बऱ्याच दिवसात एका मित्राशी फोनवर बोलणं झालं नव्हतं म्हणून विचार केला आज वेळ आहे तर फोन करावा. पलीकडे रिंग वाजली आणि लेडीज आवाज आला –
हॅलो कोण बोलतायं आपण
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. शर्माजी कुठे बाहेर गेलेत का.
तिकडून : नाही, ते घरीच आहेत पण सध्या ते फेसबुकवर आहेत.
मी : म्हणजे! मग फोन तुम्ही कसा काय घेतला
तिकडून : रोज सकाळचा नाश्ता झाला की ते दोन तास फेसबुकवर असतात. आणि त्यावेळेत कोणाचाही फोन घ्यायचा नाही म्हणून कॉल फॉरवर्डिंग करता माझा नंबर दिलेला असतो. म्हणून फोन माझ्या फोनवर येतो.
तिकडून : ते फेसबुक वरून उठले, की तुमचा फोन येऊन गेल्याचे त्यांना सांगते.
मी ठिक आहे म्हटले, बाय-बाय केले आणि फोन बंद झाला.
आणखीन एका मित्राला फोन लावला आणि तो पण फेसबुक वरच होता.
विचार केला, एका मैत्रीणीला फोन लावावा, ती नक्कीच फेसबुक वर नसणार.
फोन लावला आणि तिकडून पुरुषी आवाज आला..
तिकडून : हॅलो कोण बोलताय आपण?
मी : नमस्कार, मी करंदीकर बोलतोय. छाया मॅडम आहेत का?
तिकडून : आहेत, पण आता त्या फेसबूक वर आहेत. अजून दोन एक तास तरी त्या फेसबुक वरून बाहेर येणार नाहीत. हा त्यांचा रोजचा शेड्यूल असतो. बाहेर आल्या की त्यांना तुमचा फोन आल्याचे सांगतो.
मी थोडे बोललो आणि धन्यवाद म्हणून फोन बंद केला.
विचार केला की आता अशा मित्राला फोन लावावा की जो स्वतः फेसबूक वर असला आणि कॉल फॉरवर्ड त्याच्या बायकोकडे गेला, तर त्याच्या बायकोशी पण बोलता येईल, कारण त्या पण चांगल्या ओळखीच्या आहेत.
मी फोन लावला रिंग वाजली आणि तिकडून एकदम तरुण माणसाचा आवाज आला –
हॅलो कोण बोलताय आपण?
मी : मी करंदीकर बोलतोय, सुरेश जी आहेत का.
तिकडून : आहेत पण आता ते फेसबुक वर आहेत
आणि या वेळेत ते कोणाचाही कॉल घेत नाहीत.
मी : त्यांच्या मिसेस ना फोन देता येईल का?
तिकडून : सॉरी सर, त्या म्हणजे आई पण आता फेसबुक वर आहे. ती पण यावेळी कोणाचे फोन घेत नाही. मी सुरेशजींचा मुलगा बोलतोय.
माझं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी घरीच आहे. दोघांनी त्यांचे फोन कॉल फॉरवर्ड वर माझा नंबर दिला आहे.
मी : दोघंही दोन तीन तास फेसबुकवर म्हणजे सकाळच्या वेळी घरात कामाचा खोळंबा होत असेल
तिकडून : नाही नाही, सगळ्या कामांना मावशी आहेत. आणि ते दोघं फेसबुक वर असले, की घरात तेवढीच शांती असते. माझी बायको पण रिलॅक्स असते.
मी दोघांनाही तुमचा फोन आल्याचे सांगतो.
मी मुलाशी त्याच्या ऑफिस बद्दल / कामाबद्दल थोडी चौकशी केली, ‘हॅव अ नाईस डे’ असे म्हणून फोन बंद केला.
— — विचार केला, अरे सगळे फेसबुक वर आहेत आणि आपण फेसबुकच्या बाहेर आहोत हे काही बरोबर नाही.
मी लगेच माझ्या मोबाईलवर कॉल फॉरवर्ड करता बायकोचा नंबर टाकला आणि फेसबूकमय झालो.
काल भारत पाकिस्तानची T 20 World Cup मॅच बघत होते. अनेक चढ उतार मॅच मध्ये घडत होते, आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चूकत होते. शेवटचा ओव्हर तर ‘full of activities ‘ होता. बहुतेक क्रिकेट मधील सर्व टर्म्स त्या ओव्हर मध्ये ‘commentators ‘ ना वापराव्या लागल्या.
त्या ओव्हर मध्ये काय नाही झालं.??
एक, दोन, तीन, चार, सिक्स रनस्, नो बॉल, फ्री हिट Wide Ball, stumps उडाले, दोन प्लेअर आउट होतात. कॅप्टन चे एंपायर बरोबर डिस्कशन वगैरे वगैरे. तो एक ओव्हर म्हणजे पूर्ण मॅच होता.
खेळ कसा प्रत्येक बॉलवर बदलू शकतो. ते समजे पर्यंत दुसरी घटना घडते. प्लेअर्स ची कमाल तर होतीच, बरोबर एंपायर्स ची पण परीक्षाच होती. एवढी कठीण परीक्षा त्यांनीही यापूर्वी कधी दिली नसेल बहुतेक. जणू काही सर्वांच्या डोक्यात Super computer fit असतात, तसे ते निर्णय देत होते.
खेळ कसा खेळावा याची अनेक उदाहरण प्रत्यक्षात बघायला मिळत होती.
म्हणजे पूढे एखादा कोच आपल्या शिष्याला कोचिंग देताना हा over नक्की दाखवेल असा हा over होता.
