप समाधान वाटलं.

त्यानंतर काही दिवस काकांच्या घरी राहिलो आम्ही. तोवर जुनं झालेलं हे पडकं घर पूर्णच पाडून सगळं पुन्हा नव्याने बांधायला घेतलं. ह्या सगळ्यात झालेलं कर्ज पुढचे अनेक पावसाळे पुरलं !

 पण आज एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की त्या रात्री जर आम्ही आसरा घेतलेली खोली सुद्धा पडली असती तर ? पण देवळीतला बाप्पा रात्रभर ती भिंत जणू धरून बसला होता आमच्यासाठी. रोज त्याच्यासमोर शुभंकरोती म्हणायचो न आम्ही, मग आमच्यासाठी तो एवढं तर नक्कीच करणार न !

आज इतक्या वर्षांनंतर बाहेर तस्साच पाऊस कोसळतोय ! लाईटही गेलेत. पण आता घरात इन्व्हर्टर आहे. काळोखाला इथे प्रवेशच नाही. भिंती मजबूत आहेत, ओल येतच नाही. फक्त शुभंकरोती तेवढी ऐकायला येत नाहीये. देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची एलर्जी आहे ! पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता,…….

 तरीसुद्धा काहीतरी ढाsसळssलंs sय ! 

काहीतरी     ढाss s स  ळ s s तं ss य !

— लेखक: अज्ञात..

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

” आक्के किती प्रकारचे नाष्टे बनवती गं? खाणारी तोंड तरी नक्की किती? “

“अगं काय सांगू, खाणारी तोंड दहा बाराच आहेत. पण प्रत्येकाच्या निराळ्या तऱ्हा. बरं त्यांना या वयात या अवस्थेत नाही म्हणायला मला नाही आवडत. म्हणून करते जमेल तसं. हे बघ ए तायडे, हे नर्सिंग होम तुझ्या दादांनी जरी उभारले असले तरी याला आईची माया या आक्केने लावली आहे. लोकांना उगा वाटते, दादांच्या औषधाने पेशंट बरे होतात म्हणून. तो हातगुण या आक्केचा आहे.”

” आक्के एवढा हातगुण आहे तर, तू का नाही डॉक्टरी शिकली? “

” शिकले असते हो, पण मला तुझ्या आई वडिलांसारखे आईवडील नाही ना लाभले. मी लहान असताना आईवडील  पाठोपाठ गेले. दादा वहिनींनी पोटच्या पोराप्रमाणे वाढविले. पण हे ओझे ते तरी किती वागवणार? वयात आले आणि दिले लग्न लावून. पण तुझ्या दादांच्या रूपाने देव भेटला बघ मला.”

” हो का? मग तुझ्या या देवाने का नाही तुझे शिक्षण पूर्ण केले?”

“अगं सगळ्यांच्या नशिबी का कर्वे येतात? पण दादांनी मला कमी मात्र काही पडू दिले नाही एवढे नक्की. शेवटी सरकारी डॉक्टराच्या पदरी किती नी काय पडणार. पण जेवढे त्यांच्या पदरी पडले तेवढे निमूटपणे गोळा करून माझ्या ओंजळीत ठेवले. कधी पैशाचाही हिशेब विचारला नाही बघ.”

“आक्के पाठीमागे दादांचे एवढे कौतुक करते आणि समोर आले की व्हस व्हस करते.”

” का नको करू? अगं निवृत्ती मिळाली, म्हटले आता करतील थोडा आराम. या वयात तरी मिळेल निवांतपणा. पण कसले काय? जेवढे पैसे मिळाले तेवढे पैसे गुंतवून हे नर्सिंग होम उभारले. ना दागिना ना कपडा. वर म्हणे, समाजाने दिलेले समाजासाठी वापरले.”

” पण अनुदान मिळाले ना गं नर्सिंग होमला?”

” कसले अनुदान गं, चार स्वयंसेवी संस्था मदत करतायत म्हणून चाललेय बघ सगळे. मागे कोणाच्या सांगण्यावरून केला होता अर्ज. पण पुढे जाऊन कोणाशी बोलायला नको का? दोन खेपा घालायला नको का? कसले काय, सरकारकडून मिळाले तेवढेच खूप आहे, आणखी काही नको असे म्हणत बसले घरी.”

” पेशंटचे नातेवाईक तरी …

” अगं दवाखान्याला पैसा उरला नाही की, टाकतात आणून इथे. वर परत मागे वळून बघणे नाही. कितीदा तर दादांनी फोन करून बोलावले, तरी येत नाहीत. मग सांभाळतो आम्हीच दोघे.”

” आणि मी येते ते अधूनमधून ? “

” कोण तू? माहेरवाशीण म्हणून येतेस आणि माझी कामे वाढवतेस.”

