गणित तर समजून घ्या. “मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.
आपण असे मानू या की.
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3 असे
मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.
आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत / HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K =
8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’. याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E =
11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.
काही लोक म्हणतात “नशिब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%, “नशिब” तर एकदमच काठावर पास.
काहींना चांगले आयुष्य जगण्या साठी “पैसा /MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स ?
13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.
बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण / LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो ?
काही कल्पना करू शकता ?
नाही जमत ?
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन / ATTITUDE”
आता एटिट्यूड” चे आपल्या कोष्टकानुसार गुण तपासू…
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%. पहा आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.
“दृष्टिकोन बदला …आयुष्य बदलेल”
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..
बघा हं…
(सकाळचा अलार्म झाल्यावर)
याऽऽऽऽऽऽऽर झाली लगेच सकाळ..
आत्ता तर डोळा लागला होता..
(ब्रश करताना)
काय भाजी बनवु आता..?
(गॅस जवळ आल्यावर)
एवढीच झाली भाजी… पोरं खातील कि नाही देवजाणे…
(आंघोळीला जाताना)
कोणता ड्रेस घालु याऽऽऽऽऽऽऽर… सापडत एक काही नाही जागेवर… निळ्यानी गरमी होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते…त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो..
या… या.. आता माझ्या अंगावर पडा एकदाचे..नाही या ना या कितीही आवरा पुन्हा तेच
(घरातुन निघताना)
च्यायला काय घड्याळ पळतय… कितीही लवकर उठा तीच बोंब…
(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालु असतो)
पंडितजी तुम्ही कसलं भारी गाताय पण माफ करा मला जावं लागेल आता.. सात वाजलेत..
(गाडी चालवताना)
एखादा ओव्हरटेक करत असेल तर..
नाही ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तु ही यमसदनी जा आणि मला ही ने….
(खूप जण बॅक मिरर मधुन मागे बघत असतात….तेव्हा)
अरे बाबा काय बघतोस मागे दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं…
(Office पोचल्यावर)
हुऽऽऽऽऽऽऽश…. झालं एकदाचं टाईम मधे इन.. झालं… देव पावला..
(लिफ्ट बंद असेल तर)
नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तु लिफ्ट बंद करणार… घे अजुन काबाडकष्ट करुन घे माझ्या कडुन… हाडं मोडून जाऊ दे माझी…
(जेवताना)
किती लवकर ब्रेक संपतो.…..निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा..
(दुपारी पाठ टेकवताना)
च्यायला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा..
(चहाच्या वेळी)
कोणी एखादा कप चहा करुन दिल तर शपथ…….. वॉकिंग करावं लागेल..ढिगभर वजन वाढतय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे…
(वॉक करताना)
आताच फोन उरकुन घ्यावेत वॉकिंग टाईम पण लवकर संपतो…..
एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर..
नाही जा अजुन जोरजोरात करा वॉकिंग मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचय बना मला काही फरक पडत नाही
(संध्याकाळी स्वयंपाक करताना)
एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही..
आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको..
अजिबात भुक नाही…. एवढी भुक लागतेच कशी माणसाला
(किचन आवरताना)
नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुणी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणुन देऊ का…??
(झोपताना)
आता कुणीही माझ्या खोलीत टपकु नका तासभर….. जरा बघु द्या मोबाईल मला.. ईतके मॅसेज येतात एक धड वाचुन होत नाही….
(दुसऱ्याचे स्टेटस बघुन)
यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….
काय बाबा हल्ली तर कुणी काहीपण कपडे घालतं….
(झोप आली असताना)
झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालु आहेत वेळेच्या आधी तडमडावं लागेल…..
(आणि मध्यरात्री जाग आल्यावर)
बापरे तीन वाजले… दोन तासात उठायचय झोपा पटकन थोडावेळ..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ असेही एक पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल तोही स्मार्ट, आल्यामुळे “पत्र लेखन आणि वाचन” हे इतिहासजमा झाले आहे .
“गुरुदेव रानडे” ना त्यांच्या गुरुदेवांनी लिहिलेले पत्र वाचकाना नक्कीच विचार करायला लावेल .