कोणाकोणाचे किती आणि कशा कशाचे कौतुक करावं हेच कळत नाही. हा over म्हणजे तासोंतास चर्चा करण्याचा विषय आहे.
विराटचे तर विराट कौतुक. त्याची बॉडी लॅंगवेज, aggressive approach, presence of mind, stamina, awareness, quick decisios. एवढ्या प्रेशर मध्ये असताना तो घेत होता. कुठेही give up, surrender ची बॉडी लॅंग्वेज नव्हती. ‘मी जिंकणारच ‘हाच भाव चेहऱ्यावर होता.
त्याला साथ देणारा हार्दिक चे योगदान पण तेवढेच. आश्विनचां एवढ्या प्रेशर मध्ये असताना wide ball समजून, सोडणे. खरंच खूप कौतुकास्पद. दोन बॉल खेळायला आलेल्या अश्विन चा वर्ल्ड क्लास दिसला. अनुभव कामी आला.
पूर्ण टीम वर्क. positive attitude, Never say die approach.
हारलेला मॅच जिंकला.
कुठे, कधी, किती, कसा, केंव्हा, काय?? समतोल साधावा?? हे कोणीही मॅच बघून शिकावं. आयुष्याचे सार सांगणारा असा हा over होता.
मला तर वाटतं मनातील मरगळ काढायला प्रत्येकाने हा मॅच मधून मधून नक्की बघावा.
एक लाखाच्या आसपास उपस्थित दर्शकांसमोर आपले concentration कायम ठेवणे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक बॉल वर होणारा प्रेक्षकांचा हल्ला तुम्हाला विचलित करत नाही, म्हणजे किती मानसिक शक्ती, टफनेस, विल पावर, आणि काय म्हणाव?? शब्द/ विशेषण कमी पडतायेत.
त्यानंतर मी कितीदा तरी हा मॅच बघीतला. प्रत्येक वेळी अनेक नवीन विचार मनात येत होते.
हाच का तो कोहली?? मधल्या पिरेडमध्ये अगदी डाऊन होता. प्रत्येक वेळेस खेळायला यायचा आणि लगेच पॅव्हेलियन मध्ये परत जायचा. तेंव्हा अनेकांना बोलायचा चान्स मिळाला होता.
पुन्हा बाऊन्स होऊन पुर्वी पेक्षा जास्त दमदार वापसी. व्वा!! कौतुक च आहे.
तो काळ म्हणजे त्याच्या क्रिकेट जीवनात आलेला ‘Bad Patch ‘ च होता. शिखरावर असताना खाली घसरण. पुन्हा शिखरावर पोहचण. यामधील काळ म्हणजे अनेक मानसिक, शारीरिक उलाढाली चां काळ असणार नाही का?? त्यात पब्लिक फिगर असल्यावर लोकांच्या अपेक्षा असतातच. कौतुक करताना अगदी डोक्यावरच नाही तर, देवघरात बसवतील, तर अपेक्षा भंग झाल्यास काय करतील?? त्यांचाही भरवसा नसतो..
भारतीय तर तसेच क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेट मागे वेडेच,
क्रिकेट के लिये कुछ भी करेगा वाले
त्यात पाकिस्तान बरोबर मॅच म्हणजे
“इज्जत का सवाल असतो.
BAD PATCH मध्ये,
खेळताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष देणे, काही खेळण्याचे टेक्नीक बदलणे. कुठे सतर्क रहायचे?? कुठे समर्पित रहायचे?? हे ठरविणे. योग्य वेळी दोन पावले मागे घेणे.
खेळण्या बरोबर मानसिक अनुशासन असणेही आवश्यक आहे. हे काम खेळाडूंच्या कोचचे जरी असले तरी ते खेळाडू ने ऐकणेही महत्वाचे आहे.
जो काळानुसार स्वतः मध्ये बदल करतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. घसरत असताना ताठ उभं राहून चालत नाही. झुकता आलं पाहिजे. शिक्षण घेणे आणि त्याचा उपयोग परीक्षेत करणे, दोन्हीं मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खेळाच्या मैदानावर common sense and Presence of mind चे महत्व जास्त असते.
या काळात,
“जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा. “
असा कोचही पाहिजे. ‘धोनी’ सारखा साथ देणारा मित्रही पाहिजे.
हा विश्वास कोच आणि प्लेअर मध्ये असायला हवा.
“वक्त ने विराट को आजमाया बहुत लेकिन हरा नहीं पाया ।
हेच म्हणावे लागेल.
Bad Patch
हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. त्यांचा सामना करणे म्हणजे, स्वतः चे परिक्षण निरिक्षण करेक्शन करता आले पाहिजे. पुन्हा RESTART चे बटन दाबून पुन्हा जोमाने कष्ट करता आले पाहिजे.
स्वतः लाच Push and run करणे जमले पाहिजे. प्रत्येक area त double XL पेक्षा जास्त मेहनत करणे जमले पाहिजे.
म्हणतात ना
” जिंदगी में तोता नहीं बाज बनिए, क्यों कि तोता बोलता बहुत हैं और उड़ता कम हैं । बाज शांत रहता है, लेकिन आसमां छूने की ताकत रखता हैं। “
राष्ट्र सेविका समितिची शाखा एक तास असते. त्या एका तासाचे व्यवस्थित नियोजन केलेले आहे. ध्वजवंदन, शारीरिक- सूक्ष्म व्यायाम, खेळ, बौद्धिक, गीत आणि शेवटी प्रार्थना असा सर्वसाधारण क्रम असतो.
इथे घेतले जाणारे खेळ एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लंगडी, खोखो, कबड्डी हे खेळ कसे खेळले जातात हे शब्दांवरूनच समजते. तसेच हे खेळ प्रत्येकीने आधी खेळलेले आहेत. इथले खेळ कदाचित तुम्ही खेळले नसणार…
आता” राधा कृष्ण ”
हा खेळ बघा बरं… तुम्ही खेळलात का कधी?