” असे गं काय आक्का. बाकी तुझ्या तोंडून हे सारे ऐकायला भारी वाटते. तुझ्या नी दादांच्या संसाराची शाहिरीच जणू.”

” हं झाडावर नको चढवायला. तुझ्या आवडीचे पोहे केले आहेत. अगदी तुला आवडतात तसे साखर, लिंबू, खोबरे, कोथींबीर सगळे घालून. खा गरम गरम आणि कर आराम आत जाऊन.”

लेखक : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नवी नवरी नि जुनी नवरी – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री नीलेश कामथे ☆

? जीवनरंग ?

☆ नवी नवरी नि जुनी नवरी – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री नीलेश कामथे 

कालच ओळखीत एका ठिकाणी भेटायला गेले होते. नुकतंच लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं. साधारण महिना झाला असेल, लग्नानंतरचे सगळे सोपस्कार होऊन रुटीन लाईफ सुरू झाले होते.

सहजच विचारलं ‘ सून बाई  कुठायत?’ तेवढ्यात ती आलीच ऑफिसमधून. एक छानसं स्माईल देऊन आलेच सांगून आत पळाली.. मनात म्हंटलं, ही कशाची येते आता, दोन गोष्टी करून निघूयाआपणच.  त्यांना म्हणत होते मी “आता तुम्हीच या श्रमपरिहाराला माझ्याकडे.”

सून कपडे बदलून आलीसुद्धा बाहेर. थेट आमच्यात येऊन बसली. म्हणाली, “ हो नक्की येतील, पण  तुम्ही बसा आता. मस्त पोहे खाऊन जा, आणि पुढल्या वेळी ठरवून जेवायलाच या.”

मला आश्चर्य वाटलं. मीही सुखावले, दिलखुलास दाद दिली, तिचं माझ्या स्टाईलने कौतुकही केलं. तीही खुलली, म्हणाली, “ तुम्ही बसा बोलत. मी पोहे घेऊन येतेच.”  मी त्यांच्याकडे वळून म्हंटलं, “ वाह काय लकी आहात हो, काय गोड आहे सून तुमची.”

त्या म्हणाल्या, “ अगं हो तुझाच पॅटर्न युज करतेय, “प्रेम द्या अन् प्रेम घ्या.”  “ अरे वा, मस्त परिणाम साधलात की, नक्की काय केलंत ?”

त्या म्हणाल्या, “ विशेष काही नाही गं. ती हनिमूनवरुन आल्यावर तिला पूर्ण आराम दिला. म्हंटलं तू सात दिवस पूर्ण आराम कर. सगळी कामाची पद्धत, वेळा, बारीक बारीक लक्ष देऊन फक्त बघ. करू ही नको नी बोलू ही नको, जे आवडेल ते आवडलं या काॅलममध्ये, जे नाही आवडलं ते नाही आवडलं या काॅलममध्ये, मात्र कारणासहित लिही आणि सात दिवस कमी वाटले तर  सांग.आपण जास्ती दिवस ठेवू, ती नको म्हणत होती, पण मी ऐकलेच नाही.”

“अगदी त्याच सात दिवसात तिनी मला कोणत्या नी कशा प्रकारे मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हे मी लिहून ठेवलं. झालं– सात दिवस अगदी मजेत घालवले. मी काम करत असतांना ती माझ्या अवतीभवती राहिली आणि मला कळले, हिला माणसे आवडतात. मी काम करताना कधीच बेडरूममध्ये जाऊन बसली नाही. मग मीही तिच्याशी बोलता बोलता तिच्या सवयी, आवडीनिवडी जाणून घेतल्या. आपल्या घरच्या पद्धती, रीती रिवाज, आला गेला, कामाच्या वेळा कशा सांभाळायच्या, हे, ती बोअर होणार नाही इतपतं तिला समजेल असं ऐकवलं.”

“तीही आवडीने ऐकत होती, टिपण करत होती, घर आवरताना मध्येमध्ये तिच्याही आवडीनिवडी सांगत होती. एकंदर ती उत्साहात होती. मग मीही खुष होते. सात दिवस अगदी मजेत गेले. तिला माझं एकूण एक काम आवडलं गं, आमची गट्टी तिथेच जमली. आम्ही एकमेकींची टिपणं वाचली नि मुख्य म्हणजे तीच लक्षात ठेवून वागतोय. तिला स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता पण अजिबात सवय नव्हती. तेव्हा ती म्हणत होती, तुम्ही शिकवलंत तर मीही तयार होइन. तुम्ही सकाळी करा नि संध्याकाळी मला सगळं शिकवा. पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी माझ्याकडून करून घ्या म्हणजे तुम्हालाही बरे नि मी ही शिकीन. आणि हे असं सगळं १५ -२० दिवस झाले चाललंय, पण मस्त चाललंय आमचं.”