बॉंबे रॉयल हिंच क्लब
१९ डिसें १९०७
प्रिय रानडे,
तुम्ही व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने तुमची निराशा झाली असणार . मला तुमच्या बद्दल खरोखर खूप सहानुभूती वाटते . याची तुम्हाला कल्पना आहेच .
तुमच्या उपजत बुद्धिमत्तेचा विचार करता परीक्षेतील गणना ही एक क्षुल्लक बाब आहे . माझ्यापुरते मी म्हणेन की परीक्षेतील निकालापेक्षा अगदी स्वतंत्रपणे तुम्ही आपली बुद्धिमत्ता इतरत्र कुठेही दाखवू शकाल . मला असे निश्चित वाटते की पहिल्या वर्गाचा मान जर कोणाला द्यायचा असेल तर तो तुम्हालाच दिला पाहिजे . केवळ दुर्दैव आड आले म्हणूनच तो तुम्हाला आत्ता मिळाला नाही .
मला तुमच्या लक्षात एवढेच आणून द्यावयाचे आहे की, तुम्हाला खरे जाणणारा प्रत्येक जण किंवा तुम्ही स्वतःही या तात्पुरत्या अपयशाची फिकीर करणार नाही व तुम्हाला कमी लेखणार नाही .
तुमच्या बद्दल माझ्या मनात प्रेम व आदर असल्याने तुमच्याबद्दल वाटेल ते करण्याची मी पराकाष्ठा करीन . मला तुम्ही आपला कायमचा मित्र समजा आणि जरूर तेव्हा वाटेल ती मदत करण्यास मी सिद्ध आहे, असा विश्वास बाळगा .
मानव म्हणून स्वतःचे जे काही कर्तव्य आहे, त्या एकाच खऱ्या परीक्षेत तुम्ही अगोदरच उत्तीर्ण झाला आहात . तुमच्या खऱ्या गुणवत्तेवर अवलंबून रहा . परीक्षेतील यश हे त्यापुढे काहीच नाही असे समजा …
प्रिय राम, शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की तुमचा मित्र म्हणवून घेण्याचा मान मला मिळाला, याचा मला अभिमान वाटतो . तुमच्याकरीता जे जे काही मला करता येईल ते ते मी आनंदाने करीन .
तुमचा खरा मित्र,
प्रो.ई. ए . वुडहाऊस .
संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले
मो 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “बाबा आमटे –एक विज्ञानयोगी —” लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆
२६ डिसेंबर — आदरणीय बाबा आमटे यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने —
“कुर्यात सदा मंगलम–” मी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता. बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातुन मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती. एका मुहूर्तावर आठ लग्ने लागत होती आणि अचानकपणे मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजीची भूमिका माझ्याकडे आली होती! जरीकाठी धोतराचा लांबच लांब अंतरपाट धरला होता. हातात वरमाला घेऊन आठ रोगमुक्त वधू उभ्या होत्या आणि समोर आठ रोगमुक्त वर होते. सुदंर मांडव सजला होता, पण गर्दी खूप दाटली होती. त्यामुळे शेकडो माणसे उघड्यावर आकाशाच्या छताखाली बसली. आनंदवनातल्या गायींच्या खिल्लाराने मुहूर्त गोरज आहे हे गोठ्यात परतताना उडवलेल्या धुळीतून सिद्ध केले होते.
आली लग्नघडी वधूवरशिरी टाका सुमंत्राक्षता-” मंगलाक्षतांचा वर्षाव झाला. एकेकाळी केवळ क्षतांनी भरलेल्या शरीरावर आज साताठशे लोकांच्या समुदायाने शरीरावर आज साताआठशे लोकांच्या समुदायाने मंगलाक्षतांची वृष्टी केली. अंतरपाट दुर झाला. आठ लग्ने एकदम लागली.