नाही ना… सांगते मजेदार खेळ आहे.
सर्वांनी गोल करून उभ राहायचं. ओळीने एक दोन… एक दोन म्हणायचं. त्या दोघींची जोडी. एक राधा आणि दुसरी कृष्ण..
राधानी डोक्यावर माठ असल्याची ॲक्शन करून ऊभ रहायच. कृष्ण असलेल्यांनी शिट्टी वाजली की गोल पळायला सुरुवात करायची. नियम असा की ऊलटं पळायच नाही.
तेव्हा मोठ्या आवाजात घोषणा द्यायच्या.
” हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की.. ”
” जय जय गीता भगवत गीता ”
परत शिट्टी वाजली की आपल्या राधे कडे धावत पळत लवकर पोहोचायचं. तिच्यासमोर श्रीकृष्णाच्या मुरलीधर रूपात उभ राहायचं. शंकराचार्यांच्या श्रीकृष्ण अष्टकम् मध्ये त्यांनी म्हटल आहे तसं
” सुनाद वेणू हस्तकं ”
किती गोड खेळ आहे ना…
ज्यांची जोडी शेवटी होईल ती आऊट..
परत खेळाची पुढची फेरी सुरू…
सहज घोषणा देता देता श्रीकृष्णाच्या भगवत गीतेची आठवण करून दिली जाते. मला तर हा खेळ फार आवडला. या खेळात दरवेळी निराळी जोडी जमते. परस्पर परिचय.. संवाद होतो. स्नेहबंध वृद्धिंगत होतो.
अशा जोड्या जमवून खेळायचा अजून एक खेळ..
” धबधबा ”
बघा… हा शब्द ऐकून.. अरेच्चा हा कसा खेळायचा? ही उत्सुकता तुमच्या मनात आली ना?
तो खेळ असा आहे..
एक नंबरनी गुढघ्यावर हात ठेवून वाकायचं. दोन नंबरनी शिट्टी वाजली की पळायला सुरुवात करायची. अर्थात त्यावेळेस घोषणा सुरू करायच्या..
” झूल झूल झेंडा झूल
संघटन में शक्ती है
शक्ती को बढाना है
हिंदुस्तान हमारा है “
घोषणा देत पळताना मनात एक ऊर्जा निर्माण होऊन जोश येतो. खेळात उत्साह चैतन्य येते.
शिट्टी वाजली की सखीच्या समोर जाऊन तिच्या पाठीवर पालथे हात वरून खाली जोरजोरात थोपटायचे… की झाला धबधबा.. आहे की नाही मजा… सगळ्याजणी एकाच वेळेस ही क्रिया करतात त्यामुळे बघायला फार गंमत वाटते.
हे खेळ मनाला सुखावून जातात..
असंही समितीत सुरू असतं…
निखळ आनंद देणार…
अवघड व्यायाम करायच्या आधी खेळाडूंकडून थोडा वाॅर्मअप करून घेतात. शाखेत खेळानंतर बौद्धिक असते. इथे मेंदू तरतरीत होऊन बौद्धिक नीटपणे ऐकले जावे म्हणून हे खेळ घेत असावेत.
गंमत म्हणून म्हटलं हं…
इथे सांगितलेले बौद्धिक ऐकण्याची सध्या मात्र फार गरज आहे. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समितीत जाऊन समजतात. आजूबाजूला काय चाललेले आहे हे माहित होते.
आपण काय करायला हवे याचे भान येते. त्याबरोबरच… ते ऐकून आपल्यात सुधारणा करूया.. इतरांनाही शाखेत येण्यासाठी प्रवृत्त करूया… खेळाचा आनंद घेत घेत राष्ट्रप्रेम जागृत ठेवू या.
☆ मनुष्य इंगळी, अति दारुण – – ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“पणत्या कशा दिल्या काकू? ”
“नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन”
“मला ६ हव्यात. ”
“६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी.. ”
हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.
लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहित धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.
“हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या. ” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?
एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.
मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.
एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.
“केवढ्याला दिली रे?”
“साठ रूपये साहेब.”
“साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”
“खेळणंच आहे. ”
“साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीस ला दे. ”
“साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीस ला कशी देऊ? ”
तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे. ”
“चल. देतो तुला प्ले स्टेशन. ”
बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट. ”असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.
“दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही. ” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.
डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “गरिबी. ” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.
वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊपण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?
फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टीकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!
(चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया. ”)
इथून पुढे – –
टपरीभोवती चहा-बाज लोकांची गर्दी होतीच. अनधिकृतपणे का असेना त्या भर गर्दीतही फुटपाथवरच समोरासमोर दोन बाके, बसून चहा पिणाऱ्यांसाठी होती. रस्त्यावरच्याच बोर्डवर खडूने चहाबाबतचा मेनु लिहिला होता किंमतींसह. गुळाचा चहा, साखरेचा चहा, बिनसाखर चहा, आलं गवतीचहा, वेलदोडा चहा वगैरे. फुल कप, हाफ कप, कटींग असेही शब्द वाचायला मिळाले. माझ्यासाठी खरोखरच हे सगळं अनोळखी, गंमतीदार होतं.
वंदना अगदी सराईतपणे त्या चहावाल्या जवळ जाऊन म्हणाली, “भैय्या दो कप कमशक्करवाली चाय दो. ” खरं म्हणजे चहावाला मराठी माणूसच होता पण वंदनाने कदाचित सवयीने त्याला “भैय्या” म्हटले असणार. या उत्तर प्रदेशीय लोकांचं वर्चस्व महाराष्ट्रात किती आहे हे सहज जाणवलं.