ऐकूनही खूप छान वाटलं. इतक्यात गरमागरम पोहे आलेच. तिच्या लाघवी, खेळकर हास्यविनोदाने पोहे आणखी रुचकर लागले. खूप बरं वाटलं,पाहून ऐकून.

हल्ली होतंय काय, सासू सुना एकमेकींशी अशा दिलखुलास बोलताना दिसत नाहीत. वाटतं, दोघांनीही एकमेकींना समजून घ्या. एकमेकींची मतं जाणून ऐकून घ्या. एकमेकींना आधार वाटेल अशा वागा. एकमेकींचे दोष पटकन दाखवून भांडत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गुणांचीही दखल घ्या- ती ही मनापासून. आपापली मते एकमेकींवर लादू नका, सकारात्मकतेने, नीट प्रेमाने, आपलेपणाने सांगा, एकमेकींच्या चुका नीट समज देऊन पदरात घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकींचा आदर करा. घर कामाची वाटणी आपला वेळ आपल्या क्षमता बघून नीट समजून उमजून केलीत तर खटके उडणारच नाहीत.

सासूनेही येता जाता स्वपुराण न लावता, टोमणे न मारता, माझं अच्छ नि माझं तच्छं. हे सांगत बसण्यापेक्षा दोघी मिळून सुवर्णमध्य साधून सुनेशी जवळीक निर्माण होईल असेच पाहावे. सगळी कामं एकदम न लादता टप्याटप्याने सांगावीत. नवीन घरात रुळतांना तिलाही वेळ द्यावाच लागेल. संयम आणि प्रेम असेल तर अपेक्षित यश मिळेलच, पण थोडा काळ जाऊ द्यावाच लागेल.

सुनेने सुद्धा वागता-बोलताना नीट विचार करावा. सतत माहेरच्या कौतुकाचे टुमणे लावण्यापेक्षा सासरीही आपुलकीने राहावे. अगदी एखादा पाहुणा आल्यावर जसे आपले त्याच्याकडे सगळे लक्ष असते, अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष सुनेकडे सगळ्यांचेच– म्हणजे धुणी भांडी, केरलादी करणाऱ्या बायकांपासून ते थेट शेजारीपाजारी नि आला गेलाही निरखून बघत असतात सुनेकडे. हीच तर खरी कसोटीची वेळ असते. याच वेळी नीट जबाबदारी नि मर्यादा ओळखून वागावे. एखादे काम जास्तीचे पडले तर कुरकुर न करता आनंदाने करावे. घरातले वातावरण आपल्यामुळे बिघडणार नाही किंवा आपल्या वागण्याबोलण्याने कुणी दुखावणार नाही आणि कुठला सीनही क्रिएट होणार नाही याची दक्षता घ्यावी. हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. मने जिंकून घ्यावी.

कित्येक सासवांना काही करावे लागत नाही. तरी सुनेशी सूर जुळतच नाही. कधी त्या सुनेशी प्रेमाने वार्तालाप करीतच नाहीत. सून सगळं करत्येय, तर चार शब्द  तिच्याशी प्रेमाने आपलेपणानी बोला, जवळीक साधा, तिच्या आवडीनिवडीची कदर करून तिच्यासाठी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट केलीत तरी खूप सुखावेल ती, नि दोघिंमध्ये एक घट्ट वीण तयार होईल प्रेमाची. सासू-सून या एकमेव कारणाने वेगळी चूल मांडण्याचा साधा विचारही मनात येणार नाही. परिवार एकसंघ नि एकछती राहील, (अर्थात मनाने- नाहीतर लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो पण खरं म्हणजे मनं कधीच दूर गेलेली असतात,) आणि या मायलेकी नाही, सासुसूना आहेत असं सांगावं लागेल लोकांना. सासू- सून या नाजूक नात्याला रेशीमगाठी म्हणायचे असेल, तर दोघींच्याही वागण्यात रेशीमता हवी. म्हणजे नवी नवरी आली तर तिचे स्वागतच होइल आणि जुनी नवरी सुद्धा अज्जिबात दुखावणार नाही. “रिश्ता वही सोच नई” शेवटी दोघीनीही एकच लक्षात ठेवायचं, नाती जोडण्यासाठी, जुळवण्यासाठी आपली या पदावर पोस्टिंग झालीय, तेव्हा नाती जोडत, जुळवत सासू-सुनेच्या जोडगोळीत गोडी  ठेवा…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  निलेश कामथे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 2 – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? जीवनरंग ?

☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

(अजय आणि शिल्पा अवाक होऊन ऐकत होते…) इथून पुढे —-

“ तुझा मोबाईल इथे राहिला होता, तुझी केस पाहता मला तो मोबाईल चेक करणं आवश्यक होतं…

तू कायम या चार मैत्रिणींसोबत स्वतःची तुलना करत आली आहेस…कॉलेजमध्ये तुमचा ग्रुप होता… तू चौघीत सर्वात हुशार… सर्वात सुंदर… लग्न झाली अन चौघींच्या वाटा वेगळ्या झाल्या…बरोबर ना ? 