त्या आनंदवनात मंगलाष्टके म्हणताना मनात आनंदाचे आऊर दाटले होते, ते क्रांतीच्या अशाच एका सुदर्शानाने! बाबा आमटे या माणसाने एक अलौकिक प्रयोग सुरू केला. नुसता मानवतावादाचे शांतिपाठ गाणाऱ्या प्रवचनकाराचा नव्हे. आमच्या देशात जिवंतपणे जगणारे कमी आणि जीवनाचे भाष्यकार रगड. बाबा आमटे तसले योगी नव्हते.
वऱ्हाडातल्या गोरजे गावच्या सधन इजारदार घराण्यात छपन्न वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा मुरलीधर आमटे. चांदीच्या चमच्याने उष्टावण झालेला. शेकडो एकर उत्पन्नाच्या जोडीला वडिलांना मानाची सरकारी नोकरी. बाबांच्या आईने तर लहानपणी त्यांना बोंडल्यातून दुधाऎवजी धाडसच पाजलेले दिसते. या माणसाला भीतीचा स्पर्शच नाही. नुकती पन्नाशी उलटलेल्या या माणसाने आयुष्यात नरभक्षक वाघांपासून ते नरराक्षक गुंडांपर्यंत कुणाकुणाशी कसा-कसा मुकाबला केला, याचा वृत्तांत ‘टारझन’च्या कथेपेक्षाही अधिक रोमांचकारी आहे. मोठ्यामोठ्या संस्थानिकांकडेच असणारी रेसर गाडी स्वत: बाळगून कराचीच्या मोटार रेसमध्ये भाग घेणारा हा तरूण सर्वसंगपरित्याग करून डोक्यावर घाणीची पाटी घेऊन हिंडला आहे. हॉलीवूडच्या नटनटींना त्यांच्या चित्रपटांवीषयी परिक्षणे लिहून पाठवली आहेत.
आजदेखील बाबा आमट्यांच्या चंद्रमौळी घरात भिंतीवर पुढारी लटकलेले नाहीत. सुरेख तसवीर आहे ती नॉर्मा शिअररची. ही असामान्य नटी व तिचा अभिनय हा आजही बाबांच्या गप्पांचा आवडता विषय आहे. ज्या हातांनी त्यांनी शिकार केली, त्याच हातांनी त्यांनी माहारोग्यांच्या जखमा धुतल्या आहेत. विनोबांच्या `गिताई’ चे गठ्ठे डोक्यावरून वाहून विकले आहेत आणि धनाढ्य, धंदेवाईक बुक-डेपोवाल्यांना अधिक कमिशन आणि दारोदार नेऊन `गिताई’ पोचविणाऱ्या अर्धपोटी बाबाला आणि ताईला फडतूस कमिशन देणारे सर्वोदयी गणित न समजल्यामुळे जे मिळाले तेही फेकून दिले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी व्रतांचे त्यांनी खडतर पालनही केले आहे. त्यामुळे असल्या व्रतांच्या मर्यादा ते ओळखून आहेत आणि वनवासी भिल्लांना रानडुक्कर मारून स्वत: भाजून देऊन खाऊ घातला आहे. हा माणूस आहे की वेताळ असे वाटावे, असल्या धाडसाने भरलेले हे आयुष्य या गर्भश्रीमंत तरूणाचे पुर्वायुष्य आणि आजची त्याची आनदं वननिर्मीती यांच्यामागे एकच प्रवृत्ती होती. ती म्हणजे मनाला पटले ते प्रमाण पणाला लावून करण्याची! पेटायचे ते कापरासारखे सर्वांगाने पेटायचे. नुसता फुटबॉल खेळायचा म्हटले तरी जीवनमरणाचा लढा आहे. अशा ईर्ष्येने खेळणारा हा खेळाडू आणि म्हणूनच त्याचे कार्य पहायला कुणी आले काय, न आले काय, बाबांची धूंदी उतरत नाही.
(पु. ल. देशपांडे यांच्या `गुण गाईन आवडी’ या पुस्तकातून साभार)
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ – पॅराशूटस्… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एअर कमांडर विशाल एक जेट पायलट होता. एका मिशन मध्ये त्याचं फायटर विमान मिसाईल ने उडवलं गेलं. तत्पूर्वी त्याने पॅराशूट घेऊन उडी मारली आणि बचावला. सर्वांनी त्याचं फारफार कौतुक केलं.