दणदण गॅस स्टोव्ह पेटलेला आणि त्यावर मोठ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळणारा चहा. ऑर्डर प्रमाणे तो दूध, पाणी, चहाची पत्ती, काही आस्वाद वाढवणारे मसाले एकापाठोपाठ एक भराभर टाकत होता आणि एका डवल्याने ते सर्व मिश्रण खालीवर इतकं काही लयीत ढवळत होता की ते पाहताना माझ्या मनात सहज आलं, ” काम कुठलेही असो, कुठेही असो पण त्यातली तल्लीनता, एकाग्रता महत्त्वाची. शिवाय ग्राहकांची खुशी ही विक्रेत्यांच्या यशाची गुरू किल्ली! हेही जाणवलं चहाची ही टपरी नक्कीच लोकांची आवडती जागा असेल. काही लोक उभे होते. काही बाकावर बसले होते पण एक कपभर लज्जतदार चहासाठी त्यांच्यात असलेली थांबण्याची चिकाटी कौतुकास्पद होती. तिथे असलेल्या सर्वांसाठीच तो एक मस्त स्पेस टाइम होता. तिथे राजकारणावरच्या चर्चाही घडत होत्या. मतं मांडणारा प्रत्येक जण जणू काही त्या विषयात त्याच्या इतकं पारंगत कुणीच नव्हतं अशा अविर्भावात होता. घरापासून दूर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी तिथे श्रमपरिहारासाठी थांबले होते. त्यांच्यात आगामी परीक्षांविषयी, शिक्षण पद्धतीविषयी, ऐकायला मिळत होतं. कुणाला सरकारी दिरंगाईमुळे हवी ती ओळखपत्रे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भविष्याची काळजी होती. त्याच जमावात पुणं पाह्यला आलेले पर्यटकही होते. त्यातले काही ज्येष्ठ पूर्वीचं आणि आजचं पुणं यावर बोलता बोलता मानवाचं सारंच जीवन कसं यांत्रिक झालं आहे यावरची खंतही व्यक्त करत होते. मग विकास, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, हरित वायू, जागतिक परिषदांपर्यंत ते युद्धांपर्यंत सर्व विषय घुसळले जात होते. या व्यतिरिक्तही अनेक विषय होते. ती केवळ चहाची टपरीच नव्हती तर एक भलीमोठी गाव चावडी होती असे मला वाटले. एक चालतं बोलतं मुक्त बातमीपत्रच म्हणाना. लोकशाही तत्त्वांचं प्रतीकच जणू काही!
इतक्या सर्वांसाठी चहा बनवणारा तो चहावाला मला खरोखरच एक महात्मा वाटू लागला. त्या चहातलं एकतत्त्व या वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या स्वभाव जाती धर्मातल्या जनसमूहात आनंदमयी होउन, उर्जा बनून एकवटलं होतं. वंदना मला सांगत होती, ” अगं! पुण्यातली ही “माऊली चहा टपरी” अनेक वर्षांपूर्वीपासून आहे बरं का? टपरीचं थोडंफार आधुनिकीकरण झालं असेल पण बाकी सारं अगदी ४०/५० वर्षांपूर्वी होतं तसंच आहे. चहाची चव सुद्धा बदललेली नाही. आता तिसरी चौथी पिढी असेल पण या कामात त्यांच्या कुटुंबातलीच माणसं आहेत. इथे तुला एकही बालकामगार दिसणार नाही. गरजूंना रोज मिळतो. मात्र. हा मुलगाही पदवीधर आहे पण याच पारंपरिक व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. नाही तरी नोकऱ्या कुठे मिळतात? हा व्यवसाया उत्तम! या क्षणी माझ्या मनात विचार येत होता की बहुसंख्य चहाप्रेमी लोकांची गरज ओळखून या व्यवसायाची परंपरा सांभाळणारे हे खरोखरच थोर लोक नाहीत का? काम हीच प्रतिष्ठा असते. या व्यवसायांद्वारे इतकी सधनता प्राप्त करूनही त्यांनी या टपरीचे चांगल्या हॉटेलमध्ये का नाही रूपांतर केले?
पण तसं नसतं.
इथे एक मानवी मानसशास्त्र असतं. टपरीवरचा चहा आणि चहा पिणारे यांची भावनिकता ही या टपरीशीच परंपरेप्रमाणे जोडलेली असते. तो आनंद, ती भावनिकता, ते वातावरण आणि तो स्वाद जपणं हा त्यामागचा प्रयत्न आणि हेतू असावा. शिवाय टपरी चहा ही एक आगळीवेगळी संस्कृती आहे.
टपरीवर चहा पिण्याचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. तो कडक, सुगंधी, मसालेदार, वाफाळलेला कपात ओसंडून बशीत सांडलेला चहा मला चहापानाचा एक वेगळाच आनंद देत होता जणू काही मी त्या वातावरणातला एक भाग बनले होते आणि ते फीलिंग मला आवडत होतं. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, स्टेडीअममध्ये जाऊन क्रिकेटची मॅच पाहणे आणि टपरीवरचा चहा पिणे यातला आनंद एकाच जातीचा आहे असेच मला वाटले. चहापानाची माझी चौकट मी मोडली होती पण या निमित्ताने मी मानवी जीवनाचं एक वर्तमानपत्र जणू काही वाचत होते.
म्हटलं तर तो एक उनाड दिवस होता पण त्या उनाड दिवसांने मला एक वेगळी दृष्टी मात्र नक्कीच दिली. जीवनातली ही रांगडी सार्वजनिकता मला मजेची वाटली. असेही जगावे..