रेखा… नवऱ्यासोबत अमेरिकेत आहे… तिथले तोकड्या कपड्यातले फोटो ती सतत फेसबुक, व्हाट्सअपवर टाकत असते… तू सतत ते बघत स्वतःशी तुलना करतेस, की मला का नाही असं जाता आलं परदेशात ?? आतल्या आत कुढत, मनात नको वाटत असतांना कमेंट करतेस…”मज्जा आहे तुझी” , “भारी फोटो आहे ” , “ लकी आहेस ” वगैरे….

माधुरी, एका कंपनीत मॅनेजर… आपल्या कंपनीतले सर्व इव्हेंट्स ती सोशल मीडियावर टाकते, तू सतत ते बघत विचार करतेस, की मला का नाही मिळवता आली ती पोझिशन ?? मी सर्वात हुशार आहे, पण लहान शहरात असल्याने मागे पडलीये का मी ??

तसंच प्रेरणा आणि नम्रताचं… त्यांचे सततचे पिकनिकचे फोटो पाहून तुला वाटतं की आपल्या आयुष्यात का नाही असे क्षण ??

—तू त्यांच्या नजरेतून स्वतःला बघत राहिलीस—, ‘ त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल ? मी अशी घरी बसलेली, लाचार, कुढत जगणारी…अयशस्वी… दुबळी…’  मग अजयजवळ मन मोकळं करायलाही तू घाबरायचीस… कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्यालाही तुझ्यावर कुठल्या अपेक्षा लादून दुखवायचं नव्हतं… मग आतल्या आत कुढत तू स्वतःवर डिप्रेशन लादून घेतलंस….” 

शिल्पाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले, डॉक्टर शब्द न शब्द खरं बोलत होते…“ आणि ऐक, शिंदेकडून मी त्यांची वरवर माहिती काढली… ज्या रेखाच्या परदेशातील वास्तव्यावरून तुला हेवा वाटायचा… तिला एक असाध्य आजार आहे…रोज ती आजाराशी झगडत आहे. … माधुरी… मॅनेजर असूनही तिच्या नवऱ्यावर तिला कंट्रोल ठेवता आला नाही, तिचा नवरा बाहेर कुठल्यातरी मुलीत अडकला आहे…. प्रेरणा अपत्यासाठी वणवण करत डॉक्टरवाऱ्या करते आहे …….. आणि नम्रता कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली आहे… या चौघी आपलं वरवरचं आयुष्य सोशल मीडियावर टाकताहेत … त्या खालचं जळजळीत वास्तव कोण कशाला जगासमोर दाखवेल ???

….. तू स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे बघ…जगात तुझ्याहून सुखी कोण आहे ?? कौटुंबिक हिंसाचार तर लांबच… इतका प्रेमळ आणि प्रामाणिक नवरा तुला मिळालाय… निरोगी शरीर मिळालं आहे आणि तुझी ओंजळही तुला अपत्य मिळून भरलेली आहे…अजून काय हवं असतं सुखी आयुष्यासाठी ?? तुलना करणं सोड… दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून तू रडतेस, पण तुझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाहीये …… हा विचार तू कधी केला आहेस का  ??? “ 

एका क्षणात शिल्पाचे डोळे उघडले… एका नवीन उत्साहाचे, आनंदाचे आणि जोशाचे भरते तिला आले….

“ डॉक्टर खरंच मी चुकले…. तुमच्यामुळे मी स्वतःला माझ्या नजरेतून पाहू शकले… खरंच माझ्याहून सुखी कोण आहे या जगात ?? माझी ओंजळ सुखाने पुरेपूर भरलेली असताना काल्पनिक मृगजळामागे मी धावत होते…. स्वतःची तुलना इतरांशी करत होते….पण आता नाही… मनावरचं मळभ आता दूर झालंय…. आता शिल्पाचा एक नवीन जन्म झालाय… आनंदी, उत्साही आणि जोशपूर्ण अशी एक स्त्री म्हणून….”

डॉक्टर हसले… ” कुठल्याही गोळ्यांची गरज नाही तुम्हांला… आयुष्य भरभरून जगा…आनंदाचे कण पेरत चला…बघा आयुष्य कसं प्रेमाच्या अंकुरांनी फुलून येईल ते….”

दोघांनी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद घेत निरोप घेतला…जाता जाता अजय म्हणाला… ” तुम्ही “डॉक्टर सदावर्ते” पाटी काढून ” डिटेक्टिव्ह डॉक्टर सदावर्ते ” अशी लावली तरी चालेल….”

