श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “प्रतिक्षा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
ये रे ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही तिघेही…
मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि
तो तुझा गरमागरम चहाचा कप…
आम्ही सारेच निशब्द, स्तब्ध आणि बरचं काहीसं हरवून गेल्यासारखं बसून राहिलोय या गवाक्षाजवळ…
एकच एक तुझी कमी भासतेय आम्हाला… मैफिल खोळंबून राहिलीय..
ती टपटप गळणारी सरीवर सरी मला सांगतेय कि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे…
हाती तुझ्या वाफळता चहाचा मग आहे… तरीही तू का उदास आहे…
अरे वेड्या जरा माझ्या कडे पहा मलाही असतात बरं तुझ्यासारख्या भावभावना..
पण त्याच मी जर उराशी कवटाळून बसले तर मला जगता येईल का..
म्हणून मी असे काळ्या ढगातून ओघळत असते आणि आणि माझ्या भावभावनां ओघळू देते..
टाकलेले उसासे माझे विरघळतात तुमच्या चेहऱ्यावरील आनंदात जे तुम्ही मला जेव्हा पाहतात तेव्हा मला माझ्या आयुष्याचा अर्थ गवसतो..
आणि तू मी इथं तुझ्या अवतीभवती वावरत असताना नि हातातील मगातले गरमागरम चहाचे चुटके घेऊन मनाला तजेला करण्या ऐवजी…
तो कोण अद्यापही आला नाही याच्या चिंतेत बसतोस… आणि या आनंदाला मुकतोस..
बघ तो चहाचा मग सुद्धा कसा आता त्या गरमागरम चहाने रागावून गाल फुगवून तुझ्या कडे पाहात बसलाय..
काय अरसिक माणूस असेल हा.. इतक्या सुंदर वातावरणात आणि एखाद्याची कवि प्रतिभा कशी खुलून आली असती आणि झरझर मोत्यांच्या ओळीत कविता सरसर कागदावर उतरली असती…
पण नाही ना हा अरसिक मनाचा त्याला सौंदर्याचा, निर्सगाचा आस्वाद कसा घेतात तेच ठाऊक नाही… आणि उगाच तो कोण कुठला त्याच्या प्रतिक्षेत आपल्या बरोबर आम्हालाही ताटकळ ठेवलयं…
ती टपटप ओघळणारी पावसाची सर आणि तो गरमागरम वाफळता चहाने भरलेला मग त्याला अखेरचं निक्षेपानं सांगू लागले…
आम्हांलाही मर्यादा असतात हे ठाऊक आहे ना तुला.. मग आमच्या सोबतीची ठेवना जर कदर… का ओढून घेतोस मनावर विषण्णेतेची चादर…
अरे आता नाही तरी नंतर पुढे काही वेळेत आमच्यातला जोश ते हवेहवेसे चैतन्य लोप पावत जाईल..
मग थंड पडलेल्या कलेवरासारखे तूच काय कुणीच आमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही..
मग तूच म्हणशील या पावसानं काय उच्छाद मांडलाय नि त्यात तो मगातला चहा तर गारठोण झालाय..
दिवसाची सुरुवात तरी या मुड ऑफ करणाऱ्या गोष्टीने तरी व्हायला नको होती…
पण पण तो देखील का बरं नेमका आज उशीर करून राहिलाय…
त्याला पक्कं ठाऊक असतं अश्या रम्य वातावरणात मी त्याची नेहमीच आवर्जून वाट पाहत असतो..
आणि तो सोबत असतो तेव्हा तेव्हा आमच्या या मैफिलीला खुमार चढत असतो..
तो बोलत जातो एकामागोमाग एक बोरकर, पाडगावकर,शांताबाईंच्या आणि बऱ्याच कविंच्या कविता मागून कविता..
बाहेर टपटप ओघळणाऱ्या सरीच्या तालावर धुंदफुंद झालेल्या वातावरणात हातातले गरमागरम वाफाळ लेले चहाचे घुटके घेत असताना सारं सारं काही चैतन्यानं फुलंत उमलत जातं…
मी माझा राहातच नाही…
आणि यासाठीच मी त्याची चातकासारखी वाट बघत असतो…
जरी सोबतीला ती टपटप ओघळणारी पावसाची सरीवर सर आणि वाफळता चहाचा मग माझा आणि त्याचा असले तरी…
त्याच्याशिवाय मैफिल रंगतच नाही…
मन उदास होऊन बसतं त्याला जसजसा उशीर होतोय माझ्याकडं येण्यासाठी…
आणि आक्रंदन करणारं मन त्याला बोलवंत राहतं…
ये रे कधीची तुझी वाट बघत बसलोय आम्ही…
मी, ह्या टपटप गळणाऱ्या पावसाच्या सरी आणि
तो तुझा गरमागरम चहाचा कप…
आता अधिक उशीर लावू नकोस बरं…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





