वंदनाने रिक्षानेच मला एका सोयीच्या वळणावर सोडले. उतरताना मी तिचा हात धरला आणि म्हटले, ” थँक्यू वंदना! आज मला खूप मजा आली. “माऊली अमृततुल्य चहा” प्यायला आपण परत या टपरीवर नक्की जाऊया.”
संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.
शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढं मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!
शाळेत असताना मी एकदा संकल्प केला. होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घालून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!
पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.
याच वयात काही कविता आवडणार्या आणि करणार्यासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एका कवितेचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.
एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्या वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!
लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्याशी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते? दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्या दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.
नेहमीसारखा संसार सुरू झाला. दोन गोजिरवाणी मुले झाली. राकेश आणि रिया. मुले हळू हळू मोठी होऊ लागली. आमच्या दोघांऐवजी मुलांच्यात तू… तू… मैँ… मैँ… सुरू झालं. बालमानसशास्त्र अभ्यासलेली मी… मी ठरवलं होतं, इतर बायकांसारखं आपल्या मुलांवर ओरडायचा नाही. त्यांना मारायचं नाही. त्यांच्याशी गोड बोलून त्यांना समजववायचं. पण माझ्या वागण्याचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी, मुलं जास्तच दाणगट, हट्टी, आक्रमक झाली. उद्धटपणे उलट उत्तरे देऊ लागली. शेवटी व्यवहारात प्रत्ययाला आलं, ‘लाथों के भूत बातों से नाही मानते. ’ शेवटी बलमानसशास्त्राचं पुस्तक मनाच्या कपाटात मिटून ठेवलं आणि भांडणार्या मुलांना बाजूला करत चार दणके दिले. तेव्हा ती गप्प झाली. आई रागावतीय म्हंटल्यावर त्यांचा हटवादीपणाही कमी झाला. थोडक्यात काय माझा दीर्घकालीन संकल्प, पावसाळयातल्या भूछ्त्र्यांप्रमाणे उगवला आणि मावळला.
राकेशची मराठीची टेस्ट होती. मी त्याचा अभ्यास घेत होते. बाबा आमट्यांवरचा धडा होता. त्यावरचे काही प्रश्न त्याला विचारता विचारता, माझ्या एकदम मनात आलं, आपल्यासारख्या सामान्यांचे संकल्प सिद्धीला न जाण्यासाठीच असतात. पण काही महात्मे असे असतात, की कितीही अडचणी येवोत, परिश्रम होवो, ते आपल्या संकल्पापासून जराही ढळत नाहीत. बाबा आमटे यांनी केलेला संकल्प, महारोग्यांना स्वावलंबी बनवणे. खूप त्रास सहन करावा लागला त्यांना, पण ओसाड जमिनीवर आंनंदवन फुलावलंच त्यांनी! अगदी कुष्ठरोग्यांच्या हातांनी.
मग एकदम हेलन केलर आठवली. मुकी, बहिरी आणि आंधळी. तिच्या शिक्षिकेने अॅना सुलिव्हनने तिच्या मनात वस्तूंची संकल्पना निर्माण करण्यासाठी काय काय प्रयत्न केले, वाचूनही थक्क व्हायला होते. पण तिने संकल्प केला आणि अखेर तो सिद्धीस नेला. तिची जिद्द आणि हेलनचे प्रयत्न, याबद्दल अनेक साहित्यिकांना लिहिल्याशिवाय राहवले नाही. वी. वा. शिरवडकरांनी तर अॅनाला किमयागारच म्हंटलय॰ हेलन ही अंध, बाहिरी असूनही तिने पदवी मिळवली. पुढे ती व्यख्याती, उत्तम लेखिका, अंधांसाठी आणि बहीर्यांसाठी वकील म्हणून काम केले. पुढे अनेक अंधांना तिने ब्रेल लिपीचे धडे दिले.
नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्या पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’
असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.
यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!
☆ जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं… – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
कधी कधी आयुष्याच्या वाटेवर अशी काही माणसं भेटतात की, त्यांच्या साधेपणातच एक विलक्षण तेज दडलेलं असतं. ते तेज शब्दांत मावणारं नसतं. ते अनुभवावं लागतं. अशा व्यक्तींना भेटल्यानंतर आपला खुजेपणा आपल्याला जाणवायला लागतो. अशाच एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी काही दिवसांपूर्वी भेट झाली… माँ कोंडाळकर आजी!
वय वर्ष ८५…सडसडीत बांधा पण शरीरात विलक्षण चैतन्य, चेहऱ्यावर प्रसन्न शांतता आणि डोळ्यांत अपार श्रद्धेचा उजेड. स्मृती आणि श्रवणशक्ती अत्यंत उत्तम. भूक लागणे हा निसर्गनियम आहे. परंतु या निसर्ग नियमावर मात करून त्याच्या विरुद्ध जगणारी काही उदाहरणे मी माझ्या आकाशझुला पुस्तकात एका लेखात दिली होती. त्यापैकी एक होत्या पश्चिम बंगालमधील प्यारी बाई आणि दुसरे उदाहरण होते गुजरातमधील एका बाबांचे. ज्यांना लोक चुडीवाले माताजी म्हणून ओळखत असत. आता ते दोन्हीही हयात नाहीत. परंतु त्या दोघांनी अन्नपाण्याशिवाय कित्येक दिवस काढले ही गोष्ट खरोखरच अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी होती. युरोपातील देखील एक संत महिला अशाच प्रकारची होती.