त्याच्या या वाक्यावर डॉक्टर आणि अजय खळखळून हसायला लागले….आपण कारण नसताना दुस-याच्या दिखाव्याच्या जीवनावर, कुठलाही अभ्यास न करता विश्वास ठेवतो…त्यांच्याशी आपली तुलना करतो… व नाहक आपले मानसिक संतुलन बिघडवून घेतो,  जे योग्य नाही…हे समजायला आपल्याला फार उशीर होतो…आपण आपल्या परिवारासमवेत सुखी आहोत हीच भावना सर्वश्रेष्ठ आहे…काल्पनिक मृगजळाच्या मागे धावू नका…

— समाप्त —

ले.: अनामिक 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 1 – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? जीवनरंग ?

☆ काल्पनिक मृगजळ — भाग – 1 – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“ बोला, काय त्रास होतोय?..”

“ डॉक्टर, खूप डिप्रेशन आलं आहे, कसलाच उत्साह वाटत नाही, काहीच करायची इच्छा होत नाही…”

“ काही विशेष कारण ? एखादी वाईट घटना ??”

“ नाही डॉक्टर, अगदी सुरळीत आहे सगळं…घरकामाला बाई आहे, मुलगा ८ वीत शिकतोय, नवरा प्रेमळ आहे… तरीही का असं होत असेल ?? ”

“ ठीक आहे. तुम्ही बाहेर जा, मी तुमच्या मिस्टरांशी बोलतो जरा…”

डॉक्टरांनी सांगितलं तसं शिल्पा बाहेर गेली….

डॉक्टर अजयला विचारू लागले…

“ तुम्हा दोघांत काही वाद ?? काही भांडणं ?? ”

“अहो सांगतो काय डॉक्टर, आमच्यात कसलाही वाद नाही की काही नाही, पण ही सतत चिंतेत दिसते, कसलाही उत्साह नाही तिला… तिची ही अवस्था बघून मलाच खूप काळजी वाटली म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आलो…”

“ बरं मला शिल्पाचा दिनक्रम सांगा….”

“ सकाळी उठते, चहा बनवते, मग स्वयंपाकीण येऊन नाष्टा, जेवण बनवते. कामवाली घरातला झाडू पोचा, भांडी, कपडे आवरून घेते… त्यावेळात शिल्पा मोबाईलवर काहीतरी बघत टाईमपास करते… मग tv बघते… तिला म्हटलं नोकरी कर, मन रमेल, तर तेही नाही म्हणते…”

“ इतका राणीसारखा थाट असून शिल्पाला कसलं डिप्रेशन आलं असेल ??” डॉक्टर विचार करू लागले…

“ ठीक आहे मी काही गोळ्या देतो, त्या घ्यायला लावा आणि ८ दिवसांनी परत या…”

शिल्पा आणि अजय निघून गेले. शिल्पाचा मोबाईल तिथे टेबलवरच राहिला होता…डॉक्टरांनी कंपाउंडरला फोन केला पण तोवर ते दोघे निघून गेले होते….

डॉक्टर विचार करत बसले— ‘ ही केस जरा वेगळी दिसते, कारण कारणाशिवाय कोणी डिप्रेस होत नाही.’

अजयने शिल्पाचा सांगितलेला दिनक्रम डॉक्टरांनी आठवला..

डॉक्टरांना लक्षात आले की या सगळ्याचं मूळ हा मोबाईल आहे… असं काय होतं त्या मोबाईलमध्ये ? कोणाचा फोन येत असेल का? कोणी त्रास देत असेल का?? कारण शिल्पा जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये असायची, घरात करण्यासारखी काही कामं नव्हतीच…

डॉक्टरांनी शिल्पाचा मोबाईल चेक करायचा ठरवला…

तसं पाहिलं तर दुसऱ्याचा मोबाईल बघणं हे चुकीचं होतं. पण शिल्पाच्या उपचारासाठी ते करावंच लागणार होतं… सुदैवाने मोबाईलला कसलंही लॉक वगैरे नव्हतं…

डॉक्टरांनी व्हाट्सएप चालू केलं… सर्च बॉक्समध्ये त्यांनी काही शब्द टाकले…

—“त्रास”, “वाईट”, “दुःख”, “एकटेपणा”….

पण या संदर्भातील कुठलाही मेसेज आढळला नाही…

डॉक्टरांनी काही वेळ विचार केला..मग त्यांनी टाइप केलं..

—“मज्जा”, “भारी”, “लकी”….

अश्या शब्दांचे भरमसाठ मेसेज सापडले… त्या मेसेजमध्ये रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता अशा चार मुलींशी जास्त चॅटिंग झालेली दिसली ….

नंतर डॉक्टरांनी फेसबुक ओपन केलं… त्यात ऍक्टिव्हिटी लॉग चेक केला… त्यातही या चार मुलींची प्रोफाइल आणि फोटोज बघितले….