पाच वर्षांनंतर पत्नीसोबत तो एका रेस्टोरन्टमध्ये बसला असताना बाजूच्या टेबलवरील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुम्ही कॅप्टन विशाल ना? तुम्ही जेट फायटर चालवायचात आणि ते पाडण्यात आले होते.”
“पण हे तुला कसे माहीत?” विशालने त्याला विचारले.
तो मंद स्मित करीत म्हणाला, “मीच तुमचं पॅराशूट पॅक करून विमानात ठेवत असे”.
विशाल आश्चर्य आणि कृतज्ञतेने आ वासून विचारात पडला की जर पॅराशूट नीट उघडलं नसतं तर मी आज इथे नसतो.
त्या रात्री विशाल त्या व्यक्तीच्या विचाराने झोपू शकला नाही.
त्याला आश्चर्य वाटत राहिलं की त्या व्यक्तीला कितीवेळा पाहिलं असेल, पण साधं शुभप्रभात, तू कसा आहेस? एवढं देखील आपण विचारलं नाही. का तर तो स्वतः फायटर पायलट आहे आणि ती व्यक्ती एक साधी सुरक्षा कामगार.
तर मित्रानो, तुमचं पॅराशूट कोण बरं पॅक करतेय?
प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो.
आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूटची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
सुरक्षा जोपासण्यासाठी आपण या सर्व आधारांची मदत घेत असतो.
काहीवेळा दैनंदिन आव्हानांना सामोरे जाताना आपण काहीतरी महत्वाचं विसरत असतो.
आपण समोरच्याला हॅल्लो, प्लिज, धन्यवाद, त्याच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टींसाठी अभिनंदन, एखादी छानशी कॉम्प्लिमेंट किंवा त्यांच्यासाठी काहीही कारण नसताना काहीतरी चांगलं करावं हे करायचं राहून गेलं असणारच.
आता जरा आठवून पहा, ह्या वर्षभरात कोणी कोणी तुमचं पॅराशूट पॅक केलं ते.
या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी शब्दांद्वारे, कृतीद्वारे, प्रार्थनेद्वारे माझं पॅराशूट पॅक केलं आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कुणालाही गृहीत धरू इच्छित नाही.
अगदी मनःपूर्वक प्रेमपूर्वक मी आपणा सर्वांना 2023 च्या संस्मरणीय अखेरीसाठी आणि 2024 च्या सुंदर प्रारंभासाठी शुभेच्छा देतो
☆
कवी : अज्ञात
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जगी हा खास वेड्यांचा…! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
हजारो वेड्यांना नाना प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याचं वेड असतं. नोटा, नाणी, पोस्टाची तिकीटं, दिग्गज व्यक्तिंच्या सह्या, पुरातन कालीन वस्तू … आणि नाना प्रकारची पुस्तकं सुद्धा! विशेष म्हणजे ही सारी वेडी मंडळी, आपापले संग्रह झपाटल्यासारखे, अतिशय कष्टाने, स्वतः पदरमोड करून, वैयक्तिक पातळीवर करत असतात.
श्री. अंकेगौडा हा कर्नाटकातील असाच एक पुस्तक वेडा माणूस. गरीब शेतकऱ्याच्या घरांत जन्माला आलेला आणि आता सुमारे पासष्ट वर्षे वय असलेला हा माणूस गेली पन्नास वर्षे पुस्तकांचा संग्रह करतोय. आज मितीला त्याच्या संग्रही किती पुस्तक असावीत असा अंदाज आहे? हजार? पाच हजार? दहा हजार? …. नाही !! आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे पण आज घडीला त्यांच्या संग्रहामध्ये पंधरा लाखाहून जास्त पुस्तके आहेत !!
आमचा आपला एक व्यावहारिक विचार —
अंकेगौडा यांच्या जिद्दीला, चिकाटीला आणि एवढ्या मोठ्या अवाढव्य कामाला त्रिवार सलाम !!