परंतु अशा व्यक्तींचे उदाहरण मला प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि त्यांच्याशी भेट होऊ शकेल असे कधी वाटले नव्हते. परंतु माँ कोंडाळकर यांना भेटलो आणि खरोखरच खूप धन्यता वाटली. त्यांचं नाव ताराराणी. पण सगळे त्यांना माँ म्हणून हाक मारतात. त्यांच्या आहाराबद्दल ऐकलं आणि आश्चर्यचकितच झालो. आठ वर्षांपासून त्या फक्त दोन केळी आणि थोडं दूध यावर जगत आहेत. हे ऐकताना प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटतं. वारीत तर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. तरी देखील दुपारी फक्त दोन केळी त्या घेतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही आहार त्या घेत नाहीत. पण त्यांच्यासमोर बसल्यावर जाणवतं की, शरीराच्या गरजा मर्यादित केल्या की आत्म्याची शक्ती किती व्यापक होते! शरीरात ऊर्जा केवळ अन्नामुळे येते असा आपला समज असतो. परंतु तो या माउलींनी खोटा ठरवला आहे श्रद्धेचे बळच त्यांना जगण्याची ऊर्जा देते. केवळ दोन केळी आणि दूध एवढाच आहार त्यांना या वयात देखील संपूर्ण वारी पायी करण्याएवढी ऊर्जा प्रदान करतो हे केवढे आश्चर्य!
त्यांच्याशी भेटायची उत्सुकता मला आधीपासूनच होती. माझ्या मुलीच्या सासूबाईंमार्फत त्यांच्याबद्दल ऐकलं आणि मग एक दिवस मी, माझी पत्नी श्रद्धा आणि मुलीचे सासू-सासरे असे आम्ही चौघं त्यांना भेटायला गेलो. पुण्यातील महात्मा सोसायटीत त्या राहतात. त्यांची भेट झाली आणि मी अक्षरशः भारावून गेलो.
त्यांचं आयुष्य म्हणजे एक अखंड वारी आहे. त्यांना कळायला लागल्यापासून त्या वारी करीत आहेत. आजपर्यंत एकही वर्ष त्यांनी पंढरपूरची वारी चुकवलेली नाही. वारीला जाण्याआधी त्या आळंदीला जातात, तिथून वारीसोबत पंढरपूर, आणि परत येतानाही जेव्हा इतर लोक वाहनाने येतात, तेव्हा त्या मात्र पायीच परत येतात. पुन्हा आळंदीला जाऊन दर्शन घेऊनच वारीची सांगता! सदानंद महाराज आळंदीकर हे त्यांचे गुरु! गुरूंनी अनुग्रह दिला आणि गुरूकडून घेतलेले नाम त्यांनी आयुष्यभर जपले आणि जपत आहेत.
त्या सांगत होत्या, ” वारी म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यात खूप शिस्त असते. कोणी शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला वारीतून काढून टाकतात. परंतु तिथे खूप मजा सुद्धा असते. तिथं कोणी कोणाला काही म्हणत नाही. सगळे एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. ‘माऊली चला… माऊली या…’ असं म्हणताना सगळा अहंकार गळून पडतो. ” वारीत अभंग, भजन किंवा गवळणी म्हणताना आजही या वयात त्या एखाद्या लहान मुलीसारख्या रममाण होऊन नाचतात. नाचताना सगळं काही विसरून जातात.
खरंच… ‘माऊली’ या एका शब्दातच समतेचा आणि प्रेमाचा एक विलक्षण सुगंध दडलेला आहे! आपल्या वागण्याबोलण्यामुळे वारीत त्या सगळ्यांच्या माऊलीच झाल्या आहेत. वारीत, आळंदीला आणि पंढरपूरला सगळेजण त्यांना माँ या नावानेच संबोधतात.
त्यांची दिनचर्या ऐकली की आपण थक्क होतो. रात्री सात-साडेसातला निजणं… आणि पहाटे तीनला उठणं! त्या स्वतः सांगतात, “रात्री नामस्मरण करताना केव्हा झोप लागते ते कळतही नाही. ” पहाटे उठल्यावर पुन्हा नामस्मरण, भजन-कीर्तन… सकाळी सहाला राजाराम पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनपूजन… साडेआठला परत… दुपारी ज्ञानेश्वरी, गीता, तुकाराम गाथा, विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन… आणि दिवसभर नामात रममाण!
घरात दोन मुलं, सुना, नातवंडं—सगळा संसार आहे; पण त्या त्यात कणभरही हस्तक्षेप करत नाहीत. संसारात असूनही त्या अलिप्त आहेत. संसारात राहून अलिप्तपणे जगणारी आणि आपल्या साधनेत गढून गेलेली ही योगिनी आहे. त्या स्वयंपाकघरात चुकूनही डोकावत नाहीत. समोर काहीही अगदी त्यांचा आवडता पदार्थ ठेवला तरी त्या घेत नाहीत. मंदिरात प्रसादाचा पेढा मिळाला तरी तो स्वतः न खाता दुसऱ्याला देतात!
त्यांच्या आयुष्यात दानधर्मालाही तेवढंच महत्त्व आहे. वारीत त्या एक दिवस सर्व वारकऱ्यांना आपल्या वतीने भोजन देतात. “दानधर्म केला पाहिजे, ” हे त्यांचं ठाम मत आहे.
त्यांच्या बोलण्यात एक सहज विनोदही आहे. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग तर अतिशय गमतीदार होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी त्या कोथरूडला राहत होत्या. बहुधा थंडीचे दिवस असावेत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पांढरे केस, पांढरे कपडे घालून त्या बाहेर पडल्या होत्या. एका टेम्पोवाल्याने त्यांना पाहिलं आणि त्याला वाटलं भूतच आहे! तो एवढा घाबरला की त्याने गाडी एका बाजूला घेऊन थांबवली. आजी त्याला समजवायला पुढे गेल्या, तर तो आणखीच घाबरला! मग थोडे उजाडेपर्यंत त्यात तशाच थांबल्या. शेवटी उजाडल्यावर त्यांनी खिडकीवर टकटक करून सांगितलं, “बाळा, घाबरू नकोस… मी आजी आहे! ” पण भीतीमुळे तो माणूस अक्षरशः ओलाचिंब झाला होता.
ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मनात घर करून राहत होतं.
त्यांच्या श्रद्धेची खोलीही तितकीच विलक्षण आहे. मीराबाई, जनाबाई यांची उदाहरणं देताना त्या म्हणाल्या, “श्रद्धा अशी असावी! नाम हीच इस्टेट आहे. आपण ती वापरली, तर देवाला आपली काळजी घ्यावीच लागते! ”
त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा बाणेरला राहतो आणि धाकटा त्यांच्याजवळच महात्मा सोसायटीत असतो. त्यांचे नाव सतीश. या सतीशदादांना आम्ही भेटलो. सतीशदादा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व! त्यांच्याशी थोड्या गप्पाही झाल्या. आपल्या आईबद्दल बोलताना ते म्हणाले की आठ वर्षांपासून ती काहीही खात नाही. आमच्या घरात सर्वजण माळकरी आणि शाकाहारी आहेत. सकाळी आपल्या आईला विठ्ठल मंदिरात घेऊन जाण्याचे आणि परत आणण्याचे काम सतीशदादा आनंदाने करतात.
माँ यांनी आपल्याजवळील सर्व पैसे, दागदागिने मुलांमध्ये वाटून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, ” सोने आणि रूपे आम्हा मृत्तिकेसमान. सोन्याची, धनाची, पैशाची कोणतीही आसक्ती त्यांनी ठेवली नाही. ” बोले तैसा चाले “या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या त्या आहेत. देह सुटल्यानंतरही कोणाला आपला त्रास नको म्हणून मुलांना त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं की, तिरडी, लाकूड काही नको… थेट विद्युत दाहिनीमध्ये माझे अंत्यसंस्कार करा! देहाबद्दलचे प्रेम आणि देहाची आसक्ती भल्याभल्यांना सुटत नाही. पण इथे त्यांची विरक्ती स्पष्टपणे दिसून येते.
ही विचारांची स्पष्टता… ही अलिप्तता… आणि तरीही सगळ्यांवर असलेलं प्रेम! मला वाटतं हेच खऱ्या अध्यात्माचं लक्षण असावं.
निघताना माँ ना सहज विचारलं. परमेश्वराचा एखादा साक्षात्कार आपल्या अनुभवास आला आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या मी ८५ वर्षाची आहे. फक्त दोन केळी आणि थोडे दूध एवढाच आहार आहे. या देहाला तो भगवंत दरवर्षी वारीला घेऊन जातो आणि सुखरूप परत घेऊन येतो हा मोठा चमत्कार नाही का? खरंच आहे. हे तर माझ्या लक्षात आलंच नव्हतं. मी निघताना पुन्हा एकदा त्या माउलीच्या पायावर नतमस्तक झालो.
त्यांच्याकडून निघताना एक वेगळीच शांतता मनात उतरली होती. जणू काही आतल्या गोंधळावर कोणीतरी अलगद हात फिरवला होता…”रामकृष्ण हरी “हा जयघोष मनात सुरु होता.
जरा विमनस्क अवस्थेतच होते. एकाएकी रुटीनचा कंटाळा आला. जीवनात नव्याने काही करण्यासारखे उरलेच नाही असंच वाटायला लागलं. तोचतोचपणामुळे एक प्रकारची निरसता मनाला व्यापून राहिली. प्रत्येकाची एक वेगळी चौकट ही असतेच. चौकटीच्या बाहेर काहीतरी करणे यात नक्कीच थ्रिलिंग असावं किंवा मौज असावी. अशा काहीशा विनाकारणच्या भग्नावस्थेत असतानाच वंदनाचा फोन आला. वंदनाला मी “गडगडाटी”च म्हणते. साध्या साध्या गोष्टीतही तिचा उत्साह प्रचंड ओसंडत असतो. खरं म्हणजे आमची दोघांची व्यक्तीमत्त्वे भिन्न असली तरी आमची मैत्री मात्र घट्ट आहे.
पलिकडून म्हणाली, “काय करतेस आज? थांब! काहीच करू नकोस. माझ्याकडे आज मस्त प्लॅन आहे. “प्रार्थना” मध्ये नवा स्टॉक आलाय, सेल पण आहे आणि हो हो तुझा आवडता चहा. तिथे जवळच माऊली अमृततुल्य चहाची टपरी आहे. मला माहीत आहे, तुला टपरीवर चहा प्यायला आवडत नाही. आरोग्यव्यवस्था वगैरे वगैरे पण एकदा पिऊन तर बघ. “होश उड जायेंगे तेरे” आणि तुझ्या त्या साऱ्या सोफिस्टिकेटेड चौकटी मोडून टाक बरं का एक दिवस तरी आणि काय आश्चर्य? मी पण तिला हो म्हणूनच टाकले. ”चालेल. जाऊया. कुठे भेटूया वगैरे आमचे फोनवरच ठरले.
वंदनाचं एक वैशिष्ट्य आहे ती कधीही ब्रँडेड दुकानात अथवा शोरूम वगैरे सारख्या ठिकाणी खरेदी करणारच नाही. “प्रार्थना” सारख्याच भर गर्दीतली टपरी वजा दुकानातच ती खरेदी करते.