काय संबंध होता या चौघींचा आणि शिल्पाच्या डिप्रेशनचा ??

खूप विचाराअंती डॉक्टरांना काय समजायचं ते समजलं… इतक्यात दार वाजले, डॉक्टरांनी मोबाईल चे current apps पटापट बंद केले… शिल्पा आणि अजय आत आले.  मोबाईल राहिला म्हणून घ्यायला आले होते , मोबाईल घेऊन परत गेले..

डॉक्टरांना त्या चौघींची नावं आणि फोटो चांगले लक्षात राहिले होते…

त्यांनी त्यांचा फोन फिरवला…

“ शिंदे, जरा वेगळं काम आहे….” असं म्हणत डॉक्टरांनी शिंदेला (कंपाउंडरला) एका वेगळ्या मिशन वर धाडलं…

आठ दिवसांनी शिल्पा आणि अजय परत आले…

“ गोळ्यांनी काही फरक ?? ”

“ झोप जास्त येते,बाकी काही नाही…”

डॉक्टर उठले, त्यांचा खुर्चीमागे जाऊन हात खुर्चीच्या डोक्यावर टेकवत बोलू लागले…

“ शिल्पा..तुझ्या मैत्रिणी रेखा, माधुरी, प्रेरणा आणि नम्रता… या जगातल्या सर्वात सुखी मुली आहेत असा तुझा गैरसमज असेल तर तो काढून टाक…”

खाली मान घालून बसलेली शिल्पा चक्रावली, एकदम मान वर करत म्हणाली…

“ तुम्हाला कसं माहीत त्या माझ्या मैत्रिणी आहेत ते ??? ”

अजय आणि शिल्पा अवाक होऊन ऐकत होते…

क्रमशः

ले.: अनामिक 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन घास… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ दोन घास… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ 

नुकतेच लग्न झाले होते आणि सासू सासऱ्यांकडे मी राहात होते. सासरे रेल्वेतील निवृत्त अधिकारी पेन्शनर होते. पूर्ण वेळ देवाचे नाम घेणे, जप करणे, घरातील सर्व सामान मंडईतून स्वतः आणणे, ज्योतिषाचा व्यासंग जपणे वगैरे गोष्टीत सासरे मन रमवायचे. सासूबाई घरची सर्व कामे पहाणे, स्वैंपाक करणे, येणाऱ्या जाणाऱ्यांची उठबस करणे यातच नेहमी व्यस्त असायच्या. सासू सासरे अत्यंत देवभक्त व धार्मिक वृत्तीचे होते.

नवरा डॉक्टर व कमवता असल्याने घरी ठीक चालत होते. मी तेव्हा लग्नानंतरही शिकत होते.

त्या वेळी आमच्याकडे सुमन नावाची मोलकरीण धुणी-भांडी, व घरची साफ-सफाईची देखील कामे करायची. पूर्ण चाळीत चार पाच जणांकडे ती कामे करायची. माझ्या सासूबाईंना एक सवय होती. त्या गरम गरम चपात्या करायच्या तेव्हा रोज सुमनला अगत्याने बोलवायच्या आणि “खा गं सुमन” म्हणून सुमनला अगत्याने तव्यावरची गरम चपाती चहाबरोबर द्यायच्या. तोपर्यंत कुणीच सकाळी जेवलेले नसायचे, पण सुमन मात्र सासू बाईंच्या हातच्या गरम चपाती व चहाची हिस्सेदार व्हायची. दारावर पारू आणि तिची मुलगी मीना मासे विकायला यायच्या. एवढी मोठी टोपली दूरवरून ट्रेननी आणायची आणि दारोदार विकायची हे या कोळीणींचे हेच तेव्हढे उदरनिर्वाहाचे साधन होते.

मी सासूबाईंना ‘अहो आई’ म्हणत असे. आई पारू, व मिनालाही जेऊ घालायच्या.. ‘अगं थोडी भाजी चपाती खा, दूरून आलीस तू, दोन घास तरी खा” म्हणून अगत्याने बसवून आई त्यांना खायला द्यायच्या…

घरी माणसांची आवक मोठी होती, सतत पाहुण्यांचा राबता असायचा..कुणीही जेवल्याशिवाय जायचे नाही, दोन घास खाऊनच जायचे हा जणू आमच्या आईंचा नियमच होता..त्यावेळी माझा नवरा एकटा कमवता आणि असे सर्वाना आई का खायला घालत सुटल्या आहे ह्याबद्दल माझे सरंजामी मन अनेकदा खट्टू व्हायचे..कधी कधी चीडही यायची..जेव्हा बघावे तेव्हा कधी भाजीवाली, कधी मोलकरीण ऐसपैस बसून दोन घास खात आहेत.