पण …
हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं आता त्यांनाही खूप कठीण होत चाललं आहे. एवढी पुस्तकं ठेवण्यासाठी लागणारी जागा, कपाटं, स्टॅन्डस् , बुकशेल्फ यांची सोय नसल्यामुळे ढिगावारी पुस्तकं नुसती अस्ताव्यस्त पडली आहेत. त्यांची कुठे कसली यादी नाही, वर्गवारी केलेली नाही, अनुक्रम नाही. वाळवी, कसर हे पुस्तकांचे मोठे शत्रू. त्यांच्या बंदोबस्ताचं काय? एकेकाळी रोज शंभर-दीडशे माणसं संग्रहालय पहायला यायची, आता दोन-तीन माणसं सुद्धा येत नाहीत. कारण हवं असलेलं पुस्तक शोधणार कुठे आणि कसं? समुद्रकाठच्या वाळूतून आपल्याला हवा असलेला कण शोधणार कसा?
आणि त्यामुळे भला मोठा पुस्तक संग्रह, एवढंच कौतुक शिल्लक राहतं ! व्यावहारिक उपयोग काहीच नाही !!
लेखक : अज्ञात
संग्राहक – सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.
आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..
मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.
कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..
” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..
शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..
आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..
सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..
त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून नाकाच्या आत गाठ मारलेली..
याचं नाव सुंकलं..
परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…
मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..
दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…
” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ”
नि ” टिमक्याची चोली बाई ” गाण्यावर मनमुराद नाचायचं..
” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ” अशा गुजराती मारवाडी नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची नि सुरेखशा साखळीनं ही नथनी केसाशी नाहीतर कानातल्याशी संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!
या नथन्या त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत निपचित पडून रहायच्या!
आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं नि महाविद्यालयाचं शहर लागलं..
या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…
कधी रेखाची नाहीतर राखीची नाकातली रिंग तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी मनातल्या मोरपिसाला साद घालायची..
अशी चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..
भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की जीव शांत शांत व्हायचा..
त्या चमकीचा प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..
एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..
चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..
नंतरचे अनेक दिवस औषधाचे नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू डोस गपगुमान गिळावे लागले..
चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…
आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …
कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..
त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..
घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की तिचं अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य स्वर्गीय भासायचं…!!
आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …
नि आपण कधीही नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..
लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..
उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..
” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा मान आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “
आता ही नथ दागिना राहिली नव्हती..
ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …
आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!
मी अचानक मोठी झाले..
लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!
आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!
सुंदर दिसावं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…
फक्त महाराष्ट्रातच नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…
केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..
मंगळसुत्राखालोखाल सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा मोठा मान…
तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..
या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..
नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..
महिलांच्या शरीराची डावी बाजू ही प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..
म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..
यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..
खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…
मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…
पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..
इतरवेळी जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.
नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी
अगदी उंची साडीवरही दिसू लागलीय…!!
असतो एकेकाचा काळ …
कालाय तस्मै नम: !!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.
हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं.
मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे.
त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात, ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचं राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायचं . की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेन !
ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत.
त्यात कुणी लिहिलेलं असायचं की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन.
– तर कुणी लिहायचं …. माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे.
– कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार
– एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल, तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन.
– निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही.
– एका सासूने लिहिलं होत…. लेक आणि सुनेत मी थोडं डावं-उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !
अशी अनेकांनी त्यांची- त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली.
*
आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटरमध्ये नेत आणि यशस्वीरीत्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो “उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म” त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर “टिकमार्क” करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?
*
आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, “जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे.”
किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायचं आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे.
*
आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत, जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं?”
यावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.
डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे, माहीत नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे, ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा.
आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभवातून सांगतोय.
*
पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय. जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं, पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या, असं सांगितलं होतं,तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय. योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk) आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास! याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच !
*
आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.
कारण… असं म्हणतात की
जो प्राप्त है-पर्याप्त है
जिसका मन मस्त हैtt
उसके पास समस्त है!
लेखक :डॉ. धनंजय देशपांडे
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