“अगं! अशा ठिकाणी ओव्हरहेड खर्च नसतात म्हणून. तू जो ड्रेस मॉलमध्ये घेतेस ना तो इथे निम्म्या किमतीत मिळतो अगदी त्याच क्वालिटीचा. ” असेच ती नेहमी म्हणत असते आणि ते खरे ही असल्याचे मला जाणवलेले आहे. वास्तविक ही एका प्रथितयश उद्योगपतीची बायको आहे बरंका? पण विनाकारण जास्तीचे पैसे का खर्च करायचे हे तिचे तत्त्व!
टपरीवरच्या चहाबाबतीतही तेच. “अगं एकदा तरी सोड ना तुझी किटली, शृंगारिक कपबशी वगैरे. कंटेनर पेक्षा आतला पदार्थ महत्त्वाचा नाही का! काय भारी असतो गं माऊलीचा चहा! सुगंधी खऱ्या अर्थाने उत्तेजित करणारा! अहाहा! तुझ्या ताज संस्कृतीची ऐशी की तैशी! ”
तर असा हा चहा.
चहा नावाचं हे उत्कट पेय ज्याने शोधून काढलं त्याचे मी पहिले आभार मानते. त्यामागचा इतिहास काही असेल. ब्रिटिशांच्या काळात एका इंग्रज माणसानेच चीन मधून चहाचे रोप भारतात आणले आणि हळूहळू भारतात चहाचे मळे फुलले.
तशी चहाची परंपरा अश्मयुगापासून आहे म्हणतात. एकदा जंगलात फिरणाऱ्या माणसाने गरम पाण्यात एक वनस्पती टाकली. पाण्याचा रंग बदलला, सुगंध दरवळला आणि न राहवून तो ते पेय प्राशन करता झाला. हे अनोळखी पेय पिताच त्याला विलक्षण ऊर्जा जाणवू लागली आणि त्याने सारी वस्ती जमा करून हे पेय सर्वांना प्यायला लावले. तोच हा चहा.
माझ्या आयुष्यात तसा फार उशिरा आला. खात्रीशीर गवळ्याने आणून दिलेलं नुकतंच काढलेलं, पांढरं शुभ्र, फेसाळ दूध गरम करून रोज सकाळी ग्लासभर पिण्यातच माझं बालपण गेलं पण मोठी माणसं पितात त्या चहापासून मी वंचितच राहिले. बुद्धी, मेंदू स्मरणशक्तीस धोकादायक म्हणून चहा वर्ज्य पण जीवनाच्या पुढच्या पर्वात सायनस, मायग्रेन, पचनसंस्था असहकार, थकवा, मानसिक ताण यामुळे चहा जवळ आला आणि तो आयुष्यभर मस्त एक सवंगडी बनवून व्यापून राहिला. मात्र या चहापानासोबत माझे काही नखरे आहेत बरं का? एक तर मला कान तुटलेली, जराशीही फुटकी कपबशी अजिबात चालत नाही. चहा कसा मस्त हलकीशी डिझाईन असलेल्या शक्यतो सफेदच सोनेरी कड असलेल्या कपात आणि साजेशा बशीसोबत असला की चहा पिण्याची लज्जत वाढते. शिवाय मला थेट कपात डळमळत आणलेला, बशीत सांडलेला चहा प्यायला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मला देखणी किटलीही लागतेच. तर असे सगळे नखरे सांभाळतच मी चहाचा खरा आनंद (माझ्या दृष्टीने) अनुभवात असते. मी ४० वर्षे नोकरी केली पण त्या दरम्यानही मी माझा चहा कपबशीसह थर्मास मध्ये नेत असे. टपरीपेक्षा थर्मास बरा म्हणून आणि त्या कारणाने सह कर्मचाऱ्यांकडून माझी भरपूर थट्टा ही झालेली आहे. त्यावेळी “लोगों का काम है कहना… छोडो बेकार की बातों को.. ” अशा झोनमध्येच मी स्वतःला ठेवायचे.
तर सांगायची गोष्ट अशी की आज वंदना बरोबर एक मस्त उनाड दिवस जरासा चौकटी बाहेरचा घालवायचाच असे मी ठरवले.
लक्ष्मी रोडवर भर गर्दीत एका गल्लीतल्या मारुती मंदीरा जवळ आम्ही भेटलो. वंदना नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साही आणि खळखळणारीच. दिवस आषाढ महिन्यातले असूनही अगदी काही कोसळणारा पाऊस त्या दिवशी नव्हता. पावसाची फक्त भुरभुर होती. हवा छान थंडगार होती आणि सारं मजेदार वाटत होतं. गजबजलेले रस्ते, माणसं, वाहनं, फेरीवाले, रस्त्याच्या दुतर्फा छोटी मोठी दुकाने, हॉटेल्स सगळं काही. मी फारशी कधी या भागात येत नाही पण आज वंदना बरोबर गप्पा करत, गर्दीतून वाट काढत, मनसोक्त शॉपिंग करत, लहान लहान, फूटपाथवर पसरलेल्या दुकानापाशी थांबत, चालण्यात मला खरोखरच खूप मजा वाटत होती. या वैविध्यात, गर्दीत एक चैतन्य होतं. एक जीवन होतं. धक्काबुक्की, आवाज, गोंधळ पावसामुळे रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला साठलेले जलाशय चिखल सारंच मजेशीर वाटत होतं मला एकदम “रोमन हॉलिडे” चित्रपटातली ती बागडणारी “अॉड्री हेपबर्न” आठवली. भटकण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शिणलो होतो. थकलो होतो. चहाची एक मस्त तल्लफही जाणवत होती. तेवढ्यात वातावरणात खमंग कांदा भजीचा वासही दरवळला आणि त्यासोबत चहाचा सुगंधही. चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया.”