तेव्हा मी तरुण विशीतील युवती होते, थोडाफार एक शिक्षणाचा आत्मविश्वास आणि अहंकारही होता. त्या अहंकारातून मुसमुसुन राग यायचा..त्या फुकटच्या पत्रावळी आणि दोन घास आदरातिथ्याचा..

म्हणता म्हणता दिवस सरले..सासूबाई आणि सासरे हे काळाच्या आड गेले..आणि नकळत काळाने मलाही बदलले.

आज लोणावळ्याच्या घरी तिकडची नोकर जयश्री आली..तिला मी नकळत बोलले, जयश्री “दोन घास” खाऊन जा गं..ताकाची कढी केली आहे”..आताशा कुणीही आला आणि आपल्याकडे दोन घास खाऊन गेला नाही हे गणित माझ्या हिशेबात जुळत नाही..परिस्थितीच्या अनेक आवर्तनात माझा तारुण्यातील सरंजामी अहंकार कधी गळला तेच कळले नाही..

आपण अंगमेहनत न करता खातो ही कुणकुण सतत राहते..कोळीण, भाजीवाल्या एवढ्या मोठ्या टोपल्या वाहतात, घरी येणारी मोलकरीण सर्व काम मेहनतीने करते आणि मी फक्त टेबलावर बसून कामे करते या भावनेची सतत जाणीव होते..

आईंना आणि माझ्या सासऱ्यांना “दोन घासात” माणसं जुळवण्याचे गणित कळले होते…

“दोन घास” आपण कमी खावे परंतु अन्न हे दान करण्यातच खरे सुख असते, आनंद असतो …त्या आनंदाचे संस्कार नकळत आईंनी आणि सासरेबुवांनी माझ्यावर केले…त्यांची उतराई कशी होऊ?

कर्णाला तू सर्व दान केलेस पण फक्त अन्न दान केले नाहीस म्हणून पृथ्वीतलावर जा आणि अन्न दान कर अशी स्वर्गात आज्ञा होते..

तो पृथ्वीवर येऊन दान करतो तोच “पितृ पक्ष”..आणि मग कर्णाला मोक्ष मिळतो हे सर्वज्ञात आहे…

हा मोक्ष दुसरीकडे नाही, तर या जन्मी आणि याची डोळा दुसऱ्याला जेवून “दोन घास” भागीदारी करताना कृतार्थ होतांना बघण्यात आज  आणि येथेच आहे….

आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, परंतू स्वतःच्या ताटातील अन्न देणे हे वेगळे आहे..

अन्न हे अनेक वासनांचे बीज आहे, माणसाचे मन हे अन्नाशी निगडीत आहे. म्हणूनच अन्न आणि वृत्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा अतूट संबंध आहे..

जेव्हा आपण दुसऱ्याशी “दोन घासाची” भागीदारी करतो तेव्हा अहंकाराचा, वासनांचा त्याग करत असतो…

अश्याच एखाद्या मौळीत मी गेलेली असते..छपरातून पाणी टपटप पडत असतं.. घरात पोरं उघडी बसलेली असतात..वयात आलेली एखादी तरणी थोडीशी चिंधी गुंडाळून बसते..आणि घरची अठराविश्व दारिद्र्याची मालकीण मला म्हणते,”मॅडम दोन घास आमच्याबरोबर खा” तेंव्हा माझे डोळे पाणवतात..माझ्या कधी काळच्या सरंजामी अहंकाराची, माझीच मला घृणा येते..

माझ्या वृद्ध, गरीब आईंना कळलेली दोन घासाची माणुसकी मला पुन्हा पुन्हा दाद देऊन जाते..

लेखक- अनामिक  

प्रस्तुती- सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महापूर… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? जीवनरंग ❤️

☆ महापूर… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ 

धुवाधार पाऊस तीन दिवस थांबायचं नांव घेईना. त्यातून अतिवृष्टीचा इशारा मिळालेला.

पिंपळवाडीचं धाबं दणाणलं.

गाव दोन्हीही बाजूंनी दोन नद्यांनी घेरलेलं. ना पूलाचा पत्ता.

इन-मीन दीडशे उंबऱ्याचं गांव अन् वस्ती म्हणाल तर पोराठोरांसकट पाचशेच्या घरात.

संपर्कच तुटला.

सरपंच अन् पोलिस-पाटलानं थेट जिल्ह्याला कळवलं. कलेक्टरनं ताबडतोब आर्मीचं हेलिकॉप्टर मागवलं अन् लोकांची सुटका करायला सुरुवात पण केली.

लोकांना पाच मिनिटांत पुराच्या पलिकडं आणून सोडलं जायचं.

होता होता सुटका केलेल्या गावकऱ्यांचा आकडा वाढतच गेला.

नऊशे लोकांची सुटका झाल्यावर पायलटनं सरपंचाला विचारलं,

“अहो सरपंच, तूम्ही तर म्हणाला होता की लोकसंख्या ५०० आहे. हे नऊशे आले कुठून? आणि अजून सुध्दा शंभरेकजण शिल्लकच आहेत पुरात अडकलेले?”

