मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर…. विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ मनमंजुषेतून ☆ कल्पवृक्ष भेटला तर.... विषय एक : दोन बहिणी – दोन लेख ☆ सौ. राधिका भांडारकर आणि सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
☆ कल्पवृक्ष भेटला तर.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
देव जरी मज कधी भेटला। माग हवे ते माग म्हणाला.....हे गाणं मला फार आवडायचं.
अजुनही आवडतं...तेव्हां विचार करायची, खरंच देव भेटला तर...?नियोजन हा माझा स्थायी स्वभाव असल्यामुळे मी अगोदरच मागण्यांची यादी करुन ठेवली होती...कारण ऊगीच देव घाईत असला तर ऊशीर नको व्हायला.... आपली तयारी असलेली बरी...!! पण देव काही भेटला नाही.जगाचा कारभार सांभाळण्यात इतका गुंतला की माझ्यासारख्या सूक्ष्म जीवासाठी त्याला वेळच मिळाला नाही...
माझी यादी वर्षानुवर्षे तशीच पडून आहे....
आणि आता अलीकडे माझ्या मनात सहज विचार आला, देव नाही तर नाही, त्याचा एखादा सचीव भेटला तर....
शंकराच्या देवळांत नाही का..? आधी नंदीला पुजावे लागते...
मानवाच्या बाबतीतही कुणा स्टारची भेट हवी असेल तर अगोदर सेक्रेटरीशीच बोलावे लागते.....
मग आठवलं...कल्पवृक्ष...!! स्वर्गातला देवांचा सहकारी...तो भेटला तर...?
मी जपून ठेवलेली ती यादी बाहेर काढली...एकेका मागणीवरुन नजर फिरवली......
तशी म्हणा मागण्यांची सवय माणसाला जन्मजातच असते....मानवाचा पहिला ट्याँहा च मुळी मातेच्या दूधाची मागणी करण्यासाठी...