सरपंच पिचकारी मारत म्हणाले,” त्याचं काय हाय साएब…

माणसं ५०० पण नाहीत पण होतंय काय, हिकडं आणलेले लोक, पुनंदा तिकडं जात्यात पाण्यातून पोहून. अन् हेलिकॉप्टर मधून हिकडं येत्यात. आमाला कधीच मिळत न्हाई ना त्यात बसायला…खोटं कशाला सांगू साएब, मी सोत्ता तीनदा जाऊन आलोय…..!”

पायलटनं डोक्यावर हात मारून घेतला….!!!

मेरा भारत महान….

🤕

लेखक-अज्ञात

प्रस्तुती- सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शहीदाची बायको – प्रा. हरी नरके ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ शहीदाची बायको – प्रा. हरी नरके ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू  लोकांचं गाव. “लढावू” लोकांचं गाव!

श्री.अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1980 साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारकं उभारण्याचं ठरवलं.

कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं.

कंत्राटदारानं काही मजूर कामावर लावलेले होते.

एक म्हातारी मजूर आजारी होती. तिच्या अंगात खूप ताप होता. तिच्याच्यानं जड घमेली उचलण्याचं काम होत नव्हतं. कंत्राटदारानं घरी जाऊन आराम करा, दवापाणी घ्या असं तिला सांगितलं.

म्हातारी म्हणाली, “बाबा, दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी माझी चुल पेटंल. मी आज काम केलं नाही तर खाऊ काय? मला काम करू दे बाबा, मी पाया पडते तुझ्या.”

म्हातारीचा तोल जात होता. दोनदा तिनदा ती पडतापडता वाचली.

म्हातारी काम करताना पडली तर अपघात होईल आणि आपल्या डोक्याला विनाकारण ताप व्हायचा म्हणून कंत्राटदार चिडला आणि त्यानं तिला हाताला धरून कामावरून बाहेर काढलं.

म्हातारीनं त्याचं पाय धरलं, विनवणी करीत म्हणाली ” लेकरा, अरं, सरकार ज्यांचं हे स्मारक बांधतंया त्या शहीदाची मी बायको हायं रं!”

कंत्राटदार चरकला. म्हातारीला घेऊन तो दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी म्हातारीला तपासलं. औषधं दिली. कंत्राटदाराला सांगितलं, आजार खूप गंभीर आहे. म्हातारी चार दिवसांचीच सोबतीन आहे. त्याच आजारात बाई गेल्या. स्मारक पुर्ण झालेलं त्या बघू शकल्या नाहीत.

होय, त्या शहीद विष्णू भाऊ बारप्टे यांच्या वृद्ध पत्नी होत्या. अन्नाला मोताद झालेल्या. मजुरीवर पोट भरणार्‍या.

9 ऑगष्ट 1942 ला महात्मा गांधीजींचा “करेंगे या मरेंगे, चले जाव ” चा नारा आला. कामेरीच्या तरूणांनी हातात तिरंगा घेऊन “वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद, ब्रिटीशराज चले जाव” अशा घोषणा देत पोलीस चौकीवर मोर्चा काढला. त्या मोर्च्याचा नेता होते, तरूण विष्णू भाऊ बारप्टे.

ब्रिटीश पोलीस अधिकारी जनरल डायरचा भाऊबंध होता. तो भडकला. तुम्हाला काय पायजे? असं त्यानं विचारलं. निधड्या छातीचे विष्णू भाऊ बारप्टे म्हणाले, ” आझादी पाहिजे.” हे घे, म्हणत त्यानं थेट छातीत गोळी झाडली. विष्णू भाऊ बारप्टे जागेवरच शहीद झाले.

त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्यांची तरूण पत्नी विधवा झाली.

ब्रिटीश पोलीसांनी तिचाही अपार छळ केला. बाई काही काळ गाव सोडून परागंदा झाल्या. पुढं स्वातंत्र्य मिळालं. बाई गावी परत आल्या. मजुरी करून जगू लागल्या.

स्वातंत्र्यसैनिकांना सरकारनं ताम्रपट दिले. मानधन सुरू केलं. “आपलं माणूस राहिलं नाही, आता त्या ताम्रपटाचा काय उपयोग? फुकटचं मानधन मला नको ” म्हणून बाणेदार बाई मजुरी करून पोट भरायच्या. बाईंनी आयुष्यभर विधवापण सोसलं. अंगावर निभावलं. जवानी जाळीत निभावलं. ती शहीदाची बायको होती.

क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिन यांच्या निमित्ताने या लढाऊ, झुंझार शहिदपत्नी, स्मृतीशेष बायजाबाई बारप्टेंना विनम्र अभिवादन. कृतज्ञ वंदन!

